Sunday, October 14, 2007

तंटाभक्तांची तंटमुक्ती

- रामराम म्हादबा, उठलासा नव्हं?

- हां उठलो हाय...काय काम काढलं सकाळच्या पारी?

- काय नाय. काल काय तू लय दंगा केला म्हणं ग्रामसभेत...मी वाईच तालुक्याला गेलो व्हतो. आल्यावर बायलीने सांगितलं...तवा म्हणलं सकाळचं जाऊन समक्षच विचारावं...एक घाव ना दोन तुकडे...काय?

- आरं बाबा, आता मलाच बोल लावा दंगा केलान म्हणून. आरं अख्ख्या गावाला पूस काल काय झालं त्या सभेत. त्या ग्रामसेवकाला न सरपंचाला असा फाडला ना आडवा न उभा...ज्याचं नाव ते. टीव्ही लावू देत नाही XXX

- आरं म्हादबा, असं डोसक्यात काय पाई राख घालून घेतो रे बाबा? आरं त्या टीव्हीची मामलत ती काय अन तू भांडणं काय पाई करतो रं? काय झालं तं सांग बाबा समदं...तवर वहिनी बी चहा आणतील... - हे बग भाऊ, काल गांधी जयंती म्हून आपल्याकडं ग्रामसभा होती, हे तर तुला ठावं होतंच. आपलं काय ठरलं होतं का गावात तंटा करायचा नाय, भांडण करायचा नाय...त्यासाठी तं ही सभा बोलाविली होती..खरं का नाय...आता तुला म्हायत हाय भाऊ, का सरपंच किती डांबरट अन ग्रामसेवक किती आतल्या गाठीचं बेणं हायंत...गावात तीन पिढ्यांपासून लीडरकी हाय आमच्या घराण्याची...गेल्या विलेक्शनला विपरीत घडलं अन हा कावळा खुर्चीत जाऊन बसला. म्या म्हण्लं...जाऊ दे. परत्येक कुत्र्याचे दिस असतात. तं यानं काय केलं का ग्रामसभेचं आवताण मला द्यायला नको? बरं नाय दिलं...तरी बी म्या गेलो...का म्हण्लं गाव आपलं हाय...गावातली शांती आपली हाय....

- आरं म्हाद्या, पर तु तं सांगत होता का पाटलांच्या शांतीवर तू आताशा लाईन मारीत न्हाय म्हणून...

- ती शांती न्हाय रं भाऊ...बायकोशप्पथ लगीन झाल्यापासून म्या कोण्या बी मुलीकडं नजर उचलून पाहत नाही...आन तुला म्हणून सांगतो...आताशा 'त्या' शांतीत बी दम रायला नाही...ते जाऊ दे...तं तुला सांगत होतो आपल्या गावच्या शांतीचं म्हणजे बापूंनी सांगितलेल्या शांतीचं...तं ती शांती हवी म्हणून सभेला गेलो...

- आरं सभा तंटा मिटविण्यासाठी...तू गेला शांतीसाठी...अन तिथं करून आला मारामारी...? आरं ह्याला म्हणायचं तरी काय?

- सांगतो...सभेला समदा गाव जमला व्हता...त्यात सरपंचानं मिजास मारायला त्याच्या बायका पोरांना बी बोलाविलं होतं...तं मी विचारलं का हे एवढं लटांबर हितं कशाकरता. आता यात काय चूक हाय काय. तवा बसली ना दातखीळ सरपंचाची. तोंडातून शब्द फुटत नव्हता xxxच्या. तवा तं ग्रामसेवक मंदी पडला. त्याच्याखातर मी बी जरा आवरलो...का की आपन बी गेल्या वख्ताला बायकोला नेलंच व्हतं की तिथं...तं त्यानंतर वग सुरू केला का बेट्यांनी...सभा जमली तंटा मिटविण्यासाठी आन हे बोलू लागले हागणदारीचं...का गावात हागणदारी बंद कराया पायजे...परत्येकाने शौचालये बांधावीत...

