कलाम यांनी जाताना आपल्या केवळ दोन सुटकेस नेल्या, अशी एक बातमी कुठंतरी वाचनात आली. देशाच्या राजकारण्यांपेक्षा ही कृती खूपच वेगळी असल्याचेही काही जणांचे म्हणणे आहे. मला हे मान्य नाही. या देशातले जवळजवळ सर्व राजकारणी सुटकेसच सोबत नेतात आणि घेऊन जातातही. फरक एवढाच आहे, की कलाम यांनी त्या सुटकेसमध्ये आपले जीवनावश्यक सामानच नेले. अन्य राजकारणी मात्र सुटकेसमध्ये काय काय नेतील, हे त्यांना स्वतःला सांगता येणार नाही. निरनिराळ्या न्यायालयांमध्ये चालू असलेल्या "केस'मध्ये या नेत्यांनी दिलेल्या साक्षींवरूनच वरील विधान केले आहे, हे सूज्ञांस सांगायला नको. (पण इतरांना सांगावे लागते, म्हणून लिहिले.)
बाकी कलाम यांना राष्ट्रपती भवनातून एकही वस्तू सोबत न्यावी वाटली नाही, यामागे त्यांच्या मोहत्यागा एवढेच धैर्यही मानलेच पाहिजे. अन् माझं म्हणणं असं, की असं धैर्य आणि निरीच्छपणा अविवाहित राहिल्याशिवाय येणे शक्य नाही. कल्पना करा, अन्नामलाई विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तास घेतल्यानंतर कलाम मास्तर घरी आले आहेत. ते पाय धुवून चहा घेतात एवढ्यात मिसेस कलाम त्यांच्याजवळ येऊन म्हणतात, ""काय तुम्ही, "रायसीना हिल्स'च्या प्रासादातून काहीच घेऊन नाही आलात. बुश भारतात आले होते तेव्हा त्यांनी किती भेटवस्तू आणल्या होत्या. त्या तुम्ही तिथेच ठेवल्या. दुसऱ्या नेत्यांना पहा, आपल्या तर आपल्या इतरांच्या भेटवस्तूही ते घरी घेऊन जातात. "डीआरडीओ'त असल्यापासून तुमचं नेहमी असंच. एक गोष्ट घ्याल तर कसम!'' वगैरे वगैरे. आता हे भाषण ऐकल्यानंतर माजी राष्ट्रपती काय अन् नुसता पती काय, वैतागणार नाही? तो वस्तूच नेणारच! मात्र कलाम यांना हा त्रास नाही. त्यामुळेच ते केवळ दोन सुटकेस (आपल्याच सामानाच्या) घेऊन घरी जाते झाले.
पाच वर्षांपूर्वी जेवढे सामान घेऊन कलाम आले, तेवढेच सामान घेऊन ते घरी गेले असंही काही जणांनी सांगितलं. (वृत्तवाहिन्यांनी या घटनेचे ज्याप्रकारे कव्हरेज दिलं, त्यात कलाम पाच वर्षांपूर्वी केसांच्या किती बटा घेऊन आले आणि जाताना त्यांच्या डोक्यावर बटा होत्या, हे कोणीच कसं सांगितलं नाही या आश्चर्यातून मी अजूनही सावरलेलो नाही.) येताना त्यांनी आणलेलेच सामान तर परत नेलं नाही ना, हेही चेक करायला पाहिजे.
कलाम चाचांचं मला एक बरं आवडायचं. ते मुलांना मूलच रहा, असं म्हणत. त्यांना मुलं खूप आवडत आणि मला मूल व्हायला खूप आवडतं. मूल झालं की काय टेंशन नाही...नोकरीची चिंता नाही, नोकरी मिळाली की बॉसची हांजी हांजी नाही...सर्व सव्यापसव्य सांभाळून पगार वाढण्याचीही काळजी नाही...एरवी जाताना कलाम जे बोलले तेही आपल्याला आवडले. जनतेचा सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती जातानाही चांगली प्रतिमा मनात ठेवून गेला.
कलाम यांची प्रतिमा जेवढी उत्कट तेवढीच आता नव्या राष्ट्रपतींची प्रतिभाही "फोकस'चाच विषय ठरणार आहे. त्या महाराष्ट्राच्या आहेत म्हणून मला त्यांच्याबद्दल अगत्य आहे, अशातला भाग नाही. (मी स्वतः कितपत महाराष्ट्रीय आहे, अशी साधार शंका घेणारे कमी नाहीत.) त्यांच्याबद्दल अगत्य असण्याचे कारण वेगळेच आहे. शपथ घेतल्यानंतर त्यांनी जे पहिले भाषण केले, त्यात त्यांनी माझा उल्ल्लेख केल्याबद्दल मला अगदी भरून आलं.
तुम्हाला आढळलं की नाही माझं नाव? काय म्हणता, नाही आढळलं. अहो, असं काय करता...त्या काय म्हणाल्या सांगा बघू..."जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले...' आता सांगा राव, माझी ओळख पटण्यासाठी तुम्हाला आणखी कोणती खूण सांगू. कलाम भलेही लोकप्रिय राष्ट्रपती असतील, पण माझा जाहीर उल्ल्लेख करणाऱ्या प्रतिभाताई पाटील याच खऱ्या माझ्या राष्ट्रपती आहेत. माझ्यापेक्षा रंजलेला, गांजलेला माणूस या अलम् भारतात आणखी कोण असेल...बाकी सर्व गोष्टी जाऊ द्या...हा ब्लॉग लिहिल्यावर तो वाचून कोणी कॉमेंटही टाकत नाही...
अशा या पामर माणसाला आपलं म्हणणारी व्यक्ती आता देशाच्या सर्वोच्च्चपदी गेली आहे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. प्रतिभाताईंनी तुकारामाचा अभंग म्हटला, हीही तर खरेच आनंदाची गोष्ट आहे. त्यांची माझ्याबद्दलची आपुलकी कायम राहावी, यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन. मी नेहमी रंजला-गांजला राहीन, कारण...तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे,
ठेविले अनंते तैसेचि रहावे
असू द्यावे चित्ती समाधान...
डी.डी.के कलाम काे सलाम,
ReplyDeleteकलामचाचांबाबत अाणखी वाचायला साॅरी एेकायला अावडलं असत. कारण सांगू, पाच वषार्मध्ये त्यांच्याविषयी खुप वाचलय, पण एेकल असं काहीच नाही. असाे प्रतिभा सहकारी बॅंक अाता फुलणार म्हणायची...अथार्त त्यातून डीडीची बॅंक भरणार यायाच अाम्हाला अधिक अानंद
पुन्हा भिडूच...
Khoopach chan....Kalam was ok but Rashtrapratibha is best
ReplyDeleteअन्नामलाई विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तास घेतल्यानंतर कलाम मास्तर घरी आले आहेत. ते पाय धुवून चहा घेतात एवढ्यात मिसेस कलाम त्यांच्याजवळ येऊन म्हणतात, ""काय तुम्ही, "रायसीना हिल्स'च्या प्रासादातून काहीच घेऊन नाही आलात. बुश भारतात आले होते तेव्हा त्यांनी किती भेटवस्तू आणल्या होत्या. त्या तुम्ही तिथेच ठेवल्या.
ReplyDeleteDr. A.P.J. abdul Kalam is un-married.