Friday, June 29, 2012

पहिले पुस्तक

book cover 
गेली सहा महीने नोंदणावर काही लिहिले नाही. या दरम्यान अनेक घटना घडल्या, त्यावर लिहिण्याची इच्छाही झाली. परंतु, काही ना काही कारणाने लेखन काही झाले नाही. मात्र याच दरम्यान, 'जागतिकीकरणाची बदलती भाषा' या माझ्या पहिल्या पुस्तकाचे लेखन चालू होते. प्रिंट-ऑन-डिमांड या नवीन संकल्पनेद्वारे स्वतः प्रकाशित केलेले हे पुस्तक नुकतेच विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.
गेली दोन-एक दशके राजकीय आणि सामाजिक घडामोडी मी अगदी जवळून बघितल्या आहेत. त्यांतील काहींचा अर्थही माझ्या मगदुराप्रमाणे लावण्याचा प्रयत्नही केला आहे. महाराष्ट्रात पाणी टंचाई, जातीय विषमता आणि साखर कारखानदारी अशा काही नैमित्तिक घडामोडींच्या खालोखाल किंवा त्याहून कांकणभर अधिकच कुठल्या गोष्टीची चर्चा होत असेल, तर ती म्हणजे मराठी भाषेची, मराठी भाषकांची अस्मिता आणि त्यासाठी होणारी आंदोलने. या आंदोलनांचा विस्तार एका टोकाला शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पद्धतीचा धसमुसळेपणा तर दुसऱ्या टोकाला काही समर्पित कार्यकर्त्यांची, जगाला बावळट भासेल अशी मराठीसाठी तळमळ एवढा मोठा आहे. मात्र यांपैकी कुठल्याही एका टोकाला हालचाल सुरू झाली, की दरवेळेस मराठी माणसाची मानसिकता, जागतिकीकरण आणि संकुचितता अशा मुद्यांभोवती वाद-विवादांचा पिंगा सुरू होतो.
हळूहळू हा माझा अभ्यासाचा विषय बनला. अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यावर एक लेख मी लिहिला होता. तो कुठेही प्रकाशित झाला नाही. मात्र सात वर्षे झाली त्या विषयाचा मागोवा मी घेतच होतो. या मागोव्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, की हा विषय केवळ एखाद्या लेखाचा नाही. त्याला अनेक कंगोरे आहेत. त्यासाठी एक स्वतंत्र पुस्तक लिहावे लागेल. मग त्या लेखाचेच शीर्षक पुस्तकाला देऊन लेखनाचा ओनामा केला. पुस्तकाच्या निर्मितीमागे मात्र आमचे पूर्वीचे संपादक निधीश त्यागी यांची प्रेरणा होती. चांगला व अभ्यासू पत्रकार व्हायचा असेल, तर पुस्तक लिही, असं त्यांनी सातत्याने सांगितलं होतं.
मध्यंतरी काही घटना घडल्यामुळे मात्र हे काम मंदावले. मात्र एक वर्षाच्या परिश्रमानंतर पहिले पुस्तक तयार झाले. पुस्तकाच्या मजकुरासाठी मला मुख्यतः आधार घ्यावा लागला, तो वेळोवेळी आलेल्या बातम्यांचा. मात्र अनेकदा संदर्भासाठी कधी पुस्तकांचा तर कधी संशोधन निबंधांचाही वापर केला. शिवाय एक-दोन प्रसंगात इ-मेलद्वारे मुलाखतीही घेतल्या.
भाषा हा माझा आवडीचा विषय. सुदैवाने काही भारतीय आणि काही परदेशी भाषांमध्ये (इंग्रजीसकट! कुठल्या गटात टाकायचे तो निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यावा) गती असल्याने विविध भाषकांचे स्वतःच्या अस्मितेसाठी चाललेले झगडे गेली काही वर्षे नजरेखालून जात होते. जगातला असा कुठलाही भाग नाही, की जिथे स्वभाषेच्या रक्षणासाठी लोकांनी शांततामय, कायदेशीर तर कधी हिंसक असे मार्ग अवलंबिले आहेत. यात फ्रांसप्रमाणे ऐतिहासिक काळापासून स्वतःभोवती कुंपण घालणारा देश जसा आहे तसाच अगदी अलीकडेपर्यंत मोकळाढाकळा असलेला कॅनडासारखा देशही आहे.
मराठीतील प्रकाशन विश्वाची परिस्थिती एकुणात विचित्र म्हणावी अशीच आहे. या संदर्भातील दोन-तीन बातम्या मी स्वतःच दिल्यामुळे कुठल्याही प्रकाशकाकडे जावे अशी इच्छाही नव्हती आणि हिंमतही. सुदैवाने, परदेशात बऱ्यापैकी स्थिरावलेला प्रिंट-ऑन-डिमांड (मागणीप्रमाणे प्रकाशन) भारतात आलेला असल्याने त्याचाच लाभ घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मी जो अभ्यास केला, त्यात पोथी.कॉम या संकेतस्थळावर सर्वात किफायतशीर सेवा उपलब्ध असल्याचे जाणवले. अत्यंत सुटसुटीत सूचना आणि परवडेल अशा किंमती, यांमुळे पुस्तक तिथे देताना काहीच अडचण आली नाही. ऑक्टोबरमध्ये पुस्तकाच्या चाचणी प्रती आल्या आणि त्यातील दोष शोधणे, नवीन माहिती भरणे, बारीक-सारीक त्रुटी दूर करणे या कामाकडे लक्ष दिले. चाचणी प्रती सहकाऱ्यांना आणि ओळखीपाळखीतल्या काहींना दिल्या होत्या. त्यांच्याही सूचनांचा विचार केला. त्यात त्यावेळचे आमचे संपादक अनोष मालेकर यांचाही मोठा वाटा होता.
एक महिन्यापूर्वी पुस्तकाला अंतिम रूप दिले. पारंपरिक प्रकाशन नसल्याने प्रकाशन समारंभ इ. गोष्टी नाहीत. मात्र गेल्या आठवड्यात मंदार जोगळेकर यांच्या साहाय्याने हे पुस्तक बुकगंगा.कॉमवर ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध करण्यासाठी करार केला. त्यानुसार आजपासून ते बुकगंगावर समाविष्ट करण्यात आले आहे. त्याशिवाय पोथी.कॉमच्या संकेतस्थळावर ऑनलाईन खरेदीसाठीही ते उपलब्ध आहे. प्रकाशन खर्च आणि विक्रेत्यांचे कमिशन यांची सांगड बसत नसल्याने मात्र पुस्तक दुकानांत ते ठेवता आलेले नाही. 
छापील पुस्तक ऑनलाईन खरेदीसाठी -किंमत रु. १७०।-
ई-बुक खरेदीसाठी - किंमत रु. १००।-

4 comments: