Wednesday, September 5, 2007

जाको राखे साईयां...!

तीन दशकांच्या आयुष्यात अनेक अपघाताचे प्रसंग...अनेक छोट्या मोठ्या घटना जवळून पाहिल्या. आता वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून काम करताना तर दररोज अपघाताच्या बातम्या नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र "अपघात" फेम मुंबई-पुणे "एक्‍स्प्रेस हाय-वे"वर स्वतः अनुभवलेला अपघात आयुष्यातला आतापर्यंतचा सर्वाधिक थरारक अन्‌ भीतीदायक अनुभव ठरला. मृत्यूजवळ येऊन अगदी केसाच्या अं तराने त्यातून बचावणे म्हणजे काय, हे त्यादिवशी कळाले.
लॉजमध्ये असताना नितिन याची ओळख झाली होती. त्यावेळी मला महिना सहा हजार रुपये पगार होता आणि तो नोकरीसाठी वणवण भटकत होता. नंतर सुदैवाने त्याला "एचएसबीसी'त नोकरी लागली. आता तो माझ्यापेक्षा (आताच्या पगारापेक्षाही) तिप्पट कमावतो. गेल्या वर्षी तो लंडनला जाऊन आला. तरीही अजून त्याने आठवण ठेवली आहे. त्याच्या मित्राला लंडनला जाण्यासाठी निरोप देण्यासाठी जायचे होते. त्यामुळे त्याने बोलाविल्यावर मी हो म्हणालो. रात्रीची ड्यूटी आटोपून बाहेर पडलो तेव्हा नितीन त्याच्या मित्रांसह आणि "तवेरा" गाडीसह तयार होता. गाडीत बसल्यावर त्याच्या मित्रांशी ओळख झाली. त्यातील सुरेश हा लंडनला निघाला होता; तर कार्तिक त्याच्यासोबत कंपनीत काम करत होता. कार्तिक समोर ड्रायव्हरशेजारी आणि आम्ही मागे बसलो होतो. सर्वात मागच्या बाजूला सामान होते.
गाडीने पुणे सोडले तेव्हा गाडीचा वेग साठ ते सत्तर किमी होता. एक्‍स्प्रेस वेला लागल्यावर तो वेग 75 वर आला. मात्र ड्रायव्हर चांगली गाडी चालवत असल्याने आमची काही तक्रार नव्हती. मध्ये एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. त्यावेळी चहासाठी दहा रुपये देताना लक्षात आले, की पाकिटात तीसच रुपये होते. बाकीचे पैसे घरी ठेवले होते. मात्र घरी जायला वेळच मिळाला नसल्याने पैसै तिथेच राहिले. चहाचे पैसे दिल्यानंतर केवळ उरले वीस रुपये. गाडी मित्रांनी भाड्याने केलेली असल्याने तो खर्च माझ्यावर न व्हता. तरीही आणखी खर्चाचे काय करायचे, हा विचार चालू होता.

एव्हाना गाडीतले चालक वगळता सर्वजण झोपले होते. आता मी "बॅटमन' असल्याने (म्हणजे वटवाघूळ वर्गीय मनुष्य) मी झोपण्याचा प्रश्‍नच नव्हता. केवळ अधूनमधून डोळे झाकत होतो. मध्यंतरी एकदा डोळे उघडले तेव्हा आमची जीप एका ट्रकच्या दिशेने जाताना दिसली. पापणी मिटली आणि ती उघडायच्या आत, किंवा ड्रायव्हरला सावध करण्यासाठी ओरडण्याच्या आत "थाऽऽऽऽड' असा आवाज झाला. पुढच्या क्षणी डोळे उघडले तेव्हा मी समोरच्या सीटवर पडलो होतो...शेजारील नितीन समोरच्या दोन सीटमधील पोकळीत पडलेला...पलिकडचा सुरेश त्याच्या समोरच्या सीटवर आदळलेला...
सर्वात आधी जाणवले बाजूचा दरवाजा उघडून ड्रायव्हर बाहेर गेला...सहा-सात पावले मागच्या दिशेने गेल्यानंतर तो रस्त्यातच कोसळला. मीही दरवाजा उघडून बाहेर पडलो. सर्वांना बाहेर काढले. कार्तिकचा सर्व चेहरा रक्‍ताने माखला होता. तो बेशुद्धच होता. त्यामुळे बाहेर काढताच तो खाली पडला. नितीनचा ओठ पूर्ण फाटला होता. सुरेशच्या नाकातून रक्त येत होते. त्यांचे रक्ताळलेले चेहरे पाहून मी स्वतःच्या चेहऱ्यावरून दोन-तीनदा हात फिरवून पाहिला. पण मला काहीही झालेले नव्हते. केवळ पायाला थोडेसे खरचटले होते आणि समोरच्या सीटवर पडल्याने मुका मार लागला. त्यावेळी नशीब बलवत्तर असल्याची जाणीव झाली.
चांगले नशीब एवढ्यावरच थांबले नाही. त्यामुळे हा प्रकार घडला नाही तोच पॅट्रोलवर असलेले हायवे पोलिस तिथे दाखल झाले. त्यांनी लगेच ऍम्ब्युलन्सला कॉल लावला. दहा मिनिटांत ती दाखल झाली. त्यापूर्वी पोलिसांनी सर्वांचे नाव-गाव लिहून घेतले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, "तवेरा' ट्रकला धडकल्‌ यानंतर ट्‌कच्या मागच्या बाजूला अडकली व पुढे घासत गेली. काही असो, गाडीतल पाच जणांपैकी केवळ मीच सहीसलामत राहिल्याने सगळी माहिती, जबाब देण्याची जबाबदारी पडली. ते होईपर्यंत सर्वां ना ऍम्बुलन्समध्ये बसविले. आता ऍम्बुलन्सच्या चालकाशेजारी बसण्याची जबाबदारी माझी होती. पनवेलच्या "लाईफ लाईन' हॉस्पिटलच्या दिशेने ऍम्बुलन्स निघाली. ते तीस किलमीटर आता मला प्रकाशवर्षांसारखी भासू लागली. एक नजर रस्तावर आणि एक नजर ऍम्बुलन्सच्या स्पीडमीटर वर होती. त्याचा काटा 80च्या पुढे गेल्यावर अंगावरही "काटा' उभा रहायचा. हॉस्पिटलला गेल्यावर घड्याळात पा हिले...चार वाजून दहा मिनिटे. म्हणजे अपघात साधारण साडेतीन वाजता झाला होता.
रात्री हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या झाल्या. ड्रायव्हर आणि कार्तिक दिसतानाच गंभीर दिसत असल्याने त्यांना तडक "आयसीयू'मध्ये पाठविण्यात आले. सुरेशच्या नाकातील रक्तवाहिनी फुटल्याने आणि डोळ्या ंखाली मार लागल्याने चेहरा सुजला होता. त्याला व नितीनला "रिकव्हरी रूम'मध्ये ठेवण्यात आले. मला सामान आणि काही गरज पडल्यास थांबावे लागले. खिशात वीसच रुपये असल्याने काय करावे, हा प्रश्‍नच होता. पुण्यातील मित्राला फोन करून पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्याने स्वतः न येता कंपनीतील साहेबांकरवी पैसे मिळण्याची व्यवस्था केली. त्यामुळे तेवढी तरी सोय झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी "एचएसबीसी'तील लोकं येण्यास सुरवात झाली. सुरेशला जाता येणार नव्हते. त्‌ याने तिकिटच रद्द केले. डॉक्‍टरांच्या सांगण्यानुसार, या सर्वांना चोवीस तास ठेवावे लागणार होते. त्यात जो येईल त्याला सर्व घटनेची हकीगत सांगावी लागत असल्याने कंटाळा आला होता. अन्‌ येणारा प्रत्येक जण विचारत होता, ""तुम्हाला कसं काय लागलं नाही?''
त्यांना काय सांगणार, देव तारी त्याला "तवेरा' काय मारी?

