Monday, September 7, 2015

'आमच्या' मोरे सरांचे अभिनंदन!

अंदमान येथे विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून पुरोगामी मंबाजींचे बुरखे टराटराWP_20150717_009  फाडत शेषराव मोरे सरांनी त्यांच्यावर वैचारिक दहशतवादाचा जो हल्ला केला तो खऱ्या अर्थाने वैचारिक क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा निदर्शक आहे. 'हम बोले सो कायदा, हम बोले सो पुरोगामी' या लाल मठांमधून उठणाऱ्या हाळीला मोरे सरांनी एक जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'सौ सुनार की एक लुहार की' असा त्यांनी एकच तडाखाच दिला आहे. पुरोगामी या शब्दाच्या नावाखाली चालणाऱ्या अनाचाराला वैचारिक दहशतवाद असा स्वच्छ शब्द त्यांनी दिला आहे. त्याबद्दल मोरे सरांचे अभिनंदन.

विश्वास पाटील यांच्यानंतर 'बहुजनां'मधून स्वयंनियुक्त पुरोगाम्यांवर आणखी एक पेटता गोळा पडला आहे. अंदमानातून लागलेल्या ही या अग्नीचा मुकाबला करण्यासाठी प्रगतीशील विचारांनी एव्हाना अग्निशमनाची बुकिंग करायला सुरूवातही केली आहे.

मोरे सरांची निवड झाली, तेव्हाच या संमेलनातून काहीतरी खणखणीत ऐकायला मिळणार, हे स्पष्ट झाले होते. त्यांची निवड झाली, तेव्हा वैयक्तिकरित्या मला अनेक कारणांनी आनंद झाला. एक तर स्वा. सावरकर यांच्या विचारांचे परखड अभ्यासक म्हणून इतरांप्रमाणेच मलाही त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यात ते नांदेडचे त्यामुळे या आदराचे मूल्यवर्धन झाले . एवढ्यावर न थांबता, मला त्यांच्या हाताखाली शिकता आले, ही दुधात सागर होती. योगायोगाने अंदमानच्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे त्यांनी हाती घेतली तीही शिक्षक दिनीच.

साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून साहित्य परिषदेत त्यांचा सत्कार झाला तेव्हा गेलो असताना नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनची आठवण त्यांना करून दिली आणि मी तुमचा विद्यार्थी होतो, हेही सांगितले. त्यावर सध्या काय करता, असे त्यांनी विचारले. पत्रकार आहे, म्हणून सांगितले तेव्हा ते अंमळ खुश झाल्यासारखे वाटले. आपला विद्यार्थी अभियंता न बनता अन्य चांगल्या मार्गाला लागला, याचा कदाचित त्यांना आनंद झाला असावा!

WP_20150725_005 मोरे सरांचे पहिले पुस्तक - सावरकरांचा बुद्धिवाद: एक चिकित्सक अभ्यास - गाजत होते त्याचवेळेस ते शिकवत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माझा प्रवेश झाला, हा अगदी योगायोगच म्हणावा लागेल. त्यातही विशेष म्हणजे स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणाचे ते २५ वे वर्ष होते. त्यापूर्वी एक-दोन वर्षे सावरकरांच्या साहित्याने मला झपाटले होते.

त्यामुळे तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेताना तेतील अभ्यासक्रमापेक्षा आकर्षण होते ते मोरे सरांना भेटता येणार याचे. आम्हाला पहिल्या वर्षी सर शिकवत नसले तरी त्यांच्याबद्दल ऐकायला मिळायचे. अत्यंत नैष्ठिक आचरण आणि आपला विषय तळमळीने मांडणे, ही त्यांची खासियत.

त्या काळात घडलेला एक किस्सा. एकदा एका संस्थेने त्यांना भाषणासाठी आमंत्रित केले. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचल्यानंतर तिथे गोपाळ गोडसे हेही तिथे हजर असल्याचे सरांना दिसले. त्यावेळी त्यांनी तडक व्यासपीठ सोडले आणि गोपाळ गोडसे असतील तर मी बोलणार नाही, असे ठामपणे सुनावले.

