तसे पोट भरायचे झाले तर पंजाबमध्ये खरे तर एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही. कुठल्याही गुरुद्वाऱ्यात जावे आणि लंगर साहिबमध्ये बसून मनसोक्त आहार घ्यावा. काही गुरुद्वाऱ्यांमध्ये विवक्षित वेळी लंगर चालतो तर काही ठिकाणी चोवीस तास चालतो. शीख पंथामध्ये लंगर (सामुहिक स्वयंपाकघर आणि अन्नदान) याचे मोठे महत्त्व आहे. शिखांचे पाचवे गुरु अर्जुनदास यांची अटच होती, की 'पहले पंगत फिर संगत'. म्हणजे पाहुण्याने आधी जेवायचे आणि मगच त्यांची भेट घ्यायची. एकदा अकबर बादशहा त्यांची भेट घेण्यास गेला असता त्यालाही ही अट सांगण्यात आली. त्यावेळी मुकाट्याने बादशहालाही सामान्य लोकांसोबत पंगतीत बसावे लागले आणि लंगर घ्यावा लागला.
डोक्यावर रुमाल पांघरायचा, कुठलीही लाज न बाळगता पंगतीत बसावे आणि प्रशादा म्हणून मिळणारी रोटी हातावर झेलावी. ही एवढी तयारी असेल तर मक्के दी रोटी, एखादी भाजी, दाल, चावल आणि पेलाभर चहा मिळून जातो. जात, धर्म किंवा लिंग असा कुठलाही भेदभाव यात असत नाही. हरमंदिर साहिबमध्ये दोनदा गेलो असताना दोन्ही वेळेस मी तेथील लंगर साहिबमध्ये जेवलो. अर्थात पैसे वाचविणे किंवा पोट भरणे हा हेतू नव्हता. कारण वर म्हटल्याप्रमाणे हॉटेलमध्ये कुलचा खाल्ल्यानंतरही मी लंगरमध्ये गेलो होतो. मी गेलो कारण ती सवय आहे. घुमानच्या गुरुद्वारातही लंगर साहिब आहे आणि तेथे मी गेलो होतो. तिथे सुधीर गाडगीळ म्हणाले, "मला भूक लागलीय.”
मी म्हणालो, "चला लंगरमध्ये" आणि त्यांना तेथील लंगरच्या जेवणाचा अनुभव दिला.
नांदेडला चोवीस तास चालणारा एक गुरुद्वारा आहे आणि मुख्य गुरुद्वाऱ्यात, सचखंड साहिबमध्ये, रात्री लंगर लागतो. कधीकाळी मी तेथे जेवलोही आहे आणि सेवाही केली आहे. तशी ती शीख पंथियांमधील बहुतेक मंडळी करत असतात. ही सेवा करणारे लोक कुठले आलतू-फालतू नसून चांगले अनिवासी भारतीय, मोठे व्यावसायिक आणि कर्ती-सवरते लोक असतात. बाहेर कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारी व्यक्ती येथे आपले जोडे सांभाळायला असते. त्यामुळे हरमंदिर साहिबचा लंगर पाहण्याची, तेथील अनुभव घेण्याची मला खूप इच्छा होती.
मात्र हरमंदिर साहिबमध्ये मी जो लंगर पाहिला, तो छाती दडपून टाकणारा होता. एका वेळी किमान एक हजार लोकांची पंगत येथे बसते आणि त्याच वेळेस किमान शे-दोनशे लोक सेवेत गर्क असतात. चोहोकडे भांड्यांचा, ताट-वाट्यांचा खणखणाट चालू असतो. सुवर्ण मंदिरातील लंगर साहिब दोन मजली असून त्याच्या विस्ताराचे काम चालू आहे. एकीकडे चहाची जागा होती. म्हणजे आपल्याकडे जशी पाणपोई असते तशी चहापोई होती. तिकडे जातानाच एक सरदारजी आपल्या हातात वाडगा देणार आणि पुढे फिल्टरच्या टाकीतून आपण तोटीद्वारे पाणी घेतो, तसा तोटीद्वारे चहा मिळणार. त्यासाठी दोन सेवेकरी बसलेलेच असतात. तिकडे न जाता आपण सरळ पायऱ्या चढून वर गेलो, की लंगर साहिबचे मुख्य दालन लागते. लंगर 'छकणाऱ्या'(सेवन करणाऱ्या) लोकांच्या शेकड्यांनी ओळी बसलेल्या असतात. पद्धत अशी, की भारतीय बैठकीत पाठीला पाठ लावून लोकांनी बसायचे. वाढकरी एकामागोमाग रोटी, दाल, भात इ. पदार्थ घेऊन फिरतात. मी गेलो तेव्हा एकदा शेवयांची खीर आणि एकदा भाताची खीर होती. आता या पदार्थांचे वाटप पंगतीत करायचे म्हणून त्यांच्या दर्जात कोणतीही तडजोड नसते. अख्ख्या मसुराच्या दालीत तुपाचा ओशटपणा आढळणार म्हणजे आढळणार. भात बासमती तांदळाचाच असणार आणि त्यातही तुपाची झाक असणार म्हणजे असणार. तेव्हा असे जेवण जेवल्यानंतर कोणत्या व्यक्तीला आणखी काही खाण्याची इच्छा होणार? गंमत म्हणजे इतके सारे मोफत उपलब्ध असूनही पंजाबमध्ये हॉटेल अगदी भरभरून चालतात.
