Saturday, January 25, 2014

भ्रष्टाचार आणि 'आप'वर राष्ट्रपतींची टिप्पणी - एक नवा पायंडा

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणातून भ्रष्टाचाराच्या विरोधात केवळ स्पष्टोक्तीच केली असे नव्हे, तर त्यातून सरकारे कोसळतील, असा इशाराही दिला आहे. राष्ट्रपतींच्या बोजड भाषणांच्या परंपरेत हा एक वेगळा पायंडा आहे आणि त्याचे स्वागतच करावे लागेल.
भ्रष्टाचार हा असा कर्करोग आहे जो लोकशाहीला कमकुवत बनवतो तसेच आपल्याक राज्यांची पाळेमुळे पोकळ बनवतो. भारताचे नागरिक, क्रोधित आहेत तर त्यायचे कारण भ्रष्टाचार तसेच राष्ट्रीय साधनांचे नुकसान त्यांना दिसत आहे. जर सरकारांनी या त्रुटींचे निराकरण केले नाही तर मतदार सरकारांना खाली खेचतील,
असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. देशातील सत्ताधारी यातून बोध घेतील, अशी शक्यता कमी असली, तरी देशाचा सर्वोच्च अधिकारी हे वक्तव्य करतो आणि तेही प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवसाच्या पूर्वसंध्येला, ही खचितच महत्त्वाची बाब आहे. राष्ट्रपतींनी ‘आप’च्या नावाने निघालेल्या टोळीलाही जाता जाता टपली मारली, हे खूप बरे केले. ते म्हणाले, 
काही निराशावाद्यांनी लोकशाहीप्रती आपल्‍या कटिबध्‍दतेची खिल्‍ली उडवली असेल, मात्र जनतेने कधीही आपल्‍या लोकशाहीचा विश्‍वासघात केला नाही, जर कुठे काही त्रुटी असतील, तर त्‍या ज्‍यांनी इच्‍छा पूर्ण करण्‍याचा मार्ग म्‍हणून सत्‍तेचा मार्ग स्विकारला आहे त्‍यांच्‍यामुळे आहेत...याचप्रमाणे सार्वजनिक जीवनात वाढलेला पाखंडीपणाही धोकादायक आहे. निवडणूका कोणत्‍याही व्‍यक्‍तीला आभासाशी खेळण्‍याची परवानगी देत नाहीत. ज्‍या लोकांना मतदारांचा विश्‍वास हवा आहे, त्‍यांनी केवळ अशीच आश्‍वासने दिली पाहिजेत, जी पूर्ण होऊ शकतील. सरकार ही धर्मादाय संस्‍था नाही. लोकवादी अनागोंदी शासनाचा पर्याय असू शकत नाही. खोटया वचनांचा परिणाम अपेक्षाभंगात होतो, ज्‍यामुळे राग उफाळून येतो आणि स्‍वाभाविकपणे या रागाचे लक्ष्‍य असतेः सत्‍ताधारी पक्ष.

राष्ट्रपतींचे उरलेले भाषण नेहमीच्या चाकोरीतील होते, त्यात छोट्या राज्यांपासून दहशतवादासारखे अनेक विषय होते. वाचता येते आणि दूरचित्रवाणीवर दिसू लागले तेव्हापासूनच्या प्रत्येक राष्ट्रपतींना याच विषयावर वार्षिक प्रवचन देताना वाचले वा ऐकले आहे. त्यात काही नाविन्य नाही. ताज्या घडामोडींची बऱ्यापैकी दखल घेणारे हे भाषण म्हणून त्याची एवढीच दखल घेतलेली पुरे!

2 comments:

  1. एकेकाळी अंबानीच्या रिलायंस कंपनीचे अर्थ मंत्री म्हणून प्रसिध्द असलेले प्रणव मुखर्जी यांनी भ्रष्ट्राचार आणि आम आदमी पार्टी वर केलेली टीका म्हणजे सौ चुहे खा के बिल्ली चली हज को या सारखी आहे . भ्रष्टाचार हा कर्करोग आहे हे टाळ्या खाऊ वाक्य भाषणात वाचून जनतेला मूर्ख बनवता येते . हे देश्याच्या सर्वौच्च पदावर आहेत त्यांनी या भ्रष्ट्राचाराच्या विरुद्ध काय कायदेशीर कार्यवाई केली हे सांगितले असते तर चांगले झाले असते.

