Tuesday, September 21, 2010

जनजागृतीचा उत्सव 3

Ganpati  “बरं ते जाऊ दे. तुमच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाने पाण्याचे जे प्रदूषण होतं, त्याचं काय,” प्राध्यापक महाशयांचे युक्तिवाद आणि संयम दोन्ही संपत आला होता. त्यामुळे त्यांनी मला उत्सवकर्त्यांच्या गोटात ढकलून दिले. 

“ती एक वेगळीच गंमत आहे, सर. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गणेश मूर्तींच्या विसर्जनाने वाहतं पाणी प्रदूषित होत नाही. तळं, विहीर इत्यादींमध्ये अस्वच्छता होऊ शकते. मात्र नदी किंवा समुद्रात प्रदूषणाची शक्यता खूप कमी असते. कसे ते सांगतो. त्याआधी तुम्हाला एक गंमत सांगतो. 2005 साली प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणीनुसार, गणेशोत्सवाच्या काळात नदीचे प्रदूषण सर्वात कमी होते! वास्तविक प्लास्टर ऑफ पॅरिसने होणारी अस्वच्छता नदीत एकूण होणाऱ्या अस्वच्छतेच्या तुलनेत अगदीच कमी असते. कशी ते सांगतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील बहुतेक शहरे साठ जास्त टक्के पाणी कुठलीही प्रक्रिया न करता नदीत तशीच सोडून देतात. मुंबईत 80, पुण्यात 64, नाशिकमध्ये 47 तर नागपूरमध्ये केवळ 26 टक्के पाण्यावर प्रक्रिया केली जाते. पुण्यातील मुला-मुठेचं दुखणं ठसठशीत दाखविलं जातं. त्यामुळे तिथली परिस्थिती पाहिली, तर पुण्यात दररोज पाणीपुरवठा होतो 750 दशलक्ष लिटरचा. त्यात सांडपाणी निर्माण होतं 192 दशलक्ष लिटर. यातील सुमारे चाळीस टक्के पाणी, म्हणजे 48 दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज पुण्याच्या सदाबहार नद्यांमध्ये सोडले जाते.

“आता आपण गणेश विसर्जनाच्या दोन दिवसांतील परिस्थिती पाहू. पुण्यात परवानगीशीर अशी 40,000 गणेश मंडळे असतात. त्यात घरगुती 20-25 हजार छोट्या मूर्तींची भर पडते. अशा एकूण 60-65,000 मूर्ती असतात. आठ ते दहा इंचांची एक मूर्ती 250 ग्रामच्या जवळपास असते. अशा एकूण मूर्तींचं वजन होईल दोन टन. पुण्यातील पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, मुठा-मुळेत दररोज 90 टनांचे सांडपाणी आणि कचरा वाहत जातो. याचाच अर्थ, गणेश मूर्तींचे तथाकथित प्रदूषण एकूण प्रदूषणाच्या दोन टक्क्यांहूनही कमी आहे. राहता राहीला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा प्रश्न. PoP म्हणजे कॅल्शियम सल्फेट म्हणजेच जिप्सम. PoP संबंधात धोक्याचा सर्वात मोठा मुद्दा हा असतो, की पाणी आणि PoP शी संपर्क आल्यास त्वचा भाजली जाण्याची शक्यता खूप अधिक असते. आता मला सांगा, ज्या नदीचं तापमान 30 टक्केपेक्षा जास्त नाही, तिथे किती उष्णता निर्माण होणार? शिवाय, आपल्याकडे बहुतेक मूर्तींचं विसर्जन रात्री केलं जातं. त्यावेळी तापमान आणखीच कमी असतं. मूर्ती पाण्यात टाकल्यानंतर कोणी तिच्यासोबत वाहून जात नाही. त्यामुळं तोही मुद्दा निकालात निघतो. 

“कॅल्शियम सल्फेट पाण्यात विरघळण्यासाठी वेळ लागतो, विरघळतच नाही, असं नाही. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, आता लोकं परत शाडू आणि मातीच्या मूर्ती घ्यायला लागलेत. नैसर्गिक रंगांचा वापरही वाढतोय. त्यामुळं पाण्याचं प्रदूषण होतं, हाही मुद्दा पटणारा नाही. पुण्यातून जाणाऱ्या रसायनयुक्त पाण्यामुळे उजनीचं पाणी लोक वापरत नाहीत. तिथल्या उद्योजकांनीही आता शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी केलीय, हे तुम्हाला माहीतच असेल. या लोकांनी गणेश मूर्तींच्या नावाने खडे फोडण्याची गरज नाही.”

