Sunday, October 18, 2009

अभ्यासक्रमः त्यांचा आणि आपले

Untitledनास्तिक मताचे आधुनिक अध्वर्यू असलेल्या करुणानिधी, रामस्वामी पेरियार आदींच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम चेन्नई विद्यापीठ तयार करत आहे. त्यामुळे येत्या काही काळात तेथे एम. ए. (करुणानिधी) असे  द्वीपदवीधर होऊ घालतील. नास्तिक मतांचाच अभ्यासक्रम त्याला कोणाही पुरोगाम्याचा विरोध होणार नाही, ही काळ्या फळ्यावरची रेघ आहे. बाकी, ईश्वरावर श्रद्धा नसलेल्याला नास्तिक म्हणून त्याची शिकवण इतरांना देणार. पण ज्याची शिक्षणावर श्रद्धा नाही, अशा माझ्यासारख्या नतद्रष्टांचे काय करणार, हे आजपर्यंत ही शिक्षणव्यवस्था ठरवू शकलेली नाही. कांचीच्या शंकराचार्यांच्या मठापुढे एक मशीद आधी होतीच. तिच्याही पुढे पेरियारचा पुतळा उभारून अपशकुन करणाऱ्या करुणानिधींना त्यांची ती प्रसिद्ध हिरवी शाल लाभाची आहे म्हणे. शिवाय प्रत्येक निवडणुकीच्या आधी ज्योतिषाचा सल्ला आहेच. आता अशा व्यक्तिंच्या जीवनचरित्रातून एखाद्याला तत्वज्ञानाचा कोळ काढता येईलही.  त्यातून कोणाच्या पोटापाण्याचा प्रश्न निकालात निघत असेल, तर आपण त्यात खोडे घालणे चांगले नाही, असे मला वाटते. उलट माझं तर म्हणणं आहे, की मद्रास विद्यापीठाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यापीठांनीही अशी, हयात असलेल्या आणि अविचारात हयात घालविलेल्या नेत्यांवर अभ्यासक्रमाची गिरणी काढावी. त्यामुळे राजकारणात येऊ घातलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांना रसप्रद वाटेल, असं काहीतरी शिकता येईल. शिवाय राजकारणाचा दांडगा अभ्यास करणाऱ्या प्राध्यापकांनाही तो शिकविताना फारशी अडचण येणार नाही. समजा, महाराष्ट्रात असे अभ्यासक्रम आणले, तर ते कसे रचता येतील,  याची ही चुणूक.

एम. ए. (शरद पवार)

यात साखर कारखाने, शेती, उद्योग, नातेवाईकबाजी यात स्पेशलायझेशन असेल. साखर कारखाने हा विषय घेणाऱ्यांना केवळ साखर हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळे कसे आणायचे, याचीही उजळणी करावी लागेल. प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर रोखठोक, सरळ आणि मुद्देसूद दिल्यास शून्य गुण मिळतील. प्रश्न कोणत्याही स्वरूपाचा असला तरी त्यात काही ना काही आकडेवारी असायलाच हवी. काहीच नाही मिळाली, तर ‘सध्या देशात दीड लाख विद्यार्थी एम. ए. करत असून त्यांपैकी केवळ 9 टक्के शरद पवार या विषयात एम. ए. करत आहेत,’ असं वाक्य टाकलं तरी हरकत नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीए साठी थेट प्रवेश मिळण्याची संधी द्यायला हरकत नाही. त्यातही जमिनींचे संपादन आणि व्यवस्थापन या विषयात स्पेशलायझेशन करायला वाव (आणि वावरही) आहे. शिवाय हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास राज्यातील कृषी महाविद्यालयांमध्ये ‘शेतकऱ्यांसाठी शेतीव्यतिरिक्त उपजीविकेचे पर्याय’ या विषयावर अतिथी  प्राध्यापक म्हणून रोजगाराचीही संधी मिळेल. एक आहे, की या विद्यार्थ्यांना एम ए मिळविण्यापेक्षा एमएलए मिळविण्यात अधिक रस असण्याचा संभव आहे.

मात्र एम ए शरद पवार करणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 मार्कांची प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागेल. यात माध्यमे आणि पत्रकारांना हाताळायचे प्रात्यक्षिक असणार आहे. विविध जातींचे म्होरके सोबत बाळगूनही पुरोगामी नेते कसे म्हणवून घ्यावे, आपल्याला हवी तशी चर्चा इतरांकडून कशी करवून घ्यावी या बाबींचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवावे लागेल. याशिवाय, वेळवखत पाहून अचानक एखाद दिवशी या विद्यार्थ्यांना अन्य शाखेत सामावून घेतले जाणारच नाही, असे नाही. त्यामुळे प्रवेश घेतला एका कोर्सला आणि प्रमाणपत्र मिळाले दुसरेच, अशी शक्यता या विद्यार्थ्यांना फार.

