Sunday, November 9, 2014
अटीतटीचे राजकारण!
Tuesday, November 4, 2014
नवे मुख्यमंत्री बेबंदशाही थांबवणार का?
महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण दिले आहे. महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची सर्व जण फडणवीस यांच्याकडून अपेक्षा करत असले, तरी राज्याची गाडी रुळावर ठेवण्यासाठीच नव्या मुख्यमंत्र्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. बेबंदशाही या एका शब्दात वर्णन करता येईल, अशी परिस्थिती मागील सरकारने त्यांच्यापुढे ठेवली आहे. कायदा सुव्यवस्था असो का आर्थिक व्यवस्था, सगळीकडे आनंदीआनंद पसरला आहे.
फडणवीस यांनी शपथ घेतली त्याच दिवशी पुण्यात सहा मजली इमारत कोसळली. त्यात एक व्यक्ती दगावली. त्यापूर्वी आठ दिवस आधी अहमदनगर जिल्ह्यात दलित कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली. आधीच्या सरकारने घालून ठेवलेल्या घोळाची ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे.
स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणार, असे नवे मुख्यमंत्री ठासून सांगत आहेत आणि त्यांच्या आजवरच्या निष्कलंक चारित्र्याकडे पाहता ते खरे होईलही. परंतु राज्याच्या कारभारात जरब कशी बसवणार, हा प्रश्न त्यांना आधी सोडवावा लागेल.
कमळाच्या चिन्हावर घड्याळ्याची अनेक माणसे निवडून आली आहेत. शिवाय वर बिनशर्त पाठिंब्याचा टाईम बॉम्ब आहेच. त्यामुळे सरकारचा चेहरा बदलला तरी स्वभाव तोच राहीला, असे व्हायला नको. याचीही काळजी फडणवीस यांना घ्यावी लागणार आहे.
या उप्पर स्वपक्षातील नाठाळांना वठणीवर लावण्यातही तरुण मुख्यमंत्र्यांची ऊर्जा खर्ची पडणार आहे. गेल्या वर्षी भाजप राज्य कार्यकारणीची बैठक पुण्यात झाली होती. त्यावेळी स्थानिक भाजप नेत्यांनी केलेली हडेलहप्पी आणि पत्रकारांना गृहित धरण्याची त्यांची वृत्ती, यामुळे अनेक पत्रकारांनी फडणवीस यांच्या उपस्थितीतच वाभाडे काढले होते. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष या नात्याने त्यांनी त्यावेळी प्रत्यक्ष माफी मागितली होती.
त्यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या बेमुर्वतपणाबद्दल मी फडणवीस यांना इमेलही केला होता आणि त्यावर प्रत्युत्तरादाखल माफी मागणारा इमेलही केला होता. त्यातून त्यांचा प्रांजळपणा दिसला असला तरी ठिकठिकाणच्या अशा स्थानिक नेत्यांना ते कसे आवरणार, हा प्रश्नच आहे. कारण पुण्यातील भाजप नेत्यांच्या वर्तनात त्यानंतरही काही परिणाम पडलेला दिसला नाही. इतका की, ऐन निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
तेव्हा अशा सर्वच आघाड्यांवरील बेबंदशाही रोखण्याचे काम फडणवीस यांना करावे लागणार आहे. हे काम त्यांनी पार पाडावे, हीच मनापासून इच्छा आणि त्यांना शुभेच्छा!
Wednesday, October 22, 2014
सरकारहीन दिवाळीच्या शुभेच्छा!
यंदाच्या दिवाळीत राज्यात सरकार नाही. म्हणजे यंदाची दिवाळी सुखात जाण्यास हरकत नाही! सरकारहीन दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Monday, October 20, 2014
आता तरी शहाणे व्हा!
Wednesday, October 15, 2014
या मोदींचं काय करायचं?
लोकसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी जेव्हा प्रचारासाठी फिरत तेव्हा अन्य कुठल्याही विषयावर बोलायला तयार नव्हती. स्वतःचा कारभार, राज्याचे प्रश्न, लोकांचे म्हणणे यापेक्षा त्यांच्याकडे अधिक तातडीचा आणि अधिक महत्त्वाचा विषय होता - नरेंद्र मोदी.
