Monday, August 13, 2007

मासेल्लाह!

२८ फेब्रुवारी २००७ चा दिवस! देशाचा अर्थसंकल्प मांडण्यास आणखी चोवीस तास उरले होते. मी मात्र माझा वेगळाच संकल्प पूर्ण करण्याच्या मागे होतो. आठवड्यातून एकदाच येणाऱ्या मंगल दिनाचा, म्हणजेच साप्ताहिक सुट्टीचा आस्वाद घेत होतो. साधारणतः माणूस, तोही एकटा माणूस सुट्टीच्या दिवशी एकच काम करत असतो-ते म्हणजे आळसाचा आस्वाद घेणे. मनुष्याला जगण्यासाठी करावी लागणारी कामे एका दिवसासाठी का होईना मागे टाकण्यासारखे दुसरे सुख नाही. मीही या सुखाला पारखा होऊ इच्छित नाही. त्यामुळेच अंथरुणावर पडून राहून टीव्ही पाहण्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही काम करणे हे ’अमंगळ’ कृत्य असल्याची माझी ठाम धारणा आहे.

नाही म्हणायला मंगळवारच्या माझ्या या ’शबाथ’ला एकच काम मी नेमाने करतो. ते म्हणजे जीवसृष्टीच्या आद्य प्रणेत्यांना आपल्या पोटात जागा करून देतो. पुण्यनगरीतील अनेक हॉटेल मला या पुण्याच्या कामात हातभार लावायला उभी आहेत. मात्र माशांवरचे माझे प्रेम आणि या हॉटेल्सची दानत यांचे प्रमाण जुळत नसल्याने अनेकदा माझी हालत ’बील भरा, लेकिन पेट नही भरा,’ अशी होते. माशांच्या नादापायी कित्येकदा पैसे पाण्यात (आणि रश्श्यातही) घातल्यानंतर मी हात आवरता घ्यायला शिकलो. परंतु जीभ आवरणे अद्यापही मला जमलेले नाही. याच मत्स्यप्रेमातून मी घरात अग्निदिव्य करायच्या टोकापर्यंत आलो.

घरात गॅस स्टोव्ह आणि अन्य सामान असल्याने स्वतःला पाकसिद्धी आल्याची मनोमन खात्री तर होतीच. दुकानात गेल्यावर दिसणारी ’परंपरा’ची फिश करीची पाकिटे खुणावू लागली होती. हक्का नूडल्स करण्याचा मोठा सराव असल्याने तर रेडिमेड रेसिपिज हे माझे हक्काचे तंत्र झालेले. असे सर्व दुवे जुळून आल्यानंतर मी पाय मागे घेण्यात अर्थ नव्हता. ग्राहक पेठेतून आणलेले पाकिट रोज मला खुणावत होते. अन तो मंगळवार उजाडला. मी माझा अनेक दिवसांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरसावलो. सकाळपासून दोन चित्रपट पाहून झाले होते. सायंकाळ हळू हळू दाटून आली. रात्रीच्या बेताची पूर्वतयारी म्हणून दहा-बारा पोळ्या करून ठेवल्या. आता फक्त समोरच्या दुकानातून मासे आणायचे आणि पाकिटावरील सूचनांनुसार ’करी’ तयार करायची, एवढेच काम बाकी होते. ’मासेमैदान’ जवळच होते.

मग काय! माशांच्या दुकानात गेलो आणि आयुष्यात पहिल्यांदाच मासेखरेदी केली. सुरमई खाणार त्याला आणखी खावे वाटणार, हे मनात पक्कं असल्याने परवडत नसतानाही सुरमईची खरेदी केली. ७४ रुपयांमध्ये केवळ ३०० ग्रॅम सुरमई मिळणार, हे ऎकून मन थोडेसे खट्टूच झाले. तरीही मिळतील ते तीन तुकडे घेऊन घरी आलो. मासे धुण्यात काही वेळ गेला. तेवढ्या वेळात थोडासा टीव्ही पाहून झाला. त्यानंतर गॅसवर पातेले ठेवून त्यात पाकिट मोकळे केले. पातेल्यातील पाण्याला उकळी यायला वेळ लागला नाही, अन माझ्याही मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. भांडयात दिसणारे माशांचे तीन तुकडे गॅसवरील पातेल्यात टाकले आणि ते तुकडे हलविण्यासाठी चमचा शोधू लागलो...चमचा हातात घेऊन वळलो आणि माझ्या तोंडचे पाणी पळाले. मी टाकलेला एक तुकडा दुप्पट आकाराचा होऊन पाण्यावर तरंगत होता. त्याच्या खाली असलेला तुकडा अगदी होडीसारखा झाला होता. तिसरा तुकडा फुगला नव्हता, मात्र तो फुगला असता तर बरे झाले असते अशी परिस्थिती होती. त्या तुकड्याच्या दोन बाजूंनी दोन उंचवटे स्प्रिंगसारखे वर आले होते.

करायला गेलो एक आणि झाले भलतेच अशी माझी अवस्था झाली. हे तुकडे शिजले तरी ते खावेत की नाहीत, याचा संभ्रम निर्माण झाला. खावे तर हे असे बिभत्स तुकडे खावे लागणार आणि न खावे तर ७४ रुपये आणि तीन तास वाया जाणार...पुन्हा खाण्यासाठी बाहेर कुठेतरी जावे लागनार. स्पिल्बर्गचा ’जॉज’ नेमका आठवला आणि असे थरकाप उडविणारे मासे खाण्यापेक्षा त्यांचा घास होणे अधिक सोपे असे, असा विचार मनाला चाटून गेला.

शेवटी जीव मुठीत धरून ते तुकडे पानात घेतले आणि खायला सुरवात केली. चव चांगली लागत असली, तरी हा पदार्थ खाताना माझी अवस्था ’अप्यन्नपुष्टा प्रतिकूलशब्दौ’ अशी होती. पूर्ण जेवण होईपर्यंत मात्र मी ताटाकडे लक्ष दिले नाही. न जाणो मध्येच तो मासा जीवंत होऊन माझा घास घ्यायचा, अशी भीती वाटतच होती. एखादी गोष्ट खूप चांगली झाली, की ’माशाल्लाह’ म्हणतात, हे माहित होते. मात्र आपली सपशेल फजिती झाली, की त्याला काय म्हणायचं यासाठी मला एक नवा शब्द सापडला...’मासेल्लाह!’

2 comments:

  1. कॉमेंट मिळविण्यासाठी जुनेच पोस्ट परत नव्याने टाकू नये.....

    ReplyDelete
  2. At least for me this is new post. After reading my mind went a few years back & I recalled my own batchelor days. I also enjoyed this life.

    ReplyDelete