Friday, October 19, 2007

वाचनाच्या बेटावरील श्रद्धेचा शोध

पूनम छत्रे यांनी त्यांच्या लेखात मनाला भावलेल्या उताऱ्यांचा हा प्रवाह पुढे नेण्याची जबाबदारी टाकली आणि मला पुन्हा वाचनाच्या दिवसांत जावे लागले. गेली काही वर्षे आपणच लिहावं आणि इतरांनी वाचावं, ही भावना प्रबळ होत गेल्यामुळे वाचनसंस्कृती हळूहळू मागे पडली. फक्त "वाचनामुळे माणूस घडतो' किंवा "उत्तम संस्कृतीसाठी वाचन आवश्‍यक' अशा सुसंस्कारी सुभाषितां पुरतेच वाचन मर्यादीत झाले होते. मात्र ज्या काळात वाचन केले त्या वाचनाचे ठसे मनावर अद्याप कायम असल्यामुळे त्याच फडताळात जाऊन शोध घेतला. वाचलेल्या पुस्तकांतून आवडता उतारा द्यायचा, त्यातही मराठी उतारा द्यायचा ही जरा जोखमीचीच बाब. कारण शुद्ध मराठी साहित्याची कास सोडूनही मला आता फारा काळ लोटला आहे. असो.

"रॉबिन्सन क्रुसो' ही महाकादंबरी (सुमारे 500 पृष्ठे ) वाचून मला आता सतरा वर्षे होत आली. डॅनिएल दे फो याने लिहिलेली ही कादंबरी मानवी आकांक्षी, कर्तृत्व आणि प्रयत्नवादाचे एक महास्तोत्रच आहे. त्याहूनही विश्‍वाच्या पसाऱ्यात मानवाचे परावलंबी अस्तित्व आणि ईश्‍वराची महीमा, यांचीही कहाणी सांगणारी ही कथा आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी आलेल्या या कथेच्या असंख्य आवृत्या अगदी तीन वर्षांपूर्वी आलेल्या "कास्टअवे' या चित्रपटापर्यंत निघत आल्या आहेत. मूळ इंग्रजीतील ही कादंबरी मी वाचली ती मराठीतूनच. मात्र अस्सल मराठी वाचकांच्या प्रथेप्रमाणे या वाचनाचे प्रायोजकत्व मी शहरातल्या एकमेव नगरपालिका ग्रंथालयाला दिले होते. त्यामुळे अनुवादकाचे नाव किंवा अन्य तपशील बाळगण्याचे प्रयोजन नव्हते. आता ती कादंबरीही मिळत नाहीशी झालेली. त्यामुळे आवडता उतारा द्यायचा म्हटल्यावर संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरवात म्हणतात, तसे आपणच मूळ कादंबरी शोधून उताऱ्याचे भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. (कार्यसिद्धीस गुगुल समर्थ!) त्यामुळे काही उणीवा राहिल्या असल्यास चूकभूल देणे घेणे!

इंग्रज दर्यावर्दी रॉबिन्सन क्रुसो अनेक सागरी सफरींमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या अनुभवांतून गेला असला तरी पुनःपुनः नव्या सफरींसाठी निघण्यास तयार. अशाच एका सफरीदरम्यान वादळात सापडून त्याचे जहाज फुटते आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना जलसमाधी मिळते. फुटलेल्या जहाजाच्या अवशेषासह आणि काही सामानासह क्रुसो एका निर्जन बेटाला लागतो. तेथेच तो 28 वर्षे काढतो आणि स्वतःच्या एकाकी जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न करतो. बेटावरील प्राण्यांशी मैत्री करणे, तेथीलच गवत व वनस्पतींपासून झोपडी तयार करणे, गुहेत राहणे, नरभक्षक आदिवासींशी गाठ पडूनही त्यांच्याबद्दल "जगा व जगू द्या'ची भूमिका घेणे...अशा विविध प्रकारांनी आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न क्रुसो करतो. इतिहासात प्रगतीच्या ज्या काही पायऱ्या मानव चढल्या, त्या सर्वांचे प्र तिकात्मक चित्रण या कादंबरीत येतं. त्यामुळे एका अर्थाने माणसाच्या अस्तित्वाच्या लढाईचीच ती कहाणी होते. मात्र मला त्यात सर्वाधिक भावते अन्‌ सतरा वर्षांनंतरही लक्षात राहते तो क्रुसोच्या ईश्‍वराच्या अस्तित्वाबद्दल बदलत्या भूमिकेचे चित्रण. स्वतःच्या परिस्थितीचे निरीक्षण, त्यातून चिंतन करत असतानाच आपण ईश्‍वराच्या इच्छेनेच या परिस्थितीत सापडलो असल्याचा साक्षात्कार क्रुसोला होतो. हा या कादंबरीतला सर्वांत हृद्य प्रसंग.
---------------------

