मोरू नेहमीप्रमाणे सकाळी झोपेतून उठला आणि आंघोळ करून तयार झाला. आज त्याला न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेप्रमाणे तुरुंगात जायचे होते. घरच्या लोकांनी त्याला निरोप देण्याची जय्यत तयारी केली होती. सोसायटीतलं एक उनाड कार्टं म्हणून त्याची शहरात ओळख होती. त्याच्या घरच्या लोकांना त्याचा कोण अभिमान! खासकरून सोसायटीचे सेक्रेटरी असलेले त्याचे बाबा तर त्याच्यावरून जीव ओवाळून टाकत असत. इतका की ते स्वतः बाबा असून ते मोरुलाच बाबा म्हणत. त्यामुळे पुढे दादा झाला तरी मोरूला सर्वजण मोरूबाबाच म्हणत.आजपर्यंत मोरूला कधी "आत" जावं लागलं नव्हतं. नाही म्हणायला "डिपार्टमेंट'नं एक दोनदा "राडा' केल्याबद्दल त्याला उचललं होतं आणि रात्रभर "लॉक अप'मध्येही ठेवलं होते. त्यावेळी "मामू' लोकांनी त्याची केलेली धुलाई त्याला अजून आठवत होती. एकदा तर त्याला पाकिटमारीबद्दल सात दिवस कस्टडीतही ठेवलं होतं. त्याच्या बाबा, आई आणि बहिणीने त्यावेळी आकाशपाताळ एक करून त्याला ठाण्याबाहेर (आणि माणसांतही) आणलं होतं. आई-बाबांची परवानगी न घेता तेव्हा महाग असलेली कॅडबरी खाण्याबद्दल आणि कॅडबरी विकत घेण्यासाठी बाबांचे पैसे चोरल्याबद्दल त्याला एक दोनदा शिक्षा झाली होती. त्याची चॉकलेटची सवय सुटण्यासाठी त्याला काही दिवस दवाखान्यातही ठेवलं होतं.
त्यानंतर काही दिवस मोरूबाबा सुधारला. शहरातल्या त्याच्यासारख्याच लोकांनी चालविलेल्या नाटकमंडळीत तो काम करत होता. त्याला कामेही मिळत गेली. त्यामुळे तो लोकप्रिय असल्याचे मानण्यात येत असे. असा हा मोरूबाबा आज तुरुंगात खडी फोडायला पहिल्यांदाच जात होता. नाटकमंडळीतले काही दोस्त आणि त्याच्या सोसायटीतील टोळीतील काही मित्र यांच्या सौजन्याने त्याने काही फटाके आणले होते. त्यातील सुतळी बॉंब, रॉकेट वगैरे त्याने बिचाऱ्याने उदार मनाने मित्रांना वाटली आणि एक पिस्तूल तेवढे स्वतःजवळ ठेवले. नेमके त्याच्या मित्रांनी उडविलेल्या फटाक्यांनी सोसायटीतल्याच काही लोकांना इजा झाली, काही जणांच्या घरातील पडदे जळाले. त्यांनी दुष्टपणे मोरूला त्यात गोवून न्यायालयात गोवले. न्यायालयानेही फारशी दयाबुद्धी न दाखवता त्याला तुरुंगात धाडण्याचा निर्णय दिला. तो निकाल लागता लागताच मोरूचे बाबा ही कालवश झाले.
तुरुंगाच्या मोहिमेवर निघालेल्या मोरूच्या हातावर त्याच्या बहिणीने साखर ठेवली. बाबांच्या तसविरीजवळ जाऊन त्याने तसविरीला नमस्कार केला. पोलिसांच्या गाडीतून मोरू रवाना झाला तेव्हा त्याच्या जीवलगांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. मोरूच्या जीवनातील इथपर्यंतच्या घटना कायद्याच्या आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने सामान्य आहेत. त्याने गुन्हा केला आणि त्याची शिक्षा त्याला व्हायलाच हवी, याबाबत सर्वांचे एकमत होते. मात्र खरी मजा पुढेच आहे. मोरूला तुरुंगात ठेवले मात्र त्याला कोणत्या तुरुंगात ठेवले, त्याने दरवाजातून कोणता पाय आधी पुढे ठेवला याची कोणीही बातमी दिली नाही. जाताना तुरुंगाच्या रखवालदाराला त्याने बिडी मागितली की नाही, याची चर्चाच झाली नाही. तुरुंगात मोरूला त्याच्यासारख्याच एका सच्छील चारित्र्याच्या सज्जन पुरुषाच्या संगतीत ठेवले होते. त्याबद्दल कोणीही चकार शब्द काढला नाही. तुरुंगात जाताना मोरूने आपल्या चाहत्यांकडे (आणि त्याला पैसे पुरविणाऱ्यांकडे) पाहून हातही हलविला नाही. (त्यामुळे त्यांना हात हलवत परत यावे लागले.) मोरूला मुख्य तुरुंगातून केवळ महनीय व्यक्तींना ठेवण्यात येणाऱ्या "पुण्यनगरीत' पाठविण्यात आले. त्यावेळी त्याच्यामागे शिकारी कुत्र्यांप्रमाणे एकही वार्ताहर, माध्यम प्रतिनिधी किंवा कॅमेरामन गेला नाही. मोरू ज्या किरकोळ कॅटॅगिरीतला गुन्हेगार होता, त्या कॅटॅगिरीच्या मानाने ही वस्तुस्थिती भयंकर होती.
