अशा परिस्थितीत कोण कुठल्या संमेलनाध्यक्ष झालेल्या सबनीसांच्या फिरत्या सत्यप्रियतेमुळे एवढ्या मोठ्या शाही आयोजनावर पाणी फिरणे पी. डी. पाटलांना परवडणारे नव्हते. त्यामुळे सबनीसांच्या सरबत्तीमुळे संमेलनाचे वस्त्रहरण होत आहे, असे दिसताच त्यांनी वाहिन्या आणि वृत्तपत्रे अशा दोन्ही मार्गांनी संमेलनाच्या प्रतिमेवरील धूळ झटकायचा प्रयत्न केला. ते शक्य झाले नाही तेव्हा त्यांनी थेट सबनीसांचे कान टोचले. अन् तोपर्यंत सत्य आणि वैचारिकता या दोन इंजिनांवर धावणारी सबनीसांची गाडी अचानक ब्रेक घेऊन थांबली. कालपर्यंत एफ १ च्या स्पर्धेत भाग घेऊ पाहणारा मोटारचालक एकदम वडापची गाडी चालवू लागावा, अशी ही परिस्थिती होती. अन् या स्थितीला कारण ठरले ते स्वागताध्यक्ष हे अधिकृत पद असलेले मात्र खऱ्या अर्थाने संमेलनाचे कर्ते-करविते पी. डी. पाटील!
मागील स्वागताध्यक्षांकडून सध्याच्या स्वागताध्यक्षांना सूत्रे देण्याचा कार्यक्रम यंदाच्या संमेलनात पहिल्यांदा पाहण्यास मिळाला. सबनीस प्रकरणामुळे मात्र साहित्य संमेलनाची सूत्रे साहित्य महामंडळाकडून खऱ्या अर्थाने नवसंस्थानिकांकडे गेली. काही वाहिन्यांनी मंडपात आलेल्या तरुणांच्या मुलाखती घेऊन त्यांना संमेलनाध्यक्षांचे नाव विचारले तेव्हा त्यांनी डी. पी. पाटील हेच सांगितले. यातच सर्व काही आले!
सबनीसांनी आपले छापील वाचन न वाचण्याचा मनसुबा आधीच जाहीर केल्यामुळे सर्वांनी आधीच निःश्वास सोडला होता. मात्र संमेलनाध्यक्षांपेक्षा प्रमुख पाहुण्यांचे भाषण गाजण्याचीही एक उप-परंपरा मराठी जगतात आहे. लता मंगेशकर किंवा गिरीष कार्नाड यांची भाषणे त्यावेळच्या संमेलनाध्यक्षांपेक्षा गाजली होती. यावेळी गुलजार यांनी त्या परंपरेला नाट लागू दिली नाही. संमेलनाध्यक्षांच्या 'तिरडीचे बांबू' वगैरे अलंकृत शब्दांनी युक्त भाषणापेक्षा गुलजार यांचा तरल संवाद सगळ्यांना भावला, यात काहीही नवल नव्हते. माणसे केवळ भारंभार वाचून किंवा पुस्तके लिहून शहाणी होत नाहीत. त्यासाठी आणखी काहीतरी अंगी असावे लागते. ज्ञान धावते पण शहाणपण रांगते, अशी एक म्हण 'महाराष्ट्र वाक् संप्रदाय'मध्ये दिलेली आहे. ती अशावेळेस वारंवार आठवते.
मात्र उद्घाटनाच्या सत्रात खरी धमाल आणली ती शरद पवार यांनी. निवडणुका वगैरे प्रकार आमच्यासाठी सोडा, असा टोला देतानाच सबनीस निवडून येईपर्यंत मला त्यांचे नावही माहीत नव्हते, हेही त्यांनी सांगून टाकले. सबनीसांनी अध्यक्ष होण्यासाठी ज्या लांड्यालबाड्या केल्या त्याला हा एक प्रकारे दुजोराच होता. किमान शब्दांमध्ये समोरच्याचा पाणउतारा कसा करायचा, याचा तो वस्तुपाठच होता. दुसऱ्या दिवशी यशवंतरावांचे नाव घेऊन ज्या सुसंस्कृततेची भलामण त्यांनी केली, त्या सुसंस्कृततेचा हा एक अस्सल पुणेरी नमुना होता म्हटले तरी चालेल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तर 'बदनाम हुए तो क्या हुआ, नाम न हुआ' असा खास नागपुरी हिंदीतील संवाद ऐकवून संमेलनाध्यक्षांच्या अब्रूलाच हात घातला. (त्याचा वचपा आपल्या भाषणाच्या संबोधनात मुख्यमंत्र्यांचे नाव न घेऊन सबनीसांनी काढला.) शिवाय सबनीसांच्या भाषणाला न थांबून त्यांनी काहीही झाले तरी राजकारणी कसा भारी पडतो, याची चुणूक दाखवली.
उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आणि एकदा शरद पवारांची मुलाखत झाल्यावर संमेलनात अन्य काही कार्यक्रमांमध्ये कोणालाही रस असायचे कारण नव्हते. संमेलनातील परिसंवादांना उपस्थित राहणाऱ्या रसिकांची मानसिकता, अशा विषयावर कोणीतरी एकदा संशोधन करायला हवे. वर्षानुवर्षे तेच ते रटाळ आणि वांझोटे परिसंवाद घेऊनही आयोजकांचा उत्साह कमी का होत नाही, यावरही एखादा परिसंवाद व्हायला हवा. साहजिकच गावातील जत्रेला लोटावी तशी कुठून कुठून आलेली मंडळी संमेलनाच्या परिसरातील पुतळ्यांभोवती सहकुटुंब सेल्फ्या काढण्यात तरी गुंग होती किंवा खाद्यपदार्थांच्या मांडवात कुल्फ्या खाण्यात धन्यता मानत होती.
No comments:
Post a Comment