Tuesday, October 6, 2015

संस्कृतला विरोध सेक्युलरांचाच

18 व्या शतकातील अल्लोपनिषद हा मुस्लिम धर्मियांसाठी ग्रंथ संस्कृतमध्ये असून बायबलच्या कितीतरी संस्कृत आवृत्या आहेत. या शिवाय केरळमधील पी सी देवाशिया यांनी क्रिस्तुभागवतम् या नावाने येशु ख्रिस्तावर एक महाकाव्य लिहिले आहे अन् त्याबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार ही मिळालेला आहे. म्हणजे संस्कृतला कोणत्याही धर्माचा किंवा संस्कृतचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. विरोध आहे तो सेक्युलरांच्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये. त्यांच्या या अतिरेकी विरोधामुळेच आणि उपेक्षेमुळेच हिंदुत्ववाद्यांना संस्कृतवर एकाधिकार करता आला आहे. हा एकाधिकार मोडून काढण्यासाठी त्यांना आधी स्वतःच्या झापडा काढाव्या imageलागतील. ते करतील तो सुदिन!

ता. 3 ऑक्टोबर रोजी डॉ. रुपा कुळकर्णी यांच्या 'मोदी, संस्कृत आणि धर्मनिरपेक्षता' हा लेख प्रकाशित झाला आहे. संस्कृत भाषेच्या अभ्यासिका असे म्हणविणाऱ्या डॉ. कुळकर्णी यांनी या लेखात सत्याचा अत्यंत अपलाप केला आहे आणि दिशाभूल करणारी अनेक विधाने केली आहेत. या विधानांना कुठलाही आधार नाही आणि त्यात तर्काधिष्ठितता तर नाहीच नाही. उलट या लेखातील प्रत्येक वाक्याला द्वेषाची किनार आहे.

"भाजपाला एकहाती सत्ता मिळाली तेव्हाच, दोन गोष्टींचं आता महत्त्व वाढणार हे ठरून गेलं होतं. एक म्हणजे देशाचं हिंदुस्थान हे नाव व दुसरं म्हणजे संस्कृत," असं वाक्य लिहून लेखिकेने हिंदुत्ववाद आणि संस्कृत यांची सांगड स्वतःच घातली आहे आणि वर ‘संस्कृत फक्त हिंदूंची’ असा शिक्का मारण्यासाठी हिंदुत्ववाद्यांनाच जबाबदार धरलेले आहे.

या देशात 1994 साली, म्हणजे नरेंद्र मोदी राजकीय रडारवर ठिपक्या एवढेही नसताना संतोषकुमार आणि अन्य लोकांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यात शालेय अभ्यासक्रमात संस्कृतला ऐच्छिक विषय म्हणून उपलब्ध करून देण्यास विरोध करण्यात आला होता. त्याच याचिकेत न्यायालयाला अशी विनंती करण्यात आली होती, की संस्कृतला जर शालेय अभ्यासक्रमात स्थान दिले तर तिच्या सोबत फार्सी (पर्शियन) आणि उर्दू यांनाही स्थान द्यायला हवे. न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावताना असे स्पष्ट म्हटले होते, की संस्कृत शिक्षणाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा काहीही संबंध नाही.

त्यानंतर 2000 साली अरुणा रॉय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात अशीच याचिका दाखल केली होती आणि त्यातही हीच मागणी केली होती. मात्र न्यायालयाने तेव्हाही त्यांची मागणी धुडकावून लावत 1994 मधील याचिकेवरील निकालच कायम ठेवला.

आता डॉ. कुळकर्णी यांच्या लेखातही "पाली आणि अरेबिक या भाषा अभिजात" आहेत, असे वाक्य आहे. पाली ही भारताच्या सांस्कृतिक महत्त्वाची भाषा आहेच आणि अनेक विद्यापीठांमधून त्याचे शिक्षणही चालू आहे. पण अरेबिकचे काय? अरबी भाषेचा आणि भारताचा संबंधच काय? अगदी मोगल सत्ताधाऱ्यांचा कारभारही फारसीत चालत असे. परंतु ज्या धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) विचारांचे प्रतिनिधित्व डॉ. कुळकर्णी करू पाहतात, त्यांनी अरबी, उर्दू अशा भाषांना धर्मनिरपेक्षतेशी जोडले आहे आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल त्या आग्रही दिसतात.

