दूरचित्रवाणी वाहिन्यांनी लोकांच्या मनावर राज्य करण्यापूर्वीच्या काळात नभोवाणी केंद्रांच्या कार्यक्रमांची जगावर सत्ता होती. शीतयुद्धाच्या काळात तर विविध देशांच्या नभोवाणी केंद्रांचीच चलती होती. त्यात एक केंद्र आहे "डॉइट्शे वेले' या संस्थेचे. आधी पश्चिम जर्मनीच्या व नंतर एकीकृत जर्मनीच्या सरकारचे प्रचाराचे साधन असणाऱ्या या केंद्राचे भारताशी विशेष नाते होते व आहे. त्यामुळेच या केंद्राला मिळणाऱ्या श्रोत्यांच्या पत्रांमध्ये, कित्येक वर्षे भारतातून येणाऱ्या पत्रांची संख्या सर्वाधिक होती. "डॉइट्शे वेले' याचा अर्थ होतो "जर्मन तरंग.' मॅक्समुल्लर आणि गोएथेच्या परंपरेला जागून या केंद्रावर गेल्या वर्षीपर्यंत संस्कृतमधून कार्यक्रमांचे प्रसारण होत होते. "आकाशवाणी'व्यतिरिक्त नियमितपणे संस्कृतमधून कार्यक्रम प्रसारित करणारे ते जगातील एकमेव आकाशवाणी केंद्र होते. दर पंधरवड्याला सोमवारी संस्कृतमधून सादर होणाऱ्या या कार्यक्रमात जर्मनीतील संस्कृतविषयक घडामोडींची चांगली माहिती मिळत असे. या केंद्राचे हिंदीतील कार्यक्रम दररोज 45 मिनिटे प्रसारित करण्यात येतात, त्यातील 15 मिनिटे संस्कृतच्या वाट्याला येत असत. पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर, जर्मनीचा रोख युरोपच्या एकत्रीकरणाकडे वळला. त्यानुसार या केंद्रावरूनही केवळ जर्मनीऐवजी संपूर्ण युरोपमधील घडामोडींची माहिती देण्यात येऊ लागली. त्यामुळेच जगभरच्या संस्कृतप्रेमींना विविध विद्यापीठांमध्ये चालणारे संशोधन, विविध चर्चासत्रे आदींची माहिती मिळत असे. नव्या व्यापारी प्रसारणाच्या काळात हे कार्यक्रम चालू ठेवणे "डॉइट्शे वेले'ला परवडेनासे झाले आहे. त्यामुळेच या केंद्राने आपले हिंदीतील प्रसारण चालू ठेवले आहे; मात्र संस्कृतमधील कार्यक्रम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. "डॉइट्शे वेले'च्या हिंदी प्रसारणास सुरवात झाली 15 ऑगस्ट 1964 रोजी. त्यानंतर 3 फेब्रुवारी 1966 रोजी या केंद्रावरून संस्कृत कार्यक्रमांचे प्रसारण सुरू झाले. "आकाशवाणी'ची "सिग्निचर ट्यून' बनविणाऱ्या अर्न्स्ट शाफर यांच्या प्रयत्नातून ते साध्य झाले होते. जगात त्या वेळी संस्कृतमधून कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एकही नभोवाणी केंद्र नव्हते. या विषयावर भारतीय संसदेत जोरदार चर्चा झाली. सरकारवर टीका झाली. त्यानंतर "आकाशवाणी'वरून संस्कृतमधून बातम्या सादर करण्यात येऊ लागल्या. "डॉइट्शे वेले'च्या या उपक्रमाचे भारतात भरघोस स्वागत झाले. देशातील 20 हून अधिक वर्तमानपत्रांनी या घटनेचे स्वागत केले. अलाहाबाद येथे झालेल्या जागतिक हिंदू परिषदेत "डॉइट्शे वेले'च्या अभिनंदनाचा खास ठराव संमत करण्यात आला. नंतरच्या काळात भारतात वाढत गेलेल्या "मॅक्स मुल्लर भवन' आणि "गोएथे इन्स्टिट्यूट'चा पाया या केंद्राने घातला. आजही जोमाने चालू असलेल्या या केंद्रांवरील संस्कृत "वाणी' नाहीशी झाल्याने मात्र सुमारे चार दशकांच्या सु"संस्कृत' ऋणानुबंधांची इतिश्री झाली आहे.
No comments:
Post a Comment