Monday, December 17, 2007

इंग्लिश पिक्‍चर? कुठं आहेत?

इंग्रजी सिनेमा पाहणे, ही एके काळी प्रतिष्ठेची बाब होती. त्यातील चित्रीकरण (पाहणाऱ्यांच्या शब्दांत फोटोग्राफी!), मोटारींचा पाठलाग, नेत्रसुखद लोकेशन्स अशा गोष्टींवर बोलताना चित्रपट पाहणारे थकत नसत. ज्यांना इंग्रजी चित्रपट समजत नसत, असे बापडे (हेच संख्येने अधिक!) साहजिकच त्यांच्याकडे कौतुकमिश्रित आदराने बघत. चित्रपट जेम्स बॉंडचा असेल, तर त्यातील सुंदरी आणि विविध यांत्रिक करामतींची यात भरच पडत असे. दुसऱयाही काही इंग्रजी चित्रपटांची हवा तेव्हा होती, आताही आहे. त्यांच्याही बाबत उत्सुकता तेव्हा होती, आताही आहे. मात्र आपण बोलत आहोत ते काही प्रतिष्ठीत चित्रपटांविषयीच. कारण मी ज्या वातावरणातून आलो आहे, तिथे इंग्रजी चित्रपटांचे नाव निघाले की ऐकणाऱयांचे डोळे एक तर विस्फारतात तरी किंवा आंकुचित तरी होतात.


दुसऱयाही काही इंग्रजी चित्रपटांची हवा तेव्हा होती, आताही आहे. त्यांच्याही बाबत उत्सुकता तेव्हा होती, आता आहे. मात्र आपण बोलत आहोत ते काही प्रतिष्ठीत चित्रपटांविषयीच. कारण मी ज्या वातावरणातून आलो आहे, तिथे इंग्रजी चित्रपटांचे नाव निघाले की ऐकणाऱयांचे डोळे एक तर विस्फारतात तरी किंवा आंकुचित तरी होतात. अठरा वर्षे वय झालेल्या व्यक्तीनेच (म्हणजे पुरुषांनी) असे चित्रपट पाहावेत, त्याच्यावर आपल्या समवयस्क लोकांतच त्याची चर्चा करावी, असं वातावरण लहानपणापासून पाहात असल्यामुळे मोठं होण्याचे वेध फार लवकर लागले. (टॉकिजमध्ये प्रवेश करण्यासाठी वयाची खात्री कशी पटवावी, असा प्रश्न मला अनेक वर्षे पडला होता. शेवटी अठराचं वय पार केलं आणि तो प्रश्न निकालात निघाला.)

मोठं झाल्यावर इंग्लिश चित्रपट पाहायला मिळतील, ही जी कल्पना होती ती मात्र सपशेल धुळीला मिळाली. साधारण तेरा वर्षांपूर्वी स्टीव्हन स्पिलबर्गचा "ज्युरासिक पार्क' हिंदीत आला. हॉलिवूडची भारतीय भाषेमधील ही "एंट्री'! त्या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे अन्य हॉलिवूड निर्मात्यांनीही चित्रपट डब करायला सुरवात केली. गेल्या काही वर्षांतील महत्त्वाचे चित्रपट आठवून पाहा...त्या सर्वांच्या हिंदी आवृत्त्या चित्रपटगृहांत आल्याचेही तुम्हाला आठवेल. आतापर्यंत हिंदी, तमिळ व तेलुगु भाषेतच हॉलिवूडचे चित्रपट येत असत. गेल्या वर्षी "स्पायडरमॅन ३'ची भोजपुरी आवृत्ती आल्याने आणखी एक पाऊल पुढे पडले. त्यानंतर "ए नाईट इन म्युझियम' हा चित्रपट "वार्नर ब्रदर्स'ने भारतात हिंदी आणि तमीळ, तेलुगु भाषांमध्येच प्रदर्शित केला. केवळ डीव्हीडीवर तो मूळ इंग्रजीत उपलब्ध आहे. मराठी चित्रपटांची सध्याची चांगली स्थिती पाहता, मराठीतही चित्रपट डब झाल्यास नवल नाही.

आता होतं काय, की इंग्रजी चित्रपट पाहायला हक्काची जागाच राहिली नाही. सध्या मी पुण्यात राहतो. तिथे इंग्रजी चित्रपटांच्या खास जागा म्हणजे अलका आणि विजय टॉकिज. मात्र गेल्या काही काळापासून या दोन्ही चित्रपटांगृहांत इंग्रजी चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत. "अलका'मध्ये दोन आठवड्यांपासून हॉलिवूडचे हिंदीतील डब चित्रपट दिसत आहेत; तर "विजय'मध्ये इंग्रजी चित्रपटाच्या हिंदी आवृत्त्यांशिवाय हिंदी, मराठी किंवा अगदी कन्नड चित्रपटही झळकत आहेत. मल्टिप्लेक्‍स हीच इंग्रजी चित्रपटांची हक्काची जागा आहे, असं म्हणावं तर "सिटीप्राईड सातारा रोड'मध्येही सध्या "आय ऍम लिजेंड'चा हिंदी अवतार "मैं जिंदा हूं' चालू आहे. अन्य मल्टिप्लेक्‍समध्येही त्याचे अनुकरण होण्याची शक्‍यता कशी नाकारणार? "मंगला', "फेम जय गणेश' आणि "अपोलो'मध्येही हा चित्रपट हिंदीतच आहे. त्याशिवाय "30 नाईट डेज'चीही हिंदी आवृत्ती एक दोन चित्रपटगृहांत सुरू आहे. शिवाय प्रत्येक इंग्रजी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये पाहावा, एवढे काही आपले उत्पन्न अमेरिकेच्या तोडीचे नाही.

पुढील आठवड्यात येणारा "मिनोटॉर' हा चित्रपटही प्रामुख्याने हिंदीतच येत आहे. त्यामुळे काही दिवसांनी इंग्रजी चित्रपट कुठं आहेत, असंच म्हणावं लागेल! खरं सांगायचं तर तमिळ, तेलुगु किंवा अन्य दाक्षिणात्य आणि चीनी भाषेतील चित्रपटांच्या तुलनेत हॉलिवूडच्या डब चित्रपटांची गुणवत्ता चांगली असते. मात्र इंग्रजी चित्रपटाची इंग्रजीची म्हणून जी मजा असते, ती या चित्रपटांत उतरत नाही. 'विजय'मध्ये मी 'ओशन्स ट्वेल्व', 'ब्रिजेट जोन्स डायरी-२' असे एक दोन चित्रपट पाहिले. 'अलका'मध्ये 'द मिथ', 'ब्रोकबॅक माउंटन', 'फ्लाईट ऑफ द फिनिक्स', 'प्राईड अँड प्रिज्युडिस' असे काही चित्रपट पाहिले. आता तिथे हिंदीत चित्रपट पाहणे जीवावर येतं.

डब चित्रपटांचा एक महत्वाचा दोष म्हणजे ते मुख्यत्वे मारधाडीचे चित्रपट असतात. चांगले इंग्रजी चित्रपट भावभावनांना महत्त्व देणारे असतात. त्यामुळे त्या प्रकारचे चित्रपट आवडणाऱयांना डब चित्रपटात काय मजा येणार? तरीही बहुसंख्य लोकांना डब चित्रपट पाहण्यात गंमत वाटत असल्याने चित्रपटगृहांत असेच चित्रपट येणार, हे मी गृहित धरलं आहे. इंग्रजी चित्रपट कुठं आहे, असं विचारण्याची वेळ नक्की येणार, हेही नक्कीच!


1 comment: