Wednesday, August 8, 2007

मी एक "हॅम्लेट'

"टू बी ऑर नॉट टू बी'...हा चिंरतन प्रश्‍न शेक्‍सपिअर नामक नाटककाराच्या "हॅम्लेट' या नाटकात आहे. केवळ या नाटकात आहे, असे नव्हे तर नाटकाचा नायक असलेला डेन्मार्कचा राजकुमार हॅम्लेट याच्याच तोंडी तो घातला आहे. स्वतःच्या अस्तित्वाबाबत ही प्रश्‍न पडण्याची सवय सर्वच मोठ्या माणसांना असते. तशी ती मलाही आहे. त्यामुळेच मलाही प्रश्‍न पडला आहे. पण तो जगावं की नाही, असा प्रश्‍न नाही. मी अशा किरकोळ प्रश्‍नांचा विचार करत नसतो. मला पडलेला प्रश्‍न अगदी वेगळाच आहे..."अक्षरशः' वेगळा!

लिहावं की लिहू नये...हाच तो शाश्‍वत प्रश्‍न. हा प्रश्‍न पडण्याची कारणंही आहेत. लिहिलं तर अनेकजण दुखावतील, न लिहिलं तर अनेक दुखणी जागच्या जागी राहतील.लिहिलं तर लिहावं लागंल राम गोपाल वर्माच्या "शोले'वर आणि त्याने केलेल्या या चित्रपटाच्या विटंबनावर. अमिताभ आणि धर्मेद्रचं त्यानं काही केलं असतं, तरी चाललं असतं. पण संजीवकुमारच्या भूमिकेत मोहनलालला उभा करून दोघांचेही "कार्टून' करण्याची कला केवळ वर्माच जाणे. हात तोडलेला ठाकूर पाहण्याऐवजी आता केवळ बोटे छाटलेला "एन्काऊंटर स्पेशालिस्ट' पाहावा लागेल...तेही दाढीवाला. चार राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा आणि आजपर्यंत एकाही "रिमेक'मध्ये काम केलेला मोहनलाल आता राम गोपालाच्या "काल्यात' दिसणार.

न लिहावं तर हिमेश रेशमियाची गाणी सगळीच लोक ऐकतात म्हणून मीही ऐकत असावा, अशी लोकांची समजूत व्हायची. सानुनासिक आवाजाद्वारे कानांवर अत्याचार करण्याची किमया एकेकाळी कुमार सानू या अतिलोकप्रिय गायक महाशयांकडे होती. मात्र त्यावेळी किमान मोबाईल नामे संपर्कयंत्रावर आसमंत चिरणाऱ्या आवाजात वाद्यांचा जमेल तेवढा गोंगाट करणारे गाणे वाजविण्याची सोय नव्हती. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यांवर आणि वाहनांमध्ये तरी "सायलेंस झोन' असायचे. मात्र सानू यांना समोर दिसत असलेली मात्र त्यांचा सूर न लागलेली, "बेसूर'तेची पातळी ओलांडून "भेसूर'ते कडे झुकलेली पट्टी लावण्याचा मान रेशमिया यांच्याकडे जातो. संगीतप्रेमी भारतात रेशमिया यांच्यामुळे संगीत कसे नसावे, याचे नवे वस्तुपाठ दिले जात आहेत.

लिहिलं तर लिहावं लागंल मराठीत दररोज प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांवर आणि न खपल्यामुळे त्यांच्या पडून असलेल्या गठ्ठ्यावर. लोकांना न परवडणाऱ्या किंमतींमध्ये पुस्तकं काढायची आणि ती कोणी घेत नाही म्हणून रडत बसायचं, ही प्रकाशकांची "स्ट्रॅटेजी' काही औरच. मजकुराच्या दर्जाकडे न पाहता केवळ प्रसिद्ध झालेल्या नावांवर विसंबून पुस्तकं काढण्यात त्यांचा हात कोण धरणार? नव्या पुस्तकांची केवळ पाच हजारांची आवृत्ती काढून, त्याचा प्रकाशन समारंभ करण्याची हातोटी केवळ मराठी प्रकाशकांकडेच कशी काय बुवा? पुस्तकांच्या जाहिरातीही पुणे-मुंबईच्या वृत्तपत्रांमध्ये छापून मराठी वाचकं पुस्तकच वाचत नाहीत, हा "अभ्यासपूर्ण' निष्कर्ष कोण काढणार?

