Wednesday, May 4, 2016

यांचा महाराष्ट्र केवढा? -1

गेले वर्षभर महाराष्ट्रात दोनच विषयांनी थैमान घातले आहे एक दुष्काळ आणि दुसरा महाराष्ट्राचे विभाजन. विधानसभा निवडणुकीत काहींच्या इच्छेप्रमाणे, काहींच्या अपेक्षेप्रमाणे तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला टांग मारली, तेव्हापासून प्रत्येक पक्ष दुसरा पक्ष अन्य प्रदेशाच्या जीवावर कसा उठला आहे, या आरोपाच्या भेंडोळ्या समोर ठेवतोय. आधी श्रीहरी अणे नावाच्या महाविदुषकांनी त्याला फोडणी दिली आणि आता राज ठाकरे यांनीही या वादाचा झेंडा हातात घेतला आहे. त्यांनी उडी मारली आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही या वादात एक पात्र रंगवायचे आहे, असे गृहित धरायला हरकत नाही. एरवी मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या दोन सभांमध्ये तोंडी लावण्यापुरते मराठवाडा-विदर्भाचा विषय घेणारे राज ठाकरे अचानक अखंड महाराष्ट्राबद्दल बोलू लागते ना.
एरवी सत्तेत आल्या दिवसापासून महाराष्ट्र अखंड ठेवण्याची मर्दानगी बोलून दाखविण्याची एकही संधी उद्धव ठाकरे यांनी सोडलेली नाही आणि विदर्भाच्या ध्रुव बाळाला उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसूच कसे देत नाहीत, अशी ईर्षा भाजपची मंडळी दाखवत आहेत. त्यात भरीस भर कायम लाडावलेली मुंबई सगळ्यांच्या गळ्यातील ताईत. म्हणून जवळपास प्रत्येक गावा-खेड्यातील जमिनीवरील आणि जमिनीखालील पाणी गेल्या वीस वर्षांत स्वकर्तृत्वाने आटवून दाखविल्यानंतर सगळ्यांना महाराष्ट्रप्रेमाचे भरते आले आहे.
नाही म्हणायला काँग्रेसला बहुतेक गांधी परिवारातील कोणी या विषयावर अधिकृत भूमिका मांडत नाही तोपर्यंत काही बोलायचे नसावे आणि विदर्भात किती मोकळी जमीन उरली आहे, त्यानुसार कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ठरेल.
स्वतंत्र विदर्भाची मागणी होते म्हणजे जणू काही फाळणीची मागणी, असा आविर्भाव करून जेव्हा ही मंडळी थैमान घालू लागतात तेव्हा गंमत वाटते. अन् जेव्हा तेव्हा 105 हुतात्म्यांची आठवण काढली जाते त्यांचा विदर्भाशी काही संबंध नाही, हेही कोणी सांगत नाही. यानिमित्ताने मतमतांतरांचा धुरळा मात्र उडतो आहे आणि बाष्कळ चर्चा चालू राहते. या सर्व आरोप प्रत्यारोपांचा लसावि काढायचा झाला तर दिसते ते हेच, की या प्रत्येकाचा महाराष्ट्र त्या त्या पक्षाच्या नजरेच्या टप्प्याबाहेर नाही. कसे ते पाहू.

कोकण-मुंबईत रुजलेला शिवसेनेचा अखंड महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच शिवसेनेने भाजप हा विदर्भवादी पक्ष असल्याची आरोळी ठोकली, तेव्हा या गोंधळाला खरी सुरूवात झाली. विदर्भ महाराष्ट्रापासून तोडायचा भाजपचा डाव आहे, असा आरोपही खवळलेल्या वाघाने  केला होता. एवढे कशाला, विधिमंडळात जय विदर्भ असा नारा देणाऱ्या भाजप आमदारांची तुलना पाकिस्तान समर्थकांशी केली. जणू विदर्भ हा महाराष्ट्राचा अनादी अनंत हिस्साच आहे आणि तो महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करणे हा देशाची फाळणी करण्याएवढाच जघन्य गुन्हा आहे.
महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे, यावर शिवसेनेचा प्रामाणिक भर आहे, मान्य. पण म्हणून शिवसेना संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या पदराखाली घेते आहे, असे दिसत नाही. शिवसेनेचा भगवा झेंडा राज्यभर फडकताना दिसतो, पण त्याचा मजबूत खांब मुंबई आणि कोकणाच्या लाल मातीचच रुजलेला आहे, हे चित्र काही पुसल्या जात नाही. किमान त्या पक्षाच्या नेतृत्वाचे वागणे तरी हा ठसा पुसू देत नाही.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मराठवाड्यात २८ पैकी ११ जागा मिळाल्या, विदर्भात ३ जागा आणि मुंबईत ३६ पैकी १४ जागा मिळाल्या. म्हणजेच शिवसेनेचा मराठवाड्यातील विजयाचा टक्का अधिक आहे. औरंगाबाद महापालिका गेली कित्येक वर्षे जनतेने शिवसेनेलाच बहाल केली आहे. यंदाही ती परंपरा कायम राहिली आहे. पण विधानसभेतील पक्षाच्या गटनेत्यांची नावे - नारायण राणे, रामदास कदम, सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे - पाहिली तर मुंबई आणि कोकणाच्या पलिकडचा महाराष्ट्र नसल्यासारखाच आहे, असा शिवसेनेचा होरा आहे की काय, असा प्रश्न पडतो.
शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांमध्ये मराठवाडा व विदर्भातील एकही नाव नाही. पाच राज्यमंत्र्यांमध्ये तीन म्हणजे दादा भुसे, संजय राठोड आणि विजय शिवतारे मुंबईबाहेरचे आहेत. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रालाच जिथे हातचे राखूनच दिले तिथे या दोन प्रदेशांची काय पत्रास.
शिवसेनेच्या संकेतस्थळावर त्यांच्या नेत्यांची यादी दिली आहे. त्यात आठ नावांपैकी एकही मराठवाड्यातील नाही. पक्षाच्या 29 उपनेत्यांपैकी केवळ आठ जण मुंबई-ठाणे या पट्ट्याबाहेरील आहेत. ही यादी आणखी लांबविता येईल. पण या सगळ्याचा मथितार्थ हाच, की शिवसेनेच्या दृष्टीने सर्व प्रतिभा आणि विश्वासार्हता मुंबई व कोकणात एकवटलेली आहे. अन् तरीही विदर्भाने (वा पुढेमागे मराठवाड्याने) वेगळे होण्याची भाषा करू नये, ही अपेक्षा अतिरेकी झाली.

No comments:

Post a Comment