Thursday, June 14, 2007

संयुक्त द्विभाषिक अमेरिका?

हा माझा दोन वर्षांपूर्वीचा लेख आहे. त्यावेळी ‘सकाळ’च्या ‘लक्षवेधी’ सदरात तो छापून आला होता. आता त्यात काही सुधारणा करायच्या आहेल. त्या मी करेनच. तोपर्यंत ही सेवा रुजू करून घ्यावी.
अमेरिकन संस्कृतीचा डंका जगभर वाजत असताना व त्यामुळे जगभरातील मूळ भाषांच्या अस्तित्वावर गदा येत असताना, खुद्द अमेरिकेत मात्र द्विभाषिक व्यवस्थेचे पडघम वाजू लागले आहेत. शेजारच्या कॅनडाप्रमाणेच अमेरिकेतही इंग्रजीसह अन्य एका भाषेला व्यवहारभाषा म्हणून मान्यता मिळायची चिन्हे आहेत. ही दुसरी भाषा असणार आहे स्पॅनिश. सध्याच अमेरिकन जनतेला विमानांचे आरक्षण करताना, व्यवसायासाठी दूरध्वनीचा वापर करताना किंवा बॅंकेत व्यवहार करताना अनेक पर्यांयापैकी एका भाषेची निवड करावी लागत आहे. "हिस्पॅनिक लोकांची संख्या वाढण्यापूर्वी आम्हाला अशा गैरसोयीला तोंड द्यावे लागत नव्हते,' अशी तक्रार अमेरिकन जनता करू लागली आहे. दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश भाषक निर्वासित मोठ्या संख्येने अमेरिकेत स्थलांतर करत असतात. त्यांच्यामुळे स्पॅनिश भाषकांची संख्या नजीकच्या काळात इंग्रजी भाषकांच्या संख्येला ओलांडून जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. हा धोका इंग्रजी भाषकांनी एवढ्या गांभीर्याने घेतला आहे, की "यू. एस. इंग्लिश' या नावाची संघटनाच स्थापन करण्यात आली आहे. इंग्रजीला अमेरिकेची राष्ट्रीय भाषा जाहीर करावे, अशी या संघटनेची मागणी आहे. अमेरिकेची एकात्मता टिकविण्यासाठी हे आवश्‍यक आहे, असे या पक्षाच्या लोकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान जॉर्ज डब्लू. बुश यांनी हिस्पॅनिक समूहात प्रचार करताना अनेकदा स्पॅनिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे मुख्य स्पर्धक जॉन केरी यांनीही तोच मार्ग चोखाळला होता. अमेरिकेच्या आजूबाजूला स्पॅनिश भाषक देशांची मोठी संख्या आहे. तिथून सातत्याने निर्वासित येत असल्याने, त्या भाषेला "मरण' नाही, असे भाषातज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेच्या जनगणना खात्याने मार्च महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसारही, 2050 सालापर्यंत देशात हिस्पॅनिक-अमेरिकन वंशाच्या लोकांची संख्या तिपटीने वाढण्याची शक्‍यता आहे. या वंशाच्या लोकांची संख्या सध्या 3 कोटी 60 लाख आहे, ती 10 कोटी 30 लाख होईल. लोकसंख्येत त्यांचा वाटा 24.4 टक्के असेल, असे या खात्याने म्हटले आहे. मूळ अमेरिकनांचा वाटा सध्या 69.4 टक्के आहे, तो 2050 मध्ये 50.1 टक्‍क्‍यांपर्यंत खाली येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील शतकात अमेरिकेत जाण्यासाठी TOFEL प्रमाणेच TOSFL परीक्षा द्यावी लागल्यास नवल नाही.

No comments:

Post a Comment