संस्कृत आणि ब्राझीलचा संबंध असू शकतो का? जगाच्या नकाशाची थोडीशीही कल्पना ज्याला आहे, त्याला या दोघांचा संबंध असल्याचे सांगितले, तर हसू नाही का येणार? अगदीच संस्कृतमध्ये सांगायचे, तर तो बादरायण संबंध असणार नाही का? मलाही असेच हसू आले होते. मात्र एरिक पॅर्ट्रिज यांच्या "संस्कृत टू ब्राझील ः विग्नटस् अँड एस्सेज ऑन लॅंग्वेजेस' या पुस्तकात हा संबंध ज्या प्रकारे दाखविला आहे, त्यावरून संशयाला जागा राहत नाही. आपण भले कितीही म्हणू, संस्कृत सर्व भाषांची जननी आहे वगैरै...मात्र त्याचा खरा पुरावा अशा उदाहरणांतूनच िदसतो.एरिक साहेबांच्या मते, संस्कृत आणि ब्राझीलचा संबंध जोडण्यास कारणीभूत आहे "भा' हा धातू. आपल्याकडे भास्कर किंवा प्रभाकर यांसारख्या शब्दांतून "भा'हा धातू प्रामुख्याने वापरात आहे. त्याचा अर्थ आहे प्रकाशणे, चकाकणे. संस्कृत आणि युरोपीय भाषांचे सख्य तर जगप्रसिद्धच आहे. त्यामुळे "भा' धातूवरून प्राचीन फ्रेंच भाषेत एक शब्द निर्माण झाला "ब्रेज,' (braise) त्याचा अर्थ आहे जळणारा कोळसा. याच शब्दाचे इंग्रजीत एक रूप बनले "ब्रेझ' (braze). युरोपीय दंतकथांमध्ये "ब्राझील' या नावाने एक देश असून, उत्तर अंटार्क्टिकावरील या काल्पनिक देशात "ब्राझीलवूड' नावाचे लाकूड मोठ्या प्रमाणात मिळते, अशी कल्पना होती. आता या लाकडाला "ब्राझीलवूड' का म्हणायचे, तर या लाकडाचा रंग जळत्या कोळशासारखा असतो. पोर्तुगीज दर्यावदी जेव्हा ब्राझीलमध्ये पोचले, तेव्हा त्यांना तेथे असे जळत्या कोळशाच्या रंगाची अनेक झाडे आढळली. त्यामुळे त्यांनी त्या प्रदेशाला ब्राझील हेच नाव दिले.कोलंबस व त्याच्या सहकाऱ्यांनी भारतीय माणसं समजून अमेरिकेतील आदिवासींना ज्याप्रमाणे रेड इंडियन्स म्हणायला सुरवात केली, त्याच धर्तीचे कृत्य होतं हे. मात्र काही का असेना, जागाच्या पाठीवर संस्कृत कुठे ना कुठे, कोण्या ना कोण्या रुपात आहे एवढं नक्की!
No comments:
Post a Comment