या गोष्टीची त्यांना आठवण करून दिल्यानंतर त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, "माझ्या एक-दोन पुस्तकांची नावे झाल्यावर आमच्या गावाकडच्या लोकांनी मला सत्कारासाठी बोलावले. सत्कार झाल्यावर गावाचे कारभारी बोलायला उठले. ते म्हणाले, की मोरे सरांनी आतापर्यंत बामणांवर लिहिले (सावरकर), दलितांवर लिहिले (आंबेडकरांवर), आता त्यांनी आपल्या माणसांवर (मराठा) लिहावे. तेव्हा मी त्यांना माझ्या भाषणात सुनावले, की मी असे जाती पाहून लिहीत नाही."

नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पहिल्याच वर्षी माझा सरांशी संबंध आला. त्या वर्षी शासकीय तंत्रनिकेतनात स्नेहसंमेलन झाले नाही. म्हणून वसतिगृहातील मुलांनी मुद्दाम थाटात स्नेहसंमेलन आयोजित केले होते. त्यात वक्तृत्व स्पर्धाही आयोजित केली होती आणि तिचा विषय होता 'अंधश्रद्धा आणि समाज'. या स्पर्धेसाठी परीपरीक्षक होते मोरे सर आणि स्पर्धकांपैकी एक होतो मी. सांगायचा भाग हा, की त्या स्पर्धेत मामाझा पहिला क्रमांक आला होता.

दुसऱ्या वर्षी मात्र मोरे सर प्रत्यक्ष आम्हाला शिकवायला होते. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग हा विषय ते आम्हाला शिकवत. फ्लक्स कसा वाहतो आणि मॅग्नेटिक फिल्ड कशी तयार होते, हे ते विषयाशी एकरूप होऊन शिकवत आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याची खास चर्चा असायची. तेव्हा मोठमोठ्या विद्वज्जड ग्रंथांचे परिशीलन करणारे हेच का ते सर, असा प्रश्न पडायचा. याच वेळी त्यांच्याशी थोडासा परिचय वाढला, पण तेवढ्यात सरांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचे कळाले. आम्हाला शिकविलेले १९९४ हेच सरांच्या अध्यापनाचे शेवटचे वर्ष ठरले. (मात्र त्यात माझा कोणताही हात नाही!).

याच काळात नांदेडहून मुंबईला माझ्या फेऱ्या सुरू झाल्या होत्या. एकदा 'तपोवन एक्स्प्रेस'मध्येच सरांची भेट झाली. हातात कुठलेतरी जाड पुस्तक आणि नोंदी काढण्यासाठी एक डायरी. त्यांच्या सोबत आणखी एक व्यक्ती होती. पण त्या व्यक्तीशी चर्चा न करता सर कुठल्याशा पुस्तकातून नोंदी काढण्यात मग्न होते. धावत्या गाडीतही सरांचे ज्ञानाराधन अविरत सुरू होते.

त्या नंतर नांदेडमधील सरांच्या घरी एक-दोनदा जाणे झाले. तेव्हाही पुस्तकात गाढ बुडालेले आणि संशोधनात रममाण झालेले सरच पाहायला मिळाले. त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे, "गेल्या अनेक वर्षांमध्ये मी चित्रपट पाहिलेला नाही. कित्येक वर्षांमध्ये मी शर्ट विकत घ्यायला गेलेलो नाही इतकेच काय चप्पल सुद्धा विकत घ्यायला गेलेलो नाही. "

पुण्याला आल्यानंतर मात्र सरांशी संपर्क तुटला. या काळात त्यांचे एकामागोमाग ग्रंथ प्रकाशित झाले. पुण्यात त्यांच्या जाहीर मुलाखतीही झाल्या पण पत्रकारितेचा व्यवसाय असा विचित्र, की आपल्याला जेव्हा रामेश्वरला जायचे असते तेव्हा सोमेश्वरला जाणे भाग पडते. त्यामुळे त्यांची भेट होत नव्हती.

