Tuesday, October 9, 2007

कण्णगीचे सौभाग्य अन करुणानिधींचे दुर्भाग्य! !

गेला सुमारे महिनाभर झाला तमिळनाडू आणि खासकरून त्या राज्याचे मुख्यमंत्री मुथ्थुवेल करुणानिधी चर्चेत आहेत. अर्थात ही चर्चा त्यांना किंवा अन्य कोणालाही फारशी भूषणावह ठरावी, अशी नाही. मात्र करुणानिधी यांचा वैचारिक आणि राजकीय प्रवास ज्यांना माहित आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट फारशी नवी नाही. इंग्रजी माध्यमांतील खबरांवर पोसलेल्या आणि तमिळ वगळता अन्य माध्यमांनीही यात करुणानिधी यांच्याबद्दल वेगळवेगळ्या बातम्या देण्यात कसूर ठेवली नाही. मात्र देवाच्या नावाने बोटे मोडणारे करुणानिधी स्वतः अंधश्रद्धाळू असून, आपली पिवळी शाल घेतल्याशिवाय घराबाहेरही पडत नाहीत, अशी एखादी माहिती कोणी दिली असेल तर शप्पथ! मात्र कशी देणार? त्यासाठी तेथील माहिती असायला हवी ना?


असो. मात्र करुणानिधींच्या या बडबडीमुळे त्यांचे काही चांगले कामही दुर्लक्षिले जातात. या संपूर्ण काळात मला आठवत होते सुमारे वर्षभरापूर्वी तमिळनाडूत सत्तांतरानंतर घडलेले एक सांस्कृतिक नाटक. एखाद्या देशात, राज्यात आपल्या आवडत्या अथवा कर्तृत्ववान व्यक्तीचा गौरव करणे ही सामान्य बाब आहे. ही व्यक्ती कोणती असावी, याचेही निकष सामान्यतः ठरलेले आहेत. राजकीय नेत्यांचे पुतळे सत्तांतरानंतर रस्त्यावरील धुळीत मिळाल्याची चित्रेही दिसतात. मात्र एखाद्या साहित्यकृतीतील पात्राचा पुतळा एखाद्या शहराने मानाने उभारावा, त्याला अस्मितेचे प्रतिक बनवावे आणि हा पुतळा हलविल्यानंतर त्याच्या पुनर्स्थापनेसाठी सत्तांतराचा कौल द्यावा, ही जगाच्या इतिहासात क्वचितच घडणारी घटना. ती घडली तमिळनाडूत. कण्णगीच्या पुतळ्याच्या निमित्ताने!
जैन आचार्य व कवी इलंगो अटिगळ याने लिहिलेल्या "सिलप्पदीकारम्‌' या महाकाव्याची कण्णगी ही नायिका. तमिळ साहित्यात गेली सुमारे हजार एक वर्षे हे महाकाव्य अभिजात कृती म्हणून मान्य पावले आहे. त्यातील कण्णगीला स्त्रीशक्तीची प्रतिनिधी, देवी, न्याय मागणाऱ्यांची एक प्रतिमा असे स्थान आहे. तिच्या याच रुपातील एक पुतळा तमिळनाडू सरकारने तयार करवून, चेन्नईतील "मरीना बीच'वर स्थापित केला. सुमारे चार दशके मानाने उभा असलेला हा पुतळा पाच वर्षांपूर्वी जयललिता यांच्या सरकारने रातोरात हलविला. अन्‌ त्यानंतर तिच्या पुनर्स्थापनेसाठी सुरू झालेल्या मागण्यांची परिणती गेल्या वर्षी करुणानिधी सरकारने हा पुतळा पुन्हा "मरीना'वर बसविण्यात झाली. एका राजकीय लढ्याचा विषय ठरलेली कोण ही कण्णगी आणि तिचे स्थान काय?


या प्रश्‍नांच्या उत्तरासाठी आपल्याला "सिलप्पदीकारम'चा कथाभाग लक्षात घ्यावा लागेल. कण्णगी, तिचा पती कोवलन आणि त्याची प्रेयसी माधवी ही यातील मुख्य पात्रे. कण्णगी व तिचा पती ही दोघेही संपन्न व्यापाऱ्यांची मुले. कावेरीपूम्पट्टीनम या गावात त्यांचा सुखाचा संसार चालू असतो. अशातच कोवलनची गाठ माधवी या नृत्यांगनेशी पडते व तो तिच्या प्रेमात वाहवत जातो. त्यात सर्व संपत्ती गमावल्यावर दरिद्र कोवलनचा माधवी उपहास करते, अन्‌ पश्‍चात्तापदग्ध कोवलन कन्नगीकडे परततो. त्यानंतर दोघेही शहर सोडण्याचा निर्णय घेऊन, मदुराईच्या दिशेने निघतात. या वेळी त्यांच्याकडे असते फक्त कण्णगीची रत्नांनी भरलेली तोडयांची जोडी! कोवलन व कण्णगी मदुराईत येतात. त्या वेळी तिथे पांड्य राजा नेडुनचेळियन याचे राज्य असते. तेथे पैशांची जमवाजमव करण्यासाठी कण्णगीचे एक तोडे बाजारात विकण्यासाठी कोवलन घेऊन जातो. त्याच वेळेस राणीच्या तोड्याची चोरी केल्याचा आरोप ठेवून त्याला पहारेकरी अटक करतात. तडकाफडकी सुनावणी करून राजा चोरी केल्याबद्दल कोवलनचा शिरच्छेद करण्याची आज्ञा देतो. त्याची लगेच अंमलबजावणीही होते.


