Friday, March 18, 2016

ओवैसी अन् सेक्युलरांना जपानी चपराक!

'भारत माता की जय' म्हणायचे का नाही, यावर भाष्य करून ओवैसीने दाखवून दिलेली जनुकीय गुंतागुंत आणि देशाची मानचिहे आदरासाठी नसून खिल्ली उडवण्यासाठी आहेत, अशी 'जेएनयू'कीय अक्कल पाजळणारी पिलावळ, यांनी गेली काही दिवस बातम्यांच्या क्स फिसवर कब्जा केला आहे. राष्ट्रवादी गँग आणि दीडशहाणी गँग एकमेकांसमोर उभ्या आहेत. त्या कधी एकमेकांच्या उरावर बसतील काही नेम नाही.
अशा वातावरणात पुण्यात हिंदी भाषेच्या एका कार्यक्रमाची अध्यक्षता एक जपानी प्राध्यापक करतो. सर्व वक्त्यांची भाषणे झाल्यावर उठतो आणि साधे-सरळ परंतु थेट भिडणारे भाषण करतो. आणि भाषणाच्या शेवटी मी भारत माता की जय म्हणत आलो आहे आणि म्हणत राहणार, असे सुनावून तमाम सेक्युलरांचे नाक ठेचतो.
हे दृश्य "देशभक्तीचा ठेका घेतलेल्या" रा. स्व. संघ किंवा तत्सम टिळाधाऱ्यांच्या कार्यक्रमातील नव्हते. उलट काँग्रेस नेते असलेल्या उल्हास पवार यांच्या ताब्यातील महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या कार्यक्रमात घडलेला हा प्रसंग आहे.
'हिंदीचे जागतिकीकरण आणि शक्यता' या विषयावर राष्ट्रसभा सभेच्या वतीने एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. हिदेआकी इशिदा  होते. राहुल गांधींपेक्षा चांगल्या दर्जाच्या हिंदीत, अन् तेही स्वत:च्या मनाने, केलेल्या भाषणात प्रा. इशिदा यांनी जपानी लोकांमध्ये हिंदी, संस्कृत एकूणच भारताबद्दल असलेल्या प्रेमाचे वर्णन केले. त्यांच्या खुशखुशीतपणाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.
अनके शतकांपूर्वी बाहेरच्या आक्रमकांनी तुमच्यावर आक्रमण केले आणि येथील खडीबोलीची (हिंदी) मोडतोड केली. त्यावेळच्या देशभक्तांना ही बाब रूचली नसणारच. आक्रमकांनी केलेल्या सरमिसळीला त्यांनीही आक्षेप घेतला असणारच. मात्र नंतर उर्दू ही स्वतंत्र भाषा काढून यावर मार्ग शोधण्यात आला. त्यानंतर महात्मा गांधींनी हिंदुस्तानी ही भाषा संपर्कभाषा म्हणून रूढ केली. आज तुम्ही जिला हिंदी म्हणता, ती हीच भाषा होय. म्हणून आज इंग्रजी शब्दांच्या मिश्रणाने तुम्ही का बिचकता हेच मला कळत नाही. हीच उद्याची प्रमाणभाषा आहे, असे सांगत त्यांनी परकीय माणूस भारतीय भाषांच्या चर्चेकडे कसा पाहतो, याची चुणूक दाखविली. जपानमध्ये परकीय भाषांच्या लोकप्रियतेत हिंदी तिसऱ्या क्रमांकारवर असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर भाषणाच्या शेवटी त्यांनी 'मला आवर्जून एक उल्लेख करायचाय. मी भारतीय संस्कृतीकडे आदराने पाहतो आणि म्हणून मला 'भारत माता की जय म्हणण्याची लाज वाटत नाही. मी ते म्हणत राहणार," असे ठणकावून सांगितले.  त्यांच्या या समयसूचकतेला उपस्थितांनी दाद दिली नसती तरच नवल. अन् तोपर्यंत हिंदीच्या आडूनआडून मोदींवर तोंडसुख घेणाऱ्यांची तोंडेही पाहण्यासारखी झाली होती!

No comments:

Post a Comment