अखेर भारतीय जनता पक्षाने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आणि काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही नवसंस्थानिकांची निर्मिती करण्यावर शिक्कामोर्तब केले. जळगाव जिल्ह्यातील सत्तापदे एकनाथ खडसे यांच्या घरातच राहावीत, असा धोरणात्मक निर्णय जणू पक्षाने घेतला आहे. भारतीय राज्यघटनेनुसार महाराष्ट्रात लोकशाही असली आणि वरपांगी तरी हे पुरोगामी राज्य असले, तरी घराणे हेच येथील जनतेच्या मानसिकतेचा भाग असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
असं म्हणतात, की महाराष्ट्राचे राजकारण मोजकी घराणी चालवतात. बहुतांशी नेत्यांचे एकमेकांशी असलेले नाते पाहिले तरी या विधानाची सत्यता पटते. खुद्द शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हेच एकमेकांशी जोडलेले आहेत, तेव्हा अन्य छोट्या मोठ्या सग्या-सोयऱ्यांबद्दल तर विचारायलाच नको. त्यामुळे सत्तेची देवी कशीही फिरली तरी तिने आपला उंबरठा ओलांडू नये, याची तजवीज या सर्व मंडळींनी केली आहे.
(लोकसत्ता.कॉमवरील सत्तार्थ मालिकेतील माझा ताजा ब्लॉग. पूर्ण नोंद वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.)
Tuesday, April 1, 2014
Wednesday, March 19, 2014
हवे आहेत...कार्यकर्ते!
१६ व्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन दोन आठवडे उलटत आले तरी देशातील बहुतांश मतदारसंघात अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. यात महाराष्ट्रातील सत्ताधारी काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा पुणे व नांदेड मतदारसंघांचा जसा समावेश आहे, तसा सत्तेसाठी आतुर झालेल्या शिवसेना-भाजप युतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा मुंबई व विदर्भातील जागांचा समावेश आहे. निवडणुकीच्या बोहल्यावर चढण्यासाठी उत्सुक असलेले उमेदवार दिल्लीत मुंडावळ्या बांधून तयार असले, तरी प्रत्यक्ष रणांगणात एका गोष्टीची उणीव सर्वांना भासत आहे. ती म्हणजे कार्यकर्त्यांची.
कुठला झेंडा घेऊ हाती म्हणणारे कार्यकर्ते आता इतिहासजमा झाले...झेंडा देऊ कोणाच्या हाती, असे म्हणण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये यूपीए सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने कित्येक आंदोलने पुकारली. मात्र ऐनवेळी कार्यकर्त्यांचा त्यांत सहभाग नसल्यामुळे त्यांचा कसा फज्जा उडत गेला, हे भाजपच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यक्रमांवर नजर टाकली तरी कळून येईल. भाजपला रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ मिळते ते केवळ मतदानापुरते. प्रत्यक्ष पक्षाच्या कामात घरोघरी मातीच्या चुली अशीच अवस्था आहे. शिवाय अन्य कुठल्याही पक्षाइतकेच, किंबहुना अधिकच, याही पक्षाला गटबाजीने पोखरले आहे.
कुठला झेंडा घेऊ हाती म्हणणारे कार्यकर्ते आता इतिहासजमा झाले...झेंडा देऊ कोणाच्या हाती, असे म्हणण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये यूपीए सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने कित्येक आंदोलने पुकारली. मात्र ऐनवेळी कार्यकर्त्यांचा त्यांत सहभाग नसल्यामुळे त्यांचा कसा फज्जा उडत गेला, हे भाजपच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यक्रमांवर नजर टाकली तरी कळून येईल. भाजपला रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ मिळते ते केवळ मतदानापुरते. प्रत्यक्ष पक्षाच्या कामात घरोघरी मातीच्या चुली अशीच अवस्था आहे. शिवाय अन्य कुठल्याही पक्षाइतकेच, किंबहुना अधिकच, याही पक्षाला गटबाजीने पोखरले आहे.
लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझी ब्लॉग पोस्ट. पुढील पोस्ट वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
Wednesday, March 12, 2014
बोक्यांची मन(से)धरणी!
महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढविणार मात्र निवडून आल्यास नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार, अशी घोषणा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दोन बोके आणि माकडाच्या कथेला मूर्त रूप दिले आहे. एक तिरंगी बोका आणि एक संपूर्ण केशरी बोका, असे दोन भांडणारे बोके पंचवार्षिक लोण्याच्या वाटपासाठी रंगीबेरंगी माकडाकडे गेले होते. त्यातील दोघांचेही थोडे-थोडे हातचे राखून राज यांनी स्वतःच्याही पदरात काही पडेल, याची तजवीज केली आहे.
मनसेने निवडणूक लढवावी जेणेकरून भगव्या बोक्याची मते कमी व्हावीत आणि स्वतःचा मार्ग सुकर व्हावा, असा तिरंगी बोक्याचा आग्रह. मनसेने निवडणूक लढवू नये, असा भगव्या बोक्याचा प्रयत्न. त्यासाठी नितीन गडकरी, विनोद तावडे आणि शेलार यांच्यासारख्या तगड्या प्रतिनिधींनी राज यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचाही प्रयत्न केला. गेल्या निवडणुकीसारखी मतविभागणी टाळावी आणि देशातील तिसऱ्या सर्वाधिक जागा असलेल्या राज्यात जागांसाठी फारसे झगडावे लागू नये, हा त्यामागे हेतू.
मनसेने हुशारी दाखवून दोन्ही बोक्यांशी सलगीही ठेवली आणि स्वतःला हवे ते पदरातही पाडून घेतले. आता निवडणूक लढविल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीही मनसेवर खुश आणि निवडणुकीनंतर मोदींना पाठिंबा देणार असल्यामुळे भाजपही खुश. मनसेचे भांडण एकट्या शिवसेनेशी (किंबहुना नेमके सांगायचे तर उद्धव ठाकरेंशी), तर त्यांची गोची केल्याचे पुण्यही पदरात पडणार.
लोकसत्ता.कॉमच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. अधिक वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
Friday, March 7, 2014
उमेदवार व्हायचंय मला...
हॅलो, मला उमेदवार व्हायचंय. काहीही करून, कसंही करून मला लोकांकडे जायचंय, मतं मागायला! तसा मी लोकांच्या मताला फारशी किंमत देत नाही, पण निवडणुकीत जिंकायचं म्हणजे मतं मागावी लागतात. म्हणून मला मतांची भीक म्हणा, दान म्हणा मागण्यासाठी जायचंय. नवरात्रात कसं देवीच्या नावाने जोगवा मागतात, त्यामुळे कोणी भिकारी होतं का? मग लोकशाही देवीच्या नावाने मतं मागितल्याने मी काय भिकारी होतो का?
...तर त्यासाठी हवी उमेदवारी. कुठल्याही पक्षाची चालेल. काँग्रेस म्हणू नका, 'राष्ट्रवादी' म्हणू नका, सेना-भाजप, गेला बाजार मनसेसुद्धा...हे आपलं एक चाल म्हणून म्हणालो, नाही तर बाजारचा शब्दशः अर्थ घेईल कोणी. यांच्यापैकी कोणी नाही तर 'आप' देईल आणि 'आप'नेही दिला दगा तर बाप देईल. अरे, स्वतःच्या ताकदीवर अपक्ष म्हणून उभा राहील मी. एका खिशात थैली आणि दुसऱ्या खिशात तरुणांचे तांडे घेऊन फिरतो मी...
Tuesday, March 4, 2014
द्राविड मोदीत्व कळगम!
करुणानिधी, रामविलास पासवान, शरद पवार आणि फारुख अब्दुल्ला इ. मंडळी ज्या प्रकारे सत्तेच्या दिशेला तोंड करून उभे राहतात, त्यावरून त्यांना आता राजकीय वातकुक्कुट म्हणून मान्यता मिळायला हरकत नसावी. द्राविड मुन्नेत्र कळगम पक्षाचे नेते एम. करुणानिधी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे त्यांचे चांगले मित्र असल्याचे जे विधान केले आहे, ते याचेच उदाहरण म्हणायला पाहिजे.
तमिळनाडूतील राजकीय परिस्थितीच अशी बनली, की गेली दहा वर्षे भारतीय जनता पक्षाचा वाराही सहन न होणाऱ्या करुणानिधी यांना ही कोलांटउडी घ्यावी लागली आहे. शिवाय येत्या निवडणुकीच्या निकालाचा अंदाजही त्यातून मिळाला आहे. करुणानिधी यांच्या हाडवैरी आणि अण्णा द्रामुकच्या नेत्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आधीच पंतप्रधानपदावर दावा ठोकून राज्यातील मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याच्या निर्णयाने त्यांनी बऱ्यापैकी जनमतही बाजूला करून घेतले आहे. हा निर्णय योग्य का अयोग्य हा मुद्दा अलाहिदा, मात्र त्यांनी करुणानिधींवर याबाबतीत कडी केली, यात शंका नाही.
(लोकसत्ता ऑनलाईनच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग)...संपूर्ण नोंद कृपया येथे वाचा...
Thursday, January 30, 2014
राष्ट्रपित्याचा व्यवसाय शेती
भारतातील विसंगतींनाही कधीकधी दाद द्यावीशी वाटते. ज्या देशात शेतकरी हर क्षणी नागवला आणि भरडला जात आहे, त्या देशाचा राष्ट्रपिता स्वतःला शेतकरी मानत असावा, आणि ज्या कृषीमंत्र्याच्या अमलात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यालाच ही बाब आढळावी, याला काय म्हणावे?
या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी वकीली शिकलेले होते आणि ते बॅरिस्टर होते, हे तर सर्वांनाच माहीत आहे, परंतु खुद्द बापू स्वतःला शेतकरी मानत होते. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत याचा पुरावा सांभाळून ठेवलेला आहे. त्यात खुद्द महात्मा गांधीची स्वाक्षरीही आहे.
97 वर्षे जुन्या भांडारकर संस्थेत भारत तसेच आशियाई देशांशी संबंधित अनेक प्राचीन हस्तलिखिते, पोथ्या आणि पुस्तके आहेत. परंतु या दस्तावेजांसोबतच आणखी एक महत्त्वपूर्ण दस्तावेज इथे आहे ते म्हणजे येथील व्हिजिटर्स बुक. सन् 1917 मध्ये स्थापनेनंतर अनेक नामवंतांनी या संस्थेला भेटी दिल्या आणि या व्हिजिटर्स बुकमध्ये आठवणी व टिपण्या मागे ठेवल्या.
याच भेटींमधील एक होती महात्मा गांधी, राजकुमारी अमृत कौर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची भेट. येथील दस्तावेजांनुसार 1 सप्टेंबर 1945 रोजी या तीन असामींनी या संस्थेला भेट दिली होती. त्यांच्या सोबत मणिलाल गांधी हेही होते. या व्हिजिटर्स बुकमध्ये तीन रकाने होते - नाव, टिप्पणी आणि व्यवसाय.
पूर्ण संस्था पाहून झाल्यावर बापूंनी व्हिजिटर्स बुकमध्ये स्वाक्षरी केली. टिप्पणीच्या रकान्यात त्यांनी लिहिले, 'बहुत आनंद हुआ'. व्यवसायाच्या रकान्यात त्यांनी गुजरातीत लिहिले, 'खेडुत' अर्थात शेतकरी. त्यानंतर महात्मा गांधी येथे येऊन गेले होते, हे वारंवार सांगितले तरी त्यांच्या व्यवसायावर कोणीही लक्ष दिले नाही.
आता ही गोष्ट समोर कशी आली, तर ती आता कृषीमंत्री असलेल्या शरद पवार यांच्यामुळे. 2001 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आता केंद्रीय कृषीमंत्री असलेले शरद पवार हे या संस्थेच्या भेटीवर होते. (त्यानंतर 2004 साली भांडारकर संस्थेवर हल्ला झाला. यात काही संगती आहे का नाही, सांगता येत नाही). व्हिजिटर्स बुकमध्ये स्वाक्षरी करताना 'भांडारकर'चे तत्कालीन मानद सचिव मो. ग. धडफळे यांनी त्यांना सांगितले, की महात्मा गांधी हेही एके काळी येथे येऊन गेले होते. तेव्हा पवारांना उत्सुकता वाटली, की बापूंनी त्यांचा व्यवसाय काय लिहिला असावा. तेव्हा जुने व्हिजिटर्स बुक मागवण्यात आले आणि तेव्हा ही बाब समोर आली.
याच पानांमध्ये असेही दिसते, की राजकुमारी अमृता कौर यांनी त्यांचा व्यवसाय 'देशसेविका' लिहिला होता तर सरदार पटेल यांनीही स्वतःला शेतकरीच म्हणवले होते. मणिलाल गांधी यांनी व्यवसाय लिहिला होता, 'संपादक, इंडियन ओपिनियन'.
काल राज्यसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी स्वतःकडे वाहन नसल्याचे जाहीर केले तेव्हा ही मीच दिलेली बातमी आठवली. आज योगायोगाने म. गांधीजींची पुण्यतिथी आहे. तेव्हा हीच बातमी मी अन्यत्र दिली.
म. गांधी देशाचे राष्ट्रपिता होते अथवा नाही, यावर वाटेल तेवढा वाद घाला. परंतु 'हा देश खेड्यांचा आहे आणि शेतकऱ्यांचा आहे' असे जेव्हा तो महात्मा सांगायचा, तेव्हा ते तोंडदेखले नव्हते, इतके नक्की!
Saturday, January 25, 2014
भ्रष्टाचार आणि 'आप'वर राष्ट्रपतींची टिप्पणी - एक नवा पायंडा
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणातून भ्रष्टाचाराच्या विरोधात केवळ स्पष्टोक्तीच केली असे नव्हे, तर त्यातून सरकारे कोसळतील, असा इशाराही दिला आहे. राष्ट्रपतींच्या बोजड भाषणांच्या परंपरेत हा एक वेगळा पायंडा आहे आणि त्याचे स्वागतच करावे लागेल.
भ्रष्टाचार हा असा कर्करोग आहे जो लोकशाहीला कमकुवत बनवतो तसेच आपल्याक राज्यांची पाळेमुळे पोकळ बनवतो. भारताचे नागरिक, क्रोधित आहेत तर त्यायचे कारण भ्रष्टाचार तसेच राष्ट्रीय साधनांचे नुकसान त्यांना दिसत आहे. जर सरकारांनी या त्रुटींचे निराकरण केले नाही तर मतदार सरकारांना खाली खेचतील,
असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. देशातील सत्ताधारी यातून बोध घेतील, अशी शक्यता कमी असली, तरी देशाचा सर्वोच्च अधिकारी हे वक्तव्य करतो आणि तेही प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवसाच्या पूर्वसंध्येला, ही खचितच महत्त्वाची बाब आहे. राष्ट्रपतींनी ‘आप’च्या नावाने निघालेल्या टोळीलाही जाता जाता टपली मारली, हे खूप बरे केले. ते म्हणाले,
काही निराशावाद्यांनी लोकशाहीप्रती आपल्या कटिबध्दतेची खिल्ली उडवली असेल, मात्र जनतेने कधीही आपल्या लोकशाहीचा विश्वासघात केला नाही, जर कुठे काही त्रुटी असतील, तर त्या ज्यांनी इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग म्हणून सत्तेचा मार्ग स्विकारला आहे त्यांच्यामुळे आहेत...याचप्रमाणे सार्वजनिक जीवनात वाढलेला पाखंडीपणाही धोकादायक आहे. निवडणूका कोणत्याही व्यक्तीला आभासाशी खेळण्याची परवानगी देत नाहीत. ज्या लोकांना मतदारांचा विश्वास हवा आहे, त्यांनी केवळ अशीच आश्वासने दिली पाहिजेत, जी पूर्ण होऊ शकतील. सरकार ही धर्मादाय संस्था नाही. लोकवादी अनागोंदी शासनाचा पर्याय असू शकत नाही. खोटया वचनांचा परिणाम अपेक्षाभंगात होतो, ज्यामुळे राग उफाळून येतो आणि स्वाभाविकपणे या रागाचे लक्ष्य असतेः सत्ताधारी पक्ष.
राष्ट्रपतींचे उरलेले भाषण नेहमीच्या चाकोरीतील होते, त्यात छोट्या राज्यांपासून दहशतवादासारखे अनेक विषय होते. वाचता येते आणि दूरचित्रवाणीवर दिसू लागले तेव्हापासूनच्या प्रत्येक राष्ट्रपतींना याच विषयावर वार्षिक प्रवचन देताना वाचले वा ऐकले आहे. त्यात काही नाविन्य नाही. ताज्या घडामोडींची बऱ्यापैकी दखल घेणारे हे भाषण म्हणून त्याची एवढीच दखल घेतलेली पुरे!
Subscribe to:
Posts (Atom)