एम. ए. (शिवसेनाप्रमुख)

ही परिक्षा लेखी कमी आणि तोंडी जास्त आहे. लेखी परीक्षा या अभ्यासक्रमात केवळ तोंडी लावण्यापुरतीच आहे. एकच वाक्य अनेकदा सांगायचे, इतरांना किरकोळीत काढायचे ही या अभ्यासक्रमाची वैशिष्ठ्ये आहेत. या अभ्यासक्रमात प्रवेश घेताना दिलेले विषय आणि अभ्यासक्रम पूर्ण करताना असणारे विषय एकच असतील याचा काही नेम नाही. इतकेच काय, त्यांचा परस्परांशी संबंध असेलच, असेही नाही. मात्र परीक्षकांना आणि प्राध्यापकांनाही भुरळ घालण्याएवढी तुमची वक्तृत्वकला चांगली असलीच पाहिजे, नसता या वाटेला जाण्याचा विचारही करू नका. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगला रोजगार मिळेलच, याची काही खात्री नाही. काहीजणांना खूप रोजगार मिळेलही, मात्र तो कधी हिरावून घेण्यात येईल, याची त्यांना हमी नसते. या अभ्यासक्रमाचा सर्वात मोठा धोका म्हणजे हा अभ्यासक्रम केल्यानंतर याच शाखेत करिअर करावे लागते. नसता त्या माणसाचे प्रमाणपत्र परत घेण्यात येते. त्यामुळे हा अभ्यासक्रम केलेला माणूस एकतर ‘सर्टिफाईड’ असतो नाहीतर ‘सटरफटरफाईड’ असतो.

एक विशेष सांगायला हवा, की या अभ्यासक्रमात शिकविले एक आणि परीक्षेत आले भलतेच, फीस सांगितली एक आणि वसुली केली काहीच्या काही असं कदापि शक्य नाही. अभ्यासक्रमात जे घटक नेमून दिलेत, त्याबाहेरचा शब्द सुद्धा उच्चारण्याची कोणाची काय बिशाद…अगदी सरांचीही नाही. शिवाय सगळ्या अभ्यासक्रमाची अशी एक सॉलिड शब्दावली आहे. भल्या-भल्यांना ती शब्दावली पाठ करावीच लागते.

हा अभ्यासक्रम केलेला माणूस वडा-पावचा तज्ज्ञ मानण्यात येतो. त्यामुळे काही कालावधीत त्याने अंगातील प्रतिभेची चुणूक दाखविली, की त्याची वडा-ताण सुरू होते. अन्य कंपन्यांमध्ये त्याला सन्मानाने बोलाविण्यात येते . या अभ्यासक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याला काही ठराविक कालावधी नाही. केवळ निष्ठेने अभ्यास करत राहायचा. अचानक एखादे दिवशी तुम्ही पास झाल्याचे कळविण्यात येते. शिवाय तुम्ही पास झालात तर अचानक पी. एचडी.च्या मानकऱ्यासारखे वागविले जाता आणि तुमचा योग नाही आला, तर झिलकऱ्यांच्या बरोबर तुम्हाला वागविण्यात येते. दरबारी राजकारण ज्यांना जमते त्यांच्यासाठी हा अगदी रामबाण अभ्यासक्रम आहे. अलिकडे त्यात दर आणि बारी, दोन्हींचे प्रस्थ जास्त झाल्याच्या तक्रारी असल्या, तरी या अभ्यासक्रमाने गेली अनेक वर्षे राजदरबारी आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे.

एम. ए. (कॉंग्रेस)

या अभ्यासक्रमाला कोणाही विशिष्ठ व्यक्तीचे नाव नाही. कारण आधी त्याला गांधी हे नाव द्यायचे घाटत होते मात्र  नंतर या नावामुळे लोकांची दिशाभूल होईल, त्यांच्या मनात फारसे आकर्षण राहणार नाही या कारणामुळे ते रद्द करण्यात आले. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे याला स्थळ, काळ आणि परिस्थिती, या कशाचेही बंधन नाही. या अभ्यासक्रमासाठी तुम्ही नावही दाखल करण्याची गरज नाही. साखर कारखाना, सहकारी बँक, शिक्षण संस्था, पोलिस स्टेशन, कारागृह…अशी कोणत्याही ठिकाणी हा अभ्यासक्रम पुरा करता येतो. एक विद्यापीठ बदलून दुसऱ्या विद्यापीठात जाऊनही तो पुरा करता येतो. मात्र या अभ्यासक्रमात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल, तर त्यासाठी केंद्रीय परीक्षकांच्या मर्जीस उतरावेच लागले. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या जीवन-मरणाचा निर्णय केंद्रीय परीक्षकांच्या भुवयांच्या हलचालींवर अवलंबून असतो. ते जर खुश झाले तर मात्र या विद्यार्थ्यांचे आकाशातला बापही वाकडे करू शकत नाही. मात्र खुशामदीच्या या प्रॅक्टिकलमुळे या विद्यार्थ्यांना कधी आयचा तर कधी पोराचा आधार घ्यावा लागतो.