त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा आहे, त्यांना केवळ केंद्रातील सत्ता हवी आहे, ते हुकूमशहा आहेत, ते देशात विभाजन घडवत आहेत अशा नानाविध आरोपांची राळ राज्यातील सत्ताधाऱ्यांनी उडविली होती. अर्जुनाला ज्याप्रमाणे केवळ पक्ष्याचा डोळा दिसत होता त्याप्रमाणे पुरोगामी लोकशाही आघाडीच्या नेत्यांना केवळ मोदी आणि मोदीच दिसत होते. बाकी कुठलाही मुद्दा त्यांच्या दृष्टीने रद्दबातल ठरला होता.
त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि लोकांनीही अन्य सर्व बाबी नजरेआड करून केवळ मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अन्य कोणतीच बाब पाहिली नाही. आपण मोदींवर जरा जास्तच लक्ष केंद्रीत केले, अशी उपरती आघाडीच्या नेत्यांनाही झाली तर विधानसभा निवडणुकीचा सागरही दगडांवर मोदीनाम लिहून तरून जाण्याचा मनसुबा भाजपच्या मंडळींनी केला.
साडेचार महिन्यांनंतर आज आघाडीच्या नेत्यांसमोर तोच प्रश्न उपस्थित राहिलेला दिसतोय. प्रदेश काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडताना ज्या दोन प्रचार पुस्तिका प्रकाशित केल्या, त्यातील एक संपूर्णतः मोदी सरकारवर केंद्रीत आहे आणि दुसऱ्या पुस्तिकेतील बहुतांश भाग मोदींवरच केंद्रीत आहे. यावरून दोन्ही काँग्रेस नरेंद्र मोदींनी केवढ्या पछाडल्या आहेत, याची कल्पना येऊ शकते.
त्यावेळी मोदी अलेक्झांडरच्या आवेशात फिरत होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे काँग्रेस-राष्ट्रवादीला शक्य होते. आज मोदी नेपोलियनच्या आविर्भावात राज्य करत आहेत. आघाडीच्या नेत्यांना काहीही वाटले तरी अद्याप तरी जनतेच्या मनातून पार उतरून जावे, असे काही त्यांनी केलेले नाही. उलट पाकिस्तानशी चर्चा थांबविण्यासारख्या त्यांच्या पावलामुळे त्यांची प्रतिमा आणखी उजळली आहे. मुख्य म्हणजे मोदींच्या धसक्याने दिल्लीतील नोकरशहा वेळेवर काम करू लागले आहेत, या एकमेव बातमीने सामान्य माणूस किती हरखून गेला असेल, याची आघाडीच्या नेत्यांना कल्पनाच नाही!
अशा परिस्थितीत मोदींना कसे हाताळायचे, ही विवंचना काँग्रेस-राष्ट्रवादीला आजही छळू शकते. एका युरोपियन परिकथेत पुंगीवाला येतो आणि शहरातील सर्व उंदरांना भुलवून आपल्यामागे नेतो. त्याचप्रमाणे अनेक पक्षांतील उंदीर या गारुड घालणाऱ्या पुंगीवाल्याच्या मागे जाण्यास उत्सुक आहेतच.
मोदी नावाचा हिंदू ही केवढी समृद्ध अडगळ आहे, याचा चांगला (खरे तर अगदी वाईट) अनुभव राज ठाकरे यांनी घेतला आहे. स्वतःच्या पक्षाचे नवनिर्माण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, यातच सारे काही आले. तेव्हा या व्यक्तीशी जुळवून घेणेही अवघड आणि थेट विरोध करणेही अवघड, अशी अवघडलेली परिस्थिती त्यांच्यावर आली आहे.
