सबकुछ ट्वेंटी-२०!
त्रिभुज हिंदुस्तानी उपखंडात एकदिवसीय क्रिकेटचं वेड कमी होतं म्हणून की काय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 'आयसीसी' आता ट्वेंटी-२० क्रिकेट सुरू केलं आहे. खरं सांगायचं तर या सामन्यांना आपला मनापासून पाठिंबा नव्हता. आताही नाही. त्यात या सामन्यांमध्ये डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठी पाच साडेपाच फुटांचे हलते आणि जीवंत देखावे उभे केल्यामुळे हे क्रिकेटचे सामने आहेत, की रामगोपाल वर्मा किंवा डेव्हिड धवनचे सिनेमे आहेत, हा कूटप्रश्नच निर्माण झाला.
तरीही भारतीय संस्कार असे एकाएकी थोडेच जाणार? त्यामुळे एकदा सामन्यांना सुरवात झाली आणि 'मन मॅचरंगी रंगले' अशी अवस्था झाली. संपूर्ण स्पर्धा बारा-तेरा दिवस चालली. यात दोन वेळेस हृदयविकाराचे झटके येण्याची वेळ आली होती. मात्र त्याच वेळेस गणेशोत्सव चालला असल्याने तेवढे एक विघ्न टळले.
पहिल्या काही सामन्यांमध्ये किरकोळ संघांशी गाठ पडली. नंतर मात्र पाकिस्तानशी सामना आला आणि ट्वेंटी-२० विरोधातील सगळा अभिनिवेश मागे टाकून आपण बीसीसीआयच्या संघाला पाठिंबा दिला. (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत नाही, असे प्रतिज्ञापत्र बीसीसीआयने दोन वर्षांपूर्वी दाखल केले होते, आठवते ना.) त्या सामन्यात बीसीसीआयच्या संघाने ट्वेंटी-२०च्या मानाने अत्यंत कमी धावा केल्या. त्यामुळे सामन्याचा निकाल ऐकणे आपल्या कानाला झेपणार नाही, याची खूणगाठ बांधली होतीच. मात्र त्या दिवशी निळ्या कपड्यांतील गड्यांनी वेगळाच डाव केला. त्यांनी पाकिस्तान संघाच्या एकामागोमाग विकेट काढल्या. झालं, आता आम्हाला काम सोडून मॅच पाहावा लागणार! झालंही तसंच. हातातलं जे काय काम होतं, ते उरकलं, नाहीतरी दुसऱया दिवशी आम्ही लावलेले पान कोणी वाचणारच नव्हतं. लोकं मॅचची बातमीच वाचणार होते. साधारण अकराच्या पुढे स्वारी दूरचित्रवाणी संचाच्या समोर स्थानापन्न झाली. (म्हणजे उभी राहिली. ऑफिसमधील खुर्च्यांचे बुकिंग आधीच झाले होते.) क्रिकेटच्या मोठ्या सामन्यांचं एक बरं असतं. जमलेली गर्दी त्यांच्या कॉमेंटस् अगदी जीवाच्या कराराने देत असतात, त्यामुळे आपल्यासारख्या नाठाळ क्रिकेटबाजाला सामना कसा चालू आहे, ते कळत राहतं.
गर्दीच्या कॉमेंटमधून वाट काढत मॅच अशा वळणावर पोचला की, आता १९८६ सालच्या शारजातील सामन्याची रिप्ले बघायला मिळणार याची खात्री पटली. मात्र शेवटच्या चेंडूवरही धावा काढण्यात पाकिस्तानचे फलंदाज अपयशी ठरले आणि सामना बोल आऊट मध्ये गेला. आता बोल आऊट, फ्री हिट इ. इ. यावर भवती न भवती सुरू झाली. छातीवर मणामणाचं ओझं ठेवणारे ते काही मिनिटे गेले. बॉल आऊट सुरू झालं आणि काही मिनिटांनी बीसीसीआयचा संघ जिंकल्याचंही दिसलं. आपले गंगेत घोडे न्हाले. आता विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकलो गेलो, तरी काळजी नाही, असं निश्चिंत बसलो होतो. पण हाय रे दैवा, यंदा बाप्पा काही वेगळाच प्लॅन करून आले होते. एरवी काळेनिळे होईपर्यंत मार खाणारे मेन इन ब्लू आता पार अंतिम फेरीपर्यंत गेले होते.
सोमवार. २४ सप्टेंबर. सुदैवाने अंतिम सामना साडेपाच वाजता सुरू व्हायचा होता. त्यामुळे स्वारी कार्यालयात असली तरी कामात नव्हती. याहीवेळी समोर पाकिस्तान होता. आता साखळी सामन्याची रिप्ले होणार का छोड दे इंडिया होणार, हे याची देही याची डोळा पाहणे ही काळाची गरज होती. प्रथेप्रमाणे कार्यालयातील टीव्हीसमोर मानाचा शेवटचा प्रेक्षक म्हणजे डीडी आल्यानंतर सामना सुरू झाला. याही वेळी १५७ धावा काढून नीलपुरूष कपड्यांच्या खोलीत (ड्रेसिंग रूम) परतले. आता पुढे काय होणार याची स्थानिक, प्रामाणिक, वैतागिक आणि अगतिक(ही) तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली. काही वेळाने पाकिस्तानचा डाव सुरू झाला. तेव्हाच मॅच संपल्याशिवाय पान लावायला येणार नाही, असा निरोप पाठविला होता. पाकिस्तानचा डाव मागील पानावरून सुरू झाला आणि तिथेच संपला. कोण खेळतंय, कोण हरलंय आणि कोण जिंकलंय, अशा मूलभूत जिज्ञासेपलिकडे जाण्याचा आपला स्वभाव नाही. त्यामुळे कोण बाद झालंय, कोण आबाद झालंय...वगैरे वगैरे बाबींकडे आपलं लक्षच नव्हतं. क्रिकेटचे सामने पहायचे ते केवळ प्रेक्षकांतील हलते देखावे पाहण्यासाठी आणि जाहिरातींद्वारे प्रबोधन करून घेण्यासाठी, असं आपलं नेटकं धोरण आहे.
या धोरणाला पहिला तडा गेला सामन्याच्या शेवटून दुसऱया षटकात. मिस्बाहने एकामागोमाग षटकार आणि चौकारांची मालिका सुरू केली. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरही षटकार गेला आणि हृदयविकाराचा दुसरा झटका येण्याची चिन्हे दिसू लागली. चार चेंडू अन् सहा धावा...इकडे बाप्पांचा धावा सुरू झाला. मात्र बाप्पांनी तोपर्यंत तरी निरोप घेतलेला नसल्याने ते धावून आले...मिस्बाहने विनाकारण विकेट फेकली आणि चेंडू उंच भिरकाविला...हाताचा रिस्टबँड नीट करण्यात गुंतलेल्या श्रीशांतनेही तो फटका लीलया झेलला आणि एकदिवसीय क्रिकेटच्या लिंबू-टिंबू स्पर्धेत बीसीसीआयच्या संघाने विजेतेपद पटकावले.
स्पर्धेची एक इनिंग इथे संपली. आता दुसरी इनिंग आपण पाहणारच आहोत, मात्र ते ब्रेक के बाद!
No comments:
Post a Comment