Monday, June 7, 2010

शरच्चंद्राची फॅक्ट्री

sharad pawar ऐका जनहो राजा शरच्चंद्राची कथा. कहाणी फार जुनी नाही. या सत्तायुगातीलच होय. जंबुद्वीप नावाच्या देशात पश्चिम कोपऱ्याला एक नगरी होती. तिचं नाव सात-बारामती. या सात-बारामतीत एक मातब्बर असामी होती. असामी म्हणजे काय, राजाच. हा राजा म्हणजेच आपल्या कहाणीचा नायक, राजा शरच्चंद्र. राजा शरच्चंद्र म्हणजे धर्माची खाण आणि नीतीची खूण. सगळा कारभार खाणाखुणांनीच चालवावा तर राजा शरच्चंद्रानंच. राजा तसा क्षेत्रज. म्हणजे शेतकरी. त्यामुळे कुळाची दुखणी आणि जमिनीचे दुःख त्याला तळहातावरील रेषांप्रमाणे माहित.

तर जनहो, अशी दुखणी जाणल्यामुळेच कुळाला कधी अंतर न देणारा आणि जमिनीला कधीही दूर न सारणारा राजा म्हणून शरच्चंद्राची ख्याती होती. काही जण त्याला पुरोगामी म्हणत. ज्याच्यामुळे सात-बारामती बाहेरचे अनेक शेतकरी पुरले गेले आणि जो अनेक शत्रूंना पुरून उरला, असा तो पुरोगामी. असा येथे अर्थ घ्यायचा. नगरीच्या सगळ्या प्रजेचे हालहवाल (खासकरून हाल) ‘जाती’ने पाहायचे, हा राजा शरच्चंद्राचा मुख्य उद्योग. शरच्चंद्राच्या अधिपत्याखाली सात-बारामतीचं कोटकल्याण झालं. राजाचं आपल्या भूमीवर, नगरीवर जीवापाड प्रेम. त्यामुळं नगरीबाहेरच्या लोकांकडे लक्ष देण्याची राजाला गरज नव्हती. राजा हरिश्चंद्राप्रमाणेच आपल्या सज्जन, सच्छील व एकवचनी अशा शरच्चंद्रावरही संकटांचे डोंगर कोसळत होते. परंतु पहाडासारखी छाती करून राजानं सगळी संकटं झेलली. त्यासाठी त्याच्या कारभारी मंडळात अनेक लोक चुनखडी, रंगसफेती व अन्य अशीच साधने घेऊन तयार होती. राजाचे चरित्रही मोठे सुरस. राजाचा जन्म होताना नगरी परकियांच्या ताब्यात होती. त्याच्या जन्मानंतर दोन-चार वर्षांतच ती स्वतंत्र झाली. त्यामुळे नगरीच्या स्वातंत्र्यासाठी आपणच लढा दिला, असे राजा सर्वांना पटवून देई. राजाच्या अभ्यासूपणाचे डिंडिम वाजवणारे मठ्ठ भाट ते लोकांनाही सांगायचे. मात्र राजाची शैलीच आगळी. त्याच्या जीभेवर वाईनरींचा गोडवा. “मी जन्मलो तेव्हा सात-बारामतीत चारशे गोरे होते. म्हणजे मी पारतंत्र्याच्या काळात जन्मलो. मी जन्मल्यावर केवळ दोन गोरे उरले. मी त्या ‘काळा’त जन्मलेलो असल्याने गोऱ्यांच्या विरोधातच असणार. त्यांची संख्या कमी झाली, याचा मी काहीतरी काम केले. उगाच नाही नगरी स्वतंत्र झाली,” असं राजा समजावून सांगायचा. रसिकता आणि बुद्धी’मत्ता’ यांचा संगम झालेला तो पराक्रमी पुरुष आपल्या कोटीक्रमाने भल्या-भल्या विद्वानांची भंबेरी उडवायचा. त्यामुळे भली लोकं त्याच्या वाटेला जात नाहीत, असंही म्हटलं जायचं.

आता लोकहो, कान देऊन ऐका. एके दिवशी राजाकडे एक गोसावी आला. गोसाव्याच्या यज्ञासाठी काही धनद्रव्य देण्याचे राजाने कबूल केले होते, याची आठवण गोसाव्याने राजाला करून दिली. राजाला आधी काही आठवेच ना. त्याने गोसाव्याला तसे सांगितलेही. “अरे, या नगरीच्या शेतकऱ्यांचे भले पाहायचे, आग्नेयेकडच्या नगरीतील उद्योजकांना या नगरीत वसवायचे, झालंच तर कोंबड्याच्या झुंजी लावायच्या, घोड्यांच्या शर्यती लावायच्या, गाढवांना कामाला लावायचं अशी अनेक कामं मला करावी लागतात. आपल्या नगरीत 2500 ग्रापपंचायती आहेत. त्यांमध्ये एकूण 18,999 पंचायती आगे. त्या सगळ्या मला निस्तराव्या लागतात. त्यात अशी वचने मी कशी लक्षात ठेवू? सात-बारामतीमध्ये खूप दारिद्र्य आहे असं काही नतद्रष्ट लोक म्हणतात. जगात दुसरीकडेही किती गरीबी आहे, हे दाखविण्यासाठी खास परदेशातून ललना आणल्या मी. त्यांना बिचाऱ्यांना घालायला वस्त्रं मिळत नाहीत. अगदीच त्यांच्या लाचारीचं दर्शन नको, म्हणून त्यांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी आपल्या कसलेल्या मल्लांना कसल्या कसल्या मल्लांशी झुंजविलं. त्यात मी स्वतः एक कपर्दीकही नाही टाकली. मला त्याची गरजच काय? अन् आता तू म्हणतो, का मी तुला पैशाचे वचन दिले. असं कसं होईल महाराज,” एखाद्याची बोळवण करताना सुद्धा राजा आपली मर्यादशील वृत्तीची कास धरून ठेवत असे.