हरमंदिर साहिबची आणखी एक खासियत येथील प्राकारात तुम्हाला छायाचित्र काढण्यापासून कोणीही रोखत नाही. हवी तेवढी छायाचित्रे काढा. मी तर हरमंदिर साहिबच्या अगदी गाभाऱ्यात प्रवेश करेपर्यंत मोबाईलमध्ये छायाचित्रे काढत होतो. फक्त गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारापासून सेवेकरी छायाचित्रांना मनाई करत होते. आणखी विशेष बाब म्हणजे हरमंदिर साहिबच्या अगदी घुमटापर्यंत जाण्यास प्रत्येकाला मुभा आहे. तेथून आजूबाजूचे दिसणारे दृश्य मनोहर खरे. चारी बाजूला संगमरवराच्या भिंती ढगांशी स्पर्धा करत असतात आणि पांढरे शुभ्र घुमट निळ्या आकाशात घुसखोरी केल्यासारखे दिसतात. चारीकडच्या भिंतींमध्ये दिसणाऱ्या कमानींमधून बसलेले भाविक छायाचित्रकारांसाठी एक पर्वणीच भासतात. कोणी गुरु ग्रंथसाहिबचे पारायणे करतोय, कोणी डोळे मिटून ध्यान करतोय, एखादी स्त्री सोन्याच्या घुमटाकडे तोंड करून हात जोडून आणि डोळे मिटून प्रार्थना करतेय, अशा कमानींच्या पार्श्वभूमीवरच्या प्रतिमा चित्रमय वाटणार नाहीत तर काय? बरं, याच्या जोडीला शुद्ध शास्त्रीय रागांमध्ये बसविलेल्या आणि मंजुळ व सौम्य आवाजात चालणाऱ्या शबद किर्तनांचे पार्श्वसंगीत. या धवल चौकटीच्या बाहेरही काही जग आहे आणि तिथेही काही घडामोडी होतात, याचे विस्मरण ज्याला होत नाही त्याला जगातील सौंदर्य पाहण्याची दृष्टीच नाही, हे छातीठोकपणे सांगता येते.
पोट भरायची चिता नाही . बरोबर नादेड हून अमृतसर ला जाणाऱ्या येणारया सचखंड गाडीत तर नांदेड स्टेशन पासूनच लंगर देण्यास सुरवात होते . नंतर औरंगाबाद , मनमाड , रात्री खंडवा , नवी दिल्ही या स्टेशनवर तेथील गुरुद्वारा तर्फे आग्रहाने , प्रेमाने गाडीतील सर्व प्रवाशांना लंगर दिले जाते . या लंगर मुळे या गाडीचा व्यवसायीकांचा धंदा बंद झाला .
ReplyDeleteशेतातील गव्हाच्या पहिल्या कापणीचा भाग पंजाब मधील शेतकरी गुरुद्वाराना देतात , जो लाखो पोत्यांच्या घरात जातो . नांदेड ला सुद्धा हजारो पोती गहू पंजाब मधून येतो .
आज पंजाब चा शेतकरी सुद्धा महाराष्ट्रा च्या शेतकऱ्या प्रमाणे संकटात सापडला आहे . पाण्याचा बेसुमार उपसा आणि कीटक नाशक , रासायनिक खते यांच्या वरेमाप वापरा मुळे अडचणीत आला आहे . शेतकऱ्यांना संपूर्ण भारतात कोणीच वाली नाही . हेच खरे .
धन्यवाद, ठणठणपाळ जी
ReplyDeleteआज मी नाशिकमध्ये आहे आणि येथे शीख पंथीयांकडून अन्नदान चालू आहे. यातच त्यांच्या सेवाभावाचे स्वरूप सिद्ध होते.
शेतकऱ्यांच्या बाबत सहमत.