Sunday, July 27, 2014

एक विलक्षण भुरटे आंदोलन!

पुदुच्चेरी हा भौगोलिकदृष्ट्या विखंडीत आणि राजकीयदृष्ट्या नगण्य प्रदेश. केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्यामुळे तर तेथील घडामोडी राष्ट्रीय माध्यमांमध्ये क्वचितच जागा मिळवितात. वर्ष-दोन वर्षांतून मी तेथे जातो तेव्हा काही ना काही गमतीदार मात्र हमखास पाहायला मिळते. असा एक किस्सा मी याआधी वर्णन केला होता.

त्या किश्श्यावर वरताण असा एक प्रकार मला यंदाच्या दौऱ्यात पाहायला मिळाला. पुदुच्चेरीतील भारतीयार रस्ता आणि फ्रांस्वा मार्तेन रस्सा जिथे मिळतात ती जागा अत्यंत महत्त्वाची आहे. श्री अरविंद आश्रम, आश्रमाचे भोजनगृह, मनक्कुळ विनायगर (गणपती) मंदिर, पुदुच्चेरी सरकारचे सचिवालय, राजनिवास, विधानसभा, फ्रेंच सरकारचे वाणिज्य दूतावास, रोमां रोलां वाचनालय व ग्रंथालय अशा अनेक महत्त्वाच्या जागा या परिसरात आहेत. बहुतेक सरकारी कार्यालये याच ठिकाणी असल्यामुळे आंदोलन निदर्शनांचा येथे धडाका चालू असतो.

गेल्या वेळेस (ऑगस्ट 2012) मध्ये ख्रिश्चन लोकांना आरक्षण देण्यासाठी येथे आंदोलन चालू होते. यावेळीही असे एखादे आंदोलन आहे का, हे मी पाहत होतो. मी गेलो तेव्हा 16 जुलै रोजी भारतीयार उद्यानासमोर नेहरू पुतळ्याच्या बाजूला शिक्षण खात्यातील काही महिला कर्मचाऱ्यांचे चक्री उपोषण चालू होते. दोन तीन दिवसांच्या मुक्कामात, हे चक्री उपोषण म्हणजे या बायका सकाळी येणार, तेथे टाकलेल्या प्लास्टिक खुर्च्यांवर बसणार, काही महिला खाली जमिनीवर सतरंजी अंथरून त्यावर बसणार, मग संध्याकाळी सर्व काही आवरून घरी परतणार, पुन्हा दुसऱ्या दिवशी येणार, असा प्रकार असल्याचे मला दिसले. त्यामुळे त्यात लक्ष देण्यासारखे काही नव्हते.

Devidas0114 मात्र मला हवे होते त्यापेक्षा आणखी कैकपट गमतीशीर असे मला पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले. श्री अरविंद आश्रमाच्या भोजनगृहातून मी बाहेर पडलो. त्यावेळी दुपारचा 11:30 – 12 चा सुमार असेल. प्रवेशद्वाराच्या बाहेर येताच उजव्या बाजूला एक घोळका दिसला. राजनिवासाच्या डाव्या हाताला हा भाग येतो. येथे काहीतरी घडत आहे किंवा घडणार आहे, असा मला वास आला.

तिथे गेलो तर काही लोक एका माणसाचा फोटो एका मोठ्या फळीला चिकटवत असल्याचे दिसले. त्यांच्या भोवती काही छायाचित्रकार सरसारवल्याचे आणि एकजण त्याचे दृश्यांकन करत असल्याचेही दिसले. पुदुच्चेरीत आल्यानंतर दर्शन झाल्यावर मी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे रोमां रोलां वाचनालयात गेलो होतो. साधारण ताज्या घडामोडी काय आहेत, याचा अदमास घेतला होता. त्यामुळे या प्रकाराचा अंदाज याचा यायला लागला.

त्या गृहपाठामुळे हे छायाचित्र नायब राज्यपाल विरेंद्र कटारिया यांचे असल्याचे मी ओळखले. कटारिया यांना चारच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने हटविण्याचे आदेश काढले होते. राज्यातील सत्ताधारी एनआर काँग्रेस पक्ष केंद्रातील नव्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य आहे. शिवाय कटारिया आणि मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्यातून विस्तवही जात नव्हता. त्यामुळे रंगास्वामींच्याच सांगण्यावरून कटारियांचा पत्ता कट झाला होता, हे उघड होते.

आता गुमान आपली खुर्ची सोडण्याऐवजी कटारिया यांनी शेवटची चाल खेळली. राजनिवासात पत्रकार परिषद बोलावून त्यांनी सांगितले, की मुख्यमंत्री आणि त्यांच्या हस्तकांच्या भ्रष्टाचारात त्यांनी आडकाठी आणल्यामुळेच त्यांची गच्छंती करण्यात आली आहे. शिवाय मुख्यमंत्री व मुख्य सचिवांनी मला फसवून (कांची येथील पुजारी) शंकररामन हत्या प्रकरणात शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना निर्दोष सोडण्याच्या न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी घेतल्याचाही आरोप त्यांनी केला. (इतकेच नाही तर स्वतःच्या हकालपट्टीची कारणे शोधण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचाही आधार घेण्याची घोषणा त्यांनी पुढच्या दिवशी केली.)