माझ्या या निष्कर्षांना खोटं ठरवंल, असं काहीही घडलं नाही, त्यामुळे हे सर्व ईश्‍वरानेच घडविले आहे, ही भावना माझ्या मनात आणखी प्रबळ होऊ लागली-त्यानेच मला या दयनीय परिस्थितीत आणून ठेवले आहे, कारण त्याच्याकडे माझ्यावरच नाही, तर जगातील वस्तुमात्रावर स्वामित्व गाजविण्याची शक्ती आहे. त्यानंतर लगेच विचार आला-ईश्‍वराने माझ्यासोबत असे का केले? मी असे काय केले होते?
त्या प्रश्‍नासरशी माझ्या विवेकबुद्धीने मला टोचले, जणू काही मी एखादे पाखंड केले आहे अशा पद्धतीने आणि मला वाटले की ही विवेकबुद्धी माझ्याशी बोलत आहे, ""मूर्खा! तू विचारतोस की तू काय केले आहेस? अतिशय वाह्यातपणे घालविलेल्या आपल्या आयुष्यावर नजर टाक आणि स्वतःलाच विचार, की तू काय काय केलं नाहीस? विचार स्वतःला की तू याआधीच नष्ट का झाला नाहीस? यरमाऊथ रोडसमध्ये तु का वाहून गेला नाहीस, जहाजावर चाचांनी हल्ला केला तेव्हा लढाईत का मारला गेला नाहीस, आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील जंगली प्राण्यांनी तुला मारून का खाल्ले नाही, अगदी तुझे सगळे सहकारी बुडाले असताना तू येथे वाहून गेला नाहीस? तू स्वतःला विचार "मी असं काय केलंय.'
या विचारांसरशी मी स्तब्ध झालो, एखाद्या मूर्तीसारखा. बोलण्यासाठी माझ्याकडे एकही शब्द नव्हता. निराश आणि विचारमग्न अवस्थेतच मी उठलो आणि माझ्या आश्रयस्थळी परत आलो. झोप आल्यासारखं झाल्याने मी माझ्या भींतीकडे गेलो. पण माझ्या विचारांची गर्दी एवढी झाली होती, की झोपण्याची माझी परिस्थिती नव्हती. त्यामुळे मी खुर्चीत बसलो आणि अंधार पडू लागल्याने दिवा लावायला घेतला. आता पुन्हा माझी तब्येत बिघडण्याच्या शक्‍यतेने मी एवढा घाबरलो होतो, मला आठवलं ब्राझीलचे लोक त्यांच्या सर्व दुखण्यांवर कोणत्याही औषधाऐवजी तंबाखू घेतात. तंबाखूची एक गुंडाळी एका संदुकीत होती. ती वाळलेली होती. काही हिरवी आणि न वाळलेली गुंडाळीही होती. मी संदुकीजवळ गेलो. त्यामागे नियतीचाच हात होता यात संशय नाही कारण त्या संदुकीत मला माझ्या शरीराचंच नव्हे तर आत्म्याच्याही दुखण्याचं औषध सापडले.
मी संदुक उघडली आणि हवी असलेली तंबाखू शोधली आणि मी जपून ठेवलेली काही पुस्तके तिथेच पडली असल्याने मी आधीच उल्लेख केलेले बायबल उचलले. मला आतापर्यंत हे बायबल वाचायला वेळ मिळाला नव्हता म्हणा वा इच्छा नव्हती म्हणा-त्याला बाहेर काढून ते आणि तंबाखु दोन्ही घेऊन मी टेबलजवळ आलो. माझ्या स्वभावाच्या अस्वस्थतेवर तंबाखूचा काही उपयोग होईल का, ती त्यासाठी चांगली आहे का वाईट, यांबाबत मला काहीच माहित नव्हतं. परंतु कोणत्या ना कोणत्या प्रकारे ती परिणाम करेल, याबाबत निर्धार केल्यासारखं मी त्या तंबाखुचे अनेक प्रकारे सेवन केले. मी तंबाखुचे एक पान घेतले आणि तोंडात चघळायला सुरवात केली. तंबाखू हिरवी व कडक होती आणि मला तिची सवयही नव्हती. त्यामुळे खरोखरीच माझ्या मेंदूला गुणगुण्या आल्या. त्यानंतर मी काही पाने घेऊन रममध्ये एक-दोन तास बुडवून ठेवली. आडवं पडल्यानंतर ती रम प्यायचा मी निर्णय घेतला. त्यानंतर अखेर मी एका भांड्यात कोळसे पेटवून त्यावर काही पाने जाळली. अगदी सहन होईल तोपर्यंत त्याचा धूर घेण्यासाठी मी माझे नाक धुराजवळ घेतले.