घटना समितीत बोलत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संस्कृतला राष्ट्रभाषा करावी, असे म्हटले होते. त्यांच्या जोडीला नजीरुद्दीन अहमद यांनीही संस्कृतच्या बाजूने मत व्यक्त केले होते. त्यांच्या मते, "एवढ्या विविध भाषा बोलल्या जाणाऱ्या या देशात राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली जाणारी भाषा ही निष्पक्ष असावी. ती कोणत्याही प्रदेशाची मातृभाषा नसावी, सर्व प्रांतांना सामाईक असावी आणि तिचा स्वीकार केल्याने एका प्रांताचा फायदा तर दुसऱ्याचे नुकसान होता कामा नये". संस्कृतमध्ये हे गुण असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याच प्रमाणे महाराष्ट्रात पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्यासारख्या ज्ञानी माणसाने संस्कृतला केवठे मोठे योगदान दिले! संस्कृतची सांगड हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्या धर्माशी घातली होती, तर या स्पष्टपणे अहिंदु असलेल्या व्यक्तींच्या संस्कृतमधील कर्तृत्वाची माहिती देण्यासाठी सेक्युलरांनी तरी काय केले?

त्यानंतर लेखिकेने काही ग्रंथांची नावे दिली आहेत आणि ते हिंदूंची धर्मग्रंथ आहेत, असे सांगितले आहे. कालिदासाची काव्ये, काही नाटके आणि अन्य साहित्याचाही त्यांनी या धर्मग्रंथात समावेश करून टाकला आहे. ही तर या लेखातील कमालच म्हटली पाहिजे! वास्तविक हिंदु समाज कधीही ग्रंथाधारित नव्हता. अगदी वेदांपासून भगवद्गीतेपर्यंत सर्व ग्रंथ हिंदूंच्या दृष्टीने पूज्य असले, तरी ते त्यांच्या व्यवहाराचे आधार कधीच नव्हते. 'शास्त्रात् रूढीर्बलियसी' हाच येथील लोकांचा मंत्र राहिलेला आहे. त्यामुळे कुराण किंवा बायबल यांच्या प्रमाणे धर्मग्रंथात काय म्हटले आहे, या ऐवजी लोकाचार आणि कुळाचार काय आहे, हेच महत्त्वाचे ठरत आले आहे.

हिंदू समाजाला आलेल्या ग्लानीचे कारण म्हणजे त्यांना वेदांचे झालेले विस्मरण होय, इसे आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांनी निदान केले होते. याचाच अर्थ वेद बाजूला ठेवून सुद्धा हिंदू संस्कृती जीवंत राहू सकते. त्याचप्रमाणे मध्य युगात ८० टक्के समाजाला संस्कृतमधील ग्रंथ आणि पुराणांपासून अनभिज्ञ होता. तरीही हा समाज हिंदूच राहिला. त्यामुळे संस्कृत ही अपरिहार्यपणे हिंदू समाजाशी जोडली गेलेली आहे, या म्हणण्यात काही तथ्य नाही.

एवढे कशाला, बौद्ध आणि जैन धर्मियांनी संस्कृतमध्ये विपुल ग्रंथरचना केली, असे खुद्द लेखिकाच म्हणतात. ते खरेही आहे. याचाच अर्थ संस्कृत ही ब्राह्मणांपुरती मर्यादित नव्हती. बौद्ध जातककथा या पंचतंत्र आणि हितोपदेश एवढ्याच आवडीने वाचल्या जातात. आता बौद्ध आणि जैन साहित्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, हा लेखिकेने स्वतःच काढलेला निष्कर्ष आहे. शिवाय या साहित्याला नास्तिक म्हणण्यात आले, ही सुद्धा तद्दन थापच होय. नास्तिक मत वेगळे आहे आणि त्यालाही यथोचित मान मिळाला होता, म्हणूनच आजही चार्वाकांसारख्या विद्वानांचा उल्लेख आपण करू शकतो.