ही सर्व हकीगत त्या दिवशीच्या वृत्तपत्रांत छापून आली होती. त्यावर राज्यपालांचे आरोप योग्य नसल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रियाही छापून आली होती. पण राजापेक्षा राजनिष्ठ नसतील तर ते कार्यकर्ते कसले?

तेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळल्याबद्दल कार्यकर्ते येथे त्यांचा रोष व्यक्त करणार हे उघड होते. पण ते नक्की काय करणार, याचा अंदाज येत नव्हता.

इतक्यात त्यातील मुख्य कार्यकर्त्याने पुकारा केला, "मॅडम या, मॅडम या".

आता काय होणार याची मला उत्सुकता लागली होती. म्हणून मी माझा मोबाईल काढून कॅमेरा चालू केला.

Devidas0118 हाक मारलेल्या मॅडम आल्या. हाक मारणारा कार्यकर्ता त्या फोटो नि फळीला रस्त्याच्या एका बाजूला घेऊन आला. त्याला मदतीला पाच-सहा जण होते. उंची साडी घातलेल्या मॅडमही फळीच्या शेजारी होत्या. त्यांनी एका गरीब दिसणाऱ्या बाईला हाक मारली.

ती मध्यमवयीन बाई बिचारी एक बादली घेऊन आली. ती बादली कार्यकर्त्यांच्या घोळक्यात ठेवण्यात आली आणि काही कळायच्या आता कार्यकर्त्यांनी बादलीतला माल हाताने उचलून फळीवर फेकण्यास सुरवात केली. ते शेण असल्याचे वासावरून जाणवले. इकडे छायाचित्रकार हातघाईवर आले. मीही त्या क्लिकक्लिकाटात सामील झालो.

इतक्यात आपली ही नेमबाजी आपल्या चेहऱ्यासह छापून आली पाहिजे, हे एकाच्या लक्षात आले. मग त्याने घोळक्याला सूचना दिल्या आणि कॅमेराधारकांना फळी सहज दिसेल, अशी विभागणी करण्यात आली. मग परत लेन्सात डोळे घालून कटारियांचा चेहरा `गोमय` करण्यास सुरवात केली. सर्व कार्यकर्ते, अगदी त्या मॅडमसकट, इमानदारीने शेण फेकत होते बहुतेक. कारण संपूर्ण फोटोवर हिरवे आच्छादन पसरले होते.

या सर्व वेळेत कार्यकर्त्यांच्या घोषणाही चालूच होत्या. 'राज्यपाल, चले जाव' हे तमिळमधून सर्व जण कटारियांच्या छायाचित्राला ऐकवत होते.

Devidas0116 तितक्यात एका कार्यकर्त्याने ते छायाचित्र पाण्याने धुवून काढले. शेण वाळण्यापूर्वीच धुतल्याने कटारियांचा चेहरा पुन्हा स्वच्छ दिसू लागला. आता हाक मारणाऱ्या कार्यकर्त्याने कुठूनतरी एक प्लास्टिकची पिशवी पैदा केली. त्यातून त्याने नासके-किंवा वाळके म्हणूया – टमाटे काढले आणि सर्वांना वाटण्यास सुरुवात केली. परत नेमबाजी सुरू झाली.

हिरव्या रंगानंतर छायाचित्राला लाल रसाने न्हाऊ घालण्यात आले होते. इतका वेळ सगळा खेळ, बेट लावणारा पंटरसुद्धा पाहणार नाही इतक्या तन्मयतेने नि तिऱ्हाईतपणे पाहणाऱ्या पोलिसांना अचानक गणवेश अंगावर असल्याची नि प्रदेशाच्या प्रमुखाची टवाळकी रोखणे हे स्वतःचे कर्तव्य असल्याची आठवण झाली. त्यामुळे त्यांनी हलकेच ती फळी हटविण्यासाठी पाऊल उचलले. त्याला कार्यकर्त्यांनी रितसर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते ते!

Devidas0122 परंतु, पोलिसांनी हट्टाने ती फळी हिसकावून घेतली आणि त्यांच्या गाडीत ठेवायला पाठवली. कार्यकर्त्यांचेही चित्रण-छायाचित्रण संपले होतेच. साडी व शर्टावर पडलेले शेणाचे डागही धुवायचे होते. त्यामुळे फोटोयुक्त फळीसाठी फारसा सत्याग्रह न करता कार्यकर्त्यांनी ती पोलिसांना घेऊ दिली व लेन्सात डोळे घालून विधाने करण्यास सुरूवात केली. पुण्यात हेच काम करत असल्याने ते काय बोलत असतील याचा अंदाज होताच. फक्त हे लोक कोण होते, एवढेच माझे औत्सुक्य होते.