नागपूर आणि सोलापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमांच्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना याचा फटका बसला आणि पुन्हा या व्यक्तीचा सहवास नको, असे जाहीर करून ते मोकळे झाले. त्यांचं तरी काय चुकलं? गेली १५ वर्षे ते स्वतःसारख्याच नोकरशहा पंतप्रधानाला पाहत होते. आता अचानक त्यांनी राजकारणी पंतप्रधान पाहिला तेव्हा धक्का बसणारच.
भारतीय जनता ही भारतीय स्त्री सारखीच आहे. नेता भ्रष्टाचारी असो, निष्क्रिय असो किंवा हेकेखोर असो, जोपर्यंत तो त्यांच्याशी संपर्क राखून असतो, जनतेचा त्याच्यावर विश्वास असतो तोपर्यंत जनता त्या नेत्याच्या मागे राहते. शक्यतोवर त्याच्यासोबत नांदण्याकडे तिचा कल असतो. त्यात नेता स्वतःला स्वच्छ म्हणवून घेत असेल, काम करताना दिसत किंवा दाखवत असेल तर मग तर बोलायलाच नको. त्यामुळे शक्यतो कोणाला धुडकावून लावायचा भारतीय जनतेचा स्वभावच नाही. अगदीच कडेलोट झाला तर गोष्ट वेगळी.
याच कारणामुळे मुंदडा प्रकरणात खोलवर गुरफटलेल्या, आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी केवळ दीड वर्षाच्या अंतराने सत्तेत परतू शकल्या. बोफोर्समध्ये गुंतलेल्या राजीव गांधींना १९८९ मध्ये जवळपास २०० जागा मिळवता आल्या आणि १९९१ साली ते परत पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर होते. सतत चार वर्षे माध्यम आणि विरोधकांच्या तोफखान्याला तोंड देऊनही अशोक चव्हाण मराठवाड्यात स्वतःचे वर्चस्व कायम ठेऊ शकतात. कर्नाटकात येडियुरप्पा, तमिळनाडूत जयललिता आणि प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी हेच दाखवून दिले.
महाराष्ट्रात आज जर कोणत्या गोष्टीचा अभाव असेल तर नेमक्या या गोष्टीचा. इथल्या नेत्यांवर जनतेचा सोडा, त्यांच्या कार्यकर्त्या आणि अनुयायांचा विश्वास नाही, तेथे बाकींच्याची काय कथा. स्वतःचे काम नाही आणि इतरांचा विश्वास नाही, अशा परिस्थितीत झोडपायला एक बरे खेळणे म्हणून मागच्या वेळी त्यांना नरेंद्र मोदींचा वापर करता आला. यावेळी ते मोदींचं काय करणार?
(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. ही नोंद आपण येथेही वाचू शकता.)
Tuesday, October 14, 2014
...खग भेणे वेगळाले पळाले!
महाराष्ट्र हे प्रवासी पक्षांचे राज्य म्हणून ओळखला जाते. हिवाळ्यात थंडी जाणवू लागली, की हिमालयातून किंवा अगदी रशिया, सायबेरिया अशा प्रांतांतून पक्षी उडत येतात आणि उष्ण वातावरणात काही काळ काढून आपल्या देशात परत जातात. या पक्ष्यांनाही अचंबा वाटावे, असे काही प्रवासी पक्षी निवडणुकांच्या हंगामात आपले पक्ष बदलून कुंपणाच्या पलीकडे उडी मारतात आणि राजकीय वारे फिरले, की परत आपल्या जागी जातात. कालपर्यंतचे बगळे आज कावळे होतात आणि आजचे कावळे उद्या बगळे होतात. सत्तेची ऊब हे त्यांचे एकमेव लक्ष्य असते.
लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची जी वाताहत झाली, त्याचा धसका घेऊन त्या शिविरातील डझनावारी नेत्यांनी आपल्या टोप्या फिरविल्या आहेत. खरं तर गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळी या दोन सणांच्या दरम्यान, ऐन पितृपक्षात, पक्षांतराचा हंगामच सुरू झाला आहे. गेली 15 वर्षे सत्ता भोगणारी मंडळी आता सत्ताबदल होणार, अशी शंका मनात येताच धडाधड कुंपणाच्या पलिकडे उडी मारू लागली आहेत. दुसरीकडे भगव्या झेंड्याखाली नांदणाऱ्या काही मंडळींनीही अचानक धर्मनिरपेक्षतेची दीक्षा घेतली आहे. मात्र त्यांची संख्या आणि चेहरे किरकोळ आहेत.