ड्रायव्हर वगळता सर्वांचे मित्र आणि नातेवाईक आल्यानंतर पुण्याकडे निघण्याचा कार्यक्रम होता. त्याप्रमाणे सकाळी साडे सहाला स्टॅंडवर जाऊन बस पकडली. खूप समोर नाही, खूप मागे नाही...अशी बेताची मध्यवर्ती सीट पकडून पुण्यात आलो "वन पीस.' पुन्हा खासगी गाडीतून रात्रीच्या वेळी प्रवास न करण्याचा निश्‍चय करूनच.

तुमची होते "आग'...आमची होते होरपळ

"राम गोपाल वर्मा की आग' अशी नावापासूनच धग जाणवणाऱ्या चित्रपटाला जाण्याचं काही कारण नव्हतं..तसंच न जाण्याचंही! आपला "लालेट्टा' म्हणजे मोहनलाल याच्यासाठी त्यातल्या त्यात स्वस्त चित्रपटगृहामध्ये अगदी मोजक्‍या "निमंत्रितां'च्या उपस्थितीत मी हा चित्रपट पाहिला. पाहिला, असं केवळ म्हणायचं. एरवी खरे तर असा चित्रपट पाहून माझ्यासारख्याच्या डोळ्याचे पारणे फिटायला हरकत नव्हती. एकूण चित्रपट पाहून झाल्यानंतर माझं असं मत झालं, की एक विनोदी चित्रपट म्हणून उपरोक्त चित्रपट पहायला हरकत नाही. सात वर्षांपूर्वी "हेराफेरी' या चित्रपटाच्या यशानंतर हिंदीमध्ये अचानक विनोदपटांची लाट आली. त्यात आताशा बहुतेक विनोदपटांचा ठरीव साचा झाला आहे. त्यादृष्टीने राम गोपाल वर्मा यांनी अथक प्रयत्न करून आणि तब्बल 32 वर्षांच्या अभ्यासानंतर हा एक वेगळा चित्रपट रूजू केला आहे.

बत्तीस वर्षांपूर्वी "कितने आदमी थे...' करत पडद्यावर धुमाकूळ घालणारा एक विकृत खलनायक भारतात अवतरला. ती भूमिका साकारणारा अभिनेता समर्थ असल्याने खलनायक देशभरात लोकप्रिय झाला. त्यानंतर पडद्यावरील खलनायकाने, म्हणजेच गब्बरसिंगने ठाकूरला पीडले नसेल तेवढे गब्बरसिंगच्या नावावर अनेकांनी आम्हा चित्रपटरसिकांना पीडले आहे. वेष बदलून गब्बर अनेक चित्रपटांत येत राहिला. त्यानंतर टेपरेकॉर्डरच्या जमान्यात कॅसेटच्या रूपाने त्याचा आवाज घुमत राहिला. त्यानतंर टीव्हीच्या जमान्यात जाहिरातींत आणि विनोदाचं सोंग करणारे हास्यास्पद कार्यक्रमांचा क्रमांक आला. आता कुठे "रेडियो मिर्ची'च्या एकसुरी जाहिरीतीत गब्बरचे विडंबन केलेले संवाद ऐकू येण्याचे बंद झाले होते. मात्र त्यात रामगोपाल वर्मा नावाच्या चित्रपटक्षेत्रातील एका "डॉन'चा उदय झाला.
रामूने नंतर चित्रपटांचे असे हप्ते सुरू केले, की हिंदी चित्रपट पाहणे हाच प्रेक्षकांचा गुन्हा वाटावा. बाय द वे, रामूने त्याच्या चित्रपटनिर्मिती कंपनीचे नाव "फॅक्‍टरी' ऐवजी "गॅंग' ठेवायला हवे होते. दुर्दैवाने, रामूच्या अंधारलेल्या, इंग्रजी चित्रपटातील फ्रेम्स वापरून केलेल्या "पिक्‍चर्स'ना अनेकांचा तिकिटाश्रय लाभला. त्यामुळे बापाने कौतुकाने आणलेली खेळणी पोरगं ज्या हौसेनं तोडून त्याचा सत्यानाश करतं, त्याच उत्साहाने रामूने जुन्या चित्रपटांचे विचित्रपट काढण्याचा सपाटा लावला. रामूची ही टोळधाड इतरांच्या जीवावर तर उठलीच, त्याचे स्वतःचेही अपत्य या आपत्तीतून सुटले नाहीत.

रामूला चित्रपटाच्या तंत्राची फारशी माहिती नव्हती, तेव्हा त्याने "शिवा' आणि "रात' सारखे काही सिनेमे काढले होते. त्यातून चुकून आपलं मनोरंजन होत होतं. मात्र त्याची यत्ता वाढली. मग "शिवा'चीच एक फर्मास हिडीस आवृत्ती साहेबांनी काढली. एखाद्या चित्रपटाचं एवढं सॉलिड भजं इव्हन डेव्हिड धवनही करत नाही. (अगदी रजनीकांतच्या तमिळ "वीरा'चं त्यानं हिंदीत केलेलं "साजन चले ससुराल'सुद्धा त्यामानाने कौतुकास्पद होतं.)एका "रात'च्या विषयावर तर रामूने "भयं'कर चित्रपट काढले. मग त्याच्या चित्रपटांनी घाबरण्याऐवजी तो चित्रपट काढणार म्हटल्यावरच घाबरायला होऊ लागलं. गुन्हेगारी चित्रपटांचा खापरआजोबा "गॉडफादर'ची "फ्रेम बाय फ्रेम' कॉपी करून गेल्या वर्षी रामूजींनी "सरकार' नावाचा चित्रपट दिला. हुबेहूब काढल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षणीय झाला. तरीही मार्केटिंगचे हुकुमी हत्यार म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरण्याचे कसब त्यांनी तेव्हा दाखविलेच.

अशात रामूने जेव्हा "शोले'चं रिमेक करण्याची घोषणा केली, त्यावेळी ठाकूर, गब्बर आणि रामपूरची ग्रामस्थ मंडळींची राखरांगोळी होणार यात शंका उरली नाही. सांगायला आनंद होतो, की राम गोपाल वर्मा यांनी मायबाप प्रेक्षकांची ही अपेक्षा पूर्ण करण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. मूळ "शोले'तील जी अजरामर (आमच्या जमान्यापुरती) पात्रे आहेत, त्यांची व्यवस्थित कत्तल करण्यात रामूजींनी आपली संपूर्ण प्रतिभा पणास लावली आहे. अगदी "शोले'च्या कलावंतांचे डुप्लिकेट घेऊन तयार केलेला (केवळ अमजद खान उर्फ गब्बरसिंग यांचा अपवाद वगळून) "रामगढ के शोले' हा चित्रपटही "शोले'च्या विडंबनात "आग'च्या पासंगालाही पुरत नाही.

बब्बन हे रामूजींच्या 'आग'चे मुख्य इंधन. राम गोपाल वर्मांनी स्वतःचे छायाचित्र काढावे, अशी विकृती त्याच्यात कुटून कुटून भरली आहे. कुठून कुठून सुचतं हो या माणसाला असं? अमिताभ बच्चन या अभिनयाच्या "शहेनशहा'ला अगदी अलगदपणे रामूजींनी राहुल देव किंवा मुकेश ऋषी यांच्या पंगतीत आणून बसविले आहे. यासाठी त्यांचे खास अभिनंदन! "परवाना'मध्ये अत्यंत संयमित खलनायक साकारणारा, "अक्‍स'मध्ये जगावेगळी भुमिका करणारा हाच का तो "मिलेनियम स्टार'...रजनीकांतला लोकं इतके दिवस दक्षिणेतला अमिताभ म्हणायचे..."आग'मधली अमिताभचे चाळे पाहून आता अमिताभला उत्तरेतला मिथुन म्हणू लागतील. अमिताभचे काही संवाद कानावरून जातात...म्हणजे हे संवाद ऐकण्यासाठी का होईना प्रेक्षकांनी परत थियेटरात यावे...काय आजकाल बॉलिवूडची मार्केटिंग कोणत्या थराला जाईल, याचा काही नेम नाही...

कथा, पटकथा, चित्रण, संगीत...अशा विविध घटकांची जबाबदारी रामूजींनी स्वतःवर न ठेवता इतरांनाही त्यात सहभागी करून घेतले आहे, हे त्यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याची चुणूक दाखविते. विशेषतः संवादाच्या बाबतीत त्यांनी "बॉलिवूड'ला "कंटेंपररी' करण्याची मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे "हमें वो गलती नहीं करनी है, जो अमेरिका ने इराक में की,' असे ज्ञानवर्धक आणि वास्तववादी संवाद इथे ऐकायला मिळतात. हीच प्रतिभा मूळच्या "शोले' चित्रपटात असती, तर गब्बरसिंगही म्हणाला नसता का..."रामगढ अफगाणिस्तान नहीं है, जहां रूस की सेना घुस जाय...इ. इ.' विशेष म्हणजे प्रेक्षकांना झोप येऊ नये म्हणून रामूजींनी अधूनमधून वाद्यकल्लोळाची सोयही केली आहे.

असो...मोहनलालची काही प्रेक्षणीय दृश्‍ये या चित्रपटांत आहेत. अमिताभ आणि रजनीकांत यांचे चाहते त्यांनी केलेल्या कोणत्याही कृतीला उचित ठरविण्यास सज्ज असतात. पहिल्या वर्गातील लोकांनी मला बहुमताने दुसऱ्या वर्गात ढकलले असल्याने त्यांच्यावर सूड घेण्याचा एक वेगळाच आनंद "बब्बन' पाहताना आला..."शोले' ही एक कायमस्वरूपी "सूड'कथा आहे ती या अर्थाने! इन्स्पेक्टर नरसिम्हा आणि बब्बन यांच्यातील वैमनस्यापासून सुरू झालेली ही आग ‘अमेरिका हो या कालिगंज...मरता आम आदमी ही है,’ असा मोलाचा संदेश देऊन संपते...ही त्यातल्या त्यात गांभीर्याने घ्यायची गोष्ट.
-----------

Saturday, September 1, 2007

भागो...मोहन प्यारे!

प्रिय मोहनलाल,
मल्याळम चित्रसृष्टीतील सुपरस्टार आणि प्रियदर्शनच्या भाषेत भारतातला सर्वांत नैसर्गिक अभिनय करणारा अभिनेता, अशी तुझी आतापर्यंत ख्याती ऐकून होतो. तू तीन वेळचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अशीही त्याला एक किनार होती. मात्र मुंबईच्या टोळीयुद्धावर स्वतःची उपजीविका चालविणारे राम गोपाल वर्मा यांच्या "शोले' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये तू काम करणार, ही घोषणा झाली आणि पोटात गोळा आला. ही गोष्ट माहीत झाल्यापासूनच तुझ्याविषयी सहानुभूती वाटायला लागली.
याआधी रामूच्याच "कंपनी' नामे सिनेमात अधूनमधून बंदुकीच्या गोळ्या सुटत नाहीत, अशा तुकड्यांमध्ये तू झळकला होतास. भलेही ती भूमिका तू (नेहमी च्याच) सहजतेने जिवंत केलीस. पण यावेळी प्रकरण वेगळे होते.

तुझ्या कारकिर्दीत आजवर एकाही रिमेकमध्ये तू काम केलेले नाही, म्हणजे आता नव्हते म्हणावे लागेल. "किलुक्कम,' "काला पानी', "मुकुंदेट्टा सुमित्रा विळुक्कुन्नु,' किंवा "तलवाट्टम,' "उदयोन' अशा चित्रपटांमध्ये एकाहून एक सरस भूमिका करणारा तू, तुझ्यावर कोणता सूड घेण्यासाठी रामूने तुला "बळीचा ठाकूर' केले काय माहीत? अन्‌ तुलाही कोणती दुर्बुद्धी सुचली काय माहीत, तूही ती भूमिका स्वीकारली. ओणमच्या निमित्ताने "एशियानेट'वर तुझी मुलाखत चालू होती. हिंदी चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग असल्याने, त्यातून अधिक "रिस्पॉंस' मिळत असल्याचे तू त्या मुलाखतीत सांगितले. अशा पडेल चित्रपटांमध्ये फडतूस भूमिका केल्यावर कोणता चांगला प्रेक्षक तुला अनुकूल होणार आहे, हे स्वामी अय्यप्पाच जाणो!

