Saturday, December 8, 2007

घेता किती घेऊ दो कराने?

मी श्रीमंत व्हावे, ही नियतीचीच इच्छा दिसत आहे. मी सुखात राहावे, चंगळ करावी, खूप पैसा-अडका मला विनासायास मिळावा, देश-परदेशांत भरपूर भटकंती करायला मिळावी, किरकोळ दुकानदारांपासून मोठमोठ्या शॉपिंग मॉलमध्ये मी बेधडक प्रवेश करून खरेदी करावी...आणि त्याची किंचितही झळ माझ्या खिशाला लागू नये, अशी सोयच माझ्या नशीबात झालेली दिसत आहे. आता फक्त मी होय म्हणायची खोटी आहे, की बस्स! नेमकं इथंच घोडं पेंड खातंय...

स्थावर घर नसतानाही जगाच्या संपर्कात राहण्यासाठी सोय करून देणारा इ-मेल आला तेव्हा मला काय आनंद झाला होता. मात्र त्याच इ-मेलमुळे मला जगाच्या कानाकोपऱयातून संपत्तीचा वर्षाव होईल, असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. मात्र मी मुळातच नशीबाचा सिंकदर, त्यामुळे नायजेरिया, इथियोपिया, इरिटेरिया अशा नाना नावाच्या आणि आकारांच्या देशांतून मला पैसा मिळवून देण्याच्या ऑफर्स येत आहेत. या ऑफर्स एवढ्या अनपेक्षित, अनोख्या आणि अनोळखी देशांतीली आहेत, की मला अनेकदा त्या देशांची जागा बघण्यासाठी जगाच्या नकाशाकडे बारकाईने लक्ष द्यावे लागले आहे. या ऑफर्समुळे माझ्या एक लक्षात आलंय हं, की नायजेरियातल्या प्रत्येक दोन माणसांमागे एकाचा शंकास्पद परिस्थितीत मृत्यू झालेला असतो. त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या नावावर अफाट संपत्ती ठेवलेली असते. (अन ते राष्ट्रसंघाच्या अहवालांतील दुष्काळाची छायाचित्रे, मला तर आता त्यांचीच शंका येत आहे.) मात्र माझ्या सज्जन स्वभावाची, सच्चरित्राची आणि वरती असलेल्या कनेक्शनची ख्याती अख्ख्या जगात असल्याने त्या व्यक्तीचे वारसदार मला मेलद्वारे कळवतात. त्यांची संपत्ती मिळवून देण्याच्या बदल्यात ते मलाही प्रचंड मोठी रक्कम द्यायला तयार असताता म्हाराजा...!

अशा किती ऑफर आल्या आणि म्या करंट्याने त्या तेवढ्या ऑफरचा अव्हेर केला की हो! नायजेरिच्या ७० टक्के, इरिटेरियाच्या ४० टक्के आणि बुर्किना फासोच्या २० टक्के लोकांनी मला अशा प्रकारे मदत देऊ केली आहे. पण माझा स्वभाव पडला भिडस्त आणि दळभद्री. त्यामुळे मी त्यांचा लाभच घेतलेला नाही. तसा घेतला असता तर आतापर्यंत मी किती श्रीमंत झालो असतो, कल्पना करता का. आतापर्यंतच्या ऑफरपैकी अर्ध्या ऑफऱ जरी मी स्वीकारल्या असत्या तरी अमेरिकेचे तीन अध्यक्ष, दोन बिल गेटस आणि एक किंवा दीड अझीम प्रेमजी मी विकत घेऊ शकलो असतो. (लालूप्रसाद यादव किंवा अन्य राजकारणी घेणे मला शक्य नाही, तेवढ्या ऑफर अजूनही मला आल्या नाहीत. याची खरोखर खंत वाटते.)

हे कमी होतं म्हणून की काय, अलिकडे मी न काढलेल्या लॉटरी तिकिटांनाही प्रंचड मोठ्या रकमेची बक्षीसे लागत आहेत. इग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा देशांतील लॉटरी कंपन्या केवळ माझ्या सुखासाठी त्यांची बक्षिसे मला देऊ करत आहेत. माझा इ-मेल ऍड्रेस साक्षात कुबेरानेच तयार केला असल्यामुळे त्या ऍड्रेसवर जगाच्या कानाकोपऱ्यातून बक्षिसांचा वर्षाव होत आहे. अगदी गेल्या आठवड्यात मला याहू-एमएसएन या कंपन्यांच्या नावे असलेल्या लॉटरीचे बक्षिस देऊ करण्यात आले. त्यातील रक्कम पाहूनच मला विचार आला, की अंबानी-टाटा वगैरे मंडळी कशासाठी एवढ्या कंपन्या काढतात आणि मेहनत घेतात. त्यांनी इ-मेल अकांउंट काढला तर घरबसल्या त्यांना सध्यापेक्षा कितीतरी अधिक पैसा मिळेल. मी मात्र खरोखर या ऑफरचा लाभ घेऊ शकलो नाही. माझी मध्यमवर्गीय मानसिकता माझ्या मला तसं करूच देत नाही, काय करू?