    राहिला आप चा प्रश्न . आंदोलन कर्त्यांना शासक होऊन दाखवा असे यांनी यांच्या पक्षाने आव्हान दिले होते . ज्याना राजकारणाचे छक्के पंजे माहित नाहीत राजकारणाचा अनुभव नाही त्यांना एक महीन्याच्या आत फाशीची शिक्षा देण्याचा या देशातील बुद्धिमान विचारवंतांचा आणि मिडीयाचा प्रकार अजब आहे . आप मुळे प्रस्थापित व्यवस्थेचे हितसंबंध धोक्यात येत असल्यामुळे आप विरुद्ध रान उठवले जात आहे .

    आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या हातात पोलिस दलाचे नियंत्रण असावे या मागणी साठी अहिंसक मार्गाने आंदोलन केले तर आप चे काय चुकले . या निमित्त दिल्ली पोलिसावर मुख्यमंत्र्या चे नियंत्रण नाही हे पहिल्यांदा जनते समोर आले . आज पर्यंत भाजपा -कॉंग्रेस यांनी मांडावली / तोडपाणी करत शासन केले. जनतेशी त्यांचे कांही घेणे देणे नव्हते म्हणून तेरी भी चूप मेरी भी चूप असे राजकारण झाले . व्यवस्था बदलणे आवश्यक आहे …… पण आमच्या फायद्याच्या वाटेत या नव्या व्यवस्थेने येवू नये आमच्या शराब, सेक्स, पाणी, वीज, वाळू, शिक्षण माफिया च्या साम्राज्याला धक्का लागू नये हे कसे शक्य आहे .

    ReplyDelete
  2. ठणठणपाळजी, नमस्कार. बऱ्याच काळानंतर तुमची टिप्पणी आली आहे. प्रश्न भ्रष्टाचारावर कारवाई करण्याचा नाही, तर भ्रष्टाचार म्हणजे काय आणि खरोखरच लोकांना तो काढून टाकायचा आहे का, हा आहे.
    आप अननुभवी आहे, तिला राजकारणाचे छक्के पंजे ठाऊक नाहीत, मान्य. परंतु मग ती नम्रता स्वतः आपच्या लोकांमध्ये आहे का? आम्ही नवखे आहोत, आम्हाला जरा काळ द्या, ही भाषा त्यांनी कधीतरी वापरली का? जगाला नैतिकतेचे डोस पाजायचे आणि स्वतः शूचिर्भूत असल्यासारखी त्यांची भूमिका सगळेच लोक कसे चालवून घेतील.
    आमच्या शराब, सेक्स, पाणी, वीज, वाळू, शिक्षण माफिया च्या साम्राज्याला धक्का लागू नये हे कसे शक्य आहे
    यातल्या कुठल्याही हितसंबंधाला आतापर्यंत आपने बाधा आणलेली नाही. शीला दीक्षित यांच्यावर कारवाई करणे तर दूरच, आता ते त्यासाठी पुरावे मागत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेच्या काळात थर्ड क्लास बांधकामे करणाऱ्या ठेकेदारांची यादी मागवून त्यांना किमान काळ्या यादीत टाकण्याची कारवाई तरी यांनी केली आहे का? मग यांनी कोणत्या हितसंबंधांना बाधा आणली म्हणायचे?
    बाकी, काल या विषयावर गिरीश कुबेर यांनी लिहिलेला लेख खूपच चांगला आणि वस्तुस्थिती मांडणारा आहे. तोही तुम्ही पाहा. आपमुळे किती भाबडेपणा निर्माण झाला आहे, ते यात उत्तम प्रकारे मांडले आहे.

    http://www.loksatta.com/lokrang-news/childish-republic-355987/

    ReplyDelete