अरे, ती ठाकूरची भूमिका एव्हढी सोपी नव्हतीच. मुळात तू संजीवकुमारच्या तोडीस तोड अभिनय केलाही असतास, मात्र उत्तरेतील "जाणकार' प्रेक्षकांचे त्याने समाधान झाले असते का? न्यू जर्सी किंवा टेक्‍सासच्या "ऍसेंट'मध्ये बोलणारे हिरो आम्हाला चालतात, पण आपल्याच देशातील मराठी किंवा दक्षिणी ढंगात हिंदी बोललेले चालत नाही आम्हाला. त्यामुळे तू कधीही ठाकूर होऊ शकला नसतास, याबद्दल आमच्या मनात शंका नव्हती.

त्यानंतर रामूने कधीतरी "राम गोपाल वर्मा के शोले' नावाच्या चित्रपटाचा मुहूर्त केला. त्यावेळी अमिताभ बच्चन याच्या घेतलेल्या पहिल्या दृश्‍याचे छायाचित्र पाहिल्यावरच या "प्रोजेक्‍ट'मध्ये रामू हात पोळून घेणार हे पक्के झाले होते. त्यानंतर चित्रपटाचे नाव "आग' करण्यात आले आणि या आगीची झळ सर्वांनाच पोचणार, याची खूणगाठ पटली. अमिताभचं काही नाही, तो अशा कित्येक आगींचे रिंगण त्याने पार केले आहे. आपण काय करत आहोत, याचं भान न ठेवता, केवळ कॅमेऱ्यासमोर येण्याचे पैसे घेऊन "डाबर अनारदाना' पासून "रिड अँड टेलर'पर्यंत; मुलायमसिंहांच्या प्रचारसभांपासून "आयफा ऍवॉर्ड' समारंभापर्यंत, कुठलाही प्रसंग अथवा जाहिरातची कहाणी "साठा सुफळ' करण्यात त्याची हयात गेली. तुझं काय?

हिंदी (अन्‌ मराठीही, ते फारसे वेगळे काढणे शक्‍य नाही ) प्रेक्षकांना तुझे नाव आणि क्षमता माहितीही नाही. आता प्रियदर्शनचे चित्रपट पाहून लोकांची हसून हसून पुरेवाट होते. त्यांना काय माहीत, एकेकाळच्या तुझ्याच चित्रपटांचे हे अधिक चकचकीत रिमेकस्‌ आहेत ते? तू केलेल्या करामतीच आज अक्षयकुमार, सुनील शेट्टी आणि प्रियदर्शन कॅंपची अन्य मंडळी करतात व दुनियाभरातली तारीफ मिळवितात. तू तरी इकडच्या प्रेक्षकांपर्यंत येताना काळजी घ्यायला हवी. एकेकाळी रजनीकांतनेही मोठ्या एक्‍स्पोजरसाठी हिंदीत बाष्कळ भूमिका केल्या. त्यानंतर त्याने इथला नाद सोडला. आज तो स्वतःच्या मनाप्रमाणे काम करतो आणि इकडच्या लोकांना त्याच्या तमिळ चित्रपटाचीही दखल घ्यावी लागते.

तुझं काम अधिक अवघड करून ठेवण्यास रामू समर्थ आहेच. त्याने "शोले'चा खून, शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार एकाच वेळी करण्याची अद्‌भूत कामगिरी केलीच आहे. त्यात तुझ्यासारख्या एका चांगल्या अभिनेत्याची झालेली गोची आणि मुखभंग आमच्यासारख्यांना वेदना देतो.

त्यामुळे, आता तुला एकच सांगणे आहे...

अलम्‌ दुनियेला तू माहित झाला नाहीस, तरी चालेल. मल्याळममध्ये मनासार ख्या भूमिका कर...यशस्वी हो..अन्‌ चुकूनही मुंबईला येवू नकोस...
भागो, मोहन प्यारे...
तुझ्या अनेक प्रेक्षकांपैकी एक

Thursday, August 30, 2007

मान न मान, तू मेरा सलमान!

नमस्कार,


आवाज : प्रसिद्ध आणि लोकोद्धारक अभिनेते समलान खान यांच्या कारागृह प्रवासाच्या धावत्या वर्णन ऐकणाऱ्यांचे स्वागत आहे. मी, हांजी हांजी खां आणि प्रसिद्ध चाटुकार अखंड तोंडपुजे, आम्ही तुम्हाला या जगहितकारक यात्रेचे इत्थंभूत वर्णन देण्यासाठी सज्ज आहोत. खान यांच्या या लोकविलक्षण त्यागाबद्दलची हरतऱ्हेची माहिती घेण्यासाठी आपल्याला प्रचंड उत्सुकता आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्यासाठीच आपण सध्या खान यांच्या घरासमोरील गल्लीत उभे आहोत. ते बाहेर येऊन कारागृहात प्रवेश करतील, तसतशी ताजी माहिती आम्ही देऊ. त्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही. पाहत रहा आमची वाहिनी. आता घेऊ आपण एक ब्रेक. त्यानंतर पहा आमचा वृत्तांत.


(एक ब्रेक : प्रसिद्ध "खपा बनियान -ये धोने की बात है' यांच्या मार्फत प्रायोजित.)


चाटुकार ः ब्रेकनंतर आपले पुन्हा थेट प्रक्षेपणात स्वागत. आपण सध्या उभे आहोत समलान खान यांच्या घराबाहेरील एका गल्लीत. या गल्लीपासूनच समलान यांच्या घराच्या मुख्य दरवाजापर्यंत रस्ता जातो. याच रस्त्यावर समलान लहानपणी गोट्या खेळत होता. त्याच्या खेळादरम्यान उडालेल्या गोट्या लागून चेहऱ्यावर जखमा झालेले अनेक जण इथे आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना समलान खान आज "स्टार' असल्याचा अभिमान आहे. यांतीलच एक आहेत हे वयोवृद्ध मामू. आपण त्यांच्याशीच बोलूया...


आप कोई याद बताएंगे? कोई ऐसी बात जो आप नहीं भूले है?


मामू : हां, जरूर याद है. समलान बचपन से बहुत शरारती था. केंचुले तो वो खेलता ही था...क्रिकेट भी कहता था. बल्ला नहीं थे तो एक-दो बार मेरे दरवाजे की बल्लिंयॉं ही तोड के ले गया. बहुत शरारती था. लेकिन मैंने उसको कभी डांटा नही, क्यों कि वो कहता, चाचा, मैं बडा होने के बाद आपको एक फ्लैट दे दूंगा. और उसने दिया भी...वो स्टार बनने के बाद जुहू में हुसेन भाई से कह के उसने एक फ्लैट मेरे बडे बेटे को दिया.


बघा, म्हणजे समलान हा किती परोपकारी आहे पहा. वयोवृद्ध मामूंना फ्लैट देणारा समलान आता जेलच्या कोठडीत किती कष्ट सहन करतो, हीच आता उत्सुकता आहे.