पुण्यक्षेत्रातल्या तुरुंगात आल्यानंतरही मोरूकडे होणारी अक्षम्य हेळसांड चालूच होती. इथे आल्यानंतर त्याने किती वाजून किती मिनिटांनी कोठडीचे दार उघडले, फरशीवर बसताना त्याच्या तोंडातून कण्हण्याचा आवाज कसा येत होता, याची दखल कोणीही घेत नव्हतं. त्याने काय खाल्लं, पोळीचे किती तुकडे करून त्याने किती घास खाल्ले याचीही गणनाच कोणीच करत नव्हतं. भावी पिढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी ही ऐतिहासिक माहिती देण्याची तसदी घ्यायला कोणीही तयार नव्हतं. हीच ती भारतीय लोकांची मागास मानसिकता.
आता मोरूला याच तुरुंगात काही दिवस काढायचेत. पण इतके दिवस रात्रीच्या रात्री नाटकं करून त्याच्या प्रकृतीवर परिणाम झालेला अन् त्यात हा तुरुंगवास, त्यामुळे त्याचा रक्तदाब वाढला. याची कोणीतरी नोंद घ्यायची? तर तेही नाही. मोरूला तुरुंगातल्याच डॉक्टरकडून उपचार चालू आहेत. हे वृत्त बाहेरच्या लोकांना समजायला नको? आता मोरूकडे होणाऱ्या या अमानवी दुर्लक्षामुळे त्याच्या नाजूक जिवाला किती यातना होतायत, याची तुम्ही कल्पना करू शकता. तरीही तुम्हाला म्हणून सांगतो, तो आल्यावर याचा जाब विचारणार नाही. कारण आता तो तुरुंगात महात्मा गांधींच्या साहित्याचे परिविलोकन करतोय. हेही लोकांना कळायलाच हवं. त्याशिवाय त्याचा गुन्हा किती "मामू'ली होता, हे स्पष्ट होणार नाही. तो परत येणार. आतापर्यंत त्याने अनेक खोड्या केल्या. शाळेत, कॉलेजमध्ये (होता तितके दिवस), सोसायटीत...प्रत्येक खोडीनंतर त्याने मनापासून सर्वांची माफी मागितली आणि "जादू की झप्पी' देऊन सर्वांना खूषही केले. आताही तो असेच करणार आहे. फक्त त्याच्याकडे अगदी ढुंकूनही न पाहणाऱ्या या लोकांकडे पाहून तो म्हणेल, ""हे राम!''
व्वा, डीडी. फारच छान ! बाबा आमचा वाईट होता हे सत्य विसरलो आहोत आम्ही. वास्तव, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई सारखे चित्रपटांनी आम्हाला त्याचया विषयी आपुलकी वाटायला लागली. मात्र, त्याचा खलनायक आम्ही विसरलोत. त्याचयातील खलनायकाला आम्ही गांधीगीरीने फाटा दिला. माधयमांचा त्यात महत्वाचा वाटा आहे हे ही तितकेच खरे. त्याचया फॅन म्हणवत आम्ही फक्त न्यायालयालचया निकालाविरूधद डायरेक्ट टिपणणी करणयाची डेरिंग नाही केली. मात्र, जीभेचा काय भरवसा, उदयाचे कोणी सांगितले. त्याला शिक्षा झाली ती कमी नाही व्हायला पाहीजे. त्याने खेळणयातील नाही तर ओरीजनल एके 47 बंदुक होती. आणि ती ही त्याने गददारांकडुन मिळवली होती. साध पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पाच वर्षासाठी तुरूंगात गेलेले बघितलेत आम्ही. हा माजी केंद्रीय मंत्रयाचा एकुलते एक मुलगा आणि अभिनेता म्हणून सवलत दयावी असे वाटेत असेल तर तो कायद्याचा अनादरच आहे. आणि ते होत असल्याने चिंता वाटते.
ReplyDeleteविडंबन लेखन करताना आपण जी काही प्रतिभा दाखविली आहे, त्याला तोड नाही. मराठी साहित्याच्या इतिहासात अशा प्रकारचे लेखन करण्यात ज्या काही मंडळींनी नाव कमावले आहे, त्यांना सुद्धा आपल्या या "पीस'चे कौतूक वाटल्यावाचून राहणार नाही. लेखाचा शेवट तर भन्नाटच आहे. "हे राम'!! व्वा!!! व्वा!!!व्वा!!! बाकी आपला ब्लॉग छानच दिसतोय. रोज "व्हीजीट' करावी लागेल. करूयात...असेच लिहीत राहा आणि आपली प्रतिभा जोपासत राहा
ReplyDeleteव्वा व्वा... डी.डी.
ReplyDeleteफारच छान, काये अापल्याकडे लाडक्या बाळांचा सध्या खुपच सुळसुळाट झालाय. संजय दत्त हेही अशांपैकीच एक लाडक बाळ. तुमच्या अशा फटकाऱयाने इतरही अापल्याभाेवतीची अशी बाळं रुळावर येतील अशी अाशा करुयात.
तव्हा घ्या की त्यांचा बी हिसाब-किताब एकदा...
प्रशांत
व्वा व्वा... डी.डी.
ReplyDeleteफारच छान, काये अापल्याकडे लाडक्या बाळांचा सध्या खुपच सुळसुळाट झालाय. संजय दत्त हेही अशांपैकीच एक लाडक बाळ. तुमच्या अशा फटकाऱयाने इतरही अापल्याभाेवतीची अशी बाळं रुळावर येतील अशी अाशा करुयात.
तेव्हा हाेऊन जाऊद्या त्यांचाही हिसाब-किताब एकदा...