आता काय करावे, कुठे जावे...काय वाचावे...काही सुचत नाहीये! सकाळपासून तीन पेप्रं वाचून झाली...आठ चॅनेल रिमोटवर फिरवून झाले. त्यातील सर्व जाहिराती आणि अधून-मधून बातम्याही पाहिल्या...अनेकांना विचारले, ""तुम्ही पाहिले का?'' सर्वांनी नकारार्थी माना वेळावल्या. असं घडलंच कसं?
मुंगीने मेरुपर्वत तर गिळला नाही ना...
एक्सप्रेस रेल्वे वेळेवर तर धावली नाही ना...
"पीएमटी' रिकामी येऊन स्टॉपवर योग्य जागी तर थांबली नाही ना...
नाही ना?? मग हे सर्व सुरळीत होत असताना असं का व्हावं...?
माझी प्राणप्रिय बातमी आज का छापून आली नाही...गेल्या वर्षीपासून पेप्रांमध्ये वाचतोय...त्यातही रजनीकांतचे जुने फोटोच पाहतोय..."शिवाजी' येतोय..."शिवाजी' येतोय...कालपर्यंत तर येत होत्या बातम्या...आता का नाही आल्या...पहिल्यांदा वाचलं होतं...रजनीकांतला सोळा कोटींची बिदागी मिळालीय...मला किती पराकोटीचा आनंद झाला...त्यानंतर कितीदा तरी कोटी म्हणजे किती शून्ये, याचा अंदाज घेत होतो...त्यानंतर काही दिवस तर काहीच छापून आलं नाही...
मात्र तेव्हा "शिवाजी'च्या बातम्यांची सवय नव्हती, त्यामुळे फारसे चुकल्यासारखे वाटत नव्हते. त्यानंतर वाहिन्यांवर रजनीच्या चाहत्यांची हलती चित्रे दिसू लागली. तेव्हा मला त्याचा लळाच लागला ना! नंतर मीही "शिवाजी शिवाजी' करायला लागलो. मला आपलं वाटलं रजनीकांतनं शिवाजी महाराजांचं कामच केलंय.. महाराजांवर महाराष्ट्राचा कॉपीराईटच ना! त्यामुळे दुसरं कोणी त्यांचं नाव वापरू शकतं, ही कल्पनाच नाही! हवेत तलवार फेकून महाराज गनीमांना "हातोहात' लोळवतायेत, अशी दृश्येही मला दिसू लागली. गेल्या महिन्यांपासून मात्र चोहीकडे "शिवाजी' न् "शिवाजी'च दिसू लागले. मला तर काय करावे न् काय करू नये, असं झालं.
तेव्हाच कळालं रजनीकांत "शिवाजी' आहे मात्र "शिवाजी' नाही.... म्हणजे झालं काय, का मित्रांसोबत बोलताना आपण सोळा कोटींचीच बात काढली ना (एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाच्या फक्त पैशाबद्दलच दिलखुलास बोलतो), तर कोणीतरी म्हणालं, की तो मराठी आहे...हे आणखी काही विपरीतच. तमिळ, म्हणजे एकूणच मराठी आणि हिंदी सोडले तर आपल्याला सगळे हिरो "कोंगाडी'च...नाही म्हणायला तो आपल्या अमिताभच्या काही पिच्चरमध्ये दिसला होता, पण "अमिताभ के सामने रजनीकांत की क्या औकात...' इंटरनेटवर त्याच्या स्टाईलबद्दलचे जोक फॉरवर्ड करण्यापुरते त्याचा फार फार तर संबंध! सांगायचं म्हणजे काळ्या काळ्या ढूऽऽसमधला एक, आपण नेहमी टिंगल करतो तो कोंगाडी हिरो मराठी आहे, तो तिकडे एवढा पैसा कमावतो म्हटल्यावर माझ्या तर पोटातच ढवळायला लागलं. अन् त्याचं नाव शिवाजी गायकवाड आहे म्हटल्यावर तर एवढा हेवा वाटला...आयला, आपण एवढे गोरे, अर्धवट हिंदी बोलणारे अन् इथं खितपत पडलोय. तो तिकडे खऱ्याने पैसा ओढतोय.
गेल्या महिन्यापासून तर बाबा "शिवाजी'बाबत खूपच ऐकायला आलं...त्यात पुन्हा सोळा कोटींचीच बात होती. आणखीही काही बाता होत्या. आमच्या दोस्त तर ते तमिळनाडूतील रसिक पाहून "खी खी' हसायलाच लागले. त्यांना कळेचना हे खूळ म्हणायचं का वेड? इकडं मी टीव्ही आणि पेपरमध्ये रोज "शिवाजी'च्या बातम्या वाचत होतो. औरंगजेबाने "शिवाजी'वर ठेवली नसती अशी पाळत मी "शिवाजी'च्या बातम्यांवर ठेवली होती. चॅनेल आणि टीव्हीच्या सौजन्याने मलाही रोज काहीतरी खुराक मिळत होता. पण मला एक कळत नव्हतं, रजनीसाठी एवढी किंमत मोजायला त्याच्या मागच्या पिच्चरमध्ये असं काय होतं? त्याबाबत मात्र कोणीही बोलत नव्हतं. मी मात्र रोज बातम्या वाचायचो. मजा यायची. इतकं की, "इट शिवाजी, स्लीप शिवाजी' अशी माझी अवस्था झाली. रोज बातम्या, रोज आलटून पालटून फोटो...
माझा एक मित्र होता. तो रजनीकांतला रजनी म्हणायचा...त्याच्या पिच्चरच्या गमती सांगायचा...आम्ही त्याला हसायचो. त्यातच काल ती बातमी आली..."शिवाजी'ची दोन आठवड्यांची तिकिटे विकली गेली आहेत. इतकं बरं वाटलं. आता तर चॅनेल आणि बातम्यांचा पाऊस सुरू झाला म्हणा ना...रजनीकांत असा आणि रजनीकांत तसा...रजनीकांत आणि अमिताभ...रजनीकांत आणि त्याचे मानधन...रजनीकांत आणि त्याची स्टाईल...अशा कितीतरी बातम्या, रिपोर्ट...एका चॅनेलवर तर "आय ऍम रजनीकांत' नावाची स्पर्धाच सुरू केली होती...मलाही त्यात भाग घ्यावासा वाटला...असं सगळं छान छान "शिवाजी'चे "रजनी साम्राज्य' स्थापित झाले होते. काल तो पिच्चरही रिलीज झाला....अन् आज? आज मात्र कोणीही बातमी देत नाहीये...
अरे झालं काय...दोन वर्षांपूर्वीसारखं पुन्हा रजनीकांत गायब? मग आम्ही काय करायचं? आता कुठं माहिती घ्यायची? कुठं जाऊ? कुठं माझी तल्लफ भागवू? आता टक्कल पडलेल्या रजनीकांतचे फोटो कुठं पहायचे? त्याच्या पिच्चरसाठी आलेल्या खर्चाची चर्चा कुठं करायची? हा अन्याय आहे. दररोज "शिवाजी'ची एकतरी बातमी वाचली किंवा ऐकली पाहिजे.
मग एकच बातमी रोज छापली तरी चालेल!!!
मित्रा, खरंच खूप छान लिहिलं आहे तू. तुझा ब्लॉग वाचून आता मलाही `शिवाजी द बॉस` बघण्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. लिखाणाची शैली खूपच छान आहे आणि विशेष म्हणजे वाचकांना `खिळवून` ठेवणारी आहे. Now i am fan of your blog. keep it up!
ReplyDelete