Friday, October 5, 2012

मराठी प्रकाशने संधी साधणार का?

इंडियन रि़डरशिप सर्व्हेचा (आयआरएस) दुसऱ्या चातुर्मासाचा अहवाल नुकताच बाहेर आला. प्रत्येक वृत्तपत्राने आपापल्या सोईनुसार त्यातील काही काही भाग उचलून आपण कसे इतरांपेक्षा पुढे आहोत, याचे ढोल वाजवले आहेत. मात्र या अहवालाच्या प्राथमिक निष्कर्षांवर नजर टाकली, तरी दोन ठळक गोष्टी नजरेत भरतात – एक, मुख्य आणि त्यातही इंग्रजी किंवा राष्ट्रीय म्हणवल्या जाणाऱ्या प्रकाशनांची घसरण आणि दुसरी म्हणजे आंतरजालीय बातमीदारीचा वधारता भाव.

यंदाच्या दुसऱ्या चातुर्मासाच्या जवळपास सर्व आघाडीच्या वृत्तपत्रांच्या वितरण संख्येत घट झाली आहे. मग आपल्या वाचकांची संख्या वाढल्याचा कितीही दावा या वृत्तपत्रांनी केला, तरी तो अपुरा होय. वास्तविक देशात एकूणच माध्यमाच्या ग्राहकांमध्ये वाढ झालेली असतानाही मोठ्या वृत्तपत्रांचे वाचक-ग्राहक मात्र खालावत चालले आहेत. सध्याच्या वर्षी दुसऱ्या चार महिन्यांमध्ये छापील माध्यमांची वाढ केवळ ०.९ टक्के होती, तर आंतरजालाची वाढ मात्र तब्बल ३४.८ टक्के होती. तरीही ही घटच भाषिक माध्यमांसाठी मोठी संधी उपलब्ध करणारी आहे. ही संधी मराठी माध्यमे साधणार का, हाच खरा प्रश्न आहे.

देशातील १० शीर्षस्थ प्रकाशनांमध्ये लोकमत आहे, ही समाधानाची बाब म्हणायला पाहिजे. यंदाच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेत लोकमतने २२,००० नवे वाचक जोडले आहेत (ताजा खप ७५,०७,०००). पहिल्या क्रमाकांच्या दैनिक जागरणने (हिंदी) १७,००० (१,६४,२९,०००) व दैनिक हिंदुस्तानने (हिंदी) ४८,००० (१,२२,०५,०००) वाचक-ग्राहक जोडले आहेत. त्या तुलनेत पहिल्या १० दैनिकांमधील अन्य सर्व दैनिकांनी आपले वाचक गमावले आहेत. त्यात दैनिक भास्करने (हिंदी) १,०५,००० वाचक (१,४४,४८,०००), मलयाळ मनोरमाने १,६५,००० वाचक (९७,१०,०००), अमर उजालाने (हिंदी) ८५,००० (८६,०८,०००), टाईम्स ऑफ इंडियाने ९,००० (७६,४३,०००), राजस्थान पत्रिकाने (हिंदी) ५१,००० (६७,५६,०००), 'दिनत् तंदि'ने (तमिळ) ४६,००० (७४,३१,०००) तर मातृभूमीने (मल्याळम) १,०७,००० (६४,९३,०००)वाचक गमावले आहेत.

नियतकालिकांच्या विभागात मात्र देशपातळीवरील पहिल्या १० प्रकाशनांमध्ये एकही मराठी नाही. मात्र या विभागातही छापील प्रकाशनांची घसरण चालूच आहे. वनिताच्या (मल्याळम) वाचकसंख्येत ९१,००० ची घट आहे तर इंडिया टुडेच्या (इंग्रजी) वाचकांमध्ये तर ५९,००० ची घट आहे. साप्ताहिक मलयाळ मनोरमाच्याही वाचकांमध्ये तब्बल ५०,००० ची घट आहे. प्रतियोगिता दर्पण, सामान्य ज्ञान दर्पण (हिंदी) आणि जनरल नॉलेज टुडे (इंग्रजी) यांचा अपवाद वगळता अन्य सर्व नियतकालिकांच्या वाचकसंख्येत घट आहे. त्यातही प्र. यो. दर्पण २५,००० ने तर सा. ज्ञा. दर्पण २०,००० ने वाढला असताना ज. नॉ. टुडेची वाढ केवळ १,००० ची आहे हे मोठे सूचक आहे.

देशातील पहिल्या १० हिंदी दैनिकांपैकी जागरण, हिंदुस्तान, प्रभात खबर आणि पत्रिका या चार वृत्तपत्रांनी वाढ नोंदविली आहे तर भास्कर, अमर उजाला, राजस्थान पत्रिका, पंजाब केसरी आणि नवभारत टाईम्स या वृत्तपत्रांनी वाचकसंख्येत घट नोंदविली आहे. त्या तुलनेत पहिल्या १० इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये टाईम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाईम्स, हिंदू, टेलिग्राफ, इकॉनॉमिक टाईम्स आणि ऩ्यू इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रांच्या वाचकसंख्येत घट झालेली आहे. डेक्कन क्रोनिकल, डीएनए, मुंबई मिरर आणि ट्रिब्यून या वृत्तपत्रांच्या वाचकसंख्येत वाढ झाली आहे.

भाषिक वृत्तपत्रांमध्ये मलयाळ मनोरमा, दिनत् तंदि (तमिळ), मातृभूमी (मलयाळम), आनंद बझार पत्रिका (बंगाली), गुजरात समाचार, दिनकरन (तमिळ) या वृत्तपत्रांची वाचकसंख्या कमी झाली आहे तर लोकमत, ईनाडु (तेलुगु), साक्षी (तेलुगु) आणि सकाळ या वृत्तपत्रांची वाचकसंख्या वाढली आहे.

छापील माध्यमांची ही घसरण आणि डिजिटल माध्यमांची वाढ, दोन्हींची गती गेल्या तीन वर्षांपासून भारतात कायम आहेत. साक्षरतेच्या वाढत्या प्रमाणामुळे मुद्रित प्रकाशनांची संख्या मध्यंतरी वाढली होती, मात्र प्रकाशनांची संख्या वाढत असताना वाचकांची संख्या कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कॉमस्कोर या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेने डिंसेंबर २००९ मध्ये भारतातील माध्यमांसंबंधी आपला अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार, ऑक्टोबर महिन्यात १५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या १५ कोटी ८० लाख लोकांनी वृत्त संकेतस्थळांचा वापर केला. २००८ च्या तुलनेत ही ३७ टक्क्यांची वाढ तर होतीच, शिवाय आंतरजाल वापरणाऱ्या एकून लोकांपैकी ४४ टक्क्यांएवढी ही संख्या होती. देशात आंतरजाल वापरणाऱ्या लोकांमध्ये एका वर्षात जेवढी वाढ झाली, त्यापेक्षा दुपटीने अधिक ही वाढ होती, असे कॉमस्कोरचे कार्यकारी उपाध्यक्ष विल होजमन यांनी तेव्हा सांगितले होते.

त्यानंतर हंसा आणि MURC ने २०१० च्या पहिल्या चार महिन्यांचा आयआरएस अहवाल सादर केला आहे, त्यातसुद्धा ही बाब अधोरेखित झाली. मुद्रित वर्तमानपत्रांच्या वाचकसंख्येत त्याच्या आदल्या वर्षीच्या तुलनेत हलकीच (०.८ %), पण घट होती तर आंतरजालावर बातम्या वाचणाऱ्यांच्या संख्येत १.५ टक्क्यांची वाढ होती. २०१२ च्या पहिल्या चार महिन्यांत ही वाढ ४२ टक्के एवढी झाली आणि ताज्या अहवालात ती ३४.८ टक्के झाली आहे.

इंग्रजी किंवा हिंदी प्रकाशनांच्या तुलनेत मराठी प्रकाशनांनी अद्याप आपले वाचक फारसे गमावलेले नाहीत. उलट लोकमतने देशातील पहिल्या दहा प्रकाशनांत तर सकाळने पहिल्या दहा भाषिक दैनिकांत स्थान मिळविले आहे. हिंदी काय किंवा इंग्रजी काय, डिजिटल मजकूर ज्या प्रमाणात वाढतो त्या प्रमाणात छापील माध्यमांना उतरती कळा येत असल्याचे साधारण दिसून येते. मराठीत आंतरजालावर मजकूर निर्मिती भरपूर होत असली, तरी वृत्तपत्रांमधील मजकुराशी स्पर्धा करेल एवढी ती आशय आणि आवाक्याच्या दृष्टीने समर्थ नाही. त्यामुळे ही संधी मराठी माध्यमे (दोन्ही बाजूची) साधणार का, हा खरा प्रश्न आहे.

