Saturday, January 2, 2010

सर्वेक्षण माहिती कशी मारून टाकतात

पत्रकार हे सर्वेक्षणाचे सर्वात मोठे गिऱ्हाईक असतात. चुकीची माहिती देण्याची ती एक पद्धत आहे.

सर्वेक्षण करायचे का माहिती द्यायची, ही निवडीची बाब आहे. सर्व विषयांवर आणि कोणत्याही बाबीत का असेना, पाहण्या छापण्याची किंवा दाखविण्याची माध्यमांना सवय असते. राजकीय बातम्यांमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी ती पद्धत असते. 2009 वर्ष संपताना, पारंपरिक पाहण्या ही या वर्षाची लाक्षणिक घटना असल्याचे आपण पाहिले आहे. माध्यमं आपल्या कर्मचाऱ्यांना कमी पगार देतील पण पाहण्या करणाऱ्या कंपन्यांना कमी पडू देणार नाही.

सर्वेक्षणांमध्ये दडलेली माहिती, कोणत्याही प्रकारे वाकविली नाही, तिच्यातून अर्थ काढली नाही तर जवळपास नसतेच. तरीही राजकारणी, पत्रकारांना त्यावर भाष्य करायला का आवडते? पहिले कारण सोपे आहे. ते वस्तुनिष्ठ आणि गंभीर असल्याची एक प्रतिमा आहे. त्यावर अधिक चौकशी करायला, त्याचे गहन विश्लेषण करणे सोपे नसते. आपले काम झाकण्याची ती एक पद्धत आहे.

मतांचे प्रसारण

हे अशाप्रकारे झाकण्याला आणखी एक समर्थन आहे. पत्रकाराला त्याचे मत सिद्ध करण्यासाठी काहीतरी हवे असते. त्याला जे काय मांडायचे असते ते खरे आहे हे त्याला दाखवून द्यायचे असते. “हे माझे मत नाही. हा एक निष्कर्ष आहे,” असं त्याला सांगायचं असतं. त्याचा निष्कर्ष हा त्याच्याकडे असलेल्या माहितीवर अवलंबून नसतो तर लोकांना रसप्रद वाटेल, अशा पाहण्यांच्या आवरणाखाली असतो. तो स्वतः पुढाकार न घेता बचावात्मक धोरण घेतो. माहिती न मांडता तो एखादे मोघम मत पुढे प्रसारीत करतो.

हे पुढे मांडलेले मत लोकांपुढे अतिशय चुकीचे चित्र निर्माण करते. पत्रकार या वाचकाला संवाद साधण्यासाठी योग्य अशी व्यक्ती न मानता, जे काय कोणत्यातरी विषयावर मत माडंले आहे ते स्वीकारणारी वस्तु समजतो.  असं मत जे व्यक्त करण्यापेक्षा राखून ठेवलेले बरे वाटावे. स्वाभाविकच, पत्रकार चाकोरीत अडकून किंवा तिला बळी पडून सर्वेक्षणांचे निष्कर्ष पुढे ठेवतो. मात्र त्यातून तो माहिती पुरविण्याची स्वतःची जबाबदारी टाळतो.  त्यातून पत्रकाराची भूमिकाही गमावतो.

-------------

पत्रकारितेच्या विषयावरील एका फ्रेंच ब्लॉगचा स्वैर अनुवाद. त्यातील काही संदर्भ फ्रेंच भाषक देशांतील असले तरी आपल्याकडेही सर्वेक्षणांची जी प्रथा बोकाळली आहे,  तिला हे लागू पडते.

Thursday, December 31, 2009

शुभेच्छा...कशाच्या कशाच्या!

यंदा अद्याप तरी नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालेला नाही. एक दोन इमेल आले आहेत मात्र त्यांचे प्रमाण आटोक्यात आहे. त्याबद्दल शुभेच्छा न देणाऱ्यांचा मी आभारी आहे. एखाद्या विशिष्ट वेळेला कोणा माणसाला विशिष्ठ शब्द बोलल्यास त्याचे भलेच होते, हे एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना कसे काय वाटू शकते हे माझ्यापुरते गौडबंगाल आहे. विशिष्ट दिवशी एखादा सण पाळणे ही जर अंधश्रद्धा असू शकते, एखाद्या विशिष्ठ दिवशी उपाशी राहणे हे जर अंधश्रद्धा या सदरात मोडू शकते तर कॅलेंडरच्या एका विवक्षित रकान्यात असलेल्या दिवशी तमाम जगाला सगळं कसं 'गुड गुड' वाटू शकते, हीही अंधश्रद्धाच होय. एवढाच कि, पहिल्या तऱ्हेची अंधश्रद्धा जोपासणारे संख्येने जास्त आहेत आणि दुसऱ्या तऱ्हेचे लोक कमी आहेत, एवढाच काय तो फरक. ज्या अंधश्रद्धेचे अनुयायी जास्त ती प्रथा आणि जिचे कमी ती अंधश्रद्धा, असा काहीसा हा प्रकार आहे.