बबनराव पाचपुते, भास्करराव पाटील खतगांवकर, प्रताप पाटील चिखलीकर, विजयकुमार गावित लोकांनी कमळाच्या आश्रयाखाली जाण्याचा निर्णय घेतला आहे. कमळाच्या पानावरील जलबिंदू ओघळावेत एवढ्या सहजतेने हे नेते आपापले पक्ष सोडून नवीन पक्षाची पायरी चढले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश करून या सर्वांवर कडी केली. हत्ती खड्ड्यात पडला म्हणजे वटवाघूळ सुद्धा त्याला लाथ मारते, अशा अर्थाची एक बंगाली म्हण आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांना ही म्हण माहीत असण्याची शक्यता धूसर असली, तरी तिचा अर्थ आज नक्कीच जाणवत असणार.
रघुनाथ पंडितांनी नलोपाख्यानात नल राजा आल्यानंतर हंसांची जी त्रेधातिरपिट उडाली होती, त्याचे वर्णन केले आहे. त्यात त्यांची 'तदितर खग भेणे वेगळाले पळाले' अशी एक ओळ आहे. नल राजा येताच भीतीने गाळण उडून सगळे हंस मिळेल त्या दिशेने उडाले', असे ते म्हणतात. आपल्या या प्रवासी पक्ष्यांची गती नेमकी अशीच आहे. त्यांच्या या राजकीय उड्डाणाचे याहून समर्पक वर्णन करणारी ओळ दुसरी सापडणार नाही.
कुठल्याही दूषित गोष्टीवर गोमूत्र शिंपडून तिची शुद्धी करता येते, अशी भारतीय (मुख्यतः हिंदू) समाजात समजूत आहे. कालपर्यंत ज्यांच्या विरोधात कंठशोष केला, त्याच मंडळींना पावन करून घेताना भाजपेयींनी कुठले गोमूत्र वापरले माहीत नाही. मात्र नांदेडची जिल्हा बँक बुडविणारे खतगांवकर आणि नंदूरबार जिल्ह्यात घराण्याची सत्ता प्रस्थापित करणारे गावित भगवे उपरणे घालताच कसे काय स्वीकारार्ह होतात, हे गौडबंगाल जनतेला समजले तर त्यांच्या प्रबोधनात भरच पडेल.
इटालीच्या जनतेला फॅसिस्ट विचारसरणीची भूल देताना मुसोलिनी म्हणाला होता, "आपले लक्ष्य केवळ राष्ट्र असले पाहिजे. बाकी सर्व गोष्टी अनुषंगिक आहेत". आपल्या पुरोगामी, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, समतावादी, राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी, प्रखर राष्ट्रीय, देशभक्तीचा अंगार इ. इ. पक्षांनी एक नवीन मंत्र दिला आहे, "काहीही करून खुर्ची मिळवा, बाकी सर्व गोष्टी अनुषंगिक आहेत". मग विचारसरणी, तत्वे आणि इतिहास अशा क्षुल्लक गोष्टींची चाड बाळगण्याची गरजच काय?
कालपर्यंत ज्यांच्या विरोधात आरोपांची राळ उडविली, ज्यांच्या विरोधात आंदोलने केली आणि ज्यांना घालवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, त्यांचीच गळाभेट घेताना ही मंडळी तीळमात्रही कचरत नाहीत. नाहीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र दिलेलाच आहे 'सबका साथ, सबका विकास'. त्याची तामिली ही अशी चालू आहे.
असे म्हणतात, की या जगात प्रलय आला तरी झुरळ हा एकमेव प्राणी त्यात तग धरून राहू शकतो. याचे कारण कोणत्याही परिस्थितीत चिकाटीने राहण्याची झुरळाची शक्ती अपार असते. सत्ता कोणत्याही पक्षाची असो, खुर्चीवर बसणारी व्यक्ती तीच असते, तेव्हा शास्त्रज्ञांचे हे निरीक्षण खोटे नसल्याचे जाणवते.