अपेक्षेप्रमाणे सर्वच वृतपत्रांनी (हिंदूसह) या कार्यक्रमाला ठळक प्रसिद्धी दिली होती. या मॅडमचे नाव सुमती असल्याचे मला दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांतून कळाले. राज्यपाल स्वतःच भ्रष्टाचार करतात, स्वतःच्या मुलीला सरकारी पदावर बसवतात आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात, अशी सुमती मॅडमची तक्रार होती. सरकारने काढून टाकल्यानंतर 4-4 जिवस राज्यपाल राजनिवासात कसे राहतात आणि पत्रकारांना बोलावून वाटेल ते आरोप करतात. त्यामुळे त्यांना एक क्षणही राहण्याचा अधिकार नाही, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती.

Devidas0121या सर्व गोंधळात आणखी एक गमंत झाली. हा सर्व प्रकार मी मोबाईलमध्ये हिरिरीने चित्रबद्ध करत होते. एक व्यक्ती हातात वही घेऊन तेथे आली. काय चाललंय, असे त्याने मला विचारले. माहीत नाही, असे त्यावर मी उत्तर दिले.

"तुम्ही कुठून आलात," त्याने पुन्हा प्रश्न केला.

"मी पुण्याहून आलोय," मी सांगितले.

तो पुढे निघून गेला. त्यानंतर मी त्याची वही पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आले, की तोही पत्रकार होता आणि मी बातमीसाठीच आलोय, असे त्याला वाटले असावे. माझ्या उत्तराने त्याची निराशा केली होती.

कुठून कुठून लोक येतात, (अक्षरशः) असे त्याने मनोमन म्हटले असावे!

Sunday, July 13, 2014

कावळ्याच्या हाती दिला कारभार...

r r patil काही वर्षांपूर्वीची स्थिती होती - महाराष्ट्रात एखादी वाईट गोष्ट घडली किंवा आगळीक घडली, की लोक म्हणायचे, महाराष्ट्राचा बिहार करणार का. कारण महाराष्ट्र हे तेव्हा शांत व विचारी राज्य मानले जायचे तर बिहारमध्ये जंगल राजसारखी परिस्थिती होती. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जायची आणि पुण्याची ख्याती केवळ राज्याचीच नव्हे तर देशाची शैक्षणिक राजधानी अशी होती. भिवंडीत मोहल्ला समितीचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या सुरेश खोपडे यांना देशभरात मान होता तर अरविंद इनामदार आणि ए. ए. खान यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची नावे आदराने घेतली जात होती.

त्यानंतर एखाद दुसरे दशक उलटले असेल नसेल. आज बिहारमध्ये काही समाजविघातक गोष्ट घडली, तर तेथील लोक कदाचित म्हणत असावेत, 'अरे आपल्याला बिहारचा महाराष्ट्र करायचा आहे का?' लोकसभेच्या जागांच्या बाबतीत उत्तर प्रदेशाच्या खालोखाल असणारा महाराष्ट्र कायदाविहीनतेच्या बाबतीतही उत्तर प्रदेशाच्या खालोखाल यावा, हा योगायोग अत्यंत वाईट म्हणायला पाहिजे.

इंटरपोलने नोटीस काढलेल्या चार्ल्स शोभराजसारख्या गुन्हेगाराला पकडणारे मधुकर झेंडे यांच्यासारखे अधिकारी एकेकाळी महाराष्ट्रात होते. आज त्याच महाराष्ट्राच्या पोलिस खात्याची परिस्थिती एवढी वाईट झाली आहे, की पोलिसाचीच गाडी चोरून समाजकंटक, राष्ट्रविरोधी शक्ती ती गाडी पोलिस स्थानकाच्याच बाहेर ठेवतात आणि तीत स्फोट घडवून आणतात. त्यानंतर तपास चालू आहे आणि दहशतवादी हल्ला झाला या साचेबद्ध विधानांव्यतिरिक्त पोलिसांकडून काहीही येत नाही.

नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना पकडल्याची बतावणी करून पोलिस अधिकारी दुसऱ्याच गुन्हेगारांना उभे करतात आणि त्याबद्दल राज्याचा गृहमंत्री त्यांचा सत्कार करण्याची बात करतो. कै. नरेंद्र दाभोलकर ही काही अगदीच सामान्य व्यक्ती नव्हती. समाजात बऱ्यापैकी मान्यता असलेले त्यांचे व्यक्तीत्व होते आणि सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेशी जातकुळी सांगणारी त्यांची विचारसरणी होती. त्यांच्या खुनाला एक वर्ष व्हायला आले, तरी मारेकऱ्यांना पोलिस पकडू शकलेले नाहीत. न्यायालयाला अखेर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे लागले. सामान्य व्यक्तींशी संबंधित गुन्ह्यांच्या बाबतीत तर बोलायलाच नको.

थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात तसे छोट्या छोट्या गुन्ह्यांच्या बाबतीत पोलिसांची अक्षमता सिद्ध झाल्यावर अट्टल गुन्हेगारांनी वर्दीवाल्यांची पत्रास न बाळगता धुडगूस घालावा, यात नवल कुठले? आझाद मैदानावर पोलिसांना मारझोड करणाऱ्या आणि महिला पोलिसांचा विनयभंग करणाऱ्या गुंडांना केवळ ते मुस्लिम असल्यामुळे सोडण्यात येते. मग हिंदु राष्ट्र सेना नावाने गुंडांची टोळी चालवणारा माणूस पुण्यात राजरोस खंडणीखोरी करतो आणि त्याची माणसे सरळ सरळ दिसेल त्या माणसाचे मुडदे पाडतात. याचा अर्थ एक तर त्यांना कायद्याचा धाक नाही, आपले कोणी वाकडे करणार नाही याची त्यांनी खूणगाठ बांधली आहे किंवा हे कृत्य करण्यासाठी त्यांना कोणीतरी मोकळे रान दिलेले आहे. पोलिसांचा खाकी गणवेष हा जरब दाखविण्यासाठी नाही तर केवळ टिकाऊ व मळखाऊ कापड म्हणून असतो, असा समज होण्याची वेळ आली आहे.

आर. आर. पाटील या माणसाने गृहमंत्री पदावर आल्यापासून पद्धतशीरपणे पोलिस दलाचे खच्चीकरण केले आहे. निष्क्रियतेला सज्जनता आणि नाकर्तेपणाला नैतिकता म्हणण्याची पद्धत दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत आपल्याकडे रुढ झाली आहे. त्यामुळे पोकळ भाषणबाजी करत आला दिवस ढकलणाऱ्या पाटील यांच्यासारख्या व्यक्तीचे फावले. तोंडपाटीलकी हा शब्द त्यांच्यावरूनच निघाला असावा, असे वाटण्याइतका त्यांच्या या प्रवचनबाजीचा अतिरेक झाला आहे.

आतापर्यंत पाटील यांच्या किमान पाच-सहा कार्यक्रमांना वा पत्रकार परिषदांना मी उपस्थित राहिलो आहे. कधीही पाटील यांनी समाधानकारक, मुद्देसूद व अभ्यासू उत्तरे दिले आहेत, असे आठवत नाही.

कोणतीही घटना घडली आणि त्यावर प्रश्न विचारला की मान वेळावत आणि चेहऱ्यावर जमेल तितका बालिशपणा आणत, "मला याची माहिती घ्यावी लागेल. ती माहिती घेऊन आम्ही कडक कारवाई करू. कोणाही दोषी व्यक्तीची गय केली जाणार नाही," ही ठराविक वाक्ये फेकायची या पलिकडे कोणतेही कौशल्य आर. आर. पाटील यांनी दाखविलेले नाही. राज्यात एकीकडे हाहाकार उडालेला असला तरी यांना काहीही माहीत नसते आणि अधिकाऱ्यांकडून त्यांना सतत माहिती घ्यायची असते. हे सातत्य अन्य एखाद्या क्षेत्रात कौतुकास्पद ठरले असते. मात्र इथे अनेकांचे जीव जातायत. किती जणांचे आयुष्य उध्वस्त होत आहेत. अज्ञानात सामावलेला आनंद गवसलेला असा माणूस शोधून सापडणार नाही. तो हुडकून काढल्याबद्दल पाटील यांचे मालक शरद पवार यांचा महाराष्ट्र कृतज्ञ आहे. (पवार काका - पुतण्याबद्दल पाटील यांची वक्तव्ये पाहता ते पवार यांना नेते नव्हे तर मालक मानतात, असे मानायला पूर्ण वाव आहे.)

भांडारकर संस्थेवरील हल्ला असो, मुंबईवरील हल्ला असो, दिवे आगर येथील सुवर्ण गणपतीचा मुखवटा चोरी गेलेला असो किंवा ब्राह्मण व मागासवर्गीय जातींबाबत प्रक्षोभक लिखाण केलेल्या पुरुषोत्तम खेडेकराच्या पुस्तकाचे प्रकरण असो, आर. आर. पाटील यांचा तोच 'घेतला वसा टाकणार नाही, कोणतीही कृती करणार नाही' हा बाणा कायमच असणार. यांच्या कारकीर्दीत पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणीही येऊन मारुन जाते, बाया-बापड्यांच्या सोनसाखळ्या दिवसाढवळ्या चोरल्या जातात, तुरुंगातील कैदी फरार होतात किंवा आपसात मारहाण करून एकमेकांचे खून पाडतात, यांच्या कारकीर्दीत पोलिस आमदारांना मारतात आणि आमदार पोलिसांना मारतात, दलितांवर अत्याचारावर अत्याचार घडतात, अल्पसंख्यांकांना लक्ष्य करून मारले जाते पण यांची शांती ढळत नाही. तेवढ्याच शांतचित्ताने हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहणारे त्यांचे मालक उलट त्यांना उत्तम कामगिरीचे प्रशस्तीपत्रक देणार आणि त्याच्या जोरावर यांचे चार वाक्यांचे एकपात्री प्रयोग आणखी चालू राहणार.