न लिहावं तर मराठी वृत्तवाहिन्यांच्या गमती जमती कशा कळणार कोणाला. "डोंबिवली फास्ट'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्यावर निशिकांत कामत यांची मुलाखत घेऊन, "आता मराठी सिनेमा जागतिक पातळीवर जायला हवा,' अशी मुलाखतीची जुनी टेप लावणारा "माझा' चॅनेल कोणी पाहिला नाही ना? हैदराबादमध्ये घडलेल्या घटनेचे चित्रण आणि बातमी थेट हिंदी भावंड वाहिनीवरून प्रक्षेपित करणारे "24 तास' मराठीपण जपल्याचे लोकांना कसं कळणार? दिवसभर काय घडलं यापेक्षा दिवसभरात काय घडणार, हे ग्रह-ताऱ्यांच्या गणितावरून उपग्रह वाहिन्या लोकांपर्यंत किती तत्परतेने पोचवितात, हे लिहिल्याशिवाय लोकं जाणणार तरी कसं?

लिहिलं तर लिहावं लागंल भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंड दौऱ्यात मिळालेल्या यशाबद्दल आणि त्यातून निघणाऱ्या निष्कर्षाबद्दल. देशी-परदेशी प्रशिक्षकांच्या हाताखाली खेळताना धुळधाण उडवून घेणारा हा संघ विलायतेतील दमट वातावरणात दमदारपणे खेळतोय ही आनंदाचीच गोष्ट आहे. पण प्रशिक्षक नसतानाच त्याला हा सूर का गवसावा? संघाच्या यशासाठी "कोच' नकोच, असा गुरुपाठ तर संघ देत नाही ना?

न लिहिलं तर लपून जाईल मॉलमुळे येणारी बाजार संस्कृती आणि त्यामुळे ग्राहकांना "डिमोरलाईज' करण्याचा दुकानदारांचा हिरावणारा हक्क. मॉल आले तर ग्राहक स्वतःच माल पाहून घेईल. "किती पाहिजे,' म्हणून पायरी चढायच्या आतच त्याला क्षुल्लक असल्याची जाणीव करून देणाऱ्यांची ती उदात्त भूमिका जगापुढे कशी येणार? मॉलमध्ये हजार-बाराशे रुपयांची नोकरी मिळते, दुकानात सामानाची पोते उचलण्यापासून पुड्या बांधण्यापर्यंत राबवून घेऊन, आठशे-नऊशे रुपयांचा पगार देण्याची सामाजिक दानत असणाऱ्यांची बाजू पुढे कशी येणार? मॉलमध्ये एकावेळेस अनेक वस्तू असतात, दुकानात केवळ एकाच कंपनीच्या वस्तू भरून ठेवून "घ्यायती तर घ्या नाही तर जा,' असं म्हणण्याची पारंपरिक शैली कशी जपली जाणार...
असं लिहिण्यासारखंही भरपूर आहे, अन्‌ न लिहिण्यासारखंही भरपूर आहे...पण अलिकडे भावना दुखावण्याचं प्रमाण वाढल्यामुळे काय लिहावं अन्‌ काय लिहू नये, या विवंचनेत मी पडलो आहे. त्यामुळे माझा झाला आहे "हॅम्लेट'...लिहावं की लिहू नये, हा माझा संभ्रम आहे. वाचावं की वाचू नये, हा संभ्रम तुम्हाला पडू नये, हीच अपेक्षा आहे.

Sunday, August 5, 2007

मोरूचा तुरुंगवास...अन्‌ अज्ञातवासही

प्राथमिक सूचना ः सत्यघटनेवर आधारित

मोरू नेहमीप्रमाणे सकाळी झोपेतून उठला आणि आंघोळ करून तयार झाला. आज त्याला न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेप्रमाणे तुरुंगात जायचे होते. घरच्या लोकांनी त्याला निरोप देण्याची जय्यत तयारी केली होती. सोसायटीतलं एक उनाड कार्टं म्हणून त्याची शहरात ओळख होती. त्याच्या घरच्या लोकांना त्याचा कोण अभिमान! खासकरून सोसायटीचे सेक्रेटरी असलेले त्याचे बाबा तर त्याच्यावरून जीव ओवाळून टाकत असत. इतका की ते स्वतः बाबा असून ते मोरुलाच बाबा म्हणत. त्यामुळे पुढे दादा झाला तरी मोरूला सर्वजण मोरूबाबाच म्हणत.आजपर्यंत मोरूला कधी "आत" जावं लागलं नव्हतं. नाही म्हणायला "डिपार्टमेंट'नं एक दोनदा "राडा' केल्याबद्दल त्याला उचललं होतं आणि रात्रभर "लॉक अप'मध्येही ठेवलं होते. त्यावेळी "मामू' लोकांनी त्याची केलेली धुलाई त्याला अजून आठवत होती. एकदा तर त्याला पाकिटमारीबद्दल सात दिवस कस्टडीतही ठेवलं होतं. त्याच्या बाबा, आई आणि बहिणीने त्यावेळी आकाशपाताळ एक करून त्याला ठाण्याबाहेर (आणि माणसांतही) आणलं होतं. आई-बाबांची परवानगी न घेता तेव्हा महाग असलेली कॅडबरी खाण्याबद्दल आणि कॅडबरी विकत घेण्यासाठी बाबांचे पैसे चोरल्याबद्दल त्याला एक दोनदा शिक्षा झाली होती. त्याची चॉकलेटची सवय सुटण्यासाठी त्याला काही दिवस दवाखान्यातही ठेवलं होतं.

त्यानंतर काही दिवस मोरूबाबा सुधारला. शहरातल्या त्याच्यासारख्याच लोकांनी चालविलेल्या नाटकमंडळीत तो काम करत होता. त्याला कामेही मिळत गेली. त्यामुळे तो लोकप्रिय असल्याचे मानण्यात येत असे. असा हा मोरूबाबा आज तुरुंगात खडी फोडायला पहिल्यांदाच जात होता. नाटकमंडळीतले काही दोस्त आणि त्याच्या सोसायटीतील टोळीतील काही मित्र यांच्या सौजन्याने त्याने काही फटाके आणले होते. त्यातील सुतळी बॉंब, रॉकेट वगैरे त्याने बिचाऱ्याने उदार मनाने मित्रांना वाटली आणि एक पिस्तूल तेवढे स्वतःजवळ ठेवले. नेमके त्याच्या मित्रांनी उडविलेल्या फटाक्‍यांनी सोसायटीतल्याच काही लोकांना इजा झाली, काही जणांच्या घरातील पडदे जळाले. त्यांनी दुष्टपणे मोरूला त्यात गोवून न्यायालयात गोवले. न्यायालयानेही फारशी दयाबुद्धी न दाखवता त्याला तुरुंगात धाडण्याचा निर्णय दिला. तो निकाल लागता लागताच मोरूचे बाबा ही कालवश झाले.

तुरुंगाच्या मोहिमेवर निघालेल्या मोरूच्या हातावर त्याच्या बहिणीने साखर ठेवली. बाबांच्या तसविरीजवळ जाऊन त्याने तसविरीला नमस्कार केला. पोलिसांच्या गाडीतून मोरू रवाना झाला तेव्हा त्याच्या जीवलगांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. मोरूच्या जीवनातील इथपर्यंतच्या घटना कायद्याच्या आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने सामान्य आहेत. त्याने गुन्हा केला आणि त्याची शिक्षा त्याला व्हायलाच हवी, याबाबत सर्वांचे एकमत होते. मात्र खरी मजा पुढेच आहे. मोरूला तुरुंगात ठेवले मात्र त्याला कोणत्या तुरुंगात ठेवले, त्याने दरवाजातून कोणता पाय आधी पुढे ठेवला याची कोणीही बातमी दिली नाही. जाताना तुरुंगाच्या रखवालदाराला त्याने बिडी मागितली की नाही, याची चर्चाच झाली नाही. तुरुंगात मोरूला त्याच्यासारख्याच एका सच्छील चारित्र्याच्या सज्जन पुरुषाच्या संगतीत ठेवले होते. त्याबद्दल कोणीही चकार शब्द काढला नाही. तुरुंगात जाताना मोरूने आपल्या चाहत्यांकडे (आणि त्याला पैसे पुरविणाऱ्यांकडे) पाहून हातही हलविला नाही. (त्यामुळे त्यांना हात हलवत परत यावे लागले.) मोरूला मुख्य तुरुंगातून केवळ महनीय व्यक्तींना ठेवण्यात येणाऱ्या "पुण्यनगरीत' पाठविण्यात आले. त्यावेळी त्याच्यामागे शिकारी कुत्र्यांप्रमाणे एकही वार्ताहर, माध्यम प्रतिनिधी किंवा कॅमेरामन गेला नाही. मोरू ज्या किरकोळ कॅटॅगिरीतला गुन्हेगार होता, त्या कॅटॅगिरीच्या मानाने ही वस्तुस्थिती भयंकर होती.

