Tuesday, December 11, 2007

उद्या 'बॉस'चा वाढदिवस...

क्रावू नका. मी 'बॉस' म्हणजे आपल्या रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड याच्याबद्दल बोलतोय. तमिळनाडूचा सुपरस्टार उर्फ तलैवर उर्फ स्टाईल किंग!

रजनीकांतचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजीचा. म्हणजे उद्या तो वयाची ५७ वर्षे पूर्ण करून ५८ व्या वर्षात प्रवेश करेल. साधा झोपडपट्टीत राहणारा एक मुलगा, नंतर बस कंडक्टर आणि त्यानंतर काही दिवस संघर्ष करणारा अभिनेता ते थेट तमिळ चित्रपटांचा अनभिषिक्त सम्राट होण्यापर्यंत रजनीकांतचा प्रवास झाला. आजही नम्र आणि प्रसिद्धीपराङमुख वर्तनासाठी प्रसिद्ध असलेला हा 'शिवाजी' साठीच्या दिशेने प्रवास करतोय.

रामजीराव गायकवाड आणि रमाबाई यांच्या पाच अपत्यांपैकी चौथा शिवाजी. त्याचे बालपण हलाखीत गेले. लहाणपणी रामकृष्ण मिशनच्या शाळेत त्याचे शिक्षण झाले. ते संस्कार आजही कायम असल्याचे तो दाखवितो. बंगळूरच्या शहर बस सेवेत कंडक्टर म्हणून हा मुलगा दाखल झाला. याच काळात विविध नाटकांतून भूमिकाही करायचा. त्याच्या जो़डीला विक्षिप्त तरीही भूरळ घालणारे हातवारे करायचा. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला अभिनेता बनण्याचा आग्रह केला. त्यातून कंडक्टरकी सोडून शिवाजीचा प्रवास झाला चेन्नईतील फिल्म इन्स्टिट्यूटकडे. तिथला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सुरु झाला भूमिका मिळविण्यासाठीचा प्रवास.
यावेळी आलेला एक अनुभव त्याने एकदा सांगितला होता...'त्यावेळच्या एका मोठ्या अभिनेत्याकडे शिफारस मागण्यासाठी गेलो होतो. त्या अभिनेत्याने उद्या ये, म्हणून सांगितले. त्यावेळी रहायचे कुठे हा प्रश्न होता...तेव्हा मग चेन्नई सेंट्रलच्या प्लॅटफॉर्मवर रात्र काढली. दुसऱया दिवशी गेलो, तर पुन्हा दोन दिवसांनी येण्यास सांगितले. पुन्हा मुक्काम प्लॅटफॉर्मवर. अशा रीतीने पाच दिवस काढल्यानंतर मी त्या अभिनेत्याकडे जाणेच बंद केले.'

कन्नड भाषेतील 'कथा संगम' हा रजनीकांतचा पहिला चित्रपट. (त्यावेळी त्याला हे नाव मिळाले नव्हते.) ३२ वर्षांपूर्वी म्हणजे १९७५ साली 'अपूर्व रागङगळ' या चित्रपटातील काही मिनिटांचे दृश्य हा रजनीकांतचा तमिळ रजतपटावरील पहिला प्रवेश. चित्रपटाची नायिका भैरवी हिच्या कॅन्सरग्रस्त पतीची भूमिका त्याने केली होती. दिग्दर्शक के. बालचंदर यांनी शिवाजीरावला ही भूमिका दिली. तमिळमधील गाजलेल्या 'बॅरिस्टर रजनीकांत' या चित्रपटावरून त्यांनी शिवाजीला हे नाव दिले. याच चित्रपटात तमिळ चित्रपटातील त्यावेळी उदयोन्मुख असलेल्या एका कलाकाराची महत्वाची भूमिका होती. वयाच्या पाचव्या वर्षापासून पडद्यावर झळकणाऱया या कलाकाराचा तो पंचविसावा चित्रपट होता. काही वर्षांनी रजनीकांतला चित्रपटसृष्टी सोडण्याची इच्छा झाली होती, त्यावेळी याच त्याच्या कलाकार मित्राने त्याला परावृत केले होते. लोकांच्या दृष्टीने रजनीचा प्रतिस्पर्धी असलेला हा मित्र म्हणजे कमल हासन.