'कावळ्याच्या हाती दिला कारभार त्याने घाण करून भरला दरबार' अशी एक म्हण मराठीत आहे. त्याचा अर्थ कोणाला पाहायचा असेल, तर आर. आऱ. पाटील यांच्या कारकीर्दीवर नजर टाकली तरी पुरेल.

Sunday, May 18, 2014

धापा टाकणारे, साईडिंगला गेलेले इंजिन!

जेम्स वॉट किटलीत उसळी मारणारी वाफ दिसली आणि त्याची विचारप्रक्रिया सुरु झाली. काही दिवसांतच त्याने वाफेच्या शक्तीवर चालणारे इंजिन शोधून काढले.
शिवसेनेत बाजूला फेकल्यामुळे राज ठाकरे आतल्या आत धुमसत होते आणि त्यातून त्यांची विचारप्रक्रिया सुरु झाली. काही दिवसांतच त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आणि त्यासाठी रेल्वे इंजिनाचे चिन्ह मिळविले.
मात्र या दोघांतील साधर्म्य येथेच संपते. वॉटने शोध लावलेल्या इंजिनामध्ये उत्तरोत्तर सुधारणा झाली आणि नंतर डिझेल व विजेचे इंजिन आज धावत आहेत. रेल्वे इंजिनाचे चिन्ह असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुधारणा नावाचा प्रकारच आला नाही. त्यामुळे सोळाव्या लोकसभेचे निकाल येताना मनसेचे इंजिन धापा टाकताना दिसत आहे.
सध्याचा रोख पाहता मनसेला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. कारण मोदी नावाच्या सुनामीत भले भले वाहून गेले असताना मनसेच्या अकरा शिलेदारांपैकी कोणीही विजयाच्या किनाऱ्यावर येण्याची सुतराम शक्यता नाही. हत्ती बुडतो आणि शेळी ठाव मागतो, ही जुनी मराठी म्हण चपखल बसावी अशी ही परिस्थिती आहे.

