आवस वाडा होऽऽ मायऽ...पिंकीच्या आय, चिंकीच्या माय...आवस वाडा होऽऽऽआमच्या लहानपणी खेडेगावात वाडा होता गं बाय! शंभरी गाठलेला; पण एखाद्या चिवट म्हाताऱ्यासारखा होता गं आय....डग म्हणत नव्हता गं. वाड्याचा दरवाजा खूप मोठा आणि त्याला एक छोटा दिंडी दरवाजा होता हां! दिंडी दरवाजातून वाड्यात दिवसभरी वर्दळ असे गं बाय... त्यावेळी आया आपल्या पोरींवर अन् बापडे तरण्या पोरांवर नजर ठेवत असत गं बाय! मोठा दरवाजा वाहनांसाठी मात्र उघडला जाई. दरवाजातून आत गेलं, की ते फरशीचे मोठे अंगण दिसं ग माय. याच अंगणात माझ्या आयचं आणि शेजारणीचं कितीदा पाण्यासाठी भांडण झालं. एकदा तर तिथेच त्यांच्या भांडणात मी आयचा हात रोखायला गेले, नि आयनं हिसका दिला नि मी पडले...केवढी खोक आली मला...बाबांनी मला डॉक्टरकडे नेऊन मलमपट्टी केली...त्याचा खर्चही भांडण झालेल्या काकूंकडून वसूल केला हां...एवढी भांडणं होऊनही आम्ही 7-8 कुटुंबं मात्र कितीतरी वर्षं गुण्यागोविंदाने राहत होतो. वाडा तसा दोन मजलीच. याच अंगणात आमचीही मुले मनसोक्त खेळली. नंतर थांबवावी लागली त्यांची, ही बात वेगळी! मुलींनी भोंडला केला. खूपदा...त्यावेळी हीऽऽऽ गर्दी जमायची इथे...मुलींचीही अन् मुलांचीही....आता नाही रायलं गं...बायका मंगळागौर-हरितालिकेचे खेळ खेळल्या. त्यांच्यात त्यावेळी किती संवाद होई! त्या संवादामुळे वाड्यातील नवरोबा मंडळीना कितीदा पगार कमी पडला हो, काय सांगायचं? पेठेतले व्यापारी तर कितीदा म्हणत, या बायकांचे सण रोज रोज का नसतात म्हणून.अंगणात आमच्या अंगतीपंगती होत. आता कुठं राहिल्या हो आता तशा पंगती. परवाच तर माझ्या मुलाचे लग्न झाले. त्याची पार्टी थ्री-स्टार हॉटेलमध्ये दिली. त्यावेळी इतकी आठवण झाली त्या पंगतीची. काय सांगू बायांनो...आमच्या पंगतीमध्ये पुरुषमंडळीही सहभागी होत. आमच्या आया मात्र घरातूनच डोकावून पाहत...घरी गेल्यावर आई विचारी हो, कशी होती त्या चिंगीच्या आईने केलेली भाजी? बरी होती ना? आपल्यासारखी नव्हती ना, वाटलंच मला...मेली कूपनचं तेल वापरते पंगतीच्या दिवशी...असं आई बोलायची गं...मी मात्र चिंगीच्याच ताटातली भाजी जास्त खात असे, हीहीहीही!आम्ही उन्हाळ्यात अंगणातच झोपत असू. मात्र बाबा न दादा रात्रभर झोपत नसत. त्यांना थंडी सहन होत नसे. आम्ही सकाळी उठलो ना, की ते खालीच झोपलेले दिसत. गणपतीत घरोघरी आरत्या आणि प्रसादांची अगदी धमाल असे. गणपतीपेक्षा आम्हीच मोदक जास्त खात असू. बघा हो बाय, काय आमच्या वाड्यात जगण्याची गंमत होती?आता कोणतरी या वाड्यात रहायला पायजे गं बाई! आता आम्ही शहरात राहतो. आमचा स्वतःचा फलॅट आहे. मुलगा स्टेटस्मध्ये राहतो. इकडे येणं होत नाही गं....वाड्याच्या आठवणी लिहून वेळ काढते गं बाय...त्यामुळे आता वाड्याची देखभाल करायला, लक्ष द्यायला कोणीतरी रहायला पाहिजे गं बाय....कोणीतरी लक्ष द्या गंऽऽऽ
devidaas, lekh aavaDla. varNan chhan kele aahe.
ReplyDelete