सात दिवसांपूर्वी, 30 मार्च रोजी, मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ आमची गाडी फिरत होती. स्टाफ कॉलेज या नावाने 'प्रसिद्ध' असलेली एक उपेक्षित इमारत आम्हाला हवी होती. कारण थोड्याच वेळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्य पत्रकारिता पुरस्कार स्वीकारण्यासाठी मला 'तयार' व्हायचे होते. एखाद्या रोमांचक सामन्यातील शेवटच्या षटकांमध्ये चुरस निर्माण व्हावी, तसे अगदी तास-अर्धा तास आधी आम्हाला ती जागा सापडली आणि यथावकाश आम्ही कार्यक्रमस्थळी पोचलो. त्या10-15 मिनिटांत थोडी फार पायपीटही झाली आणि प्रत्यक्ष पुरस्कार स्वीकारण्याआधी 20 वर्षांपूर्वीचा पुनःप्रत्यय मी घेऊ शकलो.
याच परिसरात अशाच प्रकारे मी कधी काळी भटकलो होतो. फक्त त्यावेळी घर सोडून आलो होतो आणि वाट फुटेल तिकडे रस्ता शोधत फिरत होतो. गेली 15 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात जे काही काम मी केले असेल नसेल, त्याची एक गोळाबेरीज म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना एक भणंग म्हणून केलेली ही भटकंती माझ्या डोळ्यासमोर होती. हा पुरस्कार म्हणजे एक प्रकारे त्या भणंगगिरीला मिळालेली दादच म्हणावी लागेल. वीस वर्षांच्या कालखंडाची दोन टोके जोडणारे एक वर्तुळ जोडले गेले.
एरवी प्रत्येक पुरस्कारामागे असते त्या प्रमाणे याही पुरस्काराचे श्रेय आईचे कष्ट, वडिलांचे आशीर्वाद तसेच मोठ्यांचे मार्गदर्शन आणि मित्रांचे सहकार्य यांना आहेच. त्याच प्रमाणे नांदेडमध्ये माझ्या घरानंतरचे घर असणारे डॉ. राम मनोहर लोहिया वाचनालय व ग्रंथालयालाही त्याचे श्रेय आहे. वाचन-लेखन ही एक प्रतिष्ठेची बाब आहे, हे वाचनालयानेच मला शिकविले.
मात्र श्रेय सुफळ होण्यासाठी सुद्धा योग्य वेळ यावी लागते. बरोबर 25 वर्षांपूर्वी नांदेडमधील एका गणेशोत्सव मंडळाच्या निबंध स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला होता. त्यानंतर मिळालेला हा थेट दुसरा पुरस्कार. मध्ये कुठलाही थांबा नाही. त्यामुळे या पुरस्काराचा आनंद अंमळ जास्तच. शिवाय कुठल्याही वृत्तपत्राच्या नावाखाली नव्हे, तर सरकार दरबारी सोशल मीडिया लेखन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्लॉग लेखनासाठी हा पुरस्कार मिळालेला असल्यामुळे त्याचे कौतुक अधिक! गेल्या दीड-एक वर्षात मदुराईची मीनाक्षी, कन्याकुमारी, तिरुवन्नामलै, पद्मनाभस्वामी (तिरुवनंतपुरम), गोविंद देवजी(जयपूर), कोच्चीतील सेंट फ्रान्सिस चर्च, अमृतसरातील हरमंदिर साहिब आणि नांदेडमधील सचखंड हुजूर साहिब अशा नाना तीर्थस्थळांवर डोके टेकवून आलेलो आहे. (अर्थात् पुरस्कारासाठी नाही!) त्यामुळे यातील नक्की कोणता देव पावला आणि हा मान माझ्या पदरी पडला, हे अजून नक्की कळायला मार्ग नाही. मात्र 'ज्याने पाहिला नाही दिवा त्याने पाहिला अवा', अशा पद्धतीचा हा सन्मान मिळाल्यामुळे हरखून जायला होते हे नक्की.
मी इंग्रजीत ब्लॉगलेखन सुरू केल्याला यंदा दहा वर्षे पूर्ण होतील तर मराठीला नऊ वर्षे. मराठीत ब्लॉग लिहिणाऱ्या (अन् अद्याप लिहिणाऱ्या) पहिल्या काही पत्रकारांपैकी मी एक. वृत्तपत्रात काम करत असलो, तरी तेथे कामात काही राम नव्हता. मंदिराचा पुजारी सर्वात आधी नास्तिक होतो, असे म्हणतात. त्याच प्रमाणे पेपरमधील कर्मचारी सर्वात आधी निराश होतो, असे म्हणायला हरकत नाही. या क्षेत्रात मी आलो ते लेखनाच्या हौसेखातर आणि त्यालाच वाव मिळत नसल्याचे पदोपदी दिसून येत होते. भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणे ‘जीर्णमङ्गे सुभाषितम्’ अशी ही अवस्था होती. हे जाणवल्यानंतर आधी इकडे-तिकडे लिहिण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर हे नवे, मुक्त आणि प्रभावशाली माध्यम हाताशी आल्यानंतर ती संधी मी हातोहात घेतली. त्याची ताकद वगैरे ओळखणे राहिले बाजूला, पण आपल्या मनमुराद अभिव्यक्तीसाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळते आहे, याचाच आनंद जास्त होता. म्हणूनच इतरांनाही मी या माध्यमाची कास धरण्याचा आग्रह नेहमीच करत आलेलो आहे. त्यातूनच मी आणि आशिष चांदोरकर यांनी ब्लॉग लेखनाचा मार्ग चोखाळला. आम्ही काम करत असलेल्या संस्थेत आमची ती विद्रोही चळवळच होती म्हटले तरी चालेल. योगायोगाने गेल्या वर्षी त्याला हा पुरस्कार मिळाला आणि मागोमाग माझा क्रमांक लागला.
सुदैवाने अगदी आरंभापासून माझ्या लेखनकामाठीला प्रतिसाद मिळत गेला आणि हुरूप वाढत गेला.
तीन वर्षांपूर्वी औपचारिक नोकरी सोडल्यानंतर मुक्त पत्रकार म्हणून काम करायला सुरूवात केली. या काळात याहू, रिडीफ आणि बीबीसीसारख्या संस्थांसाठीही काम केले. त्याच वेळेस माझा मित्र विश्वनाथ गरूड याने लोकसत्ता.कॉमवर ब्लॉग लिहिण्याचा प्रस्ताव दिला आणि साधारण मार्च 2014 पासून मी तेथे ब्लॉग लिहायला सुरूवात केली. राजकीय घडामोडींवर आधारित असा तो ब्लॉग होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात लिहिलेल्या या नोंदींना प्रचंड प्रतिसाद मिळाला. पंधरा वर्षांच्या पत्रकारितेत आणि 10 वर्षांच्या ब्लॉगलेखनात मी कधीही एखाद्या विशिष्ठ विचारसरणीचा वा पक्षाचा प्रसार किंवा भलामण केलेली नाही. त्या निष्पक्षतेवर आणि सचोटीवर या प्रतिसाद व प्रतिक्रियांनी शिक्कामोर्तबच केले.
त्यानंतर विश्वनाथच्याच पुढाकाराने लोकसत्ता.कॉमवर जानेवारी 2015 पासून नवीन एक ब्लॉग लिहायला सुरूवात केली. 'कवडसे' नावाचा हा ब्लॉग साधारण ऑक्टोबरपर्यंत दर आठवड्याला मी लिहित होतो. माझ्या आवडत्या भाषा आणि संस्कृती विषयावरील विविध घडामोडींवर नोंदी यात लिहिल्या. याही ब्लॉगला मिळालेला प्रतिसाद भारावून टाकणारा होता. अनेक ठिकाणाहून मेल यायला लागले, चांगल्या चांगल्या लेखकांकडून दखल घेतली जाऊ लागली. कधी कधी मांडलेली मते आवडली नाहीत, तर थेट नाके मुरडणाऱ्या प्रतिक्रियाही यायला लागल्या. ‘एरवी तुम्ही बरे लिहिता, पण यावेळी गंडलात,’ असेही काही लोक थेट सांगू लागले. एका पातळीवर अहंकार सुखावणारा आणि दुसऱ्या पातळीवर मनावर दडपण आणणारा असा हा अनुभव होता. भाषा हा मराठी वाचकांच्या किती जिव्हाळ्याचा विषय आहे, हे त्यातून अधोरेखित होत होते.
म्हणूनच वर्ष 2015 साठी दहा ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांच्या समितीने या नोंदींची निवड पुरस्कारासाठी केली, तेव्हा मनाला खूप समाधान झाले. पुरस्काराची मोहर तर आज उमटली आहेच, परंतु खरोखर या नोंदींचा दर्जा उत्तमच होता, हा दावा मी आजही करू शकतो. त्यासाठी लोकसत्ता.कॉम आणि विश्वनाथचे आभार.
या शासकीय पुरस्कारामुळे एक भणंग पुरस्कृत झाला आहे, हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच!
abhinandan punha ekda mitra . . .
ReplyDeleteधन्यवाद, भूषण. तू दिलेली दाद नेहमीच महत्त्वाची असते.
ReplyDeleteमस्त लिहीलेय, आवडले, सार्वजनिक वाचनालयाचा संदर्भ जवळचा वाटला, मुंबईतील भटकंतीच्या कालावधीमधील फरकही तसाच...खऱ्याचा जमाना अजूनही आहे, यावर विश्वास नसलेल्यांनी आवर्जून वाचावे...
ReplyDeleteDD sir, grt !
ReplyDeleteमी तुला जास्त वाचले नाही आणि जे वाचले ते फेसबुक आणि डीडी च्या दुनियेत,
ReplyDeleteपरखडपणा आणि तठस्ट किंवा निष्पक्ष लिहिल्यामुळे त्यात साहित्यिकी चव येत नाही म्हणून तुझे लेख शेवटपर्यंत वाचतोच
तसा मी मजबूत आळशी आहे वाचनासंदर्भात
पुढच्या प्रगती करीता शुभेच्छा
मी तुला जास्त वाचले नाही आणि जे वाचले ते फेसबुक आणि डीडी च्या दुनियेत,
ReplyDeleteपरखडपणा आणि तठस्ट किंवा निष्पक्ष लिहिल्यामुळे त्यात साहित्यिकी चव येत नाही म्हणून तुझे लेख शेवटपर्यंत वाचतोच
तसा मी मजबूत आळशी आहे वाचनासंदर्भात
पुढच्या प्रगती करीता शुभेच्छा
धन्यवाद, पोतदार सर. तुमच्या टिपणीमुळे खूप खूप आनंद झाला. तुमचे प्रोत्साहन असेच कायम राहू द्या.
ReplyDeleteधन्यवाद, श्रीपाद. असेच वाचून प्रतिक्रिय कळव.
ReplyDeleteधन्यवाद, अमोल!
ReplyDelete