आता परत योगायोग असा आला, की सरांच्या विद्वत्तेचा सन्मान होत असताना त्याचा साक्षीदार होण्याची मोकळीक मला मिळाली. म्हणूनच साहित्य परिषदेत त्यांना आवर्जून भेटायला गेलो. त्यावेळी त्यांनी आपल्या संशोधनाची मांडणी जशी केली तसेच त्या मागच्या ध्यासाचीही पोतडी काही प्रमाणित मोकळी केली.

त्याच वेळेस गोडसेंच्या संदर्भातील घटनेची मी त्यांना स्मरण करून दिले. त्या नंतर ते भरभरून बोलायला लागले. कार्यक्रमाच्या त्या घाईतील संभाषणातसुद्धा त्यांचे सावरकरांवरचे प्रेम लपून राहत नव्हते. "गांधीहत्येत सावरकरांचा यत्किंचितही हात नव्हता. त्यांना थोडी जरी कटाची कल्पना असती तर ती हत्या टाळण्याचे त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केले असते. पण सरकारने त्यांना या गुन्ह्यात गुंतविले आणि नंतर हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे नाव घेऊन त्यांच्या विचारांचे भयंकर नुकसान केले," असे त्यांनी परखडपणे सांगितले.

मात्र त्यांचा हा परखडपणा प्रागतिक विचारांच्या पथ्यपाण्याला मानवत नाही. प्रागतिक पद्धतीत सेक्युलरिझम म्हणजे नेहरूवादी सेक्युलरिझम आणि हिंदू किंवा हिंदुत्ववादी म्हणजे दुष्ट, असा थेट कृष्ण-धवल मामला असतो. हाही बरोबर असू शकतो आणि तोही काही प्रमाणात योग्य असू शकतो, अशा विचारांचे तिथे वावडे असते. मग त्यात रोगी मेला तरी चालते. तेव्हा मोरे सरांनी पुरोगाम्यांच्या दंभावर प्रहार केल्यावर त्याचे प्रतिध्वनी उठणे स्वाभाविकच होते.

म्हणूनच मग ज्या लेखकाने आपल्या ग्रंथाचा प्रतिवाद करण्याचे आवाहन करून त्याचा एक वेगळा ग्रंथ बनविला, त्या लेखकावरच हेत्वारोपाचे आरोप करण्यास लोक सरसावतात. अर्थात् कावळ्यांच्या ट्वीटने गायी मरत नसतात, पण ज्या प्रवृत्तीबद्दल मोरे सर बोलतायत, तिची खरीखुरी झलकच यातून दिसते.

Shesharao More comments आता तर सुरूवात झाली आहे. अंदमानच्या काळ्या पाण्यातून उठलेल्या या उज्ज्वल विचारांचे तरंग येथून आणखी उमटणार आहेत. हिंदुत्ववादी आणि पुरोगाम्यांचे टोळीयुद्ध पाहण्यास आता खरी मजा येणार आहे!

4 comments:

  1. हे डावे-उजवे,पुरोगामी-प्रतिगामी प्रकरण राजीव साने यांनी त्यांच्या गल्लत गफलत गहजब पुस्तकात चांगले विशद केले आहे.

    ReplyDelete
  2. प्रामाणिक कोणी असेल तर वांधा नाही. पण हे सगळेच सोयिस्कर आणि नैमित्तिक भूमिका घेतात. सगळी समस्या तिथून सुरू होते. राजीव साने खऱ्या अर्थाने वैचारिकता पाळणाऱ्या मोजक्या विचारवंतांपैकी एक होत.

    ReplyDelete
  3. खरे पुरोगामी दहशतीच्या छायेत आहेत. हरी नरकेंच्या ब्लाॅगवर त्याचा उल्लेख आहे. आ.ह. साळुंखेनी अलिकडे आपले नाव परस्पर पत्रिकेत टाकू नये अशी विनंती केली आहे. हे कशाचे लक्षण आहे
    ...

    ReplyDelete
  4. कशाचे म्हणजे? पुरोगाम्यांची चळवळ 'दहशतवाद्यांनी' हायजॅक केल्याचे...!

    ReplyDelete