Wednesday, August 16, 2017

फतवे-आदेशांच्या पलीकडचा भारत

स्वांतत्र्यदिन! हा दिवस म्हणजे भारतीयांच्या आशा-आकांक्षांची उजळणी करण्याचा दिवस. हक्काची सुट्टी म्हणूनही अलीकडे त्याकडे पाहिले जात असले, तरी राष्ट्रीय सण म्हणून त्याचे महत्त्व अबाधित आहे. दिडशे वर्षे ब्रिटीशांच्या आणि त्यापूर्वी 800 वर्षे तुर्कांच्या-मुगलांच्या जोखडात सापडलेल्या भारतमातेने 70 वर्षांपूर्वी स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतला. भारत मातेचा जयजयकार गगनाला भेदून गेला.


अर्थातच 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारतीयांच्या मनात सुराज्याची जी ऊर्मी होती, ती आज क्षीण झाली आहे. देशभक्तीची जागा व्यवहाराने घेतली आहे. हा बदल हळूहळू झाला आहे. अक्षम राजकारणी, निर्ढावलेले नोकरशहा व कमुकवत विचारवंत अशा सर्वांनीच या अधःपतनाला हातभार लावला आहे. आज झेंडावंदनासारख्या पवित्र प्रसंगाला उपस्थित कोण राहतात तर केवळ सरकारी कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी! अन् त्यासाठी सरकारी परिपत्रके काढावी लागतात, त्याच्यावरही वाद-विवाद होतात आणि मूळच्या स्वांतत्र्यालाच हरताळ फासण्याच्या स्वातंत्र्याचे दाखले दिले जातात.


एरवी केंद्र सरकारच्या परिपत्रकाला विरोध करण्याची दुर्बुद्धी ममता बॅनर्जींना झाली नसती! केंद्रीय मनुष्यबळ खात्याने ७ ऑगस्ट रोजी सर्व राज्यांना हे पत्र पाठवले होते. केंद्राने काय सांगितले होते, तर फक्त नजीकच्या हुतात्मा स्मारकावर जा आणि श्रद्धांजली वाहा! बरे, हा आदेशही नव्हता तर केवळ सल्ला होता. पण त्या सल्ल्यातही ममतांना (त्याच त्या, शिवसेनेच्या भाषेतील बंगालच्या वाघीण!) त्यातही हुकूमशाहीचा वास आला. आम्ही हा आदेश पाळणार नाही, असे त्यांनी सांगितले. भाजपकडून आम्हाला राष्ट्रभक्तीचे धडे शिकण्याची गरज नाही, असे ममतांनी ट्वीटरवरून जाहीर केले. अर्थात मोदी आणि कंपनीच्या दहशतीमुळे असेल कदाचित, पण हे त्यांनी नेहमीच्या कर्कश पद्धतीने सांगितले.एरवी केंद्र सरकारला विरोध करायचे धाडस आजकाल कोणात उरलेय?



दुसरीकडे योगी सरकारने स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत आणि ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मध्य प्रदेशत सरकारने असेच आदेश काढले होते. आणि नेहमीप्रमाणे मुस्लिम मौलवींनी त्याला विरोधही केला. एका मौलवींनी तर सांगितले, की वंदे मातरम आणि राष्ट्रगीत म्हणू नका.


सुदैवाने सगळा भारत एवढा संकुचित नाही. मातृभूमीबद्दल आदर दाखवायला काचकूच करण्याची अक्कल सगळ्यांच्या डोक्यात आलेली नाही. त्यामुळेच 71व्या स्वातंत्र्यदिनाला एक वेगळा रंग चढला आणि तो रंग होता आसाममधील काही छायाचित्रांचा.


एरवी फडकलेले झेंडे आणि देशभक्तीच्या खोट्या उमाळ्याची सवय लागलेल्या डोळ्यांना या दृश्याने एक नजर दिली. आसाममधील ढुबरी जिल्ह्यातील हे चित्र. सगळीकडे होते तसेच तेथील एका सरकारी शाळेत मंगळवारी झेंडावंदन झाले. फरक एवढाच, की झेंडा फडकवणारे शिक्षक आणि त्याला सलामी देणारे विद्यार्थी, हे दोघेही छातीएवढ्या पाण्यात उभे होते. वेळ होती सकाळी सव्वा सातची.


या शिक्षकाचे नाव आहे मिझानूर रहमान आणि शाळेचे नाव नसकारा प्राथमिक शाळा. त्यांनी सकाळी फेसबुकवर ही छायाचित्रे टाकली आणि संध्याकाळपर्यंत त्याला जवळपास पाऊण लाख लोकांनी शेयर केले. विशेष म्हणजे रहमान यांनी ही छायाचित्रे टाकल्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. त्यांच्या भागात वीज नियमित येत नसल्याने त्यांनी थेट संध्याकाळीच फेसबुक उघडले. तेव्हा ही चित्रे एवढी प्रसिद्ध झाल्याचे त्यांना कळाले.


अमुक कर वाढविला म्हणून अमुक पैसे देऊ नका, इतका कर देतो तर या सुविधा का नाहीत अशा कृतक संतापाच्या पोस्टी टाकणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ही घटना आहे.


“झेंडावंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला वाटले, की फेसबुकवर टाकण्यासाठी काही छायाचित्रे घ्यावीत. पोहता येणाऱ्या दोन मुलांना झेंड्याजवळ जाऊन सलाम करण्यास आम्ही सांगितले आणि आम्ही छायाचित्रे घेतली,” असे रहमान यांनी बीबीसीला सांगितले. अर्थात स्वांतत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची छायाचित्रे त्यांना शिक्षण विभागाला पाठवावीच लागतात, त्यामुळे तशीही ती त्यांना काढायचीच होती.


या अशा लोकांनीच हा देश बांधून ठेवलाय. हा सामान्य भारत आहे – फतवे आणि आदेशांच्या पलीकडचा भारत! हा अस्सल भारत आहे, सरकारी कागदपत्रे आणि बेगडी क्रांत्यांच्या व मतलबी समतेच्या लढ्याच्या संघर्षापलीकडचा भारत. अन् हे दर्शन घडविले ज्याच्या नावाने उठता-बसता माध्यमे बोटे मोडतात त्या नव्या माध्यमाने – सोशल मीडियाने. देशाचा 71वा स्वांतत्र्यदिन त्या अर्थाने कारणी लागला म्हणायला हरकत नाही.

No comments:

Post a Comment