मूळात 'अपूर्व रागङगळ' कधी आला आणि कधी गेला, हे चित्रपटगृहांच्या कर्मचाऱयांनाही कळाले नसेल. तो यशस्वी झाला असता तरी रजनीकांतला त्याचा फायदा होण्याची सुतराम शक्यता नव्हती. मात्र के. बालचंदर यांनी आपल्या सहायकाला जे सांगितलं ते शंभर टक्के खरं ठरलं. "या माणसावर लक्ष ठेव. त्याच्या डोळ्यांत आग आहे. तो एक दिवस खूप मोठा होणार आहे," ते म्हणाले होते. त्यानंतर 'मुण्ड्रु मुडिच्चु', 'गायत्री', '१६ वयतिनिले' अशा अनेक चित्रपटांतून त्याने खलनायकाच्या भूमिका निभावल्या. 'भुवन ओरु केल्विकुरी' या चित्रपटाने रजनीकांतला खऱया अर्थाने नायक केले. त्यानंतर १९७९ साली आलेल्या 'भैरवी' या चित्रपटाने रजनीकांतला सुपरस्टार हे बिरुद चिकटविले.

अमिताभ बच्चन नावाचे वादळ उत्तरेतील चित्रसृष्टीत घोंघावत असताना त्याचा प्रभाव दक्षिणेत पडणे स्वाभाविकच होते. त्यानुसार अमिताभच्या हिट चित्रपटांचे सर्व भाषांत आपापल्या मगदुराप्रमाणे रिमेक होत होते. तमिळमध्येही अमिताभच्या रिमेक झालेल्या अनेक चित्रपटांपैकी १२ चित्रपटांत रजनीकांत हिरो होता. अमिताभ, रजनीकांत आणि अन्य अभिनेते या सर्वांचे बहुतांश चित्रपट मी पाहिले आहेत. त्यावरून अमिताभची बरोबरी रजनीकांत करू शकला, असे म्हणता येत नसले तरी तो कुठे पडल्याचेही म्हणवत नाही. अमिताभच्या 'विजय' चित्रपटांमध्ये अमिताभ खालोखाल जर कोणी त्याची जादू निर्माण केली असेल तर ती रजनीकांतने. ती (दिवार), पडिक्कादवन (खुद्दार), बिल्ला (डॉन), पय्युम पुली (लावारिस), नंदवनत्तील तलैवन (कस्मे वादें) अशा अनेक चित्रपटांची यासाठी काढता येईल.

यांपैकी १९८० साली आलेल्या 'बिल्ला'ने रजनीकांतला अफाट यश मिळवून दिले. हा रजनीकांतच्या कारकीर्दीचा माईलस्टोन मानला जातो. शिवाजी गणेशन आणि एमजी रामचंद्रन यांसारखे जुने अभिनेते काहीसे निवृत्त झाल्याने तरुण रजनीला रान मोकळे होते. एकमात्र कमलहासनचा अपवाद होता. मात्र त्याचा प्रेक्षकवर्ग मर्यादित होता. रजनीच्या स्टाईल आणि टोटल मनोरंजनाच्या फॉर्म्युलाने एक ते दहा पर्यंतची जागा आधीच बुक केली होती. त्यामुळेच ऐंशीच्या दशकात अमिताभच्या रिमेक चित्रपटांत काम करणारा सामान्य रजनीकांत पाच वर्षांच्या आत दक्षिणेतला अमिताभ म्हणून ओळखला जाऊ लागला. याचवेळी बोफोर्समुळे बदनाम झालेल्या अमिताभच्या कारकीर्दीला किंचित ओहोटी लागलेली असली तरी रजनीकांतने कटाक्षाने स्वतःला सर्व वादांपासून बाजूला ठेवले होते. आपला अभिनय, घर आणि अध्यात्म यांतच समाधानी असलेल्या रजनीच्या चित्रपटांनी यशाचे नवे नवे सोपान चढायला सुरवात केली. अन यानंतर सुरू झाला रजनीचा रिल आणि रिअलमधील अंतर संपवणारा सोनेरी अध्याय...

No comments:

Post a Comment