एक प्रश्न राहून राहून समोर येतो - निवडणुका हा एखादा बोधिवृक्ष आहे का, की ज्याच्या जवळ आल्यावर या लोकांना आत्मसाक्षात्कार कसा काय होतो? जिथे 10-10 वर्षे काढली त्या पक्षात आपले कोणी ऐकत नाही, पक्ष धनदांडग्यांच्या ताब्यात गेला आहे, आपली मुस्कटदाबी होत आहे, असे एकाहून एक शोध यांना लागतात. ज्या पक्षाच्या बळावर आमदारकी-खासदारकी भोगली तिथेच त्यांची घुसमट होत असल्याचा साक्षात्कार होतो. जनतेच्या प्रश्नांबद्दल वर्षानुवर्षे अनभिज्ञ असलेल्या लोकांना, कुठल्याही प्रश्नावर 'मी माहिती मागवली आहे, माहिती घेऊन सांगतो' असे साचेबद्ध उत्तर देणाऱ्यांना, वातानुकूलित कक्ष आणि स्कॉर्पियो-हमर यांसारख्या गाड्यांमध्ये वावरणाऱ्यांना घुसमटीची जाणीव करून देणाऱ्या त्या निवडणूक नामक बोधिवृक्षास नमस्कार असो!
(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. ही नोंद आपण येथेही वाचू शकता).
Monday, September 15, 2014
'जागा'ते रहो!
हवामान बदलाच्या प्रक्रियेमुळे 'नेमेचि येतो मग पावसाळा' ही उक्ती आता नको एवढी खोटी पडू लागली आहे. निवडणुकांचे मात्र तसे नाही. देशात निवडणूक आयोग नावाची संस्था सुदैवाने अद्याप कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळी, म्हणजे एका महिन्यात, होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांचे वायदे बाजार आणि घोडा बाजार सुरू झाले आहेत आणि राजकारणाचा मासळी बाजार झाला आहे.
ऐन कुस्तीत शरीराला भिडण्यापूर्वी प्रतिस्पर्धी पैलवानांनी शब्दांनीच एक दुसऱ्याचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न करावा, तसे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे चार मुख्य पक्ष एकमेकांचे उणीदुणी काढत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष नावाचा आणखी एक खेळाडूही या स्पर्धेत आहे मात्र त्याची दखल घेण्याची गरज असल्याचे बाकीच्या चारही जणांना वाटत नाही. याचे कारण भाजप-शिवसेनेला लागलेले सत्तेचे डोहाळे, काँग्रेसची झालेली गर्भगळीत अवस्था आणि जन्माला येणारे सत्तेचे बाळ कोणत्याही रंगाचे असले तरी त्याच्याशी जुळवून घेण्याची राष्ट्रवादीची नीती! जनमताचे क्रेडीट कार्ड हरविलेल्या मनसेच्या हाती भावी सध्यातरी 'ब्ल्यू प्रिंट'शिवाय काहीही नाही.
'संशयकल्लोळ' नाटक लिहिणारे गोविंद बल्लाळ देवल आज असते, तर त्यांनाही भोवळ आली असती, अशी आजची परिस्थिती आहे. दोन काँग्रेसचा काडीमोड होणार का नाही इतकाच शिवसेना-भाजप त्यांच्या नव्या सहकाऱ्यांसोबत एकत्र नांदतील का, हाही अवघड प्रश्न बनला आहे. 'बिग बॉस'च्या सर्व सत्रांना पुरून उरेल एवढा मसाला त्यात आहे. शिवाय या दोन्ही जोड्यांपैकी कोणता जोडीदार कोणाशी लगट करेल, हेही सांगता येणार नाही. तेव्हा जागावाटपाच्या नावाने डोळे वटारणे, हा केवळ बहाणा आहे. खरी कारणे दोनच – एकमेकांवरील अविश्वास आणि कार्यकर्ते टिकवून धरण्याची गरज.