मग शेवटी मी म्हणालो, “असं बघा सर, जगात प्रत्येक देशाला अन् भारतात प्रत्येक राज्याला त्यांची ओळख पटविण्यासाठी एक उत्सव लागतोच लागतो. ब्राझीलचा कार्निवल, जर्मनीचा ओक्टोबरफेस्ट, अमेरिकेचा ख्रिसमस...आपल्याकडे कर्नाटकाला त्यांचा म्हैसूरचा दसरा आहे, बंगालला दुर्गा पूजा आहे, उत्तरेत रामलीला आहे, महाराष्ट्राला कुठला उत्सव आहे? छत्रपती शिवाजीनंतर महाराष्ट्राला अभिमानास्पद असं त्याचं एकमेव ओळखपत्र गणेशोत्सव हेच आहे. या उत्सवाने जेवढे कलावंत दिले, त्यांची कला जगविली तेवढे महाराष्ट्र सरकारनेही जगवले नसतील. काही लोकं तो बदनाम करतात, म्हणून तो संपवून टाकण्याची भाषा? हे म्हणजे भिंतीला तडे गेले म्हणून घरच पाडण्यासारखं झालं. असं समजा, की गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळं बुद्धीहीन लोकांनाच त्याची गरज आहे आणि ते एकत्र येऊन, बुद्धी देण्यासाठी आकांत करतायत. सहन झालं नाही, तरी असा विचार केलात तर किमान तुम्हाला समाधान तरी लाभेल.”
(समाप्त)

लेखातील आकडे सृष्टी इको-रिसर्च इन्स्टिट्यूट, प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य अभ्यासकांनी केलेल्या पाहणीवर आधारीत. पुण्यातील मुठा नदीतील गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी प्रदूषणाच्या पातळीत कुठलीही लक्षणीय वाढ झाल्याचे दाखवित नाही.

5 comments:

  1. देशपांडे मस्तच
    गणेशउस्तावामध्ये खूप चांगली कामे सुद्धा होतात हे आजकाल कोणाला माहितीच होत. असो चांगली पोस्ट :)

    ReplyDelete
  2. हया सदरातील तिन्ही लेख वाचले,आवडले.तुम्ही प्राध्यापकांना दिलेल स्पष्टीकरण पटल.हा सण खरच उर्जेचा एक स्रोत आहे....

    ReplyDelete
  3. @विक्रम, टिपणीबद्दल धन्यवाद.
    गणेशोत्सवात चांगल्या गोष्टी होतात, हा सांगण्याचा माझा उद्देश नव्हता. मी काही पहिला माणूस नाही ते सांगणारा. ज्या कारणांसाठी या उत्सवाला विरोध होतो (थिल्लरपणा किंवा उपद्रव), ती कारणे या उत्सवाची अपत्ये नसून, एकूण समाजाचाच आजार आहे हे मला सांगायचं होतं. ज्या प्रकारे राजकारणात चांगली माणसं जात नाही म्हणून ते क्षेत्र वाईट, असं म्हटलं जातं तेच गणेशोत्सवाबद्दल म्हणता येईल. खरं तर अधिकच, कारण धर्म किंवा दैवते ही सज्जनांची मिरासदारी असल्याचा समज आहे म्हणून. (तसा गणेशोत्सव हा धर्माशी बांधील नाही, हेही सांगायला हवे.) हे मला मांडायचे होते. त्यात कदाचित मी कमी पडलो असेन.
    @दवबिंदू, धन्यवाद.
    ऊर्जेचा स्रोत हा शब्द मला सुचला नाही. तुम्ही सुचवल्याबद्दल मनापासून अभिनंदन. अस्मानीसुलतानी संकटांशी सामना करणारी लाखो माणसे आपली विवंचना विसरून दहा दिवस उत्साह टिकवून ठेवतात आणि त्याचा समारोप जल्लोषाने करतात, हा माझ्या दृष्टीने एक आश्चर्यकारक अनुभव आहे.

    ReplyDelete
  4. अतिशय मुद्देसूदपणे गणेशोत्सवाला विरोध करणारे सगळे मुद्दे काऊंटर केलेत..
    आवडलं! आधीही सांगितलं आहेच... माझे स्वतःचे बरेच गैरसमज दूर झालेत! :)

    ReplyDelete
  5. धन्यवाद, विद्याधर. गणेशोत्सवाच्या विरोधकांना गणराया सुबुद्धी देवो, हेच मागणं आपण मागू शकतो. :)

    ReplyDelete