या अभ्यासक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे येते क्लासमेटस्, म्हणजे वर्गमित्र नावाचा प्रकार नसतो. एखादा मित्र मिळाला तरी तो मित्रच राहिल, याचीही खात्री नसते. त्यामुळे हा अभ्यासक्रम शक्यतोवर वंशपरंपरागत पद्धतीनेच घेतला जाईल. नाही म्हणायला, अन्य अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीवाचून मागास राहिलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे सामावून घेण्याची एक उदात्त परंपरा या अभ्यासक्रमात आहे. या शाखेचा विद्यार्थी कधीही उपाशी मरणार नाही, कारण आपण जे शिकलो ते प्राचीन काळापासून कसं चालत आलेलं आहे, हे पटवून देण्यात त्यांच्या हातखंडा असतो. शिवाय आपण जे करत आहोत, ते जगात पहिल्यांदाच करत आहोत, असाही ते दावा करू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला वश करून घेण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. अगदीच काही अडलं तर गांधींचा वापर ते करतात. गांधी हे सर्वात सशक्त चलन आहे हे त्यांना माहित असते गांधीजी असलेले चलनच कोणतेही संकट दूर करू शकते, हे साधं बहुमत या विद्यार्थ्यांना अवगत असते. दहा पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत हा अभ्यासक्रम आला असता, तर विद्यार्थ्यांना गणवेश घालावा लागला असता. मात्र आता ती गरज राहिलेली नाही.

एम. ए. (मुंढे-गडकरी)

हा नावावरून जोड अभ्यासक्रम वाटू शकतो. मात्र तो तसा नसून दोनपैकी एक या प्रकारचा आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडण्याऐवजी एक निवडला की तो दुसऱ्यातून तो बाद असा हा प्रकार आहे. जुन्या पद्धतीच्या वार लावून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार केल्याप्रमाणे त्याची रचना आहे. फरक एवढाच की हा अभ्यासक्रम निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना खरोखरच वार लावून शिकावे लागते. त्यापेक्षाही त्यांना वार झेलणे आणि ते चुकविणे, याचीही तालीम घ्यावी लागते. शिकलेले घटक आणि परीक्षेतील प्रश्न यांच्यात काही ताळमेळ असेलच असे नाही, त्यामुळे हा सर्वात कठीण अभ्यासक्रम आहे. शिवाय परीक्षा पास झाली तरी रोजगार मुख्यत्वे उत्तर भारतात मिळणार. महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांना स्पर्धा आहे ती चाटे कोचिंग क्लासेससारख्या वर्गांची. त्यामुळे आजपर्यंत तरी या विद्यार्थ्यांना राज्यात मिळालेले यश हे चिंतनाजनकच आहे. त्याहून अधिक नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत महाजन नावाचा घटक या वि्द्यार्थ्यांसाठी फायदेशीर होता. त्यातून त्यांच्या मार्कांची बेगमी व्हायची. मात्र आता तो घटकच नाहीसा झाला असल्याने यांची स्थिती गमगीन झाली आहे.

या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना चाळीस मार्कांचे प्रात्यक्षिक आहे आव्हान द्यायचे. सतत कोणाला न कोणाला, कशावरून तरी, काही का कारणाने आव्हाने द्यायची. हातात काही कागदपत्रे आणि आवाजात धार, ही या प्रात्यक्षिकांत दिसलीच पाहिजेत. जीटी मारली तरी चालेल. पण पाहिजे म्हणजे पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याने प्रात्यक्षिकांच्या वेळी थेट प्राध्यापकांनाच आव्हान दिले, तर ती अतिरिक्त योग्यता मानली जाईल. शिवाय अभ्यासक्रमाला येणाऱ्या विद्यार्थ्यांना एम ए असले तरी ‘कमल, कमळ बघ’ इथूनच सुरवात करावी लागते. त्यासाठी प्रबोधिनीची आगळीवेगळी व्यवस्था आहे.

तर हे झाले मुख्य अभ्यासक्रम. सुरवातीस एवढे पुरे. तमिळनाडूत एक तर महाराष्ट्रात चार. आहे का नाही आपण पुढे. या अभ्यासक्रमांचे यशापयश पाहून नंतर मग रिपब्लिकन, राजू शेट्टी असे क्रॅश कोर्सही काढू. हाय काय अन् नाय काय!

No comments:

Post a Comment