Saturday, July 4, 2015

घुमानच्या निमित्ताने-8 जालियांवाला बाग का खेलियांवाला बाग?

अशा रितीने हरमंदिर साहेबला पहिली भेट दिल्यानंतर बाहेर पडलो  आणि चार पावले पुढे जात नाही तोच जालियांवाला बाग लागली. म्हणजे तशी हरमंदिर साहिबकडे येताना ही जागा दिसतेच; परंतु दर्शन झाल्यानंतर तिथे जाऊन भेट दिली. जालियांवाला बाग हत्याकांड हे भारतीय इतिहासातील एक दुर्दैवी पान. १३ एप्रिल १९१९ रोजी जनरल डायर याच्या आदेशावरून ब्रिटीश सैनिकांनी येथेच हजारो भारतीय लोकांची हत्या केली. लहानपणापासून इतिहासाच्या पुस्तकात वाचलेली ही हकिगत, 'गांधी' चित्रपटात अंगावर काटे येतील अशा पद्धतीने चित्रित केलेली ही घटना जालियांवाला हत्याकांडाच्या स्मारकात प्रवेश करताना सर्रकन डोळ्यासमोरून गेली.

जालियांवाला बाग हे नाव थोडेसे दिशाभूल करणारे आहे. म्हणजे गोष्ट अशी, की इथे बाग वगैरे काही नव्हते. जल्ले ही पंजाबमधील जातीच्या उतरंडीत खालच्या थरावर मानलेल्या जातींपैकी एक जात. या जातीतील अनेकांच्या नावावर असलेल्या जमिनीच्या तुकड्यांचे मैदान म्हणजे ही जागा. म्हणून तिला जालियांवाला असे नाव. एकेकाळी येथे केरकचरा आणि गवताचे साम्राज्य होते. नंतर ती जागा साफसूफ करण्यात आली. सुवर्ण मंदिराला जवळ असल्यामुळे बहुतेक राजकीय सभा येथे भरत असत. रौलेट कायद्याच्या दडपशाहीच्या विरोधात भरलेली सभा ही त्यापैकीच एक.

चारी बाजूंनी इमारती आणि आत जाण्यासाठी केवळ एक अरुंद गल्ली, अशी तिची स्थिती. आजही या स्मारकात जाण्यासाठी हीच एक गल्ली वापरण्यात येते. तेथून जाताना लावलेल्या पाटीवरची अक्षरे वाचताना त्या कोंडलेल्या निष्पाप माणसांचे आक्रोश आणि आकांत आपल्या कानावर आदळू लागतोआता या जागी व्यवस्थित उद्यान विकसित केले आहे. उद्यानाच्या एका कोपऱ्यात अखंड तेवणारी ज्योत असून तिला अमर ज्योति असे नाव आहे. एका ठिकाणी छोट्याशा मंदिरासारखी एक वास्तू आहे. एका कोपऱ्यात एक विहीर असून तिला शहीदी विहीर असे नाव आहे. सोजिरांच्या गोळीबारापासून वाचण्यासाठी सैरावरा धावणाऱ्या अनेक सत्याग्रहींनी याच विहीरीत उड्या मारून आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या विहीरीची खोली फारशी नाही मात्र त्याच्या इतिहासाची भीषणता रौद्र आहे. ही विहीर नसून साक्षात काळाचा जबडा आहे, असे आपल्याला वाटू लागते. येथेच एका दालनात जालियांवालाशी संबंधित एक प्रदर्शन लावले असून तिथे या घटनेतील शहीद, पत्रव्यवहार, घटनाक्रम अशी माहिती मांडली आहे.

मात्र या सर्वांत सर्वार्थाने मनाला विद्ध करणारी कोणती निशानी असेल तर ती म्हणजे येथील भिंतीवर पडलेल्या बंदुकीच्या गोळ्यांचे ठसे. या हत्याकांडात बंदुकीच्या … फैरी झाडल्या गेल्या त्यातील ३८ गोळ्यांच्या निशाण्या येथील लाल विटांच्या भिंती अद्याप अंगावर बाळगत आहेत. प्रत्येक निशाणीभोवती पांढरी चौकट आखली असून त्यातून गोळ्या लागल्यानंतर निर्माण झालेल्या खाचा दिसतात. या खुणा पाहत असताना प्रत्यक्ष गोळ्या अंगावर आल्याचा भास होतो.


जालियांवाला बागेत फिरत असताना खरे तर आपल्याला इतिहासाचे स्मरण व्हायला हवे. या हत्याकांडाला अजून पुरते शंभऱ वर्षही लोटले नाहीत. त्यामुळे त्या हजारो लोकांच्या बलिदानाची स्मृती जागवणे एवढे अवघड नाही. परंतु येथे येणारे लोक हे एखाद्या सामान्य बागेत आल्यासारखे नाचत-बागडत असतात. लहान मुले उंडारत असतात आणि त्यांच्या पोरकट आया कौतुकाने पाहत असतात. घटनेचे गांभीर्य आणि जागेचे पावित्र्य याचा लवलेशही कोणाच्या चेहऱ्यावर दिसत नाही. जालियांवाला बाग स्मारक अशी पाटी जिथे लावली आहे तिथे पर छायाचित्रेच्छुकांच्या झुंडी लोटत असतात. कोणी त्या अक्षरांकडे तोंड करून सलाम करण्याचा आविर्भाव करतो, कोणी ताठ उभे राहतो तर कोणी चार मित्रांना कवेत घेऊन आपणच इतिहास घडविल्याच्या ढंगात छबी टिपून घेतो. त्याचवेळेस वाघा सीमेवर नेण्यासाठी ग्राहकांना हाकारे घालत ऑटोवाले तिथे फिरत असतात. त्यामुळे ही जालियांवाला बाग आहे की खेलियांवाला बाग आहे, असा प्रश्न पडतो.


एखाद्या जागेचे पावित्र्य कायम ठेवायचे तर तिथे देवाची मूर्ती किंवा धर्मग्रंथातील वचनेच लावायला पाहिजेत, असा काहीतरी भारतीयांचा नियम असावा. एरवी पुण्यातील शनिवारवाडा किंवा आगाखान पॅलेस असो, मदुराईतील गांधी स्मारक असो, कन्याकुमारीतील गांधी मंडपम किंवा विवेकानंद स्मारक असो अथवा पानीपतचे युद्ध स्मारक असो, कुठल्याही जागी लोकांची प्रवृत्ती तळमळीऐवजी खेळीमेळीकडेच असल्याचे मी पाहिले आहे.

No comments:

Post a Comment