Tuesday, October 6, 2009

फोलपटांच्या मुलाखती

फोलपटराव, राजकीय नेते
भाग १
मुलाखतकारः नमस्कार, आज आपण भेटणार आहोत आपले लाडावलेले, माफ करा लाडके नेते फोलपटराव यांना. विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून फोलपटराव यांनी जनतेची सेवा केली आहे. त्यामुळेच दर निवडणुकीच्या वेळी जनताही निवडणूक लढविण्यासाठी त्यांना भरीस घालते. यंदाच्याही विवडणुकीत ते मतदारांच्या नशिबाची परीक्षा पाहणार असल्याने आपले नशिब आजमावून पाहणार आहेत. तर या आपण त्यांच्याशी संवाद साधू या.तर फोलपटरावजी, आतापर्यंतच्या वीस वर्षांच्या काळात आपण अठरा पक्ष बदलले आणि स्वतःचे दोन पक्ष काढून विसर्जितही केले. यामागचे इंगित काय?
फोलपटरावः त्याचं असं आहे...जनतेचं कल्याण व्हायचे असेल तर राज्यात स्थिर सरकार पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे दहा पक्ष तर आम्ही स्थिर सरकार याच मुद्द्यासाठी बदलले. गेल्या दहा वर्षांत तर आमची ख्यातीच अशी झाली आहे, की ज्याला आपले गव्हर्नमेंट टिकवायचे असेल, त्याला आमची मदतच घ्यावी लागते. आमची इस्त्री बसल्याशिवाय राज्याची घडीच बसत नाही म्हणा ना. दोन पक्ष आम्ही धर्मनिरपेक्षतेसाठी बदलले. जातीय शक्तींना आमच्यामुळे मदत होऊ नये, यासाठी सगळ्या धर्मनिरपेक्ष पक्षांशी जुळवून घेण्याचे आमचे आधीपासून धोरण आहे. आता त्यात गफलत काय होते, का आम्ही एखाद्या पक्षात गेल्यानंतर तिथे जातीयवाद सुरू झाल्याचे आमच्या लक्षात येते. एक उदाहरण देतो. आम्ही सत्ताधारी पक्षात असताना आमच्या मतदारसंघात दंगल झाली. त्यावेळी आम्ही गृहमंत्र्यांशी बोललो, की दंगल लवकर आटोक्यात आणा. दोषी कोण आहे, याची तपासणी करायची गरज नाही. तर गृहमंत्र्यांचे उत्तर होते, आम्हाला माहित आहे या दंगलीत कोण जातीने लक्ष घालत आहे. मग मी सत्ताधारी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. शिवाय माझ्या पक्ष बदलण्याने जनतेला किती फायदा होतो,पहा ना. दरवेळी त्यांना कोरी पाटी असलेला प्रतिनिधी मिळतो. पाट्या टाकणाऱ्या प्रतिनिधीपेक्षा कोरी पाटी असणारा प्रतिनिधी केव्हाही चांगलाच ना (आपल्या विनोदावर स्वतःच हसतात.)
आणखी एक कारण आहे। आपल्या नागरिकांनी, आमच्या अनुयायांनी सर्व प्रकारच्या अनुभवांना, नवीन विचारांना सामोरे जावे, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठीही मला असे राजकारणातले आडवळणं घ्यावे लागले.

प्रश्नः परंतु हे सर्व पक्षांतर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी केले, असे लोक म्हणतात...
फोलपटरावः लोक म्हणजे कोण हो? विरोधक! त्यांच्या म्हणण्याला कोण भीक घालतो. समोरच्या उमेदवाराच्या पाठीमागे असं काही बाही बोलण्याची रीतच असते राजकारणात. आता आम्ही काय आमच्या विरोधकांवर कमी आरोप केले. काय झालं त्याचं। तसंच असते ते. राहता राहिला प्रश्न आमच्या फायद्याचा॥ आता असं बघा, आमचा फायदा हा समाजाचा फायदा असतो. दिल्लीतून निघालेला एक रुपया गल्लीपर्यंत पोचेपर्यंत तेरा पैसे होतो, असं राजीव गांधी म्हणायचे. आता आमच्यापर्यंत रुपयाच नाही आला तर खालच्यांना तेरा पैसे तरी मिळतील का तुम्हीच विचार करा. शेवटी आम्हाला थोडेच पैसे खावेसे वाटतात. पण लोकांचे पोट भरण्यासाठी आम्हाला तेही करावे लागते. पापी पेट का सवाल है ना!

प्रश्नः मात्र अलिकडे राज्यातील जमीनींच्या विक्रीत तसेच प्रकल्पांसाठी जमिनी घेण्याच्या बाबतीत तुमचे नाव अनेक वादांमध्ये सापडले...
फोलपटरावः थांबा थांबा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. परवा दिल्लीत मला बिहारचे एक खासदार भेटले. त्यांना मी विचारले, तुम्ही आमच्या राज्यात एवढ्या जमिनी का विकत घेत आहात. त्यांनी मला सांगितले, तुमच्याच राज्यात नाही तर मी सगळ्या भारतात जमिनी घेत आहे. कारण मला राष्ट्रीय नेता व्हायचे आहे. ज्याच्या हाती किल्ला त्याच्या हाती सत्ता हे शिवाजी राजांच्या काळी ठीक होतं हो. आता सत्तेच्या किल्ल्या जमिनी ज्याच्याकडे असतात त्यांच्या हाती असते. काय आहे, विकास करायचे म्हणजे सोयीसुविधा, जागा पाहिजे. त्या ताबडतोब मिळायच्या झाल्या तर आपल्या हाती काही तरी पाहिजे ना. यासंबंधात काही वाद व्हावे, असे मला वाटत नाही. शिवाय आपला वेव्हार एकदम स्वच्छ आहे. सगळ्या जमिनी सरकारी भावाने घेतल्या आहेत, तर लोकं काय म्हणणार का सगळ्या जमिनी माझ्या भावाने घेतल्या आहेत. सगळा शब्दांचा खेळ आहे हो सारा.

2 comments:

  1. चित्र व लेखन उत्तम.
    "दिल्लीतून निघालेला एक रुपया गल्लीपर्यंत पोचेपर्यंत तेरा पैसे होतो, असं राजीव गांधी म्हणायचे. आता आमच्यापर्यंत रुपयाच नाही आला तर खालच्यांना तेरा पैसे तरी मिळतील का तुम्हीच विचार करा."
    हॆहॆहॆ
    'पैसा अडवा पैसा जिरवा' या तत्वाचा आधार घेतला नाही तर जनशेवेचे पीक घेता येणार नाही. आता पीकावरले काही दाने पाखरांसाठी ठेवावेच लागतात. पर्यावरणाचे जगा व जगु द्या हे तत्व कसे सर्वसमावेशक आहे याचा प्रत्यय येतो.

    ReplyDelete