हे ऐकून कण्णगी दरबारात धाव घेते. राजाला जाब विचारते. राणीच्या तोड्यात मोती भरलेले असताना, स्वतःचे तोडे मोडून त्यात भरलेली रत्ने दाखवते. राजाशी वादविवाद करून न्यायनिवाड्यात त्याची चूक झाल्याचे सिद्ध करते. हे ऐकताच अन्यायाची जाणीव होऊन राजा व राणी प्राणत्याग करतात. तरीही कण्णगीचे समाधान होत नाही. ती मदुराई शहराला शाप देते अन्‌ तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने शहर जळून खाक होते. यानंतर शहराच्या ग्रामदेवतेच्या कृपेने तिला मोक्ष मिळतो, अशी या महाकाव्याची कथा आहे. स्त्रीचे पावित्र्य, निष्ठा यांसाठी दक्षिण भारतात कण्णगी प्रसिद्ध आहे. मोक्ष मिळविण्यापूर्वी ती पोलची पर्वतांकडे गेली होती. या भागांतील आदिवासी देवीस्वरूपात "कण्णगी अम्मन'ची पूजा करतात. येथील "मुदुवन' आदिवासी स्वतःला कन्नगीसोबत आलेल्यांचे वंशज मानतात. श्रीलंकेतही तिची पूजा होते. तेथे सिंहली बौद्ध लोक "पतिनी' या नावाने; तर तमिळ हिंदू "कण्णगी अम्मन' नावाने तिची पूजा करतात.


एका हातात तोडा घेऊन, दुसऱ्या हाताचे बोट राजाकडे करणाऱ्या कण्णगीचा पुतळा चेन्नईकर अभिमानाने मिरवित. त्यांच्यासाठी तो तमिळ अस्मितेचे प्रतिक होता. द्रमुक पक्ष पहिल्यांदा सत्तेवर आला, तेव्हा दुसरी जागतिक तमिळ परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी जानेवारी 1968 मध्ये हा पुतळा उभारण्यात आला. सी. अन्नादुराई हे मुख्यमंत्री व करुणानिधी तेव्हा सार्वजिक बांधकाम मंत्री होते. कवि, लेखक, पटकथा लेखक व समीक्षक असलेल्या करुणानिधी यांना "कलैञर' (कलामर्मज्ञ) असे म्हटले जाते. "सिलप्पदिकारम'मधील अनेक वचने ते भाषणांत वापरतात आणि या महाकाव्यावर आधारित "पुम्पुहार' या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती. त्यांच्याच पुढाकाराने हा पुतळा "मरीना'वर बसविण्यात आला.


डिसेंबर 2001च्या एका मध्यरात्री जयललिता यांच्या आदेशावरून हा पुतळा हलविण्यात आला. एगमोरमधील एका संग्रहालयात त्याला हलविण्यात आले. त्याचे निश्‍चित कारण अद्याप माहित नाही. ती जागा सपाट करून त्यावर रस्ता तयार करण्यात आला. "वास्तुशास्त्रा'च्या दृष्टीने तो अशुभ असल्याचे ज्योतिषाने सांगितल्याने जयललितांनी हा आदेश दिल्याचे सांगण्यात येते. यावर मोठा गदारोळ झाला. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत रंगीत टीव्ही, दोन रुपये किलो तांदूळ अशा मुद्यांबरोबरच कण्णगीची पुनर्स्थापना करण्याचेही आश्‍वासन करुणानिधी यांनी दिले. तेरा मे रोजी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर तीन जून रोजी त्यांनी या पुतळ्याची खरोखरच पुनर्स्थापना केली. करुणानिधी यांच्या या निर्णयाचे राजकीय नेत्यांबरोबरच कवी, विद्वान आणि साहित्यिकांनी स्वागत केले. त्यावेळी पेनसिल्व्हानिया विद्यापीठाचे प्राध्यापक एरिक मिलर यांनी 'हिंदू'मध्ये लेख लिहून या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणतात,"" संपत्ती नसतानाही अथवा कुटुंबीयांचे पाठबळ नसतानाही एखादी स्त्री न्याय मागू शकते, तो मिळवू शकते हे कण्णगी दर्शविते. ती खरोखरच न्याय मागणाऱ्या सामान्यांची प्रतिनिधी आहे.'' न्यायदानातील चुकीमुळे पतीचा जीव गेल्यामुळे आकांत करणारी कण्णगी "मरीना बीच'वरून विनाकारण हलविल्यानंतर काही करू शकली नाही. एरवी कित्येक क्षुल्लक पुतळ्यांवरून राजकारण होणाऱ्या समाजात कुठल्याशा काव्यातील एका पात्राच्या पुतळ्यासाठी कोण दाद मागणार? मात्र तमिळ साहित्य जगत आणि करुणानिधी यांच्यासारख्या कलाप्रेमी राजकारण्यामुळे पाच वर्षांनंतर तिला तिचे स्थान परत मिळाले. हे कण्णगीचे सौभाग्यच! मात्र त्याच करुणानिधी यांना वावादुक विधाने करून स्वतःची प्रतिमा काळवंडून घेण्याची दुर्बुद्धी सुचावी हे त्यांचे दुर्दैव!

---------------


No comments:

Post a Comment