When you return to a place after a long time, you realize how much you yourself have changed over the time – Nelson Mandela
पंजाबला कधीही गेलेलो नसलो तरी पंजाबी भाषा, पंजाबी संस्कृती आणि शीख पंथ हे माझ्यासाठी अपरिचित कधीही नव्हते. किंबहुना जन्मल्यापासून पंजाबी वातावरण मी अवतीभोवती पाहतच होतो. नांदेडचा असल्यामुळे गुरुद्वारा काय, अरदास किर्तन काय किंवा होला मोहल्ला काय, यांचे अप्रूप मला नव्हते. ते माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग तर होतेच, पण शीख वर्गमित्र, कुटुंबाचे शीख स्नेही यांच्यामुळे पंजाबीपणा हा माझ्या जाणिवेचा भागच होता. नांदेड सोडण्यापूर्वी एक दोन वर्षे, १९९६-९७ च्या दरम्यान, तर जवळ जवळ प्रत्येक दिवशी गुरुद्वारा हुजूर साहिब आणि गुरुद्वारा लंगर साहिब ही आमची हक्काची ठिकाणे होती. अठरा वर्षे पुण्यात राहिल्यामुळे ही जाणीव पुसट झाली होती. नंतर दक्षिण भारतीय संस्कृतीचा ध्यास लागल्यानंतर तर ही जाणीव अगदीच झिरझिरीत झाली. लुई टॉलस्टॉय यांच्या भाषेत सांगायचे, तर "एखाद्या खानावळीवरील जुन्या पाटीसारखी ती झाली होती. त्यावर काहीतरी लिहिले होते, हे समजत होत परंतु काय लिहिले आहे हे कळत नव्हते.”
त्यामुळे घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या साहित्य संमेलनाला जायचे हे जेव्हा नक्की झाले, त्यावेळी पहिल्यांदा माझी भावना नेल्सन मंडेला यांच्या वरील वाक्यासारखी होती. हा एक प्रकारचा शोधच होता. पुण्याहून झेलम एक्प्रेसने नवी दिल्लीला निघालो त्यावेळी तरी ही भावना अंधुक स्वरूपात होती. कारण नाही म्हटले तरी पंजाबचे भूदृश्य अनोळखी असल्याची भावना मनात होती. त्याहून महत्त्वाचे म्हणजे पूर्ण १९ वर्षांनी मी उत्तर भारतात जात होतो. मनमाड-भुसावळ आणि तेथून मध्यप्रदेश या मार्गावर एकेकाळी प्रवास केला होता. त्यावेळी निव्वळ भणंग म्हणून वाट मिळेल तिकडे मी भटकत होतो. आज २०१५ साली त्याच मार्गावरून जाताना माझ्या स्वतःमध्ये किती बदल झाला, याचीच चाचणी या प्रवासात होणार होती. किमान तशी व्हावी, ही अपेक्षा होती.
नाही म्हणायला गेल्या वर्षी दिल्लीची एक फेरी झाली होती. परंतु त्यात भोज्याला शिवून येण्यासारखा प्रकार होता. त्यात अनुभव घेणे, हा प्रकार फारसा झालाच नाही. या फेरीत मात्र अनुभवांची आराधना तेवढीच असणार होती. त्यामुळे या प्रवासाची असोशी अधिक होती.
पुणे रे ल्वे स्थानकावर झेलम एक्प्रेसमध्ये बसलो ते या पार्श्वभूमीवर. गाडीत बसल्यावर आश्चर्याचा पहिला धक्का बसला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केलेल्या अंदाजपत्रकातील घोषणांची अंमलबजावणी वेळेआधीच झालेली दिसली. वास्तविक अंदाजपत्रकातील घोषणा एक एप्रिलपासून अमलात येतात. परंतु ३१ मार्चलाच झेलम एक्स्प्रेसच्या शौचकूपात बायो टॉयोलेट बसविलेले होते. प्रत्येक आसनाजवळ मोबाइल चार्जिंगची सोय केलेली होती. इतकेच नाही तर वरच्या आसनावर जाण्यासाठी अधिक चांगल्या पायऱ्यांची सोय केलेली दिसली.
जातानाच पूर्णपणे स्वतंत्र गाडीने आणि स्वतंत्र मार्गाने जायचे, याचा निश्चय मी आधीच केला होता. त्यामुळे झाले काय, की वृत्तपत्रांतून ठळक घोषणा केलेल्या पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ऐन परीक्षेच्या काळात रेल्वेच्या डब्यात केलेल्या कवितांचे सादरीकरण, फ्लॉवर आणि टमाटे या झक्कास मिश्रण असलेल्या भाज्यांची मेजवानी अशा प्रक्षोभक मनोरंजनाला मी मुकलो. परंतु हाच निर्णय योग्य होता, हे घुमानला पोचल्यानंतर सिद्ध झाले. नवी दिल्ली, अमृतसर आणि घुमान अशी त्रिस्थळी यात्रा केल्यानंतर कळाले, की संयोजकांच्या सौजन्याने धावणारी ती गाडी वास्तवात धावलीच नाही. कण्हत-कुंथत साठ तास घेऊन ती गाडी अमृतसरला पोचेपर्यंत संमेलनाच्या उद्घाटनाची वेळ येऊन पोचली होती.
चांगला आहे. पुढील भागाची वाट आहे.
ReplyDelete