Thursday, January 20, 2011

महाबळेश्वरचे गौडबंगाल-१

mahabaleshwar         वाई सोडून गाडी महाबळेश्वरच्या दिशेने पुढे जात होती तशी मला प्रचंड उत्सुकता लागली होती. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळाला पहिल्यांदा भेट देताना बहुतेक सर्वांना अशीच उत्सुकता वाटत असावी, असा माझा होरा आहे. पांचगणी येता येता मात्र ती उत्सुकता कुठल्या कुठे पळून गेली होती. पांचगणीच्या अलीकडे एक किलोमीटर पासूनच धंदा आणि लूटमार यांचे अफलातून मिश्रण वारंवार आढळत जातं. या लुटमारीला कितीही शिताफीने चुकविले, तरी कोणीकडून आपण इथे आलो, असा प्रश्न मनाशी पडला होता. त्याचवेळेस लोकं मुकाट अशा गैरप्रकारांपुढे मान तुकवितात याचं बिलकुल आश्चर्य वाटलं नाही. महाबळेश्वरच्या पहिल्या दोन भेटींत निर्माण झालेली ही प्रतिमा.

      वर्ष २०११ सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरवड्यात दोनदा या गिरीस्थानाची भेट घेतली. १८३०, म्हणजे मराठ्यांकडून हिंदुस्थान घेतल्यानंतर १२ वर्षांच्या आत, ब्रिटीश अधिकाऱ्यांनी महाबळेश्वरचा शोध लावला, असं सांगितलं जातं. तसं पाहिलं तर हे स्थान लोकांना अज्ञात होते, यावर माझा विश्वास नाही. वास्तविक बारा ज्योतिर्लिंगांतील एक असल्याने आणि प्रतापगडाशी अगदीच सलगी राखून असल्याने महाबळेश्वरला त्यापूर्वी लोक जातच असत. महाराष्ट्रात थंड हवेच्या जागा काय कमी आहेत? प्रतापगड, पन्हाळा किंवा अन्य ठिकाणीही थोड्याफार फरकाने अशीच स्थिती आहे. मात्र त्या स्थळांशी मराठ्यांचा इतिहास उज्ज्वल जोडलेला आहे. त्याची आठवण लोकांपुढे सतत राहील व आपल्या सत्तेला धोका निर्माण होईल, ही ब्रिटीशांना काळजी होती. यासाठी इतिहासाचा छाप नसलेल्या जागा ब्रिटीशांना हव्या होत्या. महाबळेश्वर किंवा माथेरान यांसारख्या जागांनी ती पूर्ण केली.

     महाबळेश्वरला कुठलाही किल्ला किंवा ऐतिहासिक स्थळ नव्हते. पुरातन मंदिर होते ते आधीच मोडकळीला आलेले आणि दूर होते. फुकटाच्या कमाईवर जगणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ऐष-आरामासाठी याहून अधिक चांगली जागा मिळणे अवघड होते. त्यानंतरच्या १७० वर्षांत चैन, मौजमजा आणि चंगळ याचे पर्याय म्हणून महाबळेश्वर पुढे आले. ब्रिटीश असेपर्यंत त्यांचा वचक होता. त्यानंतर काळ्या साहेबांच्या काळात 'एकमेकां साह्य करू, अवघे लुटू पर्यटक'चे खेळ सुरू झाले.

     जानेवारीच्या सुरवातीला पुणे आणि नाशिकमध्ये पारा तीन-चार अंश सेल्सियसवर घुटमळत असताना महाराष्ट्रातील काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वर १० अंश सेल्सियसच्या खाली यायला तयार नव्हते. त्याचवेळेस वेण्णा तलाव किंवा अशाच कुठल्या जागी बर्फाचे थर साचल्याच्या बातम्या आणि छायाचित्रे दरवर्षीचा नेम पाळून यायला सुरूवात झाली. यामागचे गौडबंगाल आहे तरी काय, याचा अदमास घ्यावा म्हणून आम्ही तेथे गेलो होतो. तिथे जे काही पाहिलं, त्यावरून रहस्यामागचा पडदा संपूर्ण उठला नाही तरी थोडीफार चुणूक पाहायला मिळाली.

     पाचगणी आणि महाबळेश्वर दोन्ही जागी प्रवेश करताना पर्यटकांना प्रति माणशी ५० रुपयांचा प्रदूषण कर द्यावा लागतो. १९८० मध्ये इंदिरा गांधींच्या कृपेने हा भाग पर्यावरण संवेदनशील क्षेत्र जाहीर झाल्याने हा कर. पूर्वीच्या काळी पाप केलं म्हणून भट मंडळी काहीतरी प्रायश्चित सांगायचे आणि यजमान त्याप्रमाणे करून आपला अपराधभाव कमी करायचे, त्याचा हा आधुनिक अवतार. प्रदूषण कर भरून उजाड होणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगांवर कोणते उपकार होणार आहेत, हे कर घेणारे आणि भरणारेच जाणोत.

    गेली अनेक वर्षे लाखो लोकांनी इमाने इतबारे हा कर भरूनही महाबळेश्वरच्या पर्यावरणात खूप सुधारणा झाली आहे, असं दिसून येत नाही. तो कमी म्हणून की काय, प्रत्येक पॉईंटवर प्रवेश करताना पर्यटकांना वेगळे शुल्क द्यावे लागते. शिवाय पार्किंग शुल्क (रु ३०) वेगळे. आता पार्किंगची जागा म्हणाल तर चोहोबाजूंनी झाडांनी वेढलेला धुळीचा एखादा ढिगाराही तुम्हाला पार्किग प्लेस म्हणून दाखविल्या जाऊ शकतो.

3 comments:

  1. जगात निरपेक्ष प्रेम करणारे काय कमी असतात का? प्रत्येक नवरा आपल्या बायकोवर प्रेम करतोच .त्याच प्रमाणे भारतात भव्य प्राचीन इमारती, मंदिरे काय कमी आहेत. तरीपण शहाजहान सारखा जनानखाना बाळगणारा, बांधकाम करणाऱ्याचे हात तोडणारा , बायको मेल्यावर तिच्या बहिणीशी निक्काह लावणाऱ्या राजा चे उदात्तीकरण करत मुमताज च्या प्रेमा खातर ताज महाल बांधला म्हणून ज्या प्रमाणे ताजमहाल चे बाजारीकरण करून खोटा इतिहास सांगत पर्यटकांना लुटले जाते , तसेच महाबळेश्वर सारख्या गावांचे झाले आहे. महाराष्ट्रात बरीच थंड हवेची ठिकाणे आहेत पण त्याकडे बाजारमूल्य नाही.जसे शिर्डीचे बाजार मूल्य आहे तसे सामान्य वारकऱ्यांच्या पंढरपुरचे नाही. बाबूजी तुम क्या क्या खरीदोगे यहां तो हर चीज बिकती है.

    ReplyDelete
  2. खरं आहे ठणठणपाळजी. इतरांकडे बाजारमूल्य नाही हेच खरे. शिर्डी आणि पंढरपूरच्या तुलनेबाबत एकदम सहमत.

    ReplyDelete
  3. ek velachya pravasasathi 90 Rs. toll dila jato pan 7 divsansathi 50 rs kar bharatana evdha khalkhalat ka?
    Punyatil ekhadya restaurantpeksha kami rates asleli kititari chanli restaurants mahabaleshwarmadhe ahet.
    tevha pravashanchi lutmaar hote vagaire he dhadant khote ahe...

    ReplyDelete