आताच मिळालेल्या बातमीनुसार, समलान झोपेतून उठला आहे. थोड्या वेळाने तो उठेल. त्यानंतर आंघोळ करून तो कारागृहाकडे रवाना होईल. या प्रत्येक क्षणाचे वृत्त आम्ही तुम्हाला देऊ. कुठेही जाऊ नका. आपण तोपर्यंत घेऊ एक ब्रेक...


(एक ब्रेक : आधीचेच प्रायोजक)


हांजी हांजी खां : मी उभा आहे समलान खान यांच्या बंगल्याच्या बाहेरच्या बाजूस. समलानकडे पाच कुत्रे पाळलेले आहेत. त्यातील दोन तुम्हाला या फ्रेममध्ये दिसत आहेत. याच्याच बाजूला त्यांचे टॉइलेट आणि बाथरूम आहे. सध्या समलान अंघोळ करत आहे...असा अंदाज आहे कारण आतून पाणी वाहण्याचा आवाज येत आहे. थोड्याच वेळात ते बाहेर येतील. त्यानंतर निघतील निदान काही दिवस तरी कारागृहात काढण्यासाठी...


चाटुकार : हांजी हांजी, तुला काय वाटतं...समलानचा गुन्हा त्याला झाली त्या शिक्षेएवढा गंभीर आहे का?


हांजी हांजी खां : चाटुकार, हे पहा समलानला उच्च न्यायालयाने शिक्षा दिली आहे. त्यामुळे आपण त्याबद्दल बोलणे योग्य नाही. चाटुकार, तुला माहितेय...काही वर्षांपूर्वी समलान एका जंगलात तेथील आदिवासींना कपडे आणि केक वाटायला गेला होता. त्यावेळी त्याला जंगलात एक लाकडाचे हरिण दिसले. समलानच्या खेळकर स्वभावानुसार तो त्या लाकडी हरिणाशी खेळू लागला. त्यात ते हरिण तुटले. त्यामुळे त्याला ही शिक्षा झाली नाही. कायदेतज्ज्ञांचे या शिक्षेबाबत वेगवेगळे मत आहे. मात्र, समलानच्या अनेक चित्रपटांत न्यायाधीशाची भूमिका करणारे अभिनेते मैलेश भोट यांच्या मते, ही शिक्षा फारच जास्त आहे. समलानचा स्वभाव, त्याची उदारता आणि सज्जनासारखी वागणूक पाहून त्याला सोडून द्यावे...


चाटुकार ः एक मिनट हांजी हांजी, आताच खबर आली आहे, की समलानची आंघोळ झाली आहे. त्याने पांढरी पॅंट घातली असून, बूट घालण्यासाठी पाय पुढे केला आहे. यावेळी त्याच्या घराच्या गच्चीवर सर्व नातेवाईक जमले होते. त्यांना समलानवर पुष्पवृष्टी करायची होती, मात्र जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे त्यांना ते जमले नाही. समलानने बूट घातले असून, तो तुरुंगात जाण्यापूर्वी घरातले शेवटचे जेवण घेत आहे. आपण त्याच्या मागावरच राहणार असून, कुठेही जाऊ नका...तोपर्यंत घेऊया थोडीशी विश्रांती!


(ब्रेक : प्रायोजक शामदेव मसाले...इसके बिना खाना अधूरा है!)


हांजी हांजी : नमस्कार, ब्रेकनंतर आपले स्वागत आहे. आपण पहातच आहात समलानच्या घराबाहेर किती मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. प्रत्येकाला आपल्या आवडत्या अभिनेत्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत, त्याची एकदातरी झलक पहायची आहे...समलानचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला सहा महिन्यांपूर्वी...आता त्याच्या तुरुंगात जाण्याने किमान एक वर्षभर लोकांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचे दर्शन होणार नाही. त्यामुळे आज त्यांना एकदा तरी समलानला डोळे भरून पहायचे आहे. त्यातीलच एकाशी आपण बोलूया...


आप कभी आये?


मैं तो आज ही यहां आया. अपने सम्मू भाई को जेल जाना है, ये मालूम हुआ तो वैसेईच भाग के आया.


आप क्याआ करते है?


हमारा तो साईकिल रिपेरिंग का दुकान है.


आप को क्याा लगता है, सम्मू भाई को दी गई सजा सही है?


बिलकुल गलत है जी. उनको कुछ सजा होना ही नहीं चाहिये था. अपुन के यहां कितने जानवर लोग मारते है. और यहां तो एक लकडी का हिरण टूट गया. अदालत को मंगता था तो थोडा सा फैन लेने का था. एक्टहर लोगों को जम में भेजनाईच नहीं चाहिये. हम फिर बात करते है.


आताच कळाले आहे, की समलान खान यांचे जेवण झाले आहे. जेवणात त्यांना त्यांचे आवडते मस्का-पाव आणि बकरीचे मटण दिले होते, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांचा जो जुना नोकर आहे, तुगलक, त्याच्याशी मी बोललो. त्याने सांगितले, की जेवण झाल्यानंतर समलानने दोनदा ढेकर दिला आणि एकदाच पाणी पिले.


चाटुकार : आता तुम्ही पडद्यावर पहात आहात, की समलान त्याचा छोट्या पुतण्या-भाच्यांशी भेटत आहे. तुम्हाला माहित आहे, की समलानला छोटी मुलं खूप आवडतात. त्याच्या नातेवाईकांवर त्याचे खूप प्रेम आहे. आता सहा महिने त्याला या मुलांशिवाय काढायचे आहे. त्यामुळे तो खूप इमोशनल झाल्याचे दिसत आहे. पडद्यावर अत्यंत कठोर भूमिका करणारा समलान मनातून अत्यंत हळवा आहे . त्याचे इथे प्रत्यंतर येत आहे. हांजी हांजी : आणि ती घडी आली...तुम्ही पहात आहात...अर्धा बाह्यांचा शर्ट आणि पांढरी पॅंट घातलेला समलान खान त्याच्या गाडीत बसत आहे. चाहत्यांच्या गराड्यातून वाट काढण्याचे त्याला कष्ट पडत आहे, हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसतच आहे. तरीही किती शांतपणे तो मार्ग काढत आहे...जीवनातील संकटावर त्याने याच शांततेने मार्ग काढला आहे...असंच वाटत आहे जणू...अन्‌ समलानने त्याच्या गाडीच्या काचा खाली केल्या आहेत...काचा वर चढल्या तरी त्याच्या नजरा त्याच्या घरावरच टिकल्या असल्याचे जाणवत आहे...गाडी स्टार्ट झाली आहे...चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढत गाडी पुढे सरकत आहे...मुख्य रस्त्याला लागल्यानंतर गाडी डावीकडे सरकेल आणि त्यानंतर समलान खान सहा महिन्यांसाठी तुरुंगात पोचेल...मात्र तुम्ही दुसरीकडे वर जाऊ नका...मार्गावरील प्रत्येक चौकात आमचे प्रतिनिधी उभे आहेत. ते तुम्हाला खडा न खडा माहिती देतील. कुठेही जाऊ नका. फक्त थोडीशी विश्रांती...