येणारे वर्ष सुखाचे जावो, असे आपल्याला वर्षातून किती वेळेस ऐकायला मिळते, तुम्ही विचार केला आहे का? १ जानेवारी, गुढी पाडवा, दसरा आणि दिवाळी शिवाय तुमचे काही अमराठी मित्र असतील तर त्यांचेही वेगळे...म्हणजे उगादी, पोंगल, विशू, बैसाखी, बिहू  इत्यादी. गम्मत म्हणजे, इतक्या शुभेच्छा मिळूनही आयुष्य आहे तसाच आहे. मागील पानावरून पुढे चालू असा म्हणण्याचीही सोय राहू नये, इतके सपक, एकसुरी आणि अर्थहीन. कदाचित म्हणूनच असावे, वर्षांताचे निमित्त काढूनगळ्याखाली दारू उतरविणारे अलीकडे वाढू लागलेत. मध्यरात्रीनंतर इकडे नवे वर्ष लागते आणि बस लागावी तसे दारू पिलेल्यांना 'सेलिब्रेशन'  लागते! मग पोटात उतरलेली दारू डोक्यात चढते आणि मौज मजेसाठी जमलेले टोळके धिंगाणा घालू लागते. यंदा या धिंगाण्याला मा. न्यायालयानेही हात द्यायचे ठरविले आहे. दारू पिण्याला काल वेळेचे बंधन नसावे असाच जणू काही न्यायालयाचा हेतू असावा. शिवाय दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांना समजून घ्या, असंही सांगितलं आहे.  न्यायालय आणि मद्यालय अशी बेधुंद युती जगात बहुधा पहिल्यांदाच अस्तित्वात आली असावी.

आता नव्या वर्षाच्या मुहूर्तावर अशी टकळी चालू केल्याबद्दल मला कोणी दोष देईलही. मात्र त्यामुळे वस्तुस्थिती कशी बदलेल? ज्या शुभेच्छा दिल्या-घेतल्या आहेत, त्या तरी खऱ्या कुठे आहेत? यांत्रिक संदेशांची देवाण घेवाण हेच त्याचे खरे स्वरूप आहे. मी तर गेल्या दिवाळीत आलेले शुभेच्छांचे मेल यंदाच्या दिवाळीत पुढे पाठविले. सगळी गुगलची कृपा, दुसरे काय. त्याच्यामुळेच असे जुने मेल सांभाळून ठेवता येतात ना. पूर्वीच्या काळी नाही का, बायका एका लग्नात आलेला आहेर जपून ठेवत आणि दुसऱ्या नातेवाईकाच्या लग्नात तो आहेर म्हणून देत. त्याचीच हि आधुनिक आवृत्ती आहे. येणाऱ्या संदेशांमध्ये जुळ्या, म्हणजे अगदी एकसारख्या एक संदेशांची संख्या पहिली, तर माझे समानधर्मा लोक कमी नाहीत, याची खात्री पटते. खरं म्हणजे इतके हुबेहूब संदेश एकावेळी एकत्र पाहिल्याने त्या संदेशांचे अजीर्णच होते.  त्यामुळे दर वर्षीप्रमाणे यंदाही शुभेच्छा संदेशांना सुट्टी. जे चाललाय ते खूप छान आहे. ते तसंच चालत राहो ही इच्छा. मात्र त्यासाठी जानेवारी किंवा दिवाळी अशा निमित्तांची गरजच काय? एका इंग्रजी लेखकाची प्रतिमा वापरून लिहायचे तर म्हणावे लागेल...आपल्या शुभकामना या ईश्वरासारख्या असाव्यात...सर्वत्र आणि सगळीकडे उपस्थित मात्र कधीही न दिसणाऱ्या!


Saturday, December 5, 2009

माकडाच्या घराची बातमी

एक होते माकड. दिवसभर आपल्या ऑफिसमध्ये बसून असावे आणि संध्याकाळ इकडे तिकडे उंडारत काढावी, या पलिकडे एखाद्याची जीवनशैली असते, असावी यावर त्याचा विश्वास नव्हता. तरीही कधी कधी त्याला स्वतःच्या अशा उनाड आयुष्याचा कंटाळा यायचा. पावसाळ्यात चुकून मुसळधार पाऊस पडायचा. त्यावेळी हा एखाद्या इमारतीच्या आश्रयाला गेला, की तिथल्या लोकांनी कधीही माकड पाहिलेले नसल्याने ते माकडापेक्षा जास्त चाळे करायचे. झाडावर बसावं तर तिथे म्हाडाच्या घरांपेक्षा जास्त पावसाचं पाणी गळत असायचं. अशावेळी माकड मनातल्या मनात संकल्प करायचे, हे काही ठीक नाही गड्या. आपण एवढे कर्तबगार आणि अशा रितीने पावसात भिजत राहावं. साधे चिमण्या-कावळे सुद्धा स्वतःचे घरटे करतात. थांब, हा पाऊस थांबला की आधी एखादे डुप्ले फ्लॅट घ्यायलाच पाहिजे. वर्तमानपत्रांच्या रिअल इस्टेटच्या पुरवण्या वाचून त्याला सगळ्या बिल्डरांची नावे जवळपास तोंडपाठ झाली होती. त्यामुळे कोणाकडे फ्लॅट बुक करायचा, हेही त्याने मनातल्या मनात ठरवून टाकलेले असायचे. पाऊस थांबला, की मात्र माकडाचा मनोरथही जागच्या जागी उभा असायचा, सरकारी योजनांसारखा. परत त्याचा सामान्य जीवनक्रम सुरू राहायचा.

