Friday, September 28, 2007

क्रिकेट, मनोरंजन का केवळ राजकारण

दुसरी इनिंग
----------
हमदशाह अब्दाली याच्या भारतातवर तीन स्वाऱया झाल्यानंतर त्याला हग्या मार देऊन परत कधीही न येण्यासाठी जाण्यास मराठ्यांनी भाग पाडले. त्याप्रमाणेच गेल्या दीड एक वर्षात सर्व स्पर्धांमध्ये मार खाल्यानंतर अचानक बीसीसीआयच्या संघाने विजय मिळविला. यात त्यांचे कर्तृत्व होतेच. विजयासाठी त्यांचे कौतुक होणेही साहजिकच होते. मात्र 'अति सर्वत्र वर्जयेत्' या पूर्वजांच्या सल्ल्याकडे लक्ष देतील तर ते भारतीय कसले? त्यामुळे मग केवळ एखाद्या राजाचा राज्याभिषेक सोहळाच भासावा, असा या खेळाडूंचा जंगी सत्कार करण्याचा घाट घालण्यात आला. अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच युवराजची आई, रोहितचे बाबा अशा नामवंत आणि तज्ज्ञांच्या मुलाखती विविध वाहिन्यांवरून दाखविण्यात आल्या, तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती. मात्र संघ जिंकल्यानंतर पालीचे हे चुकचुकणे डायनासोरच्या गुरगुराटीत बदलले होते.

रणांगण आणि 'रनांगण' यात भारतीयांची नेहमीच गल्लत होते. त्यात समोर पाकिस्तान म्हटल्यानंतर तर काही बोलायलाच नको. बीसीसीआयचा संघ मुंबईत दाखल झाला आणि तेथून वानखेडे मैदानापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यासाठी अख्ख्या मुंबई महानगरीच्या वाहतुकीला वेठीस धरण्यात आले. मुंबई म्हणजे काही पुणे नाही, की वाहतूक चालेल आपली रामभरोसे. आधीच गणेश विसर्जनासाठी आदल्या दिवशी शहराला विश्रांती मिळालेली नव्हती, त्यात हा त्रास. अनुत्पादक कामासाठी देशाच्या आर्थिक राजधानीला वेठीस धरण्याची काय ही वृत्ती? अन गप्पा करायच्या महासत्ता होण्याच्या.

आता पब्लिक जमा झाली म्हणजे आपले स्वयंघोषित पब्लिक सर्वंटही तिथे पोचणारच. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे या खेळातील 'मंजे हुए खिलाडी.' साहेब सर्वांत आधी मैदानात शड्डू ठोकून हजर होते. त्यांच्या जोडीला महाराष्ट्राचे अतिकर्तृत्ववान मुख्यमंत्री विलासराव देशमुखही मांड ठोकून बसले होते. पवार यांच्या कारकीर्दीतच तर भारतीय क्रिकेटची भरभराट झाली ना! इंग्लंड, दक्षिण आफ्रिका दौऱयातील एकदिवसीय सामन्यांतील मानहानीकारक पराभव, चॅपेल गुरुजींच्या ट्यूशन घेऊन गांगुलीच्या कारकीर्दीचा केलेला खेळखंडोबा, त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत १९७९ नंतर न जमलेली पहिल्याच फेरीतील एक्झिट...अशा एकाहून एक चढत्या पायऱयांनी बीसीसीआयचा संघ प्रगती करत होता. त्यात विश्वचषक, मग ती वीस-२०चा का असेना, संघाने जिंकल्यानंतर आपल्या अध्यक्षपदाचे सार्थक झाल्यासे साहेबांना वाटले तर काय नवल? त्यामुळे समस्त भारतीयांना सात शतकांत न मिळालेला गौरव मिळवून दिलेल्यांचा गौरव करण्यासाठी ते ही आले.

'राष्ट्रवादी' आल्यावर 'महाराष्ट्र'वादी न येऊन कसे चालेल. त्यामुळे लातूरचे देशमुखही आले. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी पॅकेज दिल्यानंतरही विदर्भात दीडशे-दोनशे शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. तेव्हा देशमुखांचे मन द्रवल्याचं दिसलं नाही. उलट केंद्रातील शंकरसिंह वाघेला नामक नेत्याच्या साथीने गेल्याच महिन्यात शेतकऱयांबद्दल आक्षेपार्ह उदगार काढल्य़ाबद्दल त्यांचा अनेक ठिकाणी उद्धारही झाला. मात्र वीस-२० स्पर्धेत संघाने विजय काय मिळविला, देशमुखांची देशभक्ती १०० टक्के जागी झाली. त्यातून त्यांनी खेळाडूंसाठी बक्षीसही जाहीर केले. महाराष्ट्रातील पन्नासेक जवान तरी गेल्या वर्षभरात काश्मीर आणि देशाच्या अन्य भागात शहीद झाले. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही केल्याचे, केल्याचे कशाला जाहीर केल्याचेही आठवत नाही.
याच राज्यातील अन्य खेळांतील अनेक खेळाडू प्रोत्साहनावाचून खितपत पडले आहेत. कोल्हापूरच्या वीरधवल खाडे या जलतरणपटूला ऑलिम्पिकमध्ये सहभागाची संधी मिळावी, यासाठी सकाळने गेल्या वर्षी मोहीम चालविली. शिवछत्रपती पुरस्कार आणि दादोजी कोंडदेव पुरस्कार जाहीर करूनही अनेक खेळाडूंना ते वेळेवर मिळत नाहीत. त्यावेळी सरकार हलल्याचं दिसत नाही. आता मात्र क्रिकेटपटूंसाठी पुरस्कार वाटण्यात पुढाकार घ्यायला तयार. एकतर बीसीसीआय आणि अन्य पुरस्कर्त्यांनी जाहीर केलेल्या पुरस्कारांपुढे राज्य सरकारचे पुरस्कार म्हणजे हत्ती बुडतो आणि शेळी ठाव मागते असाच प्रकार आहे. पण काय करणार, सभा हसली की माकडाला हसावंच लागतं.

एकूणात भारतीयांचं सेन्स ऑफ प्रोपोर्शन चांगलंच बहरू लागलंय. आपल्याच देशात आपण असे वागू लागलो, तर परकीय शत्रूंची गरजच काय?

1 comment:

  1. Hi,
    Good writing.
    Please refer the following link.
    http://www.loksatta.com/daily/20070927/edt.htm

    ReplyDelete