(ब्रेक ः प्रायोजक हिरो गुंडा मोटार सायकल कंपनी)


(याहून अधिक माहिती घेण्यासाठी कृपया कोणतीही वृत्तवाहिनी पाहणे. माझ्याच्याने ते शक्यH नाही. आपण मूर्खपणाची कोणती पातळी गाठू शकतो, याची मी चाचणी घेत होतो. ही माझी हद्द आहे. तुमची?)

Monday, August 27, 2007

आंध्रातील स्फोट आणि बेजबाबदार "वायएसआर'

केवळ तीन महिन्यांच्या अंतराने हैदराबाद शहरात दोन स्फोट झाले आणि त्यात सुमारे चाळीस जणांचे प्राण गेले. ज्या दिवशी हे स्फोट झाले, त्या दिवशी मक्का मस्जिदमधील स्फोटाला शंभर दिवस पूर्ण झाले होते. त्याच दिवशी दुपारी हैदराबादेतच सुमारे दोन कोटी 70 लाख रुपयांच्या बनावट नोटा दाऊदच्या हस्तकांकडून पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. या दोन्ही घटनांचे आपल्याकडच्या माध्यमांमध्ये फारसे प्रतिबिंब उमटले नाही. मी मूळ तेलुगु वाहिन्यांवरील बातम्याच त्या दिवशी पाहिल्या नसत्या तर मलाही या बाबी कळाल्या नसत्या. आंध्रातील सर्वच माध्यमांनी या बाबींवर विशेष जोर दिला आहे. मक्का मस्जिदच्या स्फोटांची उत्तरेतील माध्यमांनी त्या दिवशीचे दळण दळण्यासाठी दखल घेतली. त्यानंतर आताच्या हल्ल्यात महाराष्ट्राच्याच विद्यार्थ्यांचे जीव गेल्यामुळे इकडील वर्तमानपत्रांनी या घटनांची अधिक नोंद घ्यावी लागत आहे.

ताज्या स्फोटानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. आर. राजशेखर रेड्डी यांच्या प्रतिक्रियांनी जनतेत आणखी रोष निर्माण झाला आहे. "इदी आंतरजातिय उग्रवादम...पाक, अफगाणिस्तानलो मन निघु नेटवर्क विस्तरिंचलेम कदा?' (हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये आपले गुप्तचर वाढवायला हवेत,' या रेड्डी यांच्या विधानाची "ईनाडू' या तेलुगुतील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्राने खिल्ली उडविली आहे. 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यानंतर जॉर्ज बुश यांनी दाखविलेल्या दहशतवाद्यांच्या नायनाटाच्या निर्धाराशी रेड्डी यांच्या विधानाची तुलना करून, "ईनाडू'ने म्हटले आहे, ""प्रत्येक हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खास शैलीत दहशतवाद्यांवर केलेला हा प्रतिहल्ला आहे.'' त्यांच्या या गुळचट विधानामुळे स्फोटातील मृत आणि जखमींच्या जखमांवर मीठ चोळले गेले आहे, असे वर्तमानपत्राने म्हटले आहे. "बंगळूर, मालेगाव, लंडन, बगदाद...इथेही दहशतवादी हल्ले होतातच,' या रेड्डी यांच्या उद्‌गारांवर तर "ईनाडू'ने म्हटले आहे, ""वा..वा! यादवी युद्धाने धुमसत असलेल्या इराकमधील बगदादशी आंध्र प्रदेशची तुलना होऊच कशी शकते. सप्टेंबर 11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत पुन्हा दहशतवाद्यांना धुमाकुळ घालता आलेला नाही, हे माहित असतानाही मुख्यमंत्री असे बोलूच कसे शकतात.''

दहशतवाद्यांनी वैफल्यातून हे कृत्य केल्याचे राज्य सरकारने म्हटले होते. त्यावर "इनाडू'चे म्हणणे, "" इदि प्रभुत्वाल वैफल्यम. (हे दहशतवाद्यांचे नव्हे, सरकारचे अपयश आहे.''

आंध्र प्रदेश हे त्यामानाने एक गरीब राज्य आहे. मात्र आधीच्या चंद्राबाबू नायडू यांच्या कारकीर्दीत तिथे किमान शांतता तरी होती. नक्षलवाद्यांच्या मुसक्‍या आवळण्यात नायडू सरकारला बव्हंशी यश मिळाले होते. त्या तुलनेत रेड्डी यांच्या सरकारने डोळ्यांत भरण्याजोगी काहीही काम केलेले नाही. नक्षलवाद्यांवर कारवाई न करण्याचा निर्णय त्यांनी सत्तेवर येताच काही दिवसांनी जाहीर केला होता. मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही. गेल्याच महिन्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आंदोलनात तिथे सात पोलिस कर्मचारी ठार झाले. तिरुपतीतील जमीनी मिशनऱ्यांना वाटणे, मुस्लिमांना आरक्षण देणे अशा "नॉन इश्‍यू'मध्ये रेड्डी सरकारने वेळ घालविला. त्यामुळे आंध्रसारख्या चांगल्या व सुंदर राज्याचा बघता-बघता "इराक' झाला आहे.

Friday, August 24, 2007

आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड

प्रिय बंधु आणि भगिनींनो,
आज आपण माझा "आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड'चा अध्यक्ष या नात्याने जो सत्कार करत आहात, त्याबद्दल मी मनापासून आनंद आणि आभार व्यक्त करतो. खरं तर आपण माझा हा जो गौरव करत आहात, त्यातून माझ्याबद्दल आपल्या मनात असलेला जिव्हाळा अन्‌ आपुलकीच नजरेस पडते. जागतिकीकरणाच्या रेट्यात सर्वत्र चंगळवाद आणि पैशाचीच महती असताना, केवळ जिव्हाळा आणि आपुलकीच्या जोरावर उद्योग करण्याची आणि यशस्वीही होण्याची उमेद मला आपल्यासारख्या सर्वसामान्यांमुळेच मिळाली आहे, हे मी अभिमानाने नमूद करू इच्छितो.