-मंग तुला कायची अडचण रं बाबा? हागणदारी तं हागणदारी...तुला कायचा प्रोब्लम?

- प्रोब्लम आरं काय नाही...पण मी म्हन्तो, आन मी त्या दोगांच्या बी तोंडावर सांगितलं का बाबा, हागणदारीचा प्रश्न आमच्या घरात आम्ही संपविला आहे...इथं तुमी शांततेचं बोला...तं दोघं बी जोक् मारू लागले की रं...एक म्हन्ला का हागणदारीत शांतीच असती न्हवं...दुसरा काय म्हन्ला मायतंय का? त्यो म्हन्ला का तुमच्या आख्ख्या फॅमिलीनं हगायचं बंद केलं का? आता आसं कुनी बोलल्यावर तुझं टाळकं सरकणार नाय का? तं माझं बी टकुरं सराकलं...तरीबी मी शांत व्हतो...

- आरं मग भांडण कामून झालं?

- आरं ते समदं आपल्या मास्तरांचं झेंगट हाय...त्यानंच सांगितलं का टीव्हीवर आबांचं प्रवचन चालू हाय अन आबा आपल्याला शांततेचं महत्त्व सांगतायत...तर मंग काय...तुला तं माहितंय...ग्रामसेवकावर लायन मारण्यासाठी सरपंचानं टीव्हीला हात की रे घातला...आता मात्र आपला स्टॅमिना संपला व्हता बरं का! मी मोठ्यांदा आवाज काढून सांगितलं का पयले ही सभा व्हयंल अन त्येच्यानंतरच ज्याला हवा त्यानं टीव्ही बघावा...यात काय खोटी हाय काय?

- नाय....बिल्कुल नाय.

- त्येच...मी त्येच सांगत व्हतो...तं सरपंच अन त्येच्या गुंडांनी म्होरं येऊन मलाच खुन्नस दिली...अन माझ्याम्होरं येवून मला धमकी देऊ लागले...तं मी काय मागं हटणार होतो व्हयं...मी बी त्येंना त्यांच्याच भाषेत दम दिला...ही दमबाजी चालू असतानाच दोन पोरटी टीव्हीकडं गेली अन खटका दाबला...ती सरपंचाचीच कार्टी व्हती वाटतं...XXच्यांनी टीव्ही लावला तं लावला....त्यावर फॉरिनची गाणी लावली...अन ती हालणारी चित्रं...आता मी बी ती चित्रं पाहण्यात गुंतलो अन तितक्यात कुणीतरी ठोसा लावला माझ्या थ्वबाडावर...आसला कळवळला जीव...मंग मी बी काय पाहिलं नाही...हात न पाय...वाटेल तसं फिरविलं दांडपट्ट्यासारखं...ल्हानपणापासून सकाळ संध्याकाळ चार-चार लिटर दूध पिऊन केलेली तब्येत हाय ही...काय मुकाट मार खातो का मी...हे हाण हाणला...मार खावून समदे पळाले असतील हागणदारीत...हा हा हा!

- आरं हां...तो सरपंच पडला हाय तिकडं घरात तळमळत...तुझ्या नावानं शंख करतोय...अन ग्रामसेवक रात्रीपासून गेला हाय पळून...पोलिसांत फिर्याद देतो म्हून बोंबलत होता...

- बोंबलू दे भाऊ...सरकार म्हन्तं तंटामुक्त व्हा...आता तंटा करण्याऱयांनाच गावातून हाकलल्याबिगर गावात शांती कशी राहणार? आता बघ हे बोंबल्ये दवाखान्यात हायेत तवर गावात कशी शांती ऱहाते....बघच तू...चल, तंवर आपण आदर्श कार्यकर्ता पुरस्कारासाठी अर्ज देवून येवू...!

1 comment:

  1. LOL! raambaN upaay aahe.

    baraM, ekaa upakramaat tumhalaa sahabhaagi karoon ghetale ahe, maajhaa blog baghnar ka please?

    http://kathapournima.blogspot.com

    ReplyDelete