Thursday, February 11, 2016

संत्रस्त अहमदियांची कैफियत

साहित्य संमेलनातील पुस्तकांच्या दालनात अहमदिया पंथाच्या स्टॉलवर आम्ही जरा रेंगाळलो. मुस्लिमांमधील एक पंथ असलेल्या  अहमदियांना पाकिस्तानात धर्मबाह्य म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा तिथे अतोनात छळ होतो. मुस्लिमांची प्रार्थनास्थळे वापरण्यासही त्यांना मज्जाव करण्यात आला आहे. एकवेळ हिंदू चालतील परंतु अहमदिया नकोत, असा तिथे दंडक आहे. एवढे वाचून-ऐकून माहीत होते. मात्र प्रत्यक्ष अहमदियांना त्याची कारणे विचारण्याचा कधी प्रसंग आला नव्हता. ती संधी इथे मिळाली.
जगातील बहुसंख्य धर्मांच्या बहुतेक पंथांप्रमाणे अहमदिया पंथाचा जन्मही भारतातलाच. पंजाबातील लुधियाना येथे त्यांचे मुख्यालय आहे. मुस्लिम धर्मियांच्या मान्यतेप्रमाणे मुहम्मद पैगंबर हे जगातील शेवटचे प्रेषित होत. त्यांच्यानंतर कोणीही स्वतःला प्रेषित म्हणवून घेऊ शकत नाहीत. मात्र पैगंबरांच्या शिकवणीचा ग्रंथ असलेल्या हदीसमध्ये असे उल्लेख आहेत, की त्यांच्यानंतरही या जगात प्रेषित येतील. हे प्रेषित कधी येतील आणि त्यांची लक्षणे काय असतील, हेही हदीसमध्ये दिलेले आहे. त्यानुसार 19व्या शतकाच्या उत्तरार्धात पंजाबात जन्मलेले मिर्झा गुलाम अहमद कादियानी हे नव्या काळातील प्रेषित होत, अशी अहमदियांची मान्यता आहे. आज भारतात सुमारे 2 लाख अहमदिया पंथीय असून सुन्नी पंथाचा ते भाग आहेत.
या मुलभूत फरकामुळे मुस्लिमांच्या अन्य पंथातील अनुयायी अहमदियांना धर्मभ्रष्ट मानतात. स्टॉलवर असलेल्या व्यक्तींचा मात्र दावा होता, की अहमदिया पंथ हा शांती आणि सहजीवनासाठी प्रयत्नशील असलेला धर्म आहे. उस्मानाबादचे डॉ. बशरत अहमत यांचीही याच स्टॉलवर भेट झाली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवित्र पैगंबर हजरत मुहम्मद यांना अल्लाहने मुसलमानांवर येणाऱ्या परिस्थितीची माहिती पूर्वीच दिली होती. त्यापैकी एक भविष्यवाणी अशी होती, की मुसलमानांच्या मनातून ईश्वरीय निष्ठा निघून जाईल. ते मुसलमान म्हणून ओळखले गेले तरीही त्यांच्यात ईश्वरीय निष्ठेचा प्रकाश राहणार नाही. जेव्हा मुसलमानांची ईश्वरीय निष्ठा सुरैयावर (कृतिका नक्षत्राचा पुंजका) जाईल म्हणजेच ईश्वरीय निष्ठा मनातून फार दूरवर गेली असेल तेव्हा फारसी लोकांमधील एक व्यक्ती ती परत आणेल.
मिर्झा गुलाम अहमद कादियानी यांनी 1891 मध्ये असा दावा केला, की अल्लाहने त्यांना पवित्र पैगंबर हजरत मुहम्मद यांचे दास्यत्व आणि अनुनयासाठी अपेक्षित मसीहा आणि इमाम महदी म्हणून पाठविले आहे.  संपूर्ण जगाला इस्लाम धर्माचे खरा परिचय करून देणे आणि पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या शिरवणीकडे आणि पवित्र ईश्वरीय पुस्तक कुराणाकडे घेऊन जाणे, हा त्यांच्या आगमनाचा उद्देश होय, असा त्यांचा दावा होता. असे असले तरी पैगंबर हजरत मुहम्मद हेच खातमुलअंबिया (शेवटचे प्रेषित) आहेत आणि सर्वश्रेष्ठ आहेत, याबाबत त्यांनी निःसंदिग्ध शब्दांत ग्वाही दिली होती.
अहमदिया आणि अन्य मुसलमानांमधील आणखी एक फरक म्हणजे अहमदिया येशूला जीवंत मानत नाहीत. इस्लामी परंपरेनुसार येशू ख्रिस्त हाही प्रेषितच आहे, मात्र पैगंबर हजरत मुहम्मद हे शेवटचे आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित होत. मात्र ख्रिश्चन परंपरेनुसार येशू जीवंत असून तो निर्णयाच्या दिवशी (कयामत किंवा जजमेंट डे) परत येणार आहे. अहमदियांचे म्हणणे असे, की पैगंबर हजरत मुहम्मद हे सर्वश्रेष्ठ प्रेषित असल्यामुळे येशू त्यांच्यानंतर येऊ शकत नाही. एखादी व्यक्ती मेल्यानंतर ती जीवंत असण्यावर विश्वास ठेवणे चुकीचे आहे. सुळावर देण्याच्या घटनेनंतर येशू ख्रिस्त पॅलेस्टाईनमधून स्थलांतर करून काश्मीरमध्ये आले आणि श्रीनगरच्या मुहल्ला खानियारमध्ये त्यांची कबर आहे. ते कधीच आकाशात गेले नाहीत तर आकाशातून ते कसे अवतरणार, असा प्रश्न अहमदि विचारतात.
ही सगळी माहिती संमेलनाच्या त्या मांडवात आम्हाला मिळत होती. एवढे सगळे झाले, तरी पाकिस्तानात होणाऱ्या छळाबद्दल ही मंडळी फारशी बोलायला तयार नव्हती. कारण मुस्लिमांमध्ये जवळपास 53 पंथ-उपपंथ आहेत आणि त्या प्रत्येकाबद्दल कोणाला माहिती असायचे कारण नाही. अहमदियांबाबत थोडी फार माहिती होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या छळाच्या येणाऱ्या बातम्या. त्याबाबत माहिती मिळाली असती तर बरे झाले असते. तरीही त्यांच्याशी गप्पा मारताना मजा आली. संमेलनाच्या त्या विस्तीर्ण मंडपात फेरफटका मारताना पाय दुखू लागले तरी त्याचे चीज झाल्यासारखे वाटले.
संमेलनातून बाहेर पडताना माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांची भेट झाली. शरद पवारांनी संमेलनाध्यक्षांच्या निवडीची पद्धत बदलण्याचा सल्ला दिला होता. त्याबाबत त्यांना छेडले तेव्हा सध्याची पद्धत बदलायला ते नाशूख दिसले. पाच जणांची समिती दिली तर त्यांच्या हातात सगळी सूत्रे जातील. त्यातून वेगळे राजकारण निर्माण होईल. त्यापेक्षा मतदारांची संख्या वाढायला हवी, असे त्यांचे मत पडले. शिवाय साहित्य परिषदेत साहित्यिक नसलेल्या लोकांची गर्दी झालीय, याबद्दलही त्यांचा फार काही आक्षेप दिसला नाही. एवढे मोठे आयोजन करायचे तर कार्यकर्ते लागणारच. मग आयोजनासाठी कार्यकर्ते लागतात तर साहित्य संस्थांमध्ये ते का नकोत, असा त्यांचा सवाल होता. यावेळी गंमतच झाली.
"आता हा मांडव तुम्ही पाहत आहात. येथे तुम्हाला किती साहित्यिक दिसतायत," कोत्तापल्लेंनी विचारले.
माझ्या तोंडून निघून गेले, "अगदी मोजकेच".
आपण हा प्रश्न विचारून चूक केली असे त्यांना बहुदा वाटले असावे. तितक्यात नको त्या शब्दांत बोलल्याचे माझ्याही लक्षात आले. म्हणून सावरण्यासाठी मी म्हणालो, "म्हणजे साहित्यिकांपेक्षा रसिकांची संख्या जास्तच आहे."
मग ते म्हणाले, "हा एवडा डोलारा उभा करायचा तर कार्यकर्त्यांची फौज लागतेच."