गोसाव्याला काय करावे ते सुचेना. साक्षात राजाकडून काय लेखी घ्यायचे, म्हणून त्याने तोंडीच व्यवहार केला होता. राजाला त्याच्या वचनाची आठवण कशी करून द्यावी, हेही त्याला सुचेना. “होय, होय, महाराज. शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच करायचा होता यज्ञ. त्यासाठीच काही मोहरा दान देण्याचा विचार आपण व्यक्त केला होता,” अर्ध-निराश गोसावी परत बोलू लागला. एव्हाना आपल्या तोंडाला पंजा पुसल्याचा त्याला आभास होऊ लागला होता.

ओठांचा चंबू करून राजा उत्तरला, “आम्ही मोहरा दान देत नाही, खर्ची घालतो.” त्याच्या या वाक्यावर सभेत बसलेल्यांनी उगाच काहीतरी समजल्याचा आव आणत गडगडाटी हास्य केले.

“अहो, पण महाराज, तुम्हीच म्हणालात ना शेतकऱ्यांचं भलं व्हायला पाहिजे,” आता गोसाव्याचा धीर पार खचला होता. तरीही रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणे तो जागा सोडायला तयार नव्हता.

“हो, पण मी ते तेव्हा म्हणालो असंल. आता मी स्वतःच शेतकऱ्यांचं भलं केलंय,” राजा वदला. त्यावर गोसाव्याच्या दोन्ही भुवया पार त्याच्या जटांच्या सीमाभागापर्यंत पोचल्या. डोळे अगदी राजाच्या कपड्याप्रमाणे पांढरे फटक व्हायला आले.

“ते कसे काय,” कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवत त्याने तुटक तुटक विचारले.

“हे पहा. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता. शेतात पीक घे. त्यानं काय होणार. पाऊस नाही पडला म्हणजे दुष्काळ. मग आम्हाला उगीच काहीतरी तजवीज करावी लागते. अशानं टीकाव नाही लागायचा. मी शेतकऱ्यांना सांगितलं, शेती बंद करा. तिथं टॉवरचं पीक काढा. विमानतळ बनवा. सेझ बनवा. ज्यांनी ऐकलं, पहा ते कसे भरभराटीला आले. नाही ऐकलं, ते गेले विदर्भात. (राज्याला मसणात म्हणायचे होते. पण तो कधीही वावगं बोलायचा नाही. एकदम मर्यादशील माणूस.) बघ, आमच्या सात-बारामती व आजूबाजूला, बिल्डिंगांची फॅक्ट्री काढली आहे. ललना बघण्यासाठी त्यांच्या सहकारातून पैसा आला, आहात कुठं महाराज. कशाला पाहिजे तुमचा यज्ञ-बिज्ञ,”

राजाच्या या प्रश्नावर निरूत्तर झालेला गोसावी अजूनही शरच्चंद्राची फॅक्टरी शोधतोय. 

17 comments:

  1. जबरदस्त!!! मजा आली वाचून!!

    ReplyDelete
  2. धन्यवाद, महेंद्रजी. जे चाललंय ते पाहून आणखी काय बोलणार?

    ReplyDelete
  3. Ek Number. Farach Chan.

    Nilesh Joglekar

    ReplyDelete
  4. धन्यवाद, निलेश. या ब्लॉगवर तुमचा कदाचित पहिलाच प्रतिसाद आहे. तुमचे स्वागत आहे.

    ReplyDelete
  5. एक नंबर डीडी! अगदी शिट्टी वाजवाविशी वाटतेय! जबरदस्त!

    ReplyDelete
  6. धन्यवाद, आदित्य. तुमचंही ब्लॉगवर स्वागत आहे. अशा प्रतिक्रिया मिळाल्यावर लिहिण्याचा हुरूप कोणाला येणार नाही.

    ReplyDelete
  7. भ्रष्ट्र राजकीय नेत्यांची, भ्रष्ट्र राजकीय नेत्यांच्या भ्रष्ट्राचारा साठी फक्त सामान्य जनते कडून निवडलेली राज्य प्रणाली म्हणजे भारतीय लोकशाही. अशी मी लोकशाहीची व्याख्या केली . लोकशाहीचे हे भ्रष्ट्र स्वरूप पाहून अब्राहम लिंकन रडत असेल

    ReplyDelete
  8. खरं आहे तुमचं म्हणणं. पण यात केवळ राजकारण्यांचा दोष आहे असं नाही.

    ReplyDelete
  9. डेडली!
    एकदम कापाकापीच की हो!

    ReplyDelete
  10. हे हे एकदम जबरी.

    -सचिन

    ReplyDelete
  11. धन्यवाद, सचिन. ब्लॉगवर स्वागत आहे.

    ReplyDelete
  12. DD ek number . . maaf kar baryach ushirane baghitala tuza ha blog .. . pan tuzya kadun ashich kahitari bhannat mejwani milel ashi apeksha hoti . . dhanyawad

    ReplyDelete
  13. धन्यवाद, भूषण. ब्लॉगवर तुझं आणि प्रत्येकाचं केव्हाही स्वागतच आहे.

    ReplyDelete
  14. _/_ _/_ _/_

    हा...हा...हा...जबरदस्त!!

    ReplyDelete