Tuesday, August 18, 2015

हा पुरस्कार महाराष्ट्राला भूषणावहच!

image

गेल्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सत्तापालट झाला. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आधीच्या सरकारच्या तुलनेत वेगळे वाटतील असे फार काही निर्णय घेतले नाहीत. फक्त निर्णय घेणाऱ्या व्यक्ती बदलल्या, निर्णयामागचे तत्वज्ञान आणि विचार बदलले आहे, असे जाणवलेच नाही. जे काही मोजके वेगळे निर्णय घेतले त्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा हा पहिला आणि त्यानंतर आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय हा दुसरा. त्यातील पहिल्या निर्णयाची (निर्णय कमी आणि आदेश जास्त!) उपयुक्तता आणि औचित्य वादग्रस्त आहे मात्र हा दुसरा निर्णय निर्विवादपणे उत्तम आहे. महाराष्ट्राचे भूषण म्हणून हा पुरस्कार दिला जात असला तरी या पुरस्काराचे भूषण महाराष्ट्रालाच वाटावे, असे हे पाऊल आहे.

एरवी महाराष्ट्रात गेली काही वर्षे दुष्काळी परिस्थिती असली तरी पुरस्कारांच्या बाबतीत सुकाळ आहे. कोणतीतरी संस्था, कोणत्या तरी कर्तृत्ववान व्यक्तींना शोधून काढून कोणते तरी भूषण म्हणून ठरवून टाकते. अन् सत्कारार्थी व्यक्तीही 'अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशनविहीन जातं तुण्डम्' अशा अवस्थेत मंचावर जाऊन त्या पुरस्कारामुळे मी धन्य झालो, असे जाहीर करून टाकते. मात्र काही व्यक्ती अशा स्थानी असतात, की त्या कोणत्याही पुरस्कारांच्या पलीकडे गेलेल्या असतात. बाबासाहेब पुरंदरे हे अशाच व्यक्तीमत्वांपैकी एक!

ज्या लोकांना बाबासाहेबांच्या नावाला विरोध करून आपल्या जातमंडूक (कूपमंडूक तसे जातमंडूक!) वृत्तीचे ढळढळीत प्रदर्शन करायचे आहे त्यांना ते खुशाल करू द्या. 'आमचेच ऐका नाहीतर खड्ड्यात जा,' अशा मानसिकतेची ही मंडळी राज्यात सत्ताधाऱ्यांच्या कृपेने पुन्हा डोके वर काढून बसली आहेत. ज्या प्रमाणे उत्तर पेशवाईत रावबाजीच्या आश्रयाने भट-पुरोहितांचे वर्चस्व वाढले आणि त्यांनी सगळ्या समाजाच्या विवेकबुद्धीला ग्रहण लावले तशीच प्रवृत्ती आजही आहे. खरे तर राज्यातील कायदा-सुव्यवस्था, किरकोळ मुद्द्यांना आलेले महत्त्व आणि खुज्या लोकांचे वाढलेले महत्त्व, हे पाहिल्यावर ज्यांनी उत्तर पेशवाईचे वर्णन वाचले आहे त्यांना तोच काळ आठवेल.

पुरोगामीपणाचे सोवळे सांभाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ब्रिगेडी बांशिद्यांना मोकळे सोडले. भांडारकरसारख्या निरूपद्रवी आणि बऱ्यापैकी जमिनी बाळगून असलेल्या संस्था ते फोडत होते तोपर्यंत चांगले चालले होते. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मात्र याच लोकांची मजल शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक करण्यापर्यंत गेली आणि तेही सरकारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर! त्यानंतर नाकापेक्षा जड होऊ पाहणाऱ्या या मोत्यांचे प्रस्थ हळूहळू आश्रयदात्यांनीच कमी केले. नंतर वाघ्या कुत्र्याच्या निमित्ताने परत या लोकांनी आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला परंतु दादोजींप्रमाणे हा मुद्दा काही फळला नाही. उलट त्याची तीव्र प्रतिक्रिया आली म्हणून तलवारी म्यान करून ही मंडळी बसली. आता बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार मिळणार म्हटल्यावर परत आपले हमखास यशस्वी नाट्य रंगेल म्हणून ही मंडळी आपली शीतनिद्रा सोडून बोलायला लागली आहेत.

बाबासाहेबांच्या कर्तृत्वाविषयी खरे तर आवर्जून सांगायची गरज नाही. आपण इतिहासकार नाही, हे त्यांनी स्वतःच्या मुखाने अनेकदा सांगितले आहे. स्वतःच्या इतिहास वर्णनात काळानुरुप बदल करण्याची तयारीही त्यांनी दाखविली आहे. तरीही ब्रिगेडींनी एकदा ही जमीन मऊ लागली आणि मग कोपऱ्याने खणण्याची सवय त्यांना लागली. परत त्यांना जितेंद्र आव्हाडांसारखा भक्कम आधारस्तंभ मिळाला म्हणल्यावर काय पुसता? मुंब्र्यातील बेकायदा बांधकाम पाडू न देण्याचा विडा उचलणारे, दहीहंडीची घातक उंची कमी करू देणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे आव्हाड याबाबतीत मागे कसे राहतील? राम जेठमलानींनंतर नेहमी चुकीच्या बाजूने सकृद्दर्शनी तार्किक मांडणी करणारा पण रेटून खोटे बोलणारा एक बडबडतज्ज्ञ आव्हाडांच्या रूपाने देशाला मिळाला, एवढेच म्हणायचे. उरला त्यांच्या टिकेचा प्रश्न तर त्याला भर्तृहरीनेच उत्तर देऊन ठेवले आहे – तत्को नाम सुगुणिनां यो न दुर्जनै नाङ्कित (सज्जनांचा असा कोणता गुण आहे ज्यावर कद्रू मंडळी टीका करत नाहीत)?

स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांनी केलेले पाहवत नाही, अशा कायम दुखणाईत अवस्थेतील ब्रिगेडची मंडळी सकारात्मक गोष्टीसाठी कधी पुढे आल्याचे महाराष्ट्राला आठवत नाही. शिवाजीराजांचे सावत्र राजे व्यंकोजी यांनी राजांचा कायम दुस्वास केला. त्यांच्या सततच्या किरकिरीला कंटाळून राजांनी त्यांना एक खरमरीत पत्र लिहिले. त्यात त्यांनी व्यंकोजींना 'पराक्रमाचे तमाशे दाखवा' असे एक मार्मिक वाक्य लिहिले आहे. विनाकारण कुरकुर करण्यापेक्षा काहीतरी घडवून दाखवा, असे त्यांनी सांगितले होते. ब्रिगेडच्या सदस्यांना आज परत हेच वाक्य ऐकविण्याची वेळ आली आहे.

2 comments:

  1. जातमंडूक शब्द आवडला. प्रत्येक समस्येचे उत्तर जातींमधे शोधणारे हे लोक.

    ReplyDelete
  2. धन्यवाद, प्रकाशजी. हे लोक खरोखरच प्रत्येक गोष्ट जातीच्या भिंगातून पाहतात.

    ReplyDelete