Sunday, October 28, 2007

चिरंजीव मेगास्टार

आंध्र प्रदेशातील कोणत्याही गावातील कोणतेही थिएटर...प्रचंड मोठे पोस्टर्स आणि कट-आऊटस्‌वर एक चेहरा झळकतोय...तो चेहरा पाहून गावातील लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण थिएटरच्या दिशेने निघालेला...टॉकिजची घंटा वाजते आणि दिवे मालवून थिएटरमध्ये अंधार पसरतो...समोरचा पडदा उजळताच काही क्षणांत प्रत्येक प्रेक्षकाला हवा असलेला चेहरा व त्याचे झळकू लागते...थिएटरमध्ये थिएटरचे छत फाटेल एवढ्या मोठ्या आवाजात टाळ्या, शिट्यांचे आवाज...काही दर्दी रसिक खिशातील आहे नाही तेवढी चिल्लर पडद्याच्या दिशेने उधळतात. पुढचे तीन तास या प्रेक्षकांना त्यांची दुःखे विसरायला लावण्यासाठी चिरंजीवीची एंट्री झालेली असते.

सामान्यतः आंध्र प्रदेशात नेहमी दिसणारे हे चित्र. चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हटले की त्यांची लफडी, नखरे अशाच बातम्या (आवडीने) वाचायची आपल्याला सवय असते. तेलुगु सुपरस्टार चिरंजीवी याच्याबद्दल गेल्या आठवड्यात आलेल्या बातम्या याला अपवाद नव्हत्या. त्याच्या मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने माध्यमांनी त्याला मोठी प्रसिद्धी दिली. आपल्याकडच्या लोकांनीही त्याची चविष्टपणे चर्चा केली. कोट्यवधी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेला, मोठ्या मुलीचे थाटामाटात लग्न करून देणारा, निवृत्तीची भाषा बोलणारा आणि आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी चॅरिटी संस्था चालविणारा चिरंजीवी मात्र या संपूर्ण प्रकरणात फुकट बदनाम झाला.

आंध्र प्रदेशात तुम्ही कोणालाही जाऊन विचारा, चिरंजीवी हे नाव काढताच तुम्हाला वेगळी ट्रिटमेंट मिळालीच म्हणून समजा. हैदराबादेत फिरत असताना 1111 या क्रमांकाची मोटार जाताना दिसली तर बेलाशक समजा, की चिरंजीवी चालला आहे. चाहत्यांमध्ये चिरु या नावाने ओळखल्या जाणारा चिरंजीवी हा तेलुगु प्रेक्षकांचा जीव की प्राण. चिरुच्या चित्रपटांसाठी गर्दी झाल्याने काही जणांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. कोनिदेला शिव शंकर वरा प्रसाद हे नाव तुम्हाला ओळखीचं वाटतं का? नाही ना? अहो, या नावाचीच व्यक्ती देश-परदेशांत चिरंजीवी या नावाने ओळखली जाते. पश्‍चिम गोदावरी जिल्ह्यातील मुगल्तुर येथे 22 ऑगस्ट 1955 रोजी चिरंजीवीचा जन्म झाला. वडिल वेंकट राव पोलिस अधिकारी असल्याने ते बदलीच्या गावी असत. त्यामुळे आजी-आजोबांकडे चिरु लहानाचा मोठा झाला. बी. कॉम. ची पदवी घेतल्यानंतर अकाऊंटन्सीचा कोर्स करण्यासाठी तो मद्रासला दाखल झाला. "पुनादिराल्लु' नावाच्या एका सिनेमात काम करण्यासाठी यावेळी त्याला ऑफर आली. त्याने कॉलेजच्या आपल्या प्राचार्यांना आजोबा वारल्याचे खोटेच सांगून सुट्टी घेतली.

या चित्रपटातील पहिल्या दृश्‍यात चिरंजीवीला पाय धुण्याचे काम होते. त्यावेळी त्याने आधीचे दृश्‍य काय होते, अशी विचारणा केली. तेथील दिग्दर्शकांनी त्या दृश्‍याची कल्पना चिरंजीवीला दिली. त्याने मग तेथीलच थोडी धूळ घेऊन पायावर रगडली. त्याची ही कृती सिनेमाटोग्राफर पाहत होता. तो चिरंजीवीकडे आला आणि त्याला म्हणाला, ""एक दिवस तू मोठा स्टार होशील.'' तेथूनच चिरंजीवीच्या मनात अभिनेता होण्याची ठिणगी पडली. याच वेळेस तेथील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये त्याने नाव नोंदविले. यावेळी त्याची एका सिनियरशी घनिष्ठ मैत्री झाली. पुढे चालून चिरुप्रमाणेच त्याचा हा मित्रही दक्षिण भारतातील मोठा सुपरस्टार म्हणून नावा रूपाला आला. तो सुपरस्टार म्हणजे आपला रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड!