खरं तर एकेकाळी मीही आपल्यासारखाच साधा एक कर्मचारी होतो. महिन्याच्या महिन्याला संसाराचा गाडा रेटताना मेटाकुटीला येण्याचे प्रसंग नेहमीच यायचे. दर महिन्याला पगाराकडे डोळे लावून बसायचे आणि पगार झाला, की निरनिराळी बिले चुकवायची हा माझा शिरस्ता होता. एखाद्या पापभीरू माणसाने खोटा आळ आल्यावर अटकपूर्व जामीन मिळवावा, तसे मी पगारपूर्व बिलांची व्यवस्था करायचो. त्यावेळी दहा तारखेला माझा पगार व्यायचा आणि अकरा तारखेला माझा "मंथ एंड' सुरू व्हायचा. जगात खर्चाचे मार्ग चोहोदिशांनी खुले होत होते आणि बचतीचे मार्ग खुंटत होते. त्यावेळी या अर्थप्रधान जीवनाला काही पर्याय आहे की नाही, हा प्रश्‍न मला पडला. त्या प्रश्‍नाला मिळालेले उत्तर आज या कंपनीच्या यशाने रूपाने आपल्यासमोर आहे.

या प्रवासाची सुरवात कशी झाली, ते येथे सांगितल्यास अप्रस्तुत ठरणार नाही. असाच एका महिन्यात पगाराची रक्कम बिलांमध्ये खर्ची पडल्यावर मी वाण्याच्या दुकानात गेलो होतो. चहासाठी घरात पावडर होते आणि साखर मात्र संपलेली होती. (जीवनातील गोडवा आधीच संपला होता, आता साखरही संपलेली होती.) दुकानदार उधारीने काही देण्याची शक्‍यता नव्हतीच. मात्र मी गरीब असल्याने माझ्याकडे प्रेम आणि करुणा खूप असल्याचे मी ओळखून होतो. त्यामुळे अत्यंत कळवळून दुकानदाराला म्हणालो, ""मालक, जरा एक किलो साखर हवी होती. माझ्याकडे आता पैसे बिल्कुल नाहीत. पण आपुलकी आणि जिव्हाळा भरपूर आहेत. तर जरा थोडासा जिव्हाळा घेऊन साखर देता का?''

मित्रहो, सांगायला खूप आनंद वाटतो. तो दुकानदार साधा किराणा दुकानदार होता. देशात अद्याप मॉलचे वारे पोचले नव्हते. त्यामुळे सौजन्य शिल्लक असलेल्या त्या दुकानदाराने मान डोलाविली आणि म्हणाला,

"साहेब, आपुलकी देत असाल तर पैशांची काय गरज आहे? अन्‌ जिव्हाळा असल्यानंतर एक काय दोन किलो साखर घ्या ना.''

हीच ती सुरवात होती. केवळ जिव्हाळा आणि आपुलकीच्या जोरावर व्यवहार करता येतो, हे मी ओळखले. त्यानंतर सिटी बस, रेल्वे, मल्टिप्लेक्‍स, हॉटेल अशा सर्व ठिकाणी मी जिव्हाळा व आपुलकीचाच वापर करून व्यवहार केला. त्यातूनच "आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड'चा जन्म झाला. कंपनीने कणाकणाने जिव्हाळा व आपुलकी जोडली व आज ती पैशांऐवजी केवळ जिव्हाळा, स्नेह आणि आपुलकीद्वारे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवनाला नवा आनंद देत आहे, याचा सर्वांनाच आनंद व्हायला हवा.

जरा आमच्या कंपनीच्या धोरणाबद्दल सांगतो. पैसा हा जगातील सर्वच संघर्षाचे मूळ असल्याचे मार्क्‍सने म्हटले आहे. (आपल्या पूर्वसुरींनी व ज्येष्ठांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करायलाच हवे, नाही का?) त्यानुसार आमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही कधीही पैशांमध्ये पगार देत नाही. पैशांमध्ये पगार दिला, की त्यांच्या अपेक्षा खूप वाढतात अन्‌ मानवाच्या जीवनातील सर्व दुःखांचे मूळ अपेक्षांमध्ये आहे, असे भगवान गौतम बुद्धांनी म्हटले आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, कर्मचाऱ्यांना पैशांऐवजी प्रेम आणि जिव्हाळा द्या. आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना सकाळी कामावर आल्यापासून घरी जाईपर्यंत आपुलकीचा वर्षाव होतो. त्यामुळे त्यांची चित्तवृत्ती तर उल्हसित राहतेच, शिवाय कार्यक्षमताही अनेक पटींनी वाढते. एवढेच नाही, तर बाहेरच्या जगातही सर्वत्र केवळ जिव्हाळा आणि आपुलकीचाच व्यवहार करण्याचीही त्यांना सवय लागली आहे. यादृष्टीने पाहिली असता, संपूर्ण जगात आता या गोष्टींचाच प्रसार होत आहे.

जे आमच्या कर्मचाऱ्यांशी, तेच आमच्या ग्राहकांशी. आज "आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड' इतक्‍या विविध उद्योगांमध्ये आघाडीवर आहे. परंतु कुठेही आम्ही पैशांची तडजोड न करता स्नेह, जिव्हा आणि आपुलकी यांच्याच बळावर प्रगती करत आहोत. भारतातील सरकारी कार्यालयांमध्ये चालणारे अर्थपूर्ण व्यवहार जगप्रसिद्ध आहेत. मात्र तिथेही मी, माझे कर्मचारी आणि ग्राहक केवळ याच बाबींचा उपयोग करतात. बंधु-भगिनींनो, माझं आज आपल्या सर्वांपुढे एकच सांगणे आहे. पैशांचा मोह टाळा. जागतिकीकरण आणि चंगळवाद आपल्या देशासाठी चांगला नाही. केवळ स्नेह, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी याच शाश्‍वत बाबी आहेत. त्यांच्या उपयोगातून आपण नवीन, समाधानी आणि सुखी जग निर्माण करू शकतो. आपण केलेल्या या गौरवाबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो अन्‌ माझे भाषण संपवितो.

Sunday, August 19, 2007

श्रावणमासी "डीडी' उपाशी

तुराज श्रावण! या महिन्याचे नाव घेतले की अनेकांमधला कवी "फणा' वर काढतो. चहूकडे हिरवळ पसरली आहे, पावसाच्या धारा अधून-मधून उन्हाच्या तिरीपेशी लपंडाव खेळत आहेत...वातावरणात एक तजेला पसरला आहे आणि नव्या नव्या वेली जमिनीतून डोके वर काढत आहेत. पुणे शहर नसेल, तर तिथे चिमण्या-कावळे व अन्य पक्षी निसर्गाने त्यांना दिलेल्या मर्यादित आवाजात, पण हिंदी चित्रपटातील गाण्यांहून कित्येक पटींनी मधुर गाणी गात आहेत...असं काहीसं रम्य चित्र श्रावणाच्या नावासरशी डोळ्यांपुढे उभे राहते. त्यात ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ असे साक्षात बालकवींचे वचन. त्यामुळे श्रावण म्हणजे केवळ गोडवा असंच काही जणांनी वाटत राहतं. अर्थात हे फक्‍त काही जणांच्या बाबतीत.