हिवाळ्यात थंडी वाजू लागली, की माकडाला वाटायचे आपलेही एखादे घरकुल असावे जिथे प्रेमाची ऊब मिळेल. दूरचित्रवाणीच्या जाहिराती पाहून त्याला घर-संसार म्हणजे काही गंमतीचीच गोष्ट आहे, असे वाटत होते. एकदा का थंडीचा मोसम उलटला, की आपण वन रूम किचन का होईना, पण स्वतःच्या जागेत जायचेच, असा बेत तो कुडकुडत करत असायचा. थंडीच्या काळात, दोन हात एकमेकांत गुरफटुन तो असा काही बसायचा, की च्यवनप्राश खाण्याचीसुद्धा त्याला इच्छा व्हायची नाही. मात्र हिवाळा संपला, की फुलांवरील दवबिंदू उडून जावे तसा त्याचा इरादाही नाहिसा व्हायचा. नव्हे, आपण कधी असा विचार केला होता, हेही तो विसरून जायचा.

उन्हाळ्यात झाडाच्या फांद्यावरून येणारे कडक ऊन सोसताना माकडाला वाटायचे, आपलेही घर असते तर त्यात एखादा फ्रीज असता. ऊन्हाने काहिली होत असताना फ्रीज उघडून आपण एखादे शीतपेय पीत बसलो असतो. माकडच ते, शीतपेयासाठी पैसे द्यावे लागतात किंवा भारनियमनामुळे फ्रीजसुद्धा थंड होणे बंद झाल्याची त्याला कल्पना असण्याचे कारण नव्हते. अर्थात एकदा का ऊन सरले, की माकडाच्या प्लॅनचेही बाष्पीभवन होऊन जायचे. मग कुठले घर आणि कुठला विसावा.

ही झाली पारंपरिक कथा. मात्र आपले माकड आहे एकविसाव्या शतकातील. त्यामुळे आपल्या वास्तवात न येणाऱ्या योजनांचेही मार्केटिंग कसे करावे, याचं कौशल्य त्याने विकसित केले होते. त्यामुळे काय व्हायचं, पावसाळा आला की बहुतेक वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी येत असे.

येत्या पावसाळ्यात माकडाचे घर होणार

त्याखाली माकडाच्या योजनेची सगळी माहिती दिलेली असायची. इतकेच नव्हे तर माकडाने केलेली घराची आखणी अगदी सांगोपांग त्यात येत असे. लवकरच जनतेला हे घर पाहायला मिळेल, असेही त्या बातमीत म्हटलेले असायचे. जो प्रकार पावसाळ्यात, तोच प्रकार उन्हाळ्यात. उन्हाळा संपला, की माकडाच्या घराचे बांधकाम सुरू होणार या अतिरिक्त बातमीसह माकडाची योजना अगदी सविस्तर स्वरूपात त्या बातमीत येत असे. एका वर्तमानपत्रात आली, की दुसरे वर्तमानपत्रही ती बातमी आतल्या पानात का होईना, पण छापतच असे. उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही

माकडाचे घर आता अंतिम टप्प्यात, लवकरच बांधकामाला सुरवात

अशी बातमी असायची.

अगदी ताज्यातली ताजी बातमी अशी आहे, की माकडाचे घर होईल तेव्हा होईल, मात्र त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक पेपरने एक वार्ताहर नेमला आहे. चुकून घराचे बांधकाम सुरू झालेच, तर आता स्लॅब पडणार, आता पायऱ्या बांधणार अशा बातम्या छापण्यासाठी या वार्ताहरांशी संपर्क साधण्याचा तुर्तास माकडाचा विचार आहे.

Sunday, November 29, 2009

तुम्ही म्हातारे होऊ नका!

“आजही मी हातात कप घेतला, की तो थरथरायला लागतो. मात्र हातात ब्रश घेतला तर तो थरथरत नाही. एखादी शक्ती माझ्याकडून हे शक्य करून घेत असावी. मात्र माझ्या हातून चांगलेच काम होत असल्याने त्या शक्तीचा मी आभारी आहे,” मंगेश तेंडुलकर बोलत होते. या वाक्यांनी मला स्वतःला आपण काय गमावले आहे, याची जाणीव करून दिली. तेंडुलकर यांच्या 50 व्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे काल बालगंधर्वमध्ये उदॆघाटन झाले. त्यावेळी त्यांनी वरील उदॆगार काढले. व्यंगचित्रे तसे पाहायले गेले तर माझी पहिली आवड. त्यात तेंडुलकरांची चित्रे म्हणजे वेगळीच खुमारी होती. त्यांच्या या वाक्यासरशी मी एकदम 1983 पर्यंत मागे गेलो.

ज्या वयात रविवारची जत्रा मुलांनी वाचू नये, असा संकेत होता त्यावेळी मी ते साप्ताहिक सर्रास वाचत असे. त्याला कारण तेंडुलकरांची व्यंगचित्रे त्यात येत असत. उरुस का अशाच काहिशा नावाने मलपृष्ठाच्या आतील बाजूस त्यांची व्यंगचित्रे येत असत. त्यात शिवाय नाटकांचा समाचार घेणारे त्यांचे खुमासदार सदरही होतेच. त्या व्यंगचित्रांनी बराच काळ प्रभावित केले होते. त्यानंतर विकास सबनीस आणि राज ठाकरे यांच्या शैलीने भुरळ घातली होती. नंतरही काही काळ या सर्वांची गाठभेट अनेक वर्षे दिवाळी अंक किंवा दैनिक वर्तमानपत्रांतून पडत होती. मग काही काळ व्यंगचित्रकार म्हणून जगण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते सगळे डाव वेगळेच पडले. आता तेंडुलकरांच्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने, त्यांच्या या वाक्याने गमावलेल्या त्या कौशल्याची आठवण झाली.

या कार्यक्रमाचे उदॆघाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी मोठे मनोज्ञ भाषण केले. “मुलगा मोठा होताना बापाला खूप आनंद होतो. मात्र आपले वडिल म्हातारे होऊ नयेत, असे मुलाला वाटत असते. वडिलांनी म्हातारे होणे म्हणजे काहीतरी गमावल्यासारखे आहे. त्यामुळे तेंडुलकर, तुम्ही म्हातारे होऊ नका. आहात तसेच राहा,” नाना पाटेकर बोलत होते. त्यांच्या या विनंतीला उत्तर म्हणून बोलतानाच तेंडुलकरांनी वरील वाक्य उच्चारले होते.

या सगळ्या कार्यक्रमात खरंच व्यंगचित्रकार झालो असतो तर…असा विचार येत होता. कार्यक्रम संपला आणि सगळ्या लोकांनी नाना पाटकेरला एकच गराडा घातला. बिचारे तेंडुलकर एका बाजूला पडले. सगळ्यांची घाई नानाची सही घेण्यासाठी. त्यावेळी व्यंगचित्रकार न झाल्याचे आयुष्यात पहिल्यांदाच समाधान वाटले!

Wednesday, November 25, 2009

गोंधळ-धर्माचा आणि राजकारणाचा

देशाच्या राजधानीत राम मंदिर आणि बाबरी मस्जिद यांच्या पाठीराख्यांमध्ये पाठशिवणीचा खेळ चालू असताना पुण्यात काल रामकृष्ण मिशनचे स्वामी तत्वज्ञानानन्द यांचे भाषण होते. एमआयटीच्या कार्यक्रमात त्यांचे हे व्याख्यान झाले. यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, "भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे असे म्हणण्यापेक्षा तो अध्यात्मिक देश आहे, असे म्हणणे अधिक सयुक्तिक आहे. इंद्रियांमधून मिळणाऱ्या आनंदापेक्षा आत्मिक आनंद महत्वाचा आहे. हा आनंद कसा मिळवायचा हे आपलाल्या केवळ धर्मग्रंथच नाही, तर शास्त्रीय संगीत, कला आणि साहित्य यातूनही ही शिकवण मिळते."

खरे तर अशा प्रकारची वाक्ये चोहोबाजूला अनेकजण बोलत असतात. मात्र रामकृष्ण मिशनसारख्या संस्थांमधील वरिष्ठ आणि सन्माननीय व्यक्ती वरील विचार मांडते तेव्हा त्याला वेगळा अर्थ असतो. अयोध्येतील ज्या वास्तूवरून नवी दिल्लीत गोंधळ सुरु आहे, तो धार्मिक आहे का राजकीय? म्हणजे पहा, धार्मिकता सोडा आणि भौतिकता पकडा, असा उपदेश आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी केला. त्यामुळेच रामापेक्षा रामाच्या मंदिराबाबतच या लोकांना अधिक प्रीती आहे. घ्या, तुम्हाला भौतिक विचारसरणी हवी होती ना? आता बोला, आम्ही अयोध्येतील भौतिक वास्तू आणि भौतिक जमिनीसाठी हातघाईवरच येऊ.

खरं म्हणजे, धर्म, आध्यात्मिकता आणि नैतिकता या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, हे आपल्या शिक्षणव्यवस्थेने  कधी नीट सांगितलेच नाही. धर्म म्हणजे पूजापाठ, देव-देवस्की आणि मंदिरात जाणे, अशा तद्दन बाह्य उपचारांशी जोडली गेलेली वस्तू. 'आनंदो' नावाच्या एका बंगाली नियतकालिकाचा आरोग्य विशेषांक एकदा माझ्या हातात पडला. त्यात बंगालमधील बहुतेक साऱ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती होत्या. त्यात जवळजवळ सगळ्यांनी आपण प्राणायाम करतो हे सांगतानाच, याचा कोणत्याही देवाशी संबंध नाही अशी पुस्तीही जोडली होती. कम्युनिस्ट बंगालमधील नामवंतांना आपण धार्मिक गणले जाऊ, याची कोण हि धास्ती! भारत हा आध्यात्मिक देश आहे, हि वस्तुस्थिती देशाच्या मुखंडांना मान्य करता आलेली नाही. त्यामुळे प्रच्छन्न समारंभ आणि कर्मकांड धार्मिक विचारांच्या नावावर खपविले जातात. सत्य साईबाबांना 'वर्षा'वर बोलावणे येतात आणि पुणे जिल्ह्यात तसेच आजूबाजूला डुप्लिकेट धर्मस्थळांची रास उभी राहते. तिरुपती बालाजी, शिर्डी, पंढरपूर यांच्या प्रतिकृती एखाद्या मॉलच्या शाखा निघाव्यात तशा निघत आहेत.

गम्मत पहा, शिरगावला शिर्डीच्या नावाखाली एक राजेशाही दुकान काढले तर अर्धा अर्धा पान छापणारे वर्तमानपत्र आध्यात्मिकता शिकवणाऱ्या पुरुषांना मात्र खड्यासारखे दूर ठेवते. नवरात्रात महालक्ष्मी मंदिराचे,  गणेशोत्सवात दगडूशेठ गणपतीचे छायाचित्र छापणारे किंवा दाखविणारे, या सगळ्याची गरज नसून केवळ स्वतःकडे पहा असे सांगणाऱ्या लोकांना वगळणारच. त्यात त्यांची भौतिक गरज आहे. तुकारामांच्या देहू येथे त्यांच्या मूळ मंदिरात भाविक श्रद्धेने जातात. तिथेच आता थोड्या अंतरावर गाथा मंदिर नावाचे एक मोठे दुकान उभे राहत आहे. संगमरवराच्या या तीन माजली इमारतीत तुकोबांचे अभंग संगमरवराच्याच फारशीत कोरलेले आहेत. जोडीला तुकोबांचा भव्य पुतळा. आयुष्यभर व्यवहार न जमलेल्या तुकोबांनी जवळच्या डोंगरावर जाऊन साधना केली. अशा उंची प्रसादाची गरज असती तर त्यांनी आपल्याकडे चालून आलेल्या शिवाजीसारख्या राजाला मागितले असते. पण नाही. स्वामी तत्वाज्ञानानन्द म्हणाले, सध्या उपभोगवाद वाढत आहे. मोठ्या धर्मस्थळांच्या  प्रतिकृती काय किंवा या गाथा मंदिरासारख्या नवीन रचना काय, या आध्यात्मिकातेत शिरलेल्या उपभोगवादाचेच परिणाम आहेत. हा उपभोगवाद आहे, तोपर्यंत मंदिर-मशीद पडतच राहणार. राजकारण हे त्याचे केवळ एक रूप आहे.




Sunday, November 22, 2009

…अखेर व्हायचे ते झालेच

अखेर व्हायचे ते झालेच. निखिल वागळे यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर शिवसैनिकांच्या मारामारी स्वातंत्र्याने अतिक्रमण केले. स्वतःच्या मोठेपणासाठी वागळे यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही चोप कसा असतो ते दाखवून दिले आणि शिवसेना अद्यापही शिवसेनाच आहे, ते पाच पंचवीस कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गात हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे राणा भीमदेवी थाटात आश्वासन दिले. (त्यावेळी खरं तर त्या फ्रेममध्ये आबांच्या जवळ विनायक मेटे दिसतात का, याचा शोध मी घेत होतो.शिवाय  छगन भुजबळही कुठे दिसले नाहीत ते.)

आयबीएन-लोकमतवर हल्ला झाला, त्याच संध्याकाळी योगायोगाने पुण्यात मनसेच्या एका नेत्याकडे पत्रकारांचा स्नेहमेळावा जमला होता. तिथे याच घटनेची चर्चा झाली नसती तर नवल. त्यावेळी बहुतेक पत्रकारांचे मत पडले, की वागळे कधी न कधी मार खाणारच होते. त्यांच्या शैलीमुळे महानगरच्या काळापासून शिवसैनिकांची आणि त्यांची सातत्याने गाठभेट होत असे. नव्हे शिवसैनिकांचा मार खाऊनच त्यांनी जिगरबाज पत्रकार अशी स्वतःची ओळख निर्माण केली आणि त्यांच्यावर हात साफ करूनच शिवसैनिकांनी स्वतःची हिंस्र प्रतिमा निर्माण केली.

त्यांच्यावर पहिला हल्ला झाला 1991 मध्ये. त्यावेळी विजय तेंडुलकर यांच्यासहित बरीच मोठी मंडळी निषेधासाठी रस्त्यावर उतरली होती. त्यानंतरच्या पाच वर्षांमध्ये महानगरवर अनेकदा हल्ला झाला. मग पूर्वीचा निषेधाचा जोष उतरला. त्यावेळी लोकमतमध्येच आलेले अग्रलेख मला आठवतात. सातत्याने एकाच वर्तमानपत्रावर हल्ले का होतात, अशा प्रश्न त्यावेळी विचारला जाई. वागळे इलेक्ट्रॉनिक माध्यमात आले आणि त्यांच्या धडाकेबाज व आक्रमक शैलीमुळे आयबीएन-लोकमत वाहिनी यशस्वीही झाली. मात्र आक्रमकता वेगळी आणि अहंमन्यता वेगळी, हे त्यांच्या गावी नव्हती. वागळे चर्चेसाठी नेत्यांना बोलावतात आणि त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना बोलू देत नाहीत ही सार्वत्रिक तक्रार आहे. सध्याच्या राजकीय नेते भ्रष्टाचारी आहेत, काहिसे अनघड (रॉ) आहेत ही गोष्ट खरी आहे. मात्र म्हणून त्यांना वाटेल तसे सोलून काढण्याची गरज नाही. दुर्दैवाने राजकारणी म्हणजे पंचिंग डॉल आणि त्यांना हवं तसं बोलण्याचा आपल्याला परवाना आहे, असा बहुतेक पत्रकारांचा समज आहे. राजदीप सरदेसाई, निखिल वागळे, करण थापर ही यातलीच मंडळी. त्यामुळेच थापरच्या डेव्हिल्स अ़ॅडव्होकेटमधून नरेंद्र मोदी उठून गेलेले गुजराती जनतेत खपून गेले. समोरची बाजू ऐकायचीच नाही, असे ठरवलेल्या लोकांशी आणखी कसे वागणार. वर उल्लेख केलेल्या मनसेच्या नेत्याच्या शब्दांत सांगायचे म्हणजे, चॅनेलवाले एखाद्या माणसाला संपवायलाच निघतात. त्या माणसाने केलेले काम, त्याचीही काही बाजू असते हे ऐकायला ते तयारच नसतात.

राहता राहिल प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. ज्यांची मालकी राजकीय नेत्यांकडे आहे, ज्यांच्या प्रकाशनामध्ये विशिष्ठ राजकीय पक्षांची तरफदारी करण्यात येते, एकतर्फी प्रचार हीच ज्यांची ओळख आहे, त्या वर्तमानपत्रांनी हल्ले झाल्यावर मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र आणि विचार स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढावेत हीच मोठी गंमत आहे. दीड महिन्यांपूर्वी सगळी वर्तमानपत्रे जेव्हा राजकीय पक्षांच्या पैशांवर लोकशाहीवर काळी शाई पुसण्यात दंग होती, त्यावेळी यांची ही चाड कुठे गेली होती, ते कळायला मार्ग नाही. (नाही म्हणायला, ज्यांनी पॅकेजसाठी पैसे पुरविले त्यांचेच लेख पॅकेजच्या विरोधात छापून लोकसत्ताने पापक्षालन करण्याच प्रयत्न केला होता. ) पुण्यात काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी असेच माध्यमांच्या नैतिकतेवर भाषण दिले होते. अशावेळी आपलं गप्प बसण्याचं स्वातंत्र्य वापरण्यापलिकडे आपण काय करू शकतो.

सरते शेवटी बाकी शिवसैनिकांनी हा हल्ला करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे अपयश अधोरेखित केले आहे. घर फिरले की घराचे वासे फिरतात, असे म्हणतात. त्याप्रमाणे आधीच राजकीय पराभवाने गलितगात्र झालेल्या या पक्षाच्या प्रतिष्ठेला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सुरुंग लावलेला आहे. बाळासाहेबांपेक्षा वेगळ्या मार्गाने राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ही मोठी चपराक आहे. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेने अनेक पत्रकारांवर हल्ले करून पचविले कारण ते पाप धुवून काढणारे अनेक चांगली कामे शिवसेना करत होती. आता मात्र एकीकडे राजकीय पदांसाठी चाललेली दुकानदारी आणि दुसरीकडे रस्त्यावरील ही गुंडगिरी अशा कात्रीत पक्ष अडकला आहे. एकतर हे पक्षाचे भान सुटल्याचे लक्ष आहे किंवा नियंत्रण तरी सुटल्याचे लक्षण आहे.

…………..

संबंधित पोस्ट

पत्रकाराची प्रतिज्ञा

Tuesday, November 17, 2009

विक्रम वेताळ आणि सच्छील खेळाडू

राजा विक्रमाने परत आपली जुनी-पुराणी भंगार फटफटी बाहेर काढली आणि तिला कीक मारली. अनेक शतकांच्या शिरस्त्याप्रमाणे तो वेताळाला घेऊन येणार होता. बायपासवरून दहा मिनिटांतच तो शहराजवळच्या जंगलात पोचला. वेताळाची बसण्याची जागा तर त्याला माहितच होती. शिवाय ज्या झाडाजवळून रिअॅलिटी शोचा आवाज ऐकू येतो, तिथे वेताळ असतो हे त्याला माहित होतं. त्यामुळे त्याने तिकडे मोर्चा वळवला आणि वेताळाला उचलून खांद्यावर घेतले. वेताळाचेही आवडते पात्रं शोमधून बाहेर पडल्याने त्यालाही शो बघण्यात रस नव्हता. त्यापेक्षा राजाला जरासे छेडून त्याला ताज्या घडामोडीवर आजचा सवाल विचारावा निघून जावे, असा खासा बेत त्याने रचला होता.

गाडी महामार्गाला लागताच वेताळाने आपले तोंड उघडले. तो म्हणाला, “ए राजा, परिवहन अधिकाऱ्यांनी गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये असा नियम केला आहे. केवळ बोलण्यासाठी तो लागू नाही. तरीही तू असा गप्प गप्प का?  दुचाकी चालकांना अद्याप टोल द्यावा लागत नाही, त्यामुळे तू मला नेण्यासाठी कितीदाही येऊ-जाऊ शकतोस. तरीही सत्ताधारी नेत्यांसारखे न बोलता तुला मुका कावा साधायचा असेलच, तर मी मात्र विरोधी पक्षांसारखा आवाज काढतच राहणार. त्यासाठी कितीदाही निलंबित होण्याची माझी तयारी आहे. कारण मेली कोंबडी आगीला भीत नाही. मग वेताळ कशाला निलंबनाला घाबरेल? मी तुला आता एक फर्मास कथा सांगतो. ती नीट ऐक.  मी त्या कथेवर आधारित एक प्रश्न विचारेन. त्याचे उत्तर कार्यक्रमानंतर एसएमएसद्वारे दे.”

इतके बोलून वाहतूक पोलिस जसे नियम मोडणाऱ्या वाहनांची वाट पाहात रस्त्याच्या कडेला उभे राहतात, तसा एक सहेतूक पॉज वेताळाने घेतला. मग तो महागाईसारखा सुटला, “एक नगरी होती. ती राज्याची राजधानी नव्हती तरी राज्याच्या राजधानीपेक्षा त्या नगरीचा तोरा जास्त होता. कारण राज्याच्या राजाचा, मंत्र्यांचा, सरकारी अधिकाऱ्यांचा, झालंच तर सरकारचाही खजिना भरण्याची ताकद त्या नगरीत होती. अशा या नगरीत राज्याच्या सगळ्या भागातून लोक येत होते. त्याबद्दल त्या नगरीच्या लोकांमध्ये नाराजी होती. त्यामुळेच नाराजीचे नाराजकारण करणारे पक्षही तिथे होते. ही नगरी उभी करण्यासाठी नगरीच्या लोकांनी दिलेल्या लढ्याचे उदाहरण पक्ष देत होते. तरीही नगरी आडवी करण्याऱ्यांना अडवण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती. नगरीबाहेरचे लोक याच्याविरूद्ध होते. आता पुढे काय झाले ऐक.

“या नगरीतून मोठे झालेले काही लोक होते. त्यांच्यामध्ये एक सच्छील असा खेळाडू होता. तोंडावर नियंत्रण असल्याबद्दल त्याची ख्याती होती आणि त्याची कामगिरीही चोख होती. राज्यात सगळीकडे त्याच्या नावाचा दबदबा होता. या नगरीच्या लोकांना त्याचा खास अभिमानही होता. आपला माणूस म्हणून त्याच्याकडे सगळे अपेक्षेने पाहायचे. एकदा काय झाले, कोणालाही अशक्य अशी प्रदीर्घ खेळी केल्याबद्दल या सच्छील खेळाडूचा सत्कार सगळ्यांनी आयोजित केला. राज्याच्या, नगरीच्या नव्हे हां, मुखंडांनी त्याला एका मंचावर ठेवले. याचवेळी बोलताना कधी नाही ते या सच्छील खेळाडूने जाहीर केले, की ही नगरी केवळ त्या नगरीच्या नव्हे तर सगळ्या राज्याची आहे. त्याच्या या वाक्याचा खूप गाजावाजा करण्यात आला. ज्येष्ठांनी टीका केली तर कनिष्ठांनी दुर्लक्ष केले. तर आता तू मला सांग, काहीही गरज नसताना या सच्छील खेळाडूने असा बाँबगोळा का टाकला?  गेला काही वर्षे त्याने फिरकी गोलंदाजी केलेली नाही म्हणून का असा दुसरा टाकला? माझ्या प्रश्नाचे उत्तर ताबडतोब दे, राजा नाहीतर तुझ्या या मतलबी मौनाचा मी कडक शब्दांत निषेध करीन. झालंच तर तुझ्या पुतळ्याचे दहन करीन. फेसबुकवरील तुझ्या सगळ्या मित्रांपर्यंत तुझे हे अपयश पोचवीन…” थेट प्रक्षेपण करताना वृत्तवाहिन्यांचे बातमीदार करतात तशी असंबद्ध बडबड करत वेताळ हातवारे करू लागला. तितक्यात कौटुंबिक मालिकांमधील पुरूष मंडळी करतात तसा मख्ख चेहरा करून राजा बोलला.

 

“वेताळा, अरे रिएलिटी शो आणि दररोजच्या मालिका सोडून हा तमाशा बघितल्यामुळे तुला हा प्रश्न पडला का? अरे, ज्या ठिकाणी, ज्या मंचावर हा प्रसंग घडला तो जरा आठवून पाहा बरे. त्यात मुळचे नगरीचे माणसं किती आणि नगरीबाहेरचे मात्र राज्यातील किती, याचा तू अंदाज घेतला का? या सच्छील खेळाडूला फारसे बोलून कधी माहित नव्हते, असे तूच म्हणतोस. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या मुलाखती घेणाऱ्यांनीही त्याला कधी राजकारणाचे प्रश्न विचारले नाहीत. मात्र त्या दिवशी माध्यमांच्या लोकांनी त्याला तावडीत घेऊन त्याला असे काही प्रश्न विचारले, की त्याला ते वाक्य बोलावेच लागले. वरच्यांना सांभाळण्यासाठी जे खालच्यांना दाबतात, त्यांनाच माध्यम म्हणतात हे तुला ठाऊक नाही का? भौगोलिकदृष्ट्या नगरी ही राज्याचाच भाग आहे, हे कोणीही बोलू शकतो. शिवाय वर्षातले आठ-दहा महिने नगरीबाहेर तेही राज्याबाहेरच काढणाऱ्या त्या खेळाडूला वास्तव परिस्थिती काय आहे, याचं ज्ञान असण्याची शक्यता किती?

“वेताळा, आपल्याला हवं ते कोणाकडून कसं बोलवून घेतलं जातं याचा एक उत्तम नमुना तुला माहित आहे का? सर्वोच्च धर्मगुरु पोप एकदा परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांचे विमान जमिनीला लागताच पत्रकारांनी त्यांना घेरले. पत्रकारांनी त्यांना विचारले, तुम्ही येथील वेश्यांना भेटणार का? त्यावर पोप उत्तरले, येथे वेश्या आहेत का? दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत ठळक मथळा होता, पोप विचारतात येथे वेश्या आहेत का? अशा परिस्थितीत त्या बिचाऱ्या खेळाडूचा दोष काय? त्याच खेळाडूचे दुसरे वाक्य होते, की त्याला या नगरीचा नागरिक असल्याचा अभिमान आहे. त्याला मात्र पत्रकारांनी कशी बगल दिली, हे तू पाहिले नाहीस काय? त्यामुळे वेताळा, या साऱ्या घटनेत त्या खेळाडूचा दोष किंचितही नसून त्याच्या तोंडून आपला अजेंडा राबवून घेणारे नगरीबाहेरचे पत्रकार  आणि अशा लोकांना तोंड देण्याचा खेळाडूला नसलेला अनुभव, या तेवढ्य़ा दोषी आहेत.”

राजाने आपले भाषण संपविले नाही तोच वेताळाने एक गडगडाटी हास्य केले. तो म्हणाला, “राजा, तू राजा असल्याने पत्रकारांना कसे हाताळावे तुला माहित आहे. त्यामुळेच तू काहीही बोलत नाहीस. मात्र वेताळ होण्यापूर्वी मीही पत्रकारच होतो. त्यामुळे गप बसणाऱ्यांना कसे बोलते करावे, हे मलाही माहित आहे. आता तू बोललास आणि मी चाललो. आता पुढल्या इलेक्शनपर्यंत मला असेच झाडावर मालिका पाहत बसू दे.”

इतके बोलून वेताळाने फटफटीवरून रस्त्यावर उडी मारली. विरूद्ध बाजूने जाणाऱ्या एका सहा आसनी रिक्षाला हात दाखवून त्याने ती थांबविली आणि राजाला कळायच्या आत तो रिक्षात बसलाही. भाज्यांचे वाढणारे भाव बघत राहावेत तसा राजा त्या रिक्षाकडे पाहत राहिला.