4 comments:

  1. छापील माध्यमांना उतरती कळा येत असल्याचे साधारण दिसून येते. हे मात्र बरोबर आहे...याचे माध्यमांनी जरूर आत्मपरीक्षण करणे जरुरी आहे......पण आजच्या पेड न्यूज च्या जमान्यात असे होणे शक्यच नाही.. पेड बातम्यां त्याच वेळी सोशल नेट्वर्किंग साईट चा वेगाने होणारा प्रचार मुळे वाचकवर्ग दुरावत आहे हे कटुसत्य वर्तमान पत्र वाले मंजूर करणार नाहीत. कोळसा घोटाळा FDI च्या बातम्या चे स्वरूप प्रत्येक वर्तमान पत्रात वेगळे होते....लोकमत ने तर घोटाळा झालाच नाही म्हणत देशाच्या हिताच्या दृष्ठी ने या कोळसा घोटाळ्यास घोटाळा न म्हणता या खाण वाटप करणे देशाच्या हिताचे होते म्हणत मालिकाच सुरु केली.....पण मालीका पूर्ण होण्या आधीच या पत्राचे मालक दर्डा बांधु यांच्या विरुद्ध CBI ने गुन्हा दाखल केला ...आणि यांच्या देशहीताचे पोकळ प्रेम स्पष्ठ झाले. आज वर्तमानपत्रे लोकशाहीचा चतुर्थ स्तंभ न राहाता लोकशाही घोटाळ्या मधील त्रिकोणाचा तिसरा कोन राजकरणी नेते आणि नौकारशाही बरोबर झाला . जाता जाता पत्र नव्हे मित्र अशी बिरुदावली मिरविणाऱ्या महाराष्ट्रा टा ई म्स ची आंतरजाल आवृत्ती तर पोर्न आवृतीच झाली आहे....हे आपण पाहताच असाल. आंतरजालावर सर्व वर्तमान पत्र उपलब्ध असले तरी सकाळच्या चहा बरोबर ताजे छापील (पेड बातम्या का असेना) वर्तमान पत्र वाचण्याचा आनंद कांही वेगळाच असतो.... त्यातल्यात्यात बलात्कार लफडी ( माझ्या गल्लीतील लफडी, कोणाची बाई पळून गेली हे वतर्मान पत्र वाचल्यावरच मला समजते) मारामारी राजकारण्याच्या बातम्या वाचण्या पेक्षा शेत नसले तरी आग्रोवन पेपर आवर्जून वाचवा असा आहे..त्यातील शेतकऱ्यांच्या कष्टाच्या यशाच्या बातम्या वाचल्यावर जगण्याला हिम्मत येते.
    --

    ReplyDelete
  2. धन्यवाद, ठणठणपाळजी. छापील माध्यमांची विश्वासार्हता कमी होत आहे, हे खरं आहे. सकाळच्या चहाबरोबर वृत्तपत्रे वाचण्याची सवय असलेले काही लोक आहेत, मात्र नवी पिढी झपाट्याने डिजिटल प्रकाशनांकडे वळत आहे.त्यांच्यासाठी ही प्रकाशने काय करणार, हा खरा प्रश्न आहे.

    ReplyDelete
  3. "बातमी" कशाला म्हणायचं आणि "ताजी" बातमी कोणती याबाबत आता खूप बदल झाला आहे. मराठी प्रकाशनांना हे शिवधनुष्य पेलण्यासाठी बराच बदल घडवून आणावा लागेल स्वत:मध्ये!!

    ReplyDelete
  4. धन्यवाद, सविताजी. बातमी घडण्याकडून घडविण्याकडे आताशा कल झाला आहे. मात्र तसे न करता, वाचकांना बांधून ठेवायचे, ही कसरत मराठी प्रकाशनांना करावी लागणार आहे. सुदैवाने, इंग्रजीचा वाचक ज्या झपाट्याने पर्यायी माध्यमे किंवा तंत्राकडे वळला आहे, तेवढा भाषिक वाचक वळलेला नाही. परंतु तरीही मराठी प्रकाशनांना बदल करावा लागणारच आहे आणि तोही झपाट्याने!

    ReplyDelete