कोण कोणाला डोळे मारतंय, कोण कोणासोबत जाईल आणि कोण कोणाला फटका करील, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. 'आज जो कोणी गोंधळलेला नाही त्याला बहुधा काहीच माहीत नाही' (Anybody who is not confused here probably does not know anything) असे एक प्रसिद्ध वचन आहे. ज्याला कोणाला याची प्रचिती घ्यायचीय, त्यांनी एखाद्या दिवशी वर्तमानपत्र पाहावे किंवा दिवसभर मराठी वृत्तवाहिनी पाहावी.
1984 साली केवळ दोन खासदार निवडणून आल्यानंतर स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी "कमळाबाईचीही तब्येत आताशा फारशी चांगली नाही" अशा शब्दांत हिणवलेली भाजप आज अर्ध्या जागा मागत आहे. 1999 साली स्वाभिमानाचे उबळ आल्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन 15 वर्षे त्यांच्यासोबत सत्ता भोगणारी राष्ट्रवादीही अर्ध्या जागा मागते. राष्ट्रवादीने सगळ्या जागांच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यामुळे रागावलेली काँग्रेस सगळ्या जागांसाठी मुलाखती घेण्याचे जाहीर करते. सत्ताधाऱ्यांचे गलबत सोडून येणाऱ्या सर्व मुशाफिरांना सामावण्यासाठी भाजप सगळ्या जागांवर डोळा ठेवते आणि अवचित मिळालेल्या यशामुळे फुरफुरणाऱ्या मावळ्यांच्या समाधानासाठी शिवसेनाही सर्वच्या सर्व जागा लढविण्याची भाषा करते. अन् हे सर्व करून झाल्यावर टाळकऱ्यांनी 'बोला पुंडलिक वरदा हsरी विठ्ठल' म्हणावे तेवढ्याच मानभावीपणे 'आमची युती/आघाडी अभेद्य आहे', असा पुकारा ही मंडळी करतात.
सेना-भाजपची आणखी वेगळीच गोची आहे. गळ्यात गळे आणि मनात अविश्वास बाळगून फिरणाऱ्या या दोन पक्षांची ही वादावादी राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या हातात वाटाण्याच्या अक्षता देण्यासाठीचे नाटक तर नाही ना, हाही एक मुद्दा आहेच.
सगळ्याच पक्षांच्या दृष्टीने ही भाषा समजण्यासारखी आहे. लोकसभेत झालेल्या शिरकाणानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेते व कार्यकर्त्यांचे मनोबल जे घसरले ते सावरण्यासाठी त्यांना "जास्तीत जास्त जागां"चा पुकारा करणे आवश्यकच होते. नाहीतर आधीच काही मंडळी कमळाच्या नादाला लागलेली आणि उरलेलीही जाण्याची शक्यता. त्यामुळे स्वतःच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्याच तंबूत ठेवण्यासाठी त्यांना काही दिले नाही तर दिल्यासारखे तर करावे लागेल. नाही म्हणायला, राष्ट्रवादीच्या दृष्टीने हा खेळ जरा गंभीर आहे. उलट भाजप-सेनेला ऐनवेळी कार्यकर्ते नाराज होऊन चालण्यासारखे नाही, कारण आता त्यांनी काम केले नाही तर "अभी नहीं तो कभी नही" अशी त्यांची स्थिती!
दर निवडणुकीच्या आधी असा घोळ घालणे आता सवयीचे झाले आहे. मात्र यंदाची बातच निराळी आहे. म्हणून 'जागा, जागा'चे जे हाकारे आज ऐकू येत आहेत, त्यांच्यामागे होतकरू बंडकर्यांना जागच्या जागी रोखणे, कुंपणावरील लोकांना थांबविणे आणि मुख्य म्हणजे लोकांचे मनोरंजन करणे हे उद्देश नाहीत, असे नाही. शेवटी लोकांचे रंजनही हेही लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहेच ना!
(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेत प्रसिद्ध झालेली माझी नोंद. ही नोंद येथे उपलब्ध आहे).