चिरंजीवीने 1977 मध्ये "प्रणाम खरीदु' या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. हनुमानाचा भक्त असल्याने त्याने पडद्यावर चिरंजीवी हे नाव घेतले. "मोसगाडू', "47 रोजुलु' आदी चित्रपटांमधून मात्र त्याने खलनायक रंगविले. जितेंद्र, जयाप्रदा यांच्या भूमिका असलेला "कैदी' हा सिनेमा तुम्हाला आठवतो का? हा चित्रपट मुळात "खैदी नं. 786' या चित्रपटाचा रिमेक होता. याच चित्रपटातून मारधाड करणारा ऍक्‍शन हिरो म्हणून चिरंजीवीने स्वतःची ओळख निर्माण केली. आता टीव्ही चॅनल्स आणि सीडीच्या जमान्यात तेलुगु, तमिळसारख्या भाषांतील अनेक चित्रपट हिंदीत डब करून आपल्यापुढे आणले जात आहेत. मात्र 1980 आणि 90 च्या दशकात चिरंजीवीच्या अनेक सिनेमांचे हिंदीत रिमेक झाले. अनिल कपूरचे अनेक सिनेमे चिरंजीवीच्या चित्रपटांचे रिमेक होते. चिरंजीवीच्या "जमाई मजाका'चा "जमाई राजा', "घराना मोगुडु'चा "लाडला', "रौडी एमएलए'चा "लोफर' असे अनेक रिमेक आपण पाहिले. हे सर्वच चित्रपट हिट झाल्याचं तुम्हाला आठवत असेलच.

हाणामारीच्या चित्रपटांबरोबरच चिरुने त्यावेळी ब्रेक डान्सची वेगळीच आवृत्ती पडद्यावर साकारण्यास सुरवात केली. त्यामुळे त्याच्या चाहते तर वाढलेच, शिवाय त्याची अनेकांनी नक्कलही करण्यास सुरवात केली. 1990 मध्ये चिरंजीवीने "प्रतिबंध" चित्रपटातून हिंदीत प्रवेश केला. त्याला प्रचंड यश मिळाले. रामी रेड्डीचा "स्पॉट नाना' सर्वांच्या डोळ्यांत भरला तेवढाच चिरुचा जिगरबाज पोलिस इन्स्पेक्‍टर प्रेक्षकांना आवडला. या चित्रपटाच्या यशानंतर लगोलग "आज का गुंडाराज' आला. चिरंजीवीचा "हिटलर' (1995) हा सिनेमा आला आणि तेलुगु चित्रपटांमध्ये त्याला मेगास्टार या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर आंध्र प्रदेशात त्याचे स्थान इतर कोणाहीपेक्षा मोठे झाले. यानंतर चिरुच्या यशस्वी चित्रपटांची लाटच तेलुगुत आली आणि एकापाठोपाठ त्याचे चित्रपट तिकिटबारीवर गल्ला करू लागले.

खरं तर तेलुगु चित्रपटसृष्टीला "टॉलिवूड'ची स्वतःची ओळख देण्याचे काम चिरंजीवीने केले होते. त्याच्या पूर्वी एन. टी. रामाराव आणि अक्किनेनी राघवेंद्र राव हे तेलुगु चित्रपटांचे मोठे स्टार होते. मात्र चिरंजीवीला सुपरस्टारपदाचे एकछत्री राज्य लाभले. तेलुगु भाषेत चिरुनामा म्हणजे पत्ता. चिरंजीवीच्या चिरु नावातही टॉलिवूडचा पत्ता लपला आहे. रजनीकांत याच्या प्रमाणेच तोही अध्यात्मात रमणारा माणूस आहे. सुमारे तीस वर्षे चित्रपटसृष्टीत काढूनही कोणत्याही वादात न सापडलेला चिरु लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसला. लोक त्याला "अन्नया' (मोठा भाऊ) या नावाने ओळखू लागले. त्याच्या या लोकप्रियतेवर गेल्या वर्षी पद्मभूषण किताब देऊन भारत सरकारने शिक्कामोर्तब केले. अथेन्स येथे 2004 साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान "कोका कोला' कंपनीने चिरंजीवीला खास पाहुणा म्हणून आमंत्रित केले होते.

स्वतःबाबत चिरंजीवी म्हणतो, ""मी मदर तेरेसा बनण्यासाठी किंवा लोकांनी मला आध्यात्मिक म्हणावं, यासाठी काही करत नाही. मला वाटतं म्हणून मी ते करतो. लाखो लोकांचे प्रेम मिळाल्यानंतर, एवढे मोठे स्थान प्राप्त केल्यानंतर एखाद्याच्या आयुष्याला काहीतरी मोठा उद्देश असायलाच पाहिजे.''

चिरंजीवी जेवढा चित्रपटांसाठी ओळखला जातो त्याहून जास्त आंध्र प्रदेशात सामाजिक कार्याबद्दल त्याची ओळख आहे. नऊ वर्षांपूर्वी त्याने "चिंरजीवी चॅरिटेबल ट्रस्ट'ची स्थापना केली. ब्लड बॅंक (रक्तपेढी )आणि आय बॅंक (नेत्रपेढी) चालविण्याचे काम हा ट्रस्ट करतो. आंध्र प्रदेशात या रक्तपेढीने आतापर्यंत 96 हजार लोकांना मदत केली आहे आणि नेत्रपेढीने एक हजार लोकांना मदत केली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हैदराबादमध्ये "चिरंजीवी चॅरिटेबल फाउंडेशन'चे उद्‌घाटन करण्यासाठी तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. कलाम आले होते.

No comments:

Post a Comment