मनसेची स्थापना करताना राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना विठ्ठल आणि त्यांच्या भोवतीच्या लोकांना बडवे म्हणून टीका केली होती. योगायोगाने 2014 च्या निवडणुकीत मतांचा जोगवा मागताना मनसेने एकप्रकारे तशीच भूमिका घेतली होती. आमचे निवडून आलेले खासदार मोदींना पाठिंबा देतील, अशी अफलातून घोषणा केली खरी. परंतु लोकांनी मत देताना विचार केला, की मोदींनाच पाठिंबा द्यायचा तर थेट त्यांच्या उमेदवाराला देऊ. देवाच्या थेट मूर्तीला हात लावता येत असतील तर पुजाऱ्याला कोण विचारणार? म्हणूनच पुण्यासारख्या, शर्मिला ठाकरे यांच्यासारख्यांचा प्रत्यक्ष सहभाग असलेल्या व खुद्द राज ठाकरे यांनी तीन तीन सभा घेतलेल्या, जागी मतदारांनी दिपक पायगुडे यांचा विचारही केलेला नाही. अन्य 10 उमेदवारांबाबत तर बोलायलाच नको.
गेल्या निवडणुकीतही मनसेला जागा मिळालेल्या नव्हत्या, मात्र नवखेपणाचा फायदा त्यांना त्यावेळी मिळाला होता. शिवाय शिवसेनेची मते त्यांनी कापल्याचे निकालांमधून दिसले होते. मात्र मते कापण्याची आपली कामगिरी हेच आपले यश असल्याचा समज मनसेने करून घेतला. शिवाय विधानसभेच्या प्रवेशाच्या निवडणुकीत व नंतर महापालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या माफक यशामुळे तो समज आणखीच दृढ झाला. यंदा त्या कृतक यशाचेही समाधान पक्षाला मिळणार नाही.
अपयश खऱ्या अर्थाने आपल्याला शिकविते आणि यश केवळ आपला अंधविश्वास दृढ करते, असे एका लेखकाने म्हटले आहे. त्याची प्रचिती मनसेला या निकालांमुळे आली असेल.
पुणे पालिकेत मनसेला लक्षणीय विजय मिळाला (म्हणजे तो मुख्य विरोधी पक्ष झाला) तेव्हा निवडून आलेल्या नगरसेवकांना या लेखकाने प्रश्न विचारला होताः तुमच्या या विजयाचे श्रेय तुम्ही कशाला देता? तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता सर्वांनी एकमुखाने उत्तर दिले होते­ – राज ठाकरे यांना!
आज मनसेच्या स्थापनेपासून गेल्या आठ वर्षांत त्या पक्षावर ओढवलेली ही सर्वात दारुण स्थिती असताना त्याचीही जबाबदारी राज ठाकरे यांनाच घ्यावी लागेल. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून दिशा हरविलेल्या गाडीसारखी त्यांची अवस्था होती. प्रचार कोणाविरुद्ध करायचा, एवढेच नक्की होते; कशासाठी करायचा हे नक्की नव्हते.
2009 साली शिवसेनेच्या विरोधात राज ठाकरे यांनी प्रचाराची राळ उठविली होती, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी शाब्दिक वादविवाद करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान करून घेतले होते. त्या चुकीपासून त्यांनी धडा घेतल्याचे दिसले. त्यामुळे प्रचाराची आपली संहिता सोडून त्यांनी पदरचे डायलॉग टाकण्याची चूक टाळली. म्हणूनच वडा पाव आणि चिकन सूप सारखे उल्लेख राज ठाकरे यांनी करूनही ते शांत राहिले आणि मनसेचे अर्धे अपयश तिथेच निश्चित झाले. उरलेसुरले अपयश मनसेच्या धरसोडीच्या धोरणांमुळे आले. टोलबाबतचे आंदोलन हे याचे ठळक उदाहरण होय.
आपले मुद्दे संपत आल्याची जाणीव कदाचित स्वतः राज ठाकरे यांनाही झाली असेल. विविध वाहिन्यांवरून दिलेल्या त्यांच्या 'एक्सक्लुझिव्ह' मुलाखतींमध्ये त्यांनी घेतलेली शिरजोर भूमिका आणि मुलाखतकर्त्यांवर डाफरण्याच्या देहबोलीतूनच ते दिसून येत होते.
मनसे आणि आम आदमी पक्षासारख्यांना मत म्हणजे काँग्रेसला मत हे मतदारांनी यंदा पक्के ठरविले होते. या पक्षांची भूमिका ही जुन्या उंदराच्या गोष्टीसारखी होती. त्यांनी केवळ 'राजा भिकारी माझी टोपी चोरली' एवढेच गाणे म्हणायचे होते. राजाने प्रतिक्रिया दिली तर उंदीर मोठा होणार, अन्यथा तशीही त्यांची ताकद ती काय?
म्हणूनच राष्ट्रीय पातळीवर मोदींनी जे साध्य केले ते उद्धवनी महाराष्ट्रात साध्य केले. मोदींनीही प्रचाराच्या संपूर्ण काळात अरविंद केजरीवाल यांची दखलही घेतली नाही (केवळ एका अप्रत्यक्ष उल्लेखाचा अपवाद करता). त्याच धर्तीवर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात मनसेची दखलच घेतली नाही. शिवसेनेच्या इतिहासातील ही सर्वात धोरणी निवडणूक नीती म्हणावी लागेल. शिवसेनेने प्रतिसाद देणे बंद करताच मनसेच्या इंजिनातील कोळसा संपला आणि ते हळूहळू सायडिंगला आणण्याची प्रक्रिया सुरू झाली.
सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात मनसेला विश्वासार्ह खेळाडू म्हणून उतरायचे असेल, तर महाराष्ट्राचे बाजूला राहू द्या, राज ठाकरे यांना पक्षाचेच नवनिर्माण करावे लागेल, एवढे नक्की. अर्थात कोणताही पक्षा एका निवडणुकीच्या अपयशाने संपत नसतो आणि राज ठाकरे यांच्यासारख्या मुत्सद्दी राजकारण्याकडून तर ती अपेक्षाच नको, पण त्यांचा मार्ग निर्वेध नाही, एवढे नक्की

(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझी नोंद. ही नोंद येथेही उपलब्ध आहे.)

