सकल कुक्कुरे यदि स्वर्गे जाय, तबे कोन ओ हाडा खाय, अशी बंगाली भाषेत एक म्हण आहे. तिचा अर्थ असा, की सगळेच कुत्रे जर स्वर्गात गेले तर या पृथ्वीवरील हाडकं कोण खाणार? आता आपल्या सर्वच भाषांमध्ये जुन्या म्हणींमध्ये असते, तसे याही म्हणीत काही एक तथ्यांश आहे. खरं तर सध्या भूतदयावादी (का भूतवादी?) मंडळींच्या कृपेने कुत्र्यांचे एवढे लाढ चालू आहेत, की 'हर कुत्ते के दिन दिन होते है' असं म्हणण्याऐवजी 'सिर्फ कुत्तों के दिन होते है,' असं म्हणावसं वाटतं. मात्र आपण या सुदैवी कुत्र्यांना त्यांच्या सुखराज्यात तसेच सोडू आणि याच म्हणीच्या धर्तीवर आणखी काही गोष्टी ताडून पाहता येतील. अगदीच उदाहरण द्यायचे म्हटले तर...
* सगळेच होतकरू तानसेन आपला घसा मोकळा करण्यासाठी टीव्हीच्या पडद्यावर झळकत असतील तर देशभरातील बाथरूमचा उपयोग फक्त स्नान करण्यापुरताच राहणार की
काय?
* शहरात सगळीकडे मॉलच उभे राहणार असतील तर नागरिकांनी राहण्यासाठी काय जाहिरातींच्या होर्डिंग्जच्या खाली जागा भाड्याने घ्यावी की काय?
* बॉलिवूडमधला प्रत्येक उपटसुंभ सुपरस्टार आणि 'किंग' होणार असेल तर सहायक अभिनेते काय फक्त निधन पावलेल्या एखाद्या मोठ्या अभिनेत्याला श्रद्धांजली वाहायला किंवा 'शनिवार की रात अमिताभ के साथ'मध्ये बच्चन चालिसा म्हणण्यापुरतेच उरणार की काय?
* सगळेच क्रिकेटपटू जीवाचे रान करून खेळू लागले, खेळांवर लक्ष केंद्रीत करू लागले आणि खेळात जान आणू लागले, तर विविध जाहिरातींसाठी मॉडेल को-ऑर्डिनेटर्स कोणाच्या तोंडाकडे पाहणार?
* देशातील गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रत्येक राजकीय नेता अणु करारावर बोलू लागला, तर ग्रामीण भागांतील पाण्याचा प्रश्न, शेतकऱयांच्या आत्महत्या किंवा विकास कामे यांचा विचका करण्याचे महत्कार्य कोण करणार?
* सगळेच साहित्यिक संमेलनाध्यक्ष होण्याची धडपड करू लागले, तर 'चिकनच्या ५०१ चविष्ट पाककृती' किंवा 'घरच्या घरी चायनीच करा' असे बेस्टसेलर वाङमय (अन वाङगंमयही!) प्रसविण्याची जबाबदारी कोण घेणार?
* प्रत्येक जाहिरातीत लहान मुलेच जर झळकू लागली, तर पुरुषांनी प्रेक्षणीयतेची भूक काय सास-बहूच्या मालिका पाहून भागवायची काय?
* प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीची शिस्त बाळगण्याचा निश्चय केला, तर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या थोबाडीत मारील अशा कवायती रस्त्यांवर करण्याचा थरार कोण अनुभवणार?
* प्रत्येक महागडी वस्तू हप्त्यांवर अन सुखासुखी मिळू लागली, तर 'सुखवस्तू' घराची व्याख्या बदलण्याची जबाबदारी कोण घेणार?
-----------
असे अनेक प्रश्न आहेत. दिवसेंदिवस अशा प्रश्नांची यादीही वाढत आहे आणि त्यांची उत्तरेही ऑबवियस होत चालली आहेत. फक्त तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारलाच, तर उत्तर देण्याऐवजी एवढंच म्हणा, 'सकल कुक्कुरे यदि स्वर्गे जाय...'
No comments:
Post a Comment