Thursday, November 12, 2009

माहिती हवीय तर मोबदला द्या

माध्यम सम्राट रुपर्ट मर्डोक यांनी अखेर गुगल विरूद्ध युद्धाचे बिगुल फुंकले आहे. गेली दोन तीन वर्षे पाश्चात्य माध्यमांना, खासकरून मुद्रीत माध्यमांना गुगलने, त्यातही गुगल न्यूजने जेरीस आणले आहे. विविध पातळ्यांवर याबाबत चर्चा चालू असतानाच, आपल्य़ा मालकीच्या न्यूज कॉर्पोरेशन समूहाच्या संकेतस्थळांवर गुगलच्या बॉट्सना (BOTS) प्रवेश न करू देण्याचे सूतोवाच मर्डोक यांनी केले आहे. आपल्याच स्काय न्यूज ऑस्ट्रेलियाला दिलेल्या मुलाखतीत मर्डोक यांनी म्हटले आहे, की या संकेतस्थळांवर येणारे पाहुणे गुगलच्या शोधपरिणामांतून येतात. त्यांची संकेतस्थळावरील मजकूराशी सलगी नसते. त्यामुळे अशा उचलेगिरी करणाऱ्या लोकांपेक्षा मोजकेच पण पैसे देऊन वारंवार येणारे वाचक या संकेतस्थळांवर यावेत, असा प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी मुदत देण्यात आलेली नाही.

बातम्या पुरविणाऱ्या बहुतेक संकेतस्थळांची कमाई ही त्यावरील जाहिरातींच्या उत्पनातून होत असते. मात्र इंग्रजीसारख्या भाषेत जिथे जगभरातील वर्तमानपत्रे, वाहिन्या आणि ब्लॉग्ज अहोरात्र मजकूर (content) पुरवित आहेत, तिथे जाहिराती येणार किती आणि कुठून? गुगलच्याच अॅडसेन्सने प्रकाशकांना जाहिराती मोठ्या प्रमाणात पुरविल्या मात्र त्यातून उत्पन्न अगदी तटपुंजे मिळते. एखाद्या छोट्या ब्लॉगरला कदाचित त्यातून आपली उपजीविका भागविणे शक्य असेल मात्र मोठ-मोठ्या कंपन्यांनी त्यावर कसे भागवावे? मर्डोक यांनी याच मुद्यावर बोट ठेवले आहे. "गुगलवरील एखादे शीर्षक बघून कोणीतरी या संकेतस्थळांवर येतो आणि जातो. त्यातून फायदा काय होणार? लोकांना मोफतमध्ये काही देऊ नये," असं त्यांचं म्हणणं आहे.

मर्डोक यांच्या म्हणण्यात काहीसं तथ्य आहे. अशा पद्धतीने वाचकांना मोफत काही न देता माहितीसाठी मोबदला घेण्याने उत्पन्न काहीसे वाढेल. शिवाय इंग्रजीत नक्कल करणे खूप सोपे आहे. त्यामुळे एखादी बातमी कोणत्याही संकेतस्थळाने पहिल्यांदा दिली, की तीच Ctrl+c Ctrl+v करून जुजबी फेरफार केले, की दुसऱ्या संकेतस्थळांवर दिसायला लागते. अगदी अल्पावधीत ती इतक्या ठिकाणी पसरते, की मूळ बातमी देणाऱ्याचे संकेतस्थळ पाहण्याची कोणाला गरजही पडत नाही. मायकेल जॅक्सनच्या मृत्यूची बातमी सर्वात आधी टीएमझेड या संकेतस्थळाने दिली होती. मात्र भाव खाल्ला लॉस एंजेलिस टाई्म्सच्या संकेतस्थळाने. त्यामुळे मर्डोकसाहेब बोलले ते खरं आहे. मात्र त्यात एक मेख आहे.

बातमी देणाऱ्याने आपले हात आखडते घेतले तरी वाचणाऱ्याला ती वाचायची उत्सुकता हवी. मर्डोक यांच्याकडे वॉल स्ट्रीट जर्नल, फॉक्स न्यूज, स्काय न्यूज अशी यशस्वी ब्रांड्स आहेत. त्यातील डब्लूएसजेने मजकुरासाठी मोबदला घेण्याची पद्धत आधीच राबविली आहे. अन्य संकेतस्थळांवरील मजकुरासाठी तसेच पैसे मोजण्याची वाचकांची इच्छा आहे का, हाच कळीचा प्रश्न आहे. अन् वाचकाने पैसे मोजले तर त्याबदल्यात त्याला त्याच प्रतीचा मजकूर मिळेल, याची काय व्यवस्था आहे. मर्डोक यांच्या मुलाखतीनंतर अनेक ठिकाणी, अनेक फोरमवर चाललेल्या चर्चेचा इत्य़र्थ हाच आहे. इंटरनेटवरील मुक्त आणि मोफत माहितीची सवय झालेला वाचक खिशात हात घालून बातमी वाचणार का, हा मोठा सवाल आहे. या प्रश्नाचे उत्तर खुद्द मर्डोक यांच्याकडेही नाही.

दरम्यान, गुगलने आपली बाजू स्पष्ट करताना म्हटले आहे, की आम्ही वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवर दर महिन्याला अब्जावधी वाचक (किंवा प्रेक्षक म्हणा) पाठवत असतो. (त्यातील गोम अशी, की गुगल हजारो वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांची यादी सादर करतो. अब्जावधी वाचक हजारो संकेतस्थळांवर सरासरी दीड मिनिटांसाठी गेल्यानंतर ते कोणत्या जाहिरातींवर क्लिक करणार आणि त्यातून वृत्तपत्रांना काय डोम्बले मिळणार). या वाचकांना खिळवून ठेवण्याची, त्यांना आपल्या व्यवसायाशी बांधून ठेवण्याची संधी प्रकाशकांना (म्हणजे संकेतस्थळ मालकांना) मिळते. प्रकाशकांना वाचक हवे असतात म्हणूनच तर ते मजकूर प्रकाशित करतात. शिवाय आपल्या संकेतस्थळांवर काय असावे-नसावे याचे पूर्ण स्वातंत्र्य संकेतस्थळधारकाला असते.

आता सामना सुरू झाला आहे आणि तो अनेक वळणे घेत जाणार आहे. पाहूया पुढे काय होते ते.


No comments:

Post a Comment