Wednesday, May 14, 2014

वेळ ओढून आणण्याची हिकमत

   पुण्यात नुकत्याच झालेल्या आणि मतदारांची नावे गायब होण्याच्या प्रकारामुळे गाजलेल्या
लोकसभा निवडणुकीचा किस्सा. काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अन्य उमेदवारांसोबत २६ मार्च रोजी अर्ज भरणार असे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र डॉ. कदम यांनी गुपचूप जाऊन २५ मार्च रोजीच आपला अर्ज भरला आणि विशेष म्हणजे त्यांचे दोन्ही प्रतिस्पर्धी, भारतीय जनता पक्षाचे अनिल शिरोळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीपक पायगुडे यांनीही त्याच दिवशी अर्ज भरला. डॉ. कदम यांच्या या कृतीची कल्पना त्यांच्या स्वपक्षीयांनाही नव्हती, ही आणखी गंमत. याबद्दल पत्रकारांनी शोध घेतला, तेव्हा मुहूर्त साधण्यासाठी असे केल्याचे दबक्या आवाजात सांगण्यात आले. म्हणजेच तो दिवस, ती वेळ शुभ होती असे तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना सांगण्यात आले होते आणि म्हणून तिघांनीही त्याच दिवशी आपला अर्ज भरला. सुदैवाने किंवा दुर्दैवाने (?), या तिघांपैकी एकच जण निवडून येणार आहे आणि बाकी दोघांचा मुहूर्त हुकणार आहे.
  आता एक महिना पुढे जाऊ. ३० एप्रिल रोजी गुजरातेतील संपूर्ण २६ जागांसाठी मतदान होणार असते. वडोदरा येथून भाजपच्या होतकरू पंतप्रधानपदाच्या नवमान्यताप्राप्त पत्नी जशोदाबेन मोदी मतदान करणार असतात. त्यांना १२ वाजून ३९ मिनिटांनी मतदान करण्यास सांगण्यात येते आणि पतीच्या विजयासाठी त्याही या ठरलेल्या वेळेस मतदान करतात. ही वेळ शुभ असल्याचे सांगण्यात आल्यामुळे व त्यांनी ती साधल्यामुळे आता मोदींच्या मार्गात कोणताही राहु() येऊ शकणार नाही, याची भाजपच्या धर्मभोळ्या कार्यकर्त्यांची खात्री झालेली असते.

कुठल्याही किमतीवर विजय मिळविण्याची ईर्षा बाळगणाऱ्या दोन बाजीगरांच्या अतार्किक वागण्याच्या या दोन तऱ्हा. मात्र निवडणुकांच्या हंगामात केवळ याच दोन व्यक्तींनी असे विलक्षण वर्तन केले, असे नाही. आसेतू हिमाचल अशा प्रकारच्या समजुती आणि शुभ वेळ गाठण्यासाठीच्या हिकमती यांचा एक चित्रपटच उभा राहतो.
(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझी नोंद. संपूर्ण नोंद (राहूकाळ, ग्रहतारे आणि मुहूर्त!) वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा)

Thursday, May 8, 2014

पुढारी बहु भाषणात बडबडला...

निवडणुकीला लोकशाहीचाउत्सवम्हणतातखरा, परंतुआपल्यानेतेमंडळींचीकथनीकरणीपाहिली, तरशिमग्याच्यासणापेक्षातोफारसाकाहीवेगळाठरतनाही. अहाहा, काय ती बेतालवक्तव्ये; ओहोहो, काय ती वैयक्तिककुचाळकीचीभाषाआणिअरेरे, कायहीजगातीलसर्वातमोठ्यालोकशाहीचीविटंबना!

प्रशासनावर मांड, सत्तेवर नियंत्रणआणिजिभेलालगामहीराष्ट्रवादीकाँग्रेसचेअध्यक्षकेंद्रीयकृषीमंत्रीशरदपवारयांचीओळख. मात्रबहुदाजातीनेरिंगणातउतरणारनसल्यामुळेत्यांनीसंयमाचापायघोळअंगरखाकाढूनटाकूनबेफामविधानांचाअसासपाटालावला, कीनिवडणूकआयोगालात्याचीदखलघ्यावीलागली. मात्रस्वतःच्याजिभेलाआवरघालण्याऐवजीथोरल्यासाहेबांनीनिवडणूकआयोगावरचदुगाण्याझाडल्या. खरंतर"अश्वत्थामाहतः, नरोवाकुंजरोवा" अशाछापाचीविधानेकरूनसर्वांनाचबुचकळ्यातटाकायचेआणिस्वतःचेमनसुबेसिद्धकरायचे, हासाहेबांचाहातखंडाप्रयोग. मात्रयंदात्यांनीबोटावरचीशाईपुसण्यापासूनअनेकविधानेकरूननवमतदारांचीप्रचंडकरमणूककेलीतरजुन्यामतदारांनातोंडातबोटघालायलालावले.


त्यांचे पुतणे, राज्याचे 'पाणीदार' नेतेअजितपवारयांच्यावरतरवादसरस्वतीनेहमीचप्रसन्नअसते. दादांच्यातोंडातूनशब्दखालीपडलाआणिमहाराष्ट्रानेअचंबितहोऊनतोऐकलानाही, असेकधीघडावयाचेनाही. त्यांनातरआधीचउल्हासवरफाल्गुन मास. आपल्याटग्याधर्मालाजागूनदादांनीआधीमावळमतदारसंघातवरपांगीस्वपक्षीयपणवास्तविकविरोधक, दिवसाराष्ट्रवादीपणरात्रीमहाराष्ट्रवादीअशाहोतकरूटग्यांनादमदिला. प्रचारकेलानाहीतरपदेकाढूनघेऊ, मतेआणलीनाहीत, तरगाठमाझ्याशीआहे, अशाअनेकसशर्तवाक्यांचीत्यांनीमराठीतभरघातली. त्याचीप्रतिक्रियायेतनाहीसेपाहूनमग'याठिकाणी' बारामतीमतदारसंघाततोचप्रयोगकेला. आताआपणतोकेलाचनाही, असेत्यांचेम्हणणेआहे. एकास्पष्टवक्त्याआणिएकवचनीनेत्यावरनिवडणुकीनेआणलेलीकायहीस्थिती
(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. संपूर्ण नोंद वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.)

