Friday, February 12, 2010

अघोरपंथीयांची मात्रा

sadhu12 फेब्रुवारी 2009. सायंकाळी सहा वाजण्याच्या वेळेस हरिद्वारला हिंदु धर्मियांचा सर्वोच्च धार्मिक सोहळा कुंभमेळा एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोचला होता. नागा साधुंच्या मानाच्या स्नानानंतर गंगेची आरती सुरु झाली होती. इकडे मुंबईत हिंदुंत्वाचे निशाण खांद्यावर घेतलेली आणि या हिंदुत्वाला देशभक्तीशी जोडणारी शिवसेना चारी मुंड्य़ा चीत झाली होती. एका किरकोळ अभिनेत्याच्या तद्दन चित्रपटासाठी स्वतःची प्रतिष्ठा पणास लावून, द्युतात हरलेल्या पांडवांसारखे शल्य उराशी बाळगण्याची वेळ या पक्षावर आली. दीड वर्षांपूर्वी फुसके स्फोट करून हिंदुंची प्रतिष्ठा घालवू नका, असे सांगणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना आता चवली-पावली सारखे चॅनेलवाले हिणवत आहेत.

खरं सांगायचं, तर एक शेंडा-बुडखा नसणारे आंदोलन तब्बल एक आठवड्याहून अधिक काळ चालविल्याबद्दल शिवसेनेचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. सरकार (त्याची कार्यक्षमता संशयास्पद असली तरी धर्मनिरपेक्षतेसारख्या काल्पनिक गोष्टींसाठी ते अगदी इरेला पेटते), पैशास पासरी झालेल्या वृत्तवाहिन्या (यावर बडबड, दृश्य आणि मतांची गटारगंगा धो-धो सारखी वाहत असते म्हणून वाहिन्या) आणि सहकारी राजकीय पक्षही विरोधात असताना सेनेने तिच्य़ा वकुबापेक्षाही जास्त किल्ला लढविला, हे इथे मानलेच पाहिजे. जुने बाळासाहेब अद्याप सक्रिय असते तर काय बिशाद होती सरकार आणि बॉलिवूडची आपलं म्हणणं खरं करण्याची. बाळासाहेबांसाठी खेळपट्ट्या उखडणारे शिशिर शिंदे आणि बाळा नांदगावकरसारखी मंडळी आता मनसेत आहेत. त्यामुळे सेनेच्या योजना मनसुबे या पातळीवरच थांबतात.

अशोक चव्हाण यांचे सरकार खरोखऱच उच्चीचे ग्रह घेऊन आले असावे. कारण आपण आंदोलन करणार नाही, हे सांगून राज ठाकरे यांनी त्यांना आधी बाय दिला. त्यानंतर विचारायला हवे असे प्रश्न सेनेलाही विचारावेसे वाटले नाहीत. उदा. मुंबई आणि नांदेडमध्ये शाहरूखच्या चित्रपटाला मागितले नसताना संरक्षण देणारे सरकार ‘झेंडा’च्या वेळेस काय झोपले होते काय? त्यावेळेस मूग गिळून गप्प बसलेले राणे सरकार यावेळेस मात्र सेनेवर बंदी घालण्याची मागणी कशी काय करू शकतात? आता कोणीतरी म्हणत होतं, शिवसेनेने सीमेवर जाऊन लढावे, तिथे त्यांची जास्त गरज आहे. जणू काही हा एक चित्रपट पाहिल्याने देशातील समस्त हुतात्म्यांना मुक्ती मिळणार होती.

शिवसेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या लाठ्या खात होते, तेव्हा काही मंडळी म्हणत होती, की सेनेच्या गुंडगिरीमुळे महाराष्ट्राची अब्रू जात आहे. मला तसं वाटत नाही. महाराष्ट्राची मान खालण्याचे पुण्य एकट्या त्या पक्षाचे नाही. आपल्या मुलासारख्या नेत्याचे जोडे उचलणारे मंत्री, शेतकरी आत्महत्या करत असताना आयपीएलसाठी जीव खालीवर करणारे  नेते, नित्य भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत असतानाही लोकांना उपदेश करत फिरणारे अधिकारी आणि सरतेशेवटी मूक साक्षीदार बनण्याचे जागतिक विक्रम मोडीत काढणारी जनता यांचा -त्यात सिंहाचा वाटा आहे. शिवसेना ही फार-फार तर या ‘मानमोड्यांची' ब्रँड अँबॅसिडर म्हणता येईल.

जे अत्याचार करतात त्यांना संपविल्यास पाप लागत नाही आणि जे अत्याचार किंवा यातना सोडवितात त्यांना संपविल्यास मुक्ती दिल्याचे पुण्य लागते, अशी अघोरपंथी साधुंची शिकवण असते. सरळमार्गी साधुंची (इथे द्विरुक्ती झाली) शिकवण हिंदु धर्मियांना पचलेली नाही, हे तर सध्याच्या समस्येवरून दिसतच आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाला  आता कदाचित अघोरपंथीयांचीच मात्रा लागू पडेल.

7 comments:

  1. सुंदर लेख. पूर्णत:सहमत.

    'सरळमार्गी साधुंची (इथे द्विरुक्ती झाली)' हे तर मस्तच.

    एक (फुकटचं) मत : आत्ताच्या italic पेक्षा आधीचा नॉर्मल फोन्ट चांगला होता. italic मुले वाचालायला थोडा त्रास होतो.

    ReplyDelete
  2. एकदम खणखणीत बंदा रुपया झालाय हा लेख. एकदम सडेतोड. बाळासाहेबांनी वाचायलाच हवा. एक प्रिंट काढुन पाठवुन द्या मातोश्रीवर..

    ReplyDelete
  3. कुंभमेळा अघोर पंथीयांची शिकवण व शिवसेनेचे आंदोलन याची रुपक तुलना आवडली. एक प्रश्न जर चॆनेल वाल्यांनी याला प्रसिद्धी दिली नसती तर?

    ReplyDelete
  4. <>

    हे तर जाम आवडले.

    ReplyDelete
  5. @हेरंब,
    खूप खूप धन्यवाद. तुमचा सल्ला योग्य आहे. खरं तर मलाही इटॅलिक ठेवायचं नव्हतं. मात्र पोस्टिंगच्या वेळेस नॉर्मल करायला विसरलो. लेखात मान खाली घालण्याची ऐवजी मान खालण्याची असं झालंय त्यालाही हेच कारण आहे.
    @महेंद्र,
    फार वाईट वाटलं बाळासाहेबांची केविलवाणी अवस्था पाहून. त्यांचं लक्ष असेलच. तुम्हाला लेख आवडला, त्याबद्दल मात्र धन्यवाद.
    @प्रकाशजी,
    चॅनेलवाले प्रसिद्धी देण्यासाठी टपलेलेच होते. चित्रपट प्रदर्शित होणार नाही म्हटल्यानंतर ते ज्या पद्धतीने आक्रस्ताळेपणा करत होते आणि काल ज्या पद्धतीने जितं मया करत होते, त्यावरून शिवसेनेची मानहानी करण्यासाठी त्यांनी सगळी ईर्षा पणाला लावली होती. याला प्रसिद्धी मिळणारच, म्हणून सेनेनेही तो इश्यू केला. जे झालं ते फार वाईट झालं.

    ReplyDelete
  6. रतेशेवटी मूक साक्षीदार बनण्याचे जागतिक विक्रम मोडीत काढणारी जनता यांचा -त्यात सिंहाचा वाटा आहे.....
    लेख शंभर टक्के पटला...

    ReplyDelete
  7. धन्यवाद आनंद. आता गेल्या दोन दिवसांतील घटनांनी तर या विधानाची सत्यता आणखी पटविली आहे.

    ReplyDelete