लेखिकेने आणखी स्वतःच म्हटले आहे, की मुस्लिम, ख्रिश्चनांनी संस्कृतला कधीच विरोध केला नाही. त्यात तथ्य आहे. पण लेखिकेने असे म्हटले आहे, की धर्मनिरपेक्षतावाद्यांनी त्याला कधीच विरोध केला नाही, ते निखालस खोटे आहे. ते कसे, ते वर उल्लेख केलेल्या याचिकांवरून दिसून येईल. इतकेच कशाला, कर्नाटक (2009) आणि केरळमध्ये (2002) संस्कृत विद्यापीठांच्या स्थापनेचे प्रस्ताव आले, तेव्हा विधिमंडळात त्याला विरोध करण्यात स्वतःला सेक्युलर म्हणविणारे होते आणि तेव्हाही त्यांनी संस्कृतसोबत उर्दू विद्यापीठ स्थापन कराव्यात, असे सांगितले होते. म्हणजे भाषा आणि धर्माचा संबंध कोण कसा जोडते, ते समजेल.

'टी.व्ही. वरील शास्त्रीय नृत्याचे सर्वच कार्यक्रम विविध हिंदू देवी-देवतांच्या पौराणिक आख्यानांवरच बेतलेले असतात. इतर धर्मांमधील महापुरुष म्हणजे येशू, मुहम्मद, बुद्ध किंवा झरतृष्ट हे या शास्त्रीय नृत्यांचे विषय होताना माझ्या एकदाही पाहण्यात आले नाहीत,' असं एक विनोदी विधान लेखिकेने केले आहे.

भरतनाट्यम, कथकली यांसारख्या कला देवळांमध्ये जन्मल्या आणि वाढल्या. आता २१व्या शतकातील सेक्युलर विचारांना पात्र होण्यासाठी १०-१२व्या शतकात कोणीतरी देवळांमध्ये बुद्धवंदना किंवा इस्लामी आख्यान सादर करावे, ही अपेक्षा अगोचर म्हणायला हवी. शिवाय इस्लाममध्ये ईश्वर (अल्लाह) आणि पैगंबर सोडून अन्य कोणाची स्तुती करणे निषिद्ध आहे, त्याला कलावंत काय करणार? पण १८ व्या शतकातील अल्लोपनिषद हा मुस्लिम धर्मियांसाठी ग्रंथ संस्कृतमध्ये असून बायबलच्या कितीतरी संस्कृत आवृत्या आहेत. या शिवाय केरळमधील पी सी देवाशिया यांनी क्रिस्तुभागवतम् या नावाने येशु ख्रिस्तावर एक महाकाव्य लिहिले आहे अन् त्याबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार ही मिळालेला आहे.

लोकांना माहीत नाही परंतु हे सांगावेच लागेल, की अलीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही संस्कृतमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्माण होत असून त्यातील किमान तीन महाकाव्ये महत्त्वाची मानली जातात. पहिले बलदेव मेहराद्ध यांचे 'अम्बेडकरदर्शनम्', प्रभाकर जोशी यांचे 'भीमायनम्' आणि बौद्ध विद्वान सुगतकविरत्न शान्तिभिक्षु शास्त्री यांचे 'भीमाम्बेडकरशतकम्'.

थोडक्यात सांगायचे म्हणजे संस्कृतला कोणत्याही धर्माचा किंवा संस्कृतचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. विरोध आहे तो सेक्युलरांच्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये. त्यांच्या या अतिरेकी विरोधामुळेच आणि उपेक्षेमुळेच हिंदुत्ववाद्यांना संस्कृतवर एकाधिकार करता आला आहे. हा एकाधिकार मोडून काढण्यासाठी त्यांना आधी स्वतःच्या झापडा काढाव्या लागतील. ते करतील तो सुदिन!

2 comments: