Saturday, August 4, 2012

मुख(दुर्बळ) मंत्री

prithviraj महाराष्ट्र अभूतपूर्व संकटातून जात असताना नेतृत्वाच्या पातळीवर अत्यंत सत्त्वहीन व्यक्तिमत्त्वे वावरत आहेत ही फार मोठी शोकांतिका आहे. राज्याला मुख्यमंत्री आहे, मंत्रिमंडळ आहे मात्र त्यांचे मुख्यत्व तर सोडाच पण मंत्रीत्वही दिसत नाही. ऑक्टोबर २०१० मध्ये 'आदर्श'च्या गोंधळानंतर अशोक चव्हाणांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण आले तेव्हा स्वच्छ प्रतिमेची पुण्याई त्यांच्या पाठीमागे होती. या स्वच्छ प्रतिमेचा अर्थ नाकर्तेपणा असल्याचे तेव्हा दुर्लक्षित झाले तरी दीड वर्षात ती बाब वारंवार उघडकीस आली.

नवे मुख्यमंत्री फायली मोकळ्या करत नसल्याच्या तक्रारी ऐकत एक वर्ष गेल्यानंतर डिसेंबर-जानेवारीच्या काळात महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांदरम्यान धरणांमधील पाण्याची उधळपट्टी झाली. फेब्रुवारीपासून राज्याला 'मुदतपूर्व' टंचाईच्या झळा जाणवू लागल्या. त्यावेळी पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याऐवजी आघाडीचे नेते या पापाचे फळ कोणाच्या पदरात पडेल याची चिंता वाहत होते. सिंचनाच्या प्रश्नावर श्वेतपत्रिका काढण्याची भाषा करून मुख्यमंत्री चव्हाण व अन्य काँग्रेसजनांनी शह द्यायचा आणि काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी उघड करून राष्ट्रवादीने काटशह द्यायचा, असा जंगी सामना दोन महिने चालला. अगदी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा कलगीतुरा चालू होता.

या दरम्यान पाण्यासाठी भटकंती करताना महिलांना जीव द्यावा लागला, गावेच्या गावे 'महाराष्ट्र नको अन्य राज्यांत जातो,' असे सांगू लागली तरी राज्यकर्त्यांना पाझर फुटला नाही. गेल्या दहा वर्षांतील आवर्तनाप्रमाणे पावसाने जूनमध्ये दडी मारली आणि जनतेच्या तोंडचे पाणी पळाले. तरीही सरकार नावाची यंत्रणा हलताना दिसली नाही. त्यानंतर तर अख्खे मंत्रालयच अग्नीदेवतेच्या हवाली करून मुंबईचे कारभारी भाड्याच्या इमारतींतून कारभार हाकू लागले. राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात राज्य झळाळून उठण्याऐवजी त्याला अशा झळांना सामोरे जावे लागले. राज्याचा मानबिंदू असलेल्या इमारतीत अनेक जीवनमरणाच्या प्रश्नांची होळी झाली, तेव्हा मुख्यमंत्री चव्हाण यांचे वक्तव्य होते, “नियमित अग्निशमनाची तालीम करत असल्यानेच जीवित हानी टाळता आली.” अग्निशमनाची नियमित तालीम होत होती, तर आग दुसऱ्या मजल्यापासून वर कशी पसरली हा प्रश्न विचारणारे नसल्याने त्यांचे फावले.

पुणे स्फोटाला दोन दिवस उलटल्यानंतर मुख्यमंत्र्यांना आज शहरात येण्याची आठवण झाली. त्यातही स्फोटांच्या जागी न जाता त्यांनी विश्रामगृहातच आढावा बैठक घेतली आणि खारूताईसारखे पत्रकारांना चेहरा दाखवून निघून गेले. या स्फोटांची चौकशी चालू असल्याने काहीच सांगता येत नाही, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. पत्रकारांनी चार-पाच वेगवेगळे प्रश्न विचारले, त्यात 'या हल्ल्यामागे अतिरेकी संघटना आहेत काय, तपास कुठवर आला आहे, पोलिसांना काही धागेदोरे मिळाले आहेत का, ' असे अनेक प्रश्न होते. या सगळ्यांना एकच उत्तर – तपास चालू आहे. तो पूर्ण झाल्यावरच बोलू.

मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारला - स्थानिक पोलीस आणि केंद्रीय अधिकारी विसंगत विधाने करत आहेत. त्याबद्दल काय सांगाल. त्यांचं उत्तर होतं - कोणीही सगळं सांगेल त्यावर विश्वास ठेवू नका. फक्त ऑफिशियल माहितीवर विश्वास ठेवा. अर्थात ऑफिशियल माहिती कोण देणार, हा प्रश्न त्यांनी टाळलाच. हा प्रश्न विचारण्यामागे कारणही तसेच होते. मॅक्डोनाल्डच्या बाहेर स्फोट झाल्यानंतर केवळ तासाभराच्या आत पुण्याचे आयुक्त राष्ट्रीय वाहिन्यांना फोनवर सांगत होते, की हा खोडसाळपणाचा प्रकार आहे. जंगली महाराज रस्त्यावर फिरणाऱ्या आमच्यासारख्या पत्रकारांना अधिकारी जवळ येऊ देत नव्हते आणि इकडे हा प्रकार चालू होता. मध्य प्रदेशातील एका वाहिनीने त्यावेळी मला विचारले, 'आपके कमिश्नर का तो ऐसा बयान आया है. वो कितना सिरियस है.'

इकडे घटनास्थळी काम करणाऱ्या पोलिसांना आणि आम्हा पत्रकारांना काय चाललंय याची कल्पना येत नव्हती आणि साहेब अशा घोषणा करण्यात व्यग्र होते. तिकडे केंद्रीय गृह सचिव सांगत होते, की हा दहशतवादी हल्ला आहे. आता यातल्या कोणाला अधिकृत मानावे, अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे?

अशा प्रकारे अडचणींच्या प्रश्नापासून पळण्याची दोन महिन्यांतील चव्हाण यांचा हा दुसरा प्रसंग. मे महिन्यात यशदामध्ये कुठल्याशा बैठकीसाठी आलेले चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेसाठी आम्हाला बोलाविले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारही सोबत होते. त्यावेळी श्वेतपत्रिकेचा सामना चांगलाच रंगला होता. त्यामुळे काहीतरी महत्त्वाचे ऐकायला मिळणार, असे वाटत असतानाच दोघाही नेत्यांनी पाच-पाच मिनिटांचे भाषण केले. 'पाण्याची टंचाई लक्षात घेऊन जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येतील. या संदर्भात लवकरच धोरण ठरविण्यात येईल. धरणातील साठ्याचे नियोजन करण्यात येईल,' अशी ठेवणीतील वाक्ये फेकून कुठलाही प्रश्न न ऐकताच मंडळींनी काढता पाय घेतला. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी एक-दोन ठिकाणी प्रश्नांचा सामना तरी केला, मात्र मुख्यमंत्र्यांना काही अजून ते जमलेले नाही. नाही म्हणायला परवा त्यांनी मोजक्या पत्रकारांपुढे आपण फाईली मोकळ्या करत असल्याची कैफियत मांडली, पण त्यातून त्यांची कार्यक्षमता दिसण्याऐवजी हतबलताच जास्त जाणवली.

कुठलेही नियंत्रण आणि इच्छाशक्ती नसलेला असा हा मुख्यमंत्री नव्हे मुखदुर्बळ मंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे. एका पृथ्वीराज चव्हाणाच्या अपरिपक्वतेमुळे भारतावर परकीयांच्या राज्याला वाव मिळाला. आता या पृथ्वीराज चव्हाणांमुळे काय होईल, हे काळच सांगेल.

Monday, July 30, 2012

Friday, June 29, 2012

पहिले पुस्तक

book cover 
गेली सहा महीने नोंदणावर काही लिहिले नाही. या दरम्यान अनेक घटना घडल्या, त्यावर लिहिण्याची इच्छाही झाली. परंतु, काही ना काही कारणाने लेखन काही झाले नाही. मात्र याच दरम्यान, 'जागतिकीकरणाची बदलती भाषा' या माझ्या पहिल्या पुस्तकाचे लेखन चालू होते. प्रिंट-ऑन-डिमांड या नवीन संकल्पनेद्वारे स्वतः प्रकाशित केलेले हे पुस्तक नुकतेच विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.
गेली दोन-एक दशके राजकीय आणि सामाजिक घडामोडी मी अगदी जवळून बघितल्या आहेत. त्यांतील काहींचा अर्थही माझ्या मगदुराप्रमाणे लावण्याचा प्रयत्नही केला आहे. महाराष्ट्रात पाणी टंचाई, जातीय विषमता आणि साखर कारखानदारी अशा काही नैमित्तिक घडामोडींच्या खालोखाल किंवा त्याहून कांकणभर अधिकच कुठल्या गोष्टीची चर्चा होत असेल, तर ती म्हणजे मराठी भाषेची, मराठी भाषकांची अस्मिता आणि त्यासाठी होणारी आंदोलने. या आंदोलनांचा विस्तार एका टोकाला शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पद्धतीचा धसमुसळेपणा तर दुसऱ्या टोकाला काही समर्पित कार्यकर्त्यांची, जगाला बावळट भासेल अशी मराठीसाठी तळमळ एवढा मोठा आहे. मात्र यांपैकी कुठल्याही एका टोकाला हालचाल सुरू झाली, की दरवेळेस मराठी माणसाची मानसिकता, जागतिकीकरण आणि संकुचितता अशा मुद्यांभोवती वाद-विवादांचा पिंगा सुरू होतो.
हळूहळू हा माझा अभ्यासाचा विषय बनला. अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यावर एक लेख मी लिहिला होता. तो कुठेही प्रकाशित झाला नाही. मात्र सात वर्षे झाली त्या विषयाचा मागोवा मी घेतच होतो. या मागोव्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, की हा विषय केवळ एखाद्या लेखाचा नाही. त्याला अनेक कंगोरे आहेत. त्यासाठी एक स्वतंत्र पुस्तक लिहावे लागेल. मग त्या लेखाचेच शीर्षक पुस्तकाला देऊन लेखनाचा ओनामा केला. पुस्तकाच्या निर्मितीमागे मात्र आमचे पूर्वीचे संपादक निधीश त्यागी यांची प्रेरणा होती. चांगला व अभ्यासू पत्रकार व्हायचा असेल, तर पुस्तक लिही, असं त्यांनी सातत्याने सांगितलं होतं.
मध्यंतरी काही घटना घडल्यामुळे मात्र हे काम मंदावले. मात्र एक वर्षाच्या परिश्रमानंतर पहिले पुस्तक तयार झाले. पुस्तकाच्या मजकुरासाठी मला मुख्यतः आधार घ्यावा लागला, तो वेळोवेळी आलेल्या बातम्यांचा. मात्र अनेकदा संदर्भासाठी कधी पुस्तकांचा तर कधी संशोधन निबंधांचाही वापर केला. शिवाय एक-दोन प्रसंगात इ-मेलद्वारे मुलाखतीही घेतल्या.
भाषा हा माझा आवडीचा विषय. सुदैवाने काही भारतीय आणि काही परदेशी भाषांमध्ये (इंग्रजीसकट! कुठल्या गटात टाकायचे तो निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यावा) गती असल्याने विविध भाषकांचे स्वतःच्या अस्मितेसाठी चाललेले झगडे गेली काही वर्षे नजरेखालून जात होते. जगातला असा कुठलाही भाग नाही, की जिथे स्वभाषेच्या रक्षणासाठी लोकांनी शांततामय, कायदेशीर तर कधी हिंसक असे मार्ग अवलंबिले आहेत. यात फ्रांसप्रमाणे ऐतिहासिक काळापासून स्वतःभोवती कुंपण घालणारा देश जसा आहे तसाच अगदी अलीकडेपर्यंत मोकळाढाकळा असलेला कॅनडासारखा देशही आहे.
मराठीतील प्रकाशन विश्वाची परिस्थिती एकुणात विचित्र म्हणावी अशीच आहे. या संदर्भातील दोन-तीन बातम्या मी स्वतःच दिल्यामुळे कुठल्याही प्रकाशकाकडे जावे अशी इच्छाही नव्हती आणि हिंमतही. सुदैवाने, परदेशात बऱ्यापैकी स्थिरावलेला प्रिंट-ऑन-डिमांड (मागणीप्रमाणे प्रकाशन) भारतात आलेला असल्याने त्याचाच लाभ घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मी जो अभ्यास केला, त्यात पोथी.कॉम या संकेतस्थळावर सर्वात किफायतशीर सेवा उपलब्ध असल्याचे जाणवले. अत्यंत सुटसुटीत सूचना आणि परवडेल अशा किंमती, यांमुळे पुस्तक तिथे देताना काहीच अडचण आली नाही. ऑक्टोबरमध्ये पुस्तकाच्या चाचणी प्रती आल्या आणि त्यातील दोष शोधणे, नवीन माहिती भरणे, बारीक-सारीक त्रुटी दूर करणे या कामाकडे लक्ष दिले. चाचणी प्रती सहकाऱ्यांना आणि ओळखीपाळखीतल्या काहींना दिल्या होत्या. त्यांच्याही सूचनांचा विचार केला. त्यात त्यावेळचे आमचे संपादक अनोष मालेकर यांचाही मोठा वाटा होता.
एक महिन्यापूर्वी पुस्तकाला अंतिम रूप दिले. पारंपरिक प्रकाशन नसल्याने प्रकाशन समारंभ इ. गोष्टी नाहीत. मात्र गेल्या आठवड्यात मंदार जोगळेकर यांच्या साहाय्याने हे पुस्तक बुकगंगा.कॉमवर ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध करण्यासाठी करार केला. त्यानुसार आजपासून ते बुकगंगावर समाविष्ट करण्यात आले आहे. त्याशिवाय पोथी.कॉमच्या संकेतस्थळावर ऑनलाईन खरेदीसाठीही ते उपलब्ध आहे. प्रकाशन खर्च आणि विक्रेत्यांचे कमिशन यांची सांगड बसत नसल्याने मात्र पुस्तक दुकानांत ते ठेवता आलेले नाही. 
छापील पुस्तक ऑनलाईन खरेदीसाठी -किंमत रु. १७०।-
ई-बुक खरेदीसाठी - किंमत रु. १००।-

Tuesday, May 1, 2012

महाराष्ट्र दिनाचा अनुत्साह

गेली अनेक दशके एक मे हा दिवस महाराष्ट्रात तरी ओळखला जातो तो शाळा-शाळांमध्ये लागणाऱ्या निकालांसाठी. एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल मे महिन्याच्या पहिल्या दिवशी लागतात. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवरसांची रांगोळी काढलेली दिसते. योगायोगाने याच दिवशी महाराष्ट्राचा स्थापना दिवस साजरा केला जातो. जातो म्हणण्यापेक्षा जायचा असं म्हणायची वेळ आली आहे.
महाराष्ट्र दिनाचा जो उत्साह अगदी अलीकडेपर्यंत दिसत होता तो गेली दोन वर्षे तरी दिसेनासा झाला आहे. दुष्काळाच्या अस्मानी संकटांपासून कायदा-सुव्यवस्था अभावाच्या सुलतानी जाचापर्यंत हर प्रकारची संकटे अवतीभोवती असताना तो उत्साह दिसावा, ही अपेक्षाही वावगीच म्हणायला हवी. सत्ताधाऱ्यांनी प्रगत आणि सुसंस्कृत राज्याचे कितीही मुखवटे चढवले तरी भोवतालची भीषण परिस्थिती लोकांच्या नजरेत येण्यावाचून राहत नाही.
राज्याच्या ५२ व्या स्थापना दिनाच्या केवळ दोन दिवस आधी जत तालुक्यातील एका गावाने महाराष्ट्राऐवजी कर्नाटकात सामील होण्याची ईच्छा व्यक्त केल्याची बातमी झळकली. इथे शेतकऱ्यांना सवलती मिळत नाहीत उलट कर्नाटकात दुष्काळग्रस्तांना मोफत वीज आणि विना व्याज कर्ज मिळत असल्याने गावकऱ्यांनी ती मागणी केली होती. महाराष्ट्र हे पुरोगामी, प्रगत आणि सामाजिक न्यायात आघाडीवर राज्य असल्याची वल्गना करणाऱ्या सर्वांनी आपली मान शरमेने खाली घालावी, अशी ती बातमी होती. प्रगतीचे सर्व दावे आणि अस्मितेच्या सगळ्या गप्पा त्या एका बातमीपुढे धुरकट होऊन गेल्या.
अशी मागणी ही पहिली वेळ नव्हती. गेल्या ऑगस्टमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील वैरागड येथील गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन गुजरात राज्यात समाविष्ट होण्याची मागणी केली. त्या गावकऱ्यांनी तर खुद्द नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहून आपली इच्छा कळविली होती. कायद्याच्या तरतुदींमुळे आणि प्रक्रियेमुळे अशा गोष्टी चटकन होत नाहीत, मात्र वारे कुठल्या दिशेने वाहतायत याचा अंदाज येण्यासाठी त्या पुरेशा आहेत.
गेल्या दशकात महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रांत अधोगती झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येत राज्य आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे कर्जबाजारी राज्यांच्या यादीतही महाराष्ट्र सर्वात वर आहे. केवळ व्याजाच्या हप्त्यापोटी राज्याला दर वर्षी रु. 20,000 कोटी द्यावे लागतात. या आकडेवारीच्या उप्परही जनतेला दैनंदिन भोगाव्या लागणाऱ्या अनेक कटकटी आहेत आणि त्यासाठी शासन-प्रशासन एकत्रपणे जबाबदार आहेत, याची खात्रीही जनतेला पटली आहे.
अशा परिस्थितीत महाराष्ट्र दिनाचा उत्साह जाणवेल तरी कसा?

Monday, November 14, 2011

पाट्या त्यांच्या आणि आपल्या

Charte de la langue français - L'OQLF lance une campagne pour le respect de la loi 101 dans l'affichage commercial
ओक्यूएलएफच्या अध्यक्षा लुईसे मार्शां (सौजन्यः रेडियो कॅनडा इंटरनॅशनल)

महाराष्ट्रात अन्य राजकीय मुद्दे नसले वा ते मुद्दे हाती घेणे राजकारण्यांना गैरसोयीचे असले, की मराठी पाट्यांचा प्रश्न उचलला जातो. चार-पाच इंग्रजी पाट्यांना काळे फासायचे आणि मराठीच्या नावाने चांगभलं करायचे, असा खेळ सुरू असतो. त्यात मग मंत्रीगणही भाग घेऊन मराठीची तरफदारी करू पाहतात. भारतातील अन्य राज्यांत असाच आट्यापाट्यांचा खेळ कसा चालतो, हे मी मागे लिहिले होते.  मात्र असाच प्रकार दूर देशीच्या कॅनडामध्येही होत आहे.

कॅनडा हा द्विभाषक देश. इंग्रजी आणि फ्रेंच या भाषांना तेथे समान दर्जा देण्यात आलेला. खासकरून क्युबेक प्रांतात  फ्रेंच भाषा ही कारभाराची आणि व्यवहाराची भाषा आहे.  मात्र क्युबेकमध्ये अलीकडे आलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या दुकानांवर इंग्रजी पाट्या लावल्यामुळे बिथरलेल्या क्युबेक सरकारने फ्रेंच पाट्या लावण्यासाठी खास मोहीम सुरू केली आहे. 

आजपासून (सोमवार) सुरू झालेल्या या मोहिमेसाठी पाच लाख डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. मोठ्या कंपन्या आणि साखळी आस्थापने यांच्यावर या मोहिमेच्या माध्यमांतून खास नजर ठेवण्यात येईल. ऑफिस क्युबेक्वा द ला लँग फ्रांसेज् (ओक्यूएलएफ) या फ्रेंच भाषेच्या राखणदार संस्थेच्या अध्यक्ष लुईसे मार्शां यांच्या मते, या कंपन्या वा दुकानांना इंग्रजी नावे लावता येतील मात्र त्यांच्यासोबत त्या नावाचे विवरण करणारे अथवा समानार्थक फ्रेंच शब्द असायला हवेत. इंग्रजी पाट्य़ांवर नियंत्रण ठेवले नाही, तर फ्रेंच भाषक समाज म्हणून क्युबेकची असलेली ओळख हरवेल, अशी भीती मार्शां यांना वाटत आहे.सध्यातरी नियम पाळण्यास सांगणे, एवढाच या मोहिमेचा हेतू आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास काय दंड करणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. 
 
या धोरणांतर्गत स्कोरस् या रेस्तराँच्या साखळीला तिचे इंग्रजी नाव वापरण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी rotisserie हा फ्रेंच शब्द वापरण्याची अट घालण्यात आली आहे.  चष्टमे आणि गॉगल्ससाठी प्रसिद्ध  असलेल्या द लूक या साखळी दुकानांना lunetterie - म्हणजे चष्म्यांचे दुकान हा शब्द लावण्यास सांगण्यात आले.  गेल्या आठवड्यात क्युबेकमधील फ्रेंच भाषेची अवनती होत असल्याचे गाऱ्हाणे मांडत सुमारे ५०० लोकांनी माँट्रियलमध्ये निदर्शने केली होती. त्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे व ती फेब्रुवारी २०१२ पर्यंत चालणार आहे. त्यासाठी www.respectdelaloi.gouv.qc.ca (कायद्याचा आदर करा) हे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करून त्यावर व्यावसायिकांना सर्व प्रकारची माहिती पुरविण्यात आली आहे. किमान ५० कामगार असलेल्या सर्व आस्थापनांना अधिकारी भेट देतील आणि आस्थापनांना बिल १०१चे पालन करण्यास सांगतील, असे ओक्यूएलएफने काल जाहिर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 
 
बिल १०१ हे क्युबेकने १९७७ साली संमत केलेल्या फ्रेंच भाषेच्या जाहीरनाम्याचे (ला शार्ते दि ला लँग फ्रांसेज) नाव आहे ज्याद्वारे त्या प्रांतात फ्रेंच भाषेचे संरक्षण करण्याची हमी देण्यात आली व ओक्यूएफची स्थापना करण्यात आली.