या ऑफरचा लाभ घेतला नाही म्हणून काय झाले. इकडे भारतातल्या कंपन्याही माझ्या सुखासाठी काही कमी धडपड करत नाहीत. काहींनी क्रेडिट कार्ड काढले आहेत, काहींनी तरुणांसाठीच्या विमा योजना काढल्या आहेत, काहींनी गुंतवणुकीच्या आकर्षक योजना काढल्या आहेत. नुसत्या काढल्या आहेत, असे नव्हे. या योजनांचा मी पुरेपूर वापर करावा, याचाही ते प्रेमळ आग्रह करतात. बरं, त्यांचं अगत्य एवढं की मी योजनांचा लाभ करून न घेता माझ्या गरिबीच्या दिवसांत राहिलो तरी त्या योजनांची प्रत्येक बारीकसारीक गोष्ट मला कळविल्याशिवाय त्यांना सुखाचा घास जात नाही. एका क्रेडिट कार्डच्या कंपनीने त्यांच्या कार्डचा आकार १० सेंमीवरून आठ सेमी केला, हे त्यांनी मला नऊ वेळा मेल करून कळविले. माणूस अर्धमेला होणे म्हणजे काय हे मला तेव्हा कळाले. एका विमा कंपनीच्या दरात बदल नाही, मुदतीत बदल नाही का प्रिमियममध्ये बदल नाही. तरीही ती कंपनी मला सारखी ती माझ्या पाठीशी उभी असल्याची जाणीव करून देते. कारण काय, तर त्या कंपनीच्या जाहिरातीतील मॉडेल अलिकडे बदलली आहे. पूर्वीची मध्यमवयीन ललनेच्या जागी आता एक षोडशवर्षीय नवोढा आली आहे. आता सांगा, याहून अधिक काळजी कोण घेणार?

माझ्या सौख्यासाठी नेट लावून प्रयत्न केवळ मेलद्वारे होतायत असे नव्हे. प्रत्यक्ष जगातही त्यासाठी अनेकजण दिवसरात्र एक करत आहेत. मोबाईल नामक यंत्राद्वारे त्याची अनेक प्रात्यक्षिके अधून-मधून (म्हणजेच सातत्याने) चालू असतात. एका कंपनीने गुंतवणुकीची खूप छान योजना आणली होती. त्यामुळे मला महिन्याच्या महिन्याला मोठी रक्कम मिळणार होती. ही सर्व माहिती सांगणारी मुलगी अशा सुरांत सांगत होती, की अगदी त्या कंपनीचाच मालक असतो तरी त्या आवाजाल भूलून मी गुंतवणूक केली असता. पण हाय रे दैवा! मी त्या कंपनीचाच काय, मी काम करत असलेल्या कंपनीचाही मालक नाही. त्यामुळे तिची सगळी योजना सांगून झाल्यावर मी तिला एका शब्दांतच सांगितलं, “तुम्ही सांगताय ते खरं आहे. मला तुमची योजना आवडली. पण त्यात गुंतवणूक करण्यासाठी माझा सध्याचा पगार वाढवायला पाहिजे. तुम्ही जरा आमच्या कंपनीत फोन करून सांगता का, त्याबद्दल?”

यानंतर त्या मुलीने संवाद आटोपता घेतला व पुन्हा कॉल केलाही नाही. पण मला विश्वास आहे, की मला परवडेल आणि फायदा होईल, अशी एखादी योजना तयार करायला तिने तिच्या कंपनीला सांगितलेच असेल. पण असे प्रयत्न करणारी ती एकटीच थोडी आहे. विविध क्रेडिट कार्ड, बँका त्यांच्या मोठमोठ्या आणि प्रतिष्ठित ग्राहकांमध्ये माझे नाव जोडण्यासाठी उतावीळ झाल्या आहेत. त्यामुळे माझ्या मोबाईलवर मित्र आणि नातेवाईकांच्या कॉलपेक्षा या कंपन्यांच्या कॉलचीच संख्या जास्त झाली आहे.

या सगळ्यांना नाराज करायला माझ्या जीवावर येतं. पण करणार काय. आपल्याला पडली कष्टाची भाकर खाण्याची सवय. त्यामुळे या सुख-समृद्धीच्या योजना डोळे दिपवून टाकत असल्यातरी नजरेत भजत नाहीत. त्यामुळे मी अजूनही करंट्यासारखा या योजना केवळ वाचून सोडून देतो. या सर्वांचा त्यामुळे हिरमोड होत असेल, याची मला जाणीव आहे. पण शेवटी आपल्या घेण्यालाही मर्यादा आहेतच ना. घेता किती घेशील दो कराने, हे आपल्याला लक्षात घ्यावंच लागतं.

No comments:

Post a Comment