या सर्व उचापतीदरम्यान, मी बायबल घेऊन वाचण्यास सुरवात केली. पण माझे डोके तंबाखूमुळे असे बधीर झाले होते, की किमान त्या वेळेपुरते तरी वाचणे अशक्‍य झाले होते. फक्त चाळण्यासाठी म्हणून पुस्तक उघडले आणि मला आढळलेले पहिले शब्द होते, ""संकटाच्या वेळेस मला हाक मार, मी तुझी सुटका करेन आणि तू माझे नाव घेशील.'' माझ्यासारख्याला हे शब्द अगदी चपखल होते. ते वाचून माझ्या मनावर मोठा परिणाम झाला. मात्र त्यानंतरच्या काळात हा परिणाम अधिक होता. कारण सुटका या शब्दाला काही अर्थ नव्हता, असे मी म्हणेल. माझ्या हताश परिस्थितीत ही शक्‍यता एवढी दूर होती, की माझी स्थिती इस्राएलच्या मुलांसारखी झाली. त्यांच्यासाठी खाण्यासाठी मांस देण्याचे आश्‍वासन मिळाल्यावर त्यांनी विचारले होते, ""या उजाड माळरानात भगवंत टेबल मांडू शकतो?'' तसंच मीही विचारायला लागलो, ""भगवंत स्वतः मला येथून सोडविणार का?'' त्यानंतर अनेक वर्षे काहीही आशा नजरेच्या टप्प्यात न आल्याने तर ही शंका नेहमीच माझ्या विचारविश्‍वात ठाण मांडून राहिली होती.
तरीही या शब्दांनी माझ्यावर खूप परिणाम केला होता व त्याबद्दलच मी नेहमी चिंतन करत असे. आता खूप उशीर झाला होता, आणि मी म्हटल्याप्रमाणे तंबाखूने एवढी गुंगी आली होती की मला झोप येऊ लागली होती. रात्री काही लागलं तर हाताशी असावा, या हेतूने दिवा जळताच ठेवून मी अंथरुणावर पडलो. मात्र पाठ टेकण्यापूर्वी मी ती गोष्ट केली, जी त्यापूर्वी आयुष्यात कधीही केली नव्हती-मी गुडघे टेकले आणि ईश्‍वराने मला दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची, तसेच संकटकाळात मी हाक मारल्यानंतर मदतीला येण्याची प्रार्थना केली. माझी तोडकीमोडकी आणि अडाण प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर, तंबाखूची पाने बुडवून ठेवलेली रम मी प्यायलो. ती एवढी कडक झाली होती आणि तंबाखूच्या चवीनी भरली होती, की माझ्या घशाखाली ती उतरेना. त्यानंतर लगेच मी झोपण्यासाठी आडवा पडलो. त्यामुळे माझ्या डोक्‍यात आग होत होती, तरीही मला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा सूर्याच्या स्थितीवरूनच दुपारचे तीन तरी वाजले असावेत, असा अंदाज मी केला.

-------------
असो. मला वाटते या पोस्टमध्ये जरा जास्तच लांबण लावली. एकूणात मला ही संधी दिल्याबद्दल (म्हणजेच माझ्यावर ही जबाबदारी टाकल्याबद्दल) मी आभारी आहे. आता ही जबाबदारी मी आणखी पुढे देतो.

No comments:

Post a Comment