श्रावण महिना म्हटला, की माझ्या पोटात गोळा उभा राहतो. कारण श्रावणाचा पहिला हल्ला पोटावरच होतो. या महिन्याचे आगमन होताच पहिले छूट शाकभाज्यांच्या पर्यायी अन्नावर गदा येते. आपल्या "प्राण'प्रिय खाद्यावर असे पाणी सोडण्याचे जीवावर आले, तरी कर्तव्य करावेच लागते. कारण प्रश्‍न श्रद्धेचा असतो, संस्कारांचा असतो. "ममैवांशो सर्वलोके जीवभूत सनातनः' असे भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेत सांगितले आहे. तरीही एका विशिष्ट महिन्यात भगवंताला कोथींबीर, कारले, पालक आणि तत्सम सजीवच का चालतात आणि अन्य पदार्थ अभक्ष्य का ठरतात, याचे कोडे उलगडत नाही. अन्‌ वरून याला श्रावण"मास' म्हणून आम्हाला खिजवायचे?

बरं, एवढ्यावरच उरकलं तर एवढ्या महिन्याभराचे फारसे दुःख वाटले नसते. प्रश्‍न येतो तो चार सोमवार, एक चतुर्थी अशा एकाहून एक एकदिवसीय कसोटींचा! काय सांगावं, या दिवसांचा सामना कसा करावा, या विवंचनेत अन्नपाणी गोड लागत नाही हो! एक तर मराठी पत्रकार असल्याने उपासमारी ही तशी पाचवीलाच पुजलेली! त्यात आणखी कसेबसे दोन घास घशाखाली घालायचे, तर त्याचीही चोरी. "चरैवेति चरैवेति एतद्‌ सत्यम्‌' हा ज्याचा बाणा, त्याला या दिवशी ज्या अग्निदिव्याला सामोरे जावे लागते, त्याची कल्पना इतरांना येणार नाही. वर्षाचे 357 दिवस (चार सोमवार, दोन एकादशी, एक चतुर्थी आणि एक महाशिवरात्री धरून) भलेही हा माणूस वडापावच्या गाड्याकडे तुच्छतादर्शक आढ्यतेने जातो. मात्र नेमका या दिवशी वडापावचा वास त्याला आपल्याकडे ओढून घेतो. "कळेना कळेना वळेना वळेना' असं समर्थ रामदासांनी म्हटले आहे, त्याची प्रचिती यावेळी येते. अन्‌ उपास करणाऱ्याला तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार!

एवढे उपास केल्यानंतर मला एक शंका राहून राहून येते. उपासाच्या खाद्यांचे आणि "इंडियन पीनल कोड'चे (ग्रामीण वर्तमानपत्रांत बव्हंशी आढळणारा भारतीय दंड विधान उर्फ भा. दं. वि.) नियम एकाच व्यक्तीने केले असावेत. त्याशिवाय या दोन्ही नियमांमध्ये विचित्रपणाबाबत एवढे साम्य आढळले नसते. उपासाच्या दिवशी काय खायचं आणि काय खायचं नाही, हे लक्षात ठेवायचे म्हणजे खायची गोष्ट नाही. अहो, पिष्टमय पदार्थ असलेला साबुदाणा उपासाला चालतो, मात्र यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साळींचे पोहे निषिद्ध! दक्षिण अमेरिकेतून युरोपमार्गे भारतात आलेला बटाटा ओ.के.., वनस्पती तेलांपासून बनलेला डालडा ओ.के. मात्रत्याच वनस्पतींची भाजी हद्दपार! तांदळाची जातभाई भगर उपासाच्या दिवशी मानाने मिरविणार आणि अरबस्तानातील खजूरही शेखी मिरविणार! बाहेरच कुठे उपासाचे खावे म्हटले, तर साबुदाणा वडे आणि नायलॉन चिवडा या हॉटेलचालकांमध्ये अतिलोकप्रिय पदार्थांशिवाय अन्य काही मिळण्याची खोटी! त्यात हे वडे आणि चिवडा पामोलिव तेलातून काढलेला...तेही अन्य पदार्थ तळलेल्याच! म्हणजे करमणूक हवी म्हणून मराठी चित्रपटाला जायचं आणि प्रखर वास्तवाचं प्रतिबिंब, भावभावनांचे कंगोरे, वैचरिक घुसळण अशा नावांखाली जमेल तेवढी (अन्‌ अत्यंत स्वस्तातली)पिळवणूक सहन करून यायचं! उपास करणाऱ्या प्रत्येक माणसाकडे अशा "सेल्फ गोल'चे पोटभर अनुभव असतातच.

श्रावणात ज्या दिवशी उपास नसतात, त्यादिवशी उपासही परवडतील असे सण असतात. ईश्‍वराने सगळे महिने तयार केल्यानंतर अनेक सण राहून गेल्याची त्याला आठवण आली आणि ते सर्व सण त्याने श्रावणातच कोंबले असावेत, असा माझा एक सिद्धांत आहे. बरं, हे सणही कसे गोडधोड करून खायचे...साग्रसंगीत पुरणाची पोळी तोडायचे. म्हणजे आमची डबलबार अडचण. गोडधोड करायचे म्हटले, की वेळेवर खायला मिळणार नाही, याची "अनुभव हीच खात्री!' अन्‌ समजा मिळालेच तर पुरणाची पोळी खाऊन "डोळे मिटून' ऑफिसमध्ये जायला सगळेच काही सरकारी कर्मचारी नसतात. त्यात पंचामृत, चटण्या हे जेवणाच्या ताटातले "साईड हिरो' या महिन्यात एकदम सुपरस्टारशी स्पर्धा करायला जमतात. त्यामुळे "जेवण नको पण पदार्थ आवर,' अशी अवस्था होऊन जाते. या महिन्यात सत्यनारायणाच्या पूजाही फॉर्ममध्ये असल्यामुळे तिकडे कुठे जेवायचे तोंडभरून आमंत्रण असतेच. इकडे श्रावणातील पाऊस व उन्हाची लपाछपी चालू असते, दुसरीकडे जेवण अन्‌ उपासाचा "मेरी गो राऊंड' चालू असते.

उपास पुराणाच्या या अडचणींचे हे एवढे अध्याय असले, तरी या सर्व रसांचा परिपोष एका अध्यायात होतो. तो अध्याय म्हणजे उपास करणारा एकटा माणूस. त्याला उपासाचे करून द्यायला कोणी नाही, अन्‌ उपास सोडण्यासाठी करून द्यायलाही कोणी नाही. असा माणूस फारतर काय करेल, काही नाही "मेरे नैना सावन भादो...फिर भी मेरा मन उपासा...' असे गाणे गाईल. कारण काय, तर एका दिवसाच्या उपासाने आपण मरत नाहीत, याची त्याला पुरेपूर जाणीव असते. शेवटी काय, तर व्हरायटी ऍडस्‌ स्पाईस टू लाईफ...अन्‌ कधी कधी हा मसाला उपासदार असतो...एवढंच!!!