Friday, April 25, 2014

इस थप्पड का कव्हरेज...

निवडणुकांचा मोसम होता. मोदी विरुद्ध इतर सर्व (होय, अगदी भाजपच्या मंडळीसहित) असा छान सामना रंगला होता. फक्त एकच रुखरुख लागली होती. बातम्यांच्या थंड्या हंगामात ज्याने तमाम चॅनेले आणि छापेवाल्यांना रोजगार पुरवला, त्या आम मीडिया पक्ष, छे छे, आम आदमी पक्षाचे कोणीही नाव घेत नव्हते. दिल्लीची (धाकली) गादी केवळ जनतेच्या भल्यासाठी सोडणाऱ्या या पक्षाच्या नेत्याला आठ-आठ दिवस दूरचित्रवाणीच्या पडद्यावरून गायब केल्याने सर्वसामान्य जनतेचे भले साधण्याचा दुसरा मार्गच त्याला सापडत नव्हता.

अशात एक घटना घडली. लाली नावाच्या कोणा ऑटो रिक्षाचालकाने मिरवणुकीत येऊन अरविंद केजरीवालांना हार घातला आणि त्यानंतर सणसणीत वाजवली. एवढी सणसणीत की त्यामुळे त्यांचा चेहरा सुजला. ही थप्पड केवळ केजरीवालांवर नव्हती, ती होती तमाम कॅमेरेवाले आणि लेखणीवाल्यांना. प्रजासत्ताक भारतात क्रांती करू पाहणाऱ्या एका होतकरू युगपुरुषाकडे दुर्लक्ष करण्याची त्यांची प्राज्ञा तरी कशी झाली. साहजिकच या थपडीमुळे सर्व माध्यमीय मंडळी खडबडून जागी झाली आणि पुन्हा एकवार केजरीवाल व त्यांच्या कोंडाळ्यावर लेन्सा केंद्रित झाल्या.

वास्तविक केजरीवालांसाठी चपराक खाण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. राजकारणाचे त्यांचे मनसुबे पाहून अण्णांनी खडे बोल सुनावले तेव्हा, मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर लोकांनी केलेल्या टिकेच्या वेळेस अशा लाक्षणिक थपडा त्यांना कितीतरी वेळी बसल्या. मात्र, त्याही पलीकडे प्रत्यक्ष थपडा किती खाव्या लागल्या, याचीही स्वतंत्र गणती करावी लागेल. असो.

(लोकसत्ता.कॉमवरील सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. संपूर्ण ब्लॉग वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.)


Sunday, April 6, 2014

भाऊ माझा... मी भावाचा… वैरी!

हत्ती भांडतात तेव्हा गवत चिरडले जाते, अशी एक आफ्रिकी म्हण आहे. मुंबईत गुरुवारी झालेल्या राड्यानंतर या म्हणीचा पडताळा किमान या दोन सेनेच्या मागे फरफटत जाणाऱ्या कार्यकर्ते व मतदारांना आला असेल. 

खरं तर अफलातून खेळी करत उमेदवार देण्याची घोषणा करणाऱया राज ठाकरे यांच्याकडून चांगल्या व वेगळ्या प्रचाराची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी पूर्ण भ्रमनिरास केला.मागील निवडणुकीच्या वेळेस मध्यंतर झालेल्या 'संगीत भाऊबंदकी'च्या प्रयोगाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यनगरीत मुळा-मुठेच्या तीरावर केली. कुठलाही आशय नसलेल्या, विषय हरविलेल्या आणि दिशा नको असलेल्या बेचव सभेला फोडणी देण्यासाठी त्यांनी महायुतीत सामील न होण्यामागच्या कारणाची (सनक्कल) जंत्री सादर केली. 

जणू काही या आवतणाची वाटच पाहत असलेले शिवसेनेचे 'मर्द' कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तोच धागा पुढे चालवला व त्यांना पेलवेल अशा इर्षेने प्रत्युत्तर दिले. त्याला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी मेनूच सादर केला. त्यावेळी त्यांनी जे तपशील दिले, त्यानुसार पाचवीत असताना माझे दोन चॉकलेट कशाला खाल्ले किंवा लहानपणी रेल्वेतून जाताना खिडकीशी जागा कशी मिळू दिली नाही, अशा आठवणीच यायच्या बाकी होत्या.त्याची परिणती शेवटी दोन्ही सेनांना प्राणप्रिय असलेल्या प्रत्यक्ष हाणामारीत झाली. सख्खा भाऊ पक्का वैरी या मराठमोळ्या म्हणीला जरा वेगळे वळण देऊन ठाकरे बंधूंनी चुलत भाऊ पक्के वैरी अशी स्थिती तयार केली आहे. 
(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. संपूर्ण नोंद वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.)