Tuesday, October 9, 2007

पाण्यात न गेलेले पैसे

देवा, याही देशात पाऊस पाड
देवा, याही शहरात पाऊस पाड...

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी देवाला उद्देशून ही कविता लिहिली. त्यामागे त्यांचे जे काय हेतू असायचे ते असोत. (जर्मनमध्ये तिचं भाषांतर व्हावं, असा हेतू निश्चितच नसावा.) मात्र हीच कविता सध्या मी दिवस रात्र आलापत आहे. मेघराजांची अशी आराधना एखाद्या जातीवंत बेडकानंही केली नसेल. अर्थात तळमळीतील ही उणीव आवाजाने भरून निघते, हा भाग अलाहिदा.

तर, पर्जन्यराजाचा हा असा धावा करण्यामागे माझा काय स्वार्थ असावा, असं वाटलं ना?. शहरातच राहत असल्याने भरपूर पाऊस होऊन चांगले पीक काढावे, असा मी शेतकरीही नाही. पावसाच्या प्रत्येक थेंबासरशी कवितेचे पाट वाहू घालण्याएवढी काव्यप्रतिभाही आता राहिली नाही. खरं तर, पावसाला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. मात्र तरीही पाऊस पडावा, यासाठी मी अगदी चातकासारखी वाट पाहत आहे. कारण...

कारण...माझे जर्कीन उर्फ जॅकेट उर्फ् सामान ठेवायची पिशवी उर्फ....बरंच काही! चार महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या या सर्वऋतूसमभाव चीजेसाठी मला हवाय पाऊस. एकदा या शहरात चांगला दणदणीत पाऊस पडू दे, त्यात न भिजण्यासाठी या प्रावरणाचा उपयोग करू दे...मग तीन वर्षे दुष्काळ पडला तरी चिंता नाही, (एक्चुअली कोरडा दुष्काळ असो किंवा ओला दुष्काळ...मी कोणत्याच गोष्टीची चिंता करत नाही. याबाबतीत महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि माझं एकमत आहे.) एवढीच माझी आता महत्त्वाकांक्षा आहे.
काय आहे, गेली दोन वर्षे महाराष्ट्रात पूर आणि अतिवृष्टीची परंपरा चालू आहे. त्या दोन संकटांशी झगडता झगडता तनू भागलेल्या जुन्या जर्कीनने यंदा कॉलर टाकली आणि त्याच्या रिप्लेसमेंटची तरतूद करण्याची जबाबदारी आली. आता हा योजनाबाह्य खर्च अंगावर पडल्यावर त्यासाठी हालचाली करणंही आलंच. आधीच खरेदीची काडीचीही अक्कल नसल्याची पंचक्रोशीत ख्याती! त्यात पावसाळ्याचा हंगाम बघून विक्रेत्यांनी केलेली सुगीची बेगमी. मग काय विचारता?

म्या पामराने कसाबसा छातीचा कोट करून जून महिन्यात एक जंगी जर्कीन विकत घेतले. आठशेपासून सुरू झालेली बोली खाली आणत पाचशे रुपयांत विक्रेत्याला पटविले आणि काखोटीला मारून ते गाठोडं आणलं. तरीही मनात धाकधूक होतीच. त्यामुळे आधी नव्या वस्तूचं खासगी प्रदर्शनही सुरू झालं. त्यात सर्वांनी 'छान छान, चांगलं आहे' असे शेरे मारल्यावर आमचे गंगेत घोडे न्हाले. आता हा पाऊस आणि हे जर्किन...पहिल्या पावसाच्या मेघगर्जनने मोराने पिसारा फिरवून नाचावे, तसा आनंद झाला.

हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता, हे मला लवकरच कळाले. (दोन अतिपरिचित वाक्यांचे कॉम्बिनेशन करण्याची खुमखुमी बऱयाच दिवसांपासून होती. त्याची आज संधी मिळाली.) खरं सांगायचं तर अपेक्षांवर पाणी फिरले असं म्हणायचंही संधी दिली नाही. जून महिन्यापासून आकाशात ढग जमतायत, वातावरण कुंद होतंय, पण...पावसाचे थेंब काही पृथ्वीपर्यंत येत नाहीत. पावसापासून बचाव करण्यासाठी जर्किन घालून फिरावं आणि घरी परतताना जर्किनमुळे घामाघूम होऊन, ओल्या अंगाने परतावं हेच आता नशिबी आलंय.