छातीवर डीपीयूचे बिल्ले लावलेले तरुण-तरूणी फिरत होते, त्याकडे बहुधा त्यांचा निर्देश असावा. मात्र अभावितपणे मी बोलून गेलो होतो. ते काही खोटे नव्हते. आपल्या गावात एक मोठा कार्यक्रम होत आहे. मोठ-मोठे लोक तिथे येताहेत आणि खूप काही पाहायला मिळणार, या भावनेने जमा झालेल्यांचीच तिथे गर्दी होती. त्यात साहित्यिक म्हणवून घेणारे किंवा साहित्याच्या आचेने आलेले होतेच कितीसे? केवळ पुस्तके आणि संतांची शिल्पे उभी केली म्हणजे साहित्यिक गुण येत नाहीत. हिंदुस्तान अँटिबायोटिक्सच्या मैदानावर एक शुभ्र भपका दिसत होता. त्यात साहित्य कमी आणि सामग्रीच जास्त होती. त्याला कोणाचा काय इलाज

A photo posted by Devidas Deshpande (@devidasdesh) on

तिथेच एका ठिकाणी एक पुतळा होता. पुस्तकांचे ओझे पेलणाऱ्या मुलाचा हा पुतळा मला खूप अन्वर्थक वाटला. ज्ञान मिळालेय, पण ते पेलवत नाही, अशी काहीशी अवस्था मंडपाच्या आत प्रतिष्ठापना झालेल्यांची झाली होती. त्याचाच निदर्शक जणू हा पुतळा होता!

No comments:

Post a Comment