हे जर्किन नावाचं प्रकरण अंगावर घेतल्यानंतर पाऊस गायब झाल्यामुळे पाचशे रुपये पाण्यात गेल्याचं दुःख मला दिवसरात्र खायला लागलं. त्याची नुकसानभरपाई करण्यासाठी या जर्किनचा अधिकात अधिक उपयोग करून घ्यायचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागला. (व्यवस्थापनशास्त्रातील मॅक्झिमाईजिंगची संकल्पना हीच ना?) त्याचा पहिला प्रयोग जर्किनच्या दोन्ही बाजूंच्या खिशांवर झाला. मोबाईल, ऑफिसचे कार्ड, पासबुक...अशा चीजवस्तू वाहण्यासाठी हे दोन्ही खिसे अगदी चपखल कामी आले. त्यामुळे वेगळी एखादी बॅग ऑफिसला नेण्याची गरज नाहिशी झाली. मात्र त्याचा एक परिणाम असा झाला, की जर्किनचे दोन्ही खिसे पाण्याने भरलेल्या पखालीसारखे आकाराने फुगु लागले. त्यामुळे आजबाजूच्या लोकांच्या नजरा वेगळ्या अर्थाने जर्किनवर खिळू लागल्या.

त्यानंतर हीच उपयोगाची क्लृप्ती थोडी ताण देऊन वाढविण्याचा मार्ग पत्करला. जर्किनचा विस्तार तसा ऐसपैस असल्याने याबाबतीत फारसा विचार करावा लागला नाही. पूर्वीच्या काळी धोतराचा ज्याप्रमाणे शरीराचा खालचा भाग झाकण्यापासून अंथरूण-पांघरूण होण्याएवढा सर्वप्रकारे उपयोग होत असे, त्याप्रमाणे या जर्किनचा उपयोग होऊ लागला. छातीपर्यंत चेन ओढून घेऊन सदऱयाचे तुटलेले बटन झाकणे, बसमध्ये मळलेल्या सीटची धूळ टाकण्यासाठी असे जर्किनवर प्रयोग सुरू झाले. अगदी अलिकडे तर रेल्वेच्या बर्थवर झोपण्यासाठी अंथरण्यापर्यंत या वस्तुच्या उपयोगाचे क्षितिज रुंदावले आहे. त्यामुळे डेल कार्नेजीसारखं मीही ‘हाऊ टू यूझ जर्किन इन १०० वेज इन इव्हरी वेदर' या किंवा तत्सम नावाने एखादे पुस्तक लिहावे असा विचार करतोय. (या प्रस्तावित पुस्तकासाठीची काही टिपणे जर्किनच्या डाव्या खिशात ठेवली आहेत. )

हे एवढे प्रात्यक्षिक करूनही त्यातून मिळतं ते एकप्रकारचं कोरडं समाधानच! एवढे होऊनही माझा आशावाद मला अद्याप सोडून गेलेला नाही. हवामान विभागाच्या अंदाजावर कोणाचाही नसेल एवढा माझा विश्वास आहे. आज ना उद्या शहरात पाऊस पडेल, आज ना उद्या पावसापासून बचावल्याच्या आनंदाचा शिडकावा तरी मिळेलच, याची आशा अद्याप माझ्या मनात शिल्लक आहेच. त्यासाठीच...केवळ त्यासाठीच पाऊस पडावा, यासाठी मी देवाचा धावा करतोय!
--------------

1 comment:

  1. जर्किनचे दोन्ही खिसे पाण्याने भरलेल्या पखालीसारखे आकाराने फुगु लागले. त्यामुळे आजबाजूच्या लोकांच्या नजरा वेगळ्या अर्थाने जर्किनवर खिळू लागल्या.


    ...he mast aahe!!!
    zakaasac lihilays!!
    chaangali aahe eshtaael!!
    ek suchavu?
    jerkin malaa deun taak.
    maazya poreelaa khelaaylaa deto. roj paanyaat gheun taas-taas khelat basel!!!

    ReplyDelete