पुण्यक्षेत्रातल्या तुरुंगात आल्यानंतरही मोरूकडे होणारी अक्षम्य हेळसांड चालूच होती. इथे आल्यानंतर त्याने किती वाजून किती मिनिटांनी कोठडीचे दार उघडले, फरशीवर बसताना त्याच्या तोंडातून कण्हण्याचा आवाज कसा येत होता, याची दखल कोणीही घेत नव्हतं. त्याने काय खाल्लं, पोळीचे किती तुकडे करून त्याने किती घास खाल्ले याचीही गणनाच कोणीच करत नव्हतं. भावी पिढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी ही ऐतिहासिक माहिती देण्याची तसदी घ्यायला कोणीही तयार नव्हतं. हीच ती भारतीय लोकांची मागास मानसिकता.

आता मोरूला याच तुरुंगात काही दिवस काढायचेत. पण इतके दिवस रात्रीच्या रात्री नाटकं करून त्याच्या प्रकृतीवर परिणाम झालेला अन्‌ त्यात हा तुरुंगवास, त्यामुळे त्याचा रक्तदाब वाढला. याची कोणीतरी नोंद घ्यायची? तर तेही नाही. मोरूला तुरुंगातल्याच डॉक्‍टरकडून उपचार चालू आहेत. हे वृत्त बाहेरच्या लोकांना समजायला नको? आता मोरूकडे होणाऱ्या या अमानवी दुर्लक्षामुळे त्याच्या नाजूक जिवाला किती यातना होतायत, याची तुम्ही कल्पना करू शकता. तरीही तुम्हाला म्हणून सांगतो, तो आल्यावर याचा जाब विचारणार नाही. कारण आता तो तुरुंगात महात्मा गांधींच्या साहित्याचे परिविलोकन करतोय. हेही लोकांना कळायलाच हवं. त्याशिवाय त्याचा गुन्हा किती "मामू'ली होता, हे स्पष्ट होणार नाही. तो परत येणार. आतापर्यंत त्याने अनेक खोड्या केल्या. शाळेत, कॉलेजमध्ये (होता तितके दिवस), सोसायटीत...प्रत्येक खोडीनंतर त्याने मनापासून सर्वांची माफी मागितली आणि "जादू की झप्पी' देऊन सर्वांना खूषही केले. आताही तो असेच करणार आहे. फक्त त्याच्याकडे अगदी ढुंकूनही न पाहणाऱ्या या लोकांकडे पाहून तो म्हणेल, ""हे राम!''

Friday, August 3, 2007

दिग्दर्शनाचा ‘नायक’

सेट मॅक्स वाहिनीच्या कृपेने अनिल कपूरचा नायक हा चित्रपट अलिकडे दर दोन दिवसांनी पहायला मिळत आहे. एका साध्या टीव्ही पत्रकाराचा मुख्यमंत्रीपदापर्यंत होणारा प्रवास या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. गेल्या महिन्यात प्रत्येक वृत्तवाहिनी आणि वर्तमानपत्राच्या रकान्यांची शोभा वाढविणाऱया ‘शिवाजी-द बॉस’ या चित्रपटाचा दिग्दर्शक एस. शंकर हाच या चित्रपटाचा दिग्दर्शक. तमिळमधील ‘मुदलवन’ आणि तेलुगुमधील ‘ओक्के ओक्कुडु’ या चित्रपटांचा हा रिमेक. मूळ चित्रपटात अर्जून आणि मनिषा कोईराला यांच्या मुख्य भूमिका आहेत. शंकर या दिग्दर्शकाच्या चित्रपटांची काही वैशिष्ट्ये आहेत.

एक, त्याच्या चित्रपटांमध्ये सामाजिक संदेश काही तरी असतोच. त्याच्या पहिल्या ‘जंटलमन’ चित्रपटात शिक्षणाचे बाजारीकरण आणि त्यामुळे गरिब विद्यार्थ्यांची होणारी वंचना त्याने दर्शविली होती. या चित्रपटाचा हिंदीतील दुर्दैवी रिमेक पाहून (त्याचा नायक चिरंजीवी असलातरी) मूळ चित्रपटाची कल्पना येणार नाही. हिंदुस्तानी (तमिळमधील इंदियन) या चित्रपटात देशातील भ्रष्टाचाराच्या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला होता. नायक (मुदलवन) मध्ये सडलेल्या सरकारी यंत्रणेवर भाष्य केले आहे. गेल्या वर्षीच्या ‘अन्नियन’ (हिंदीतील अपरिचित) मध्ये त्याने नागरिकांचा छोट्या मोठ्या गुन्ह्यांकडे, कायदेभंगाकडे गांभीर्याने न पाहण्याकडे नजर टाकली होती. ‘चांगले सरकार हवे म्हणतो, आधी चांगले
नागरिक बना,’ हा त्याने त्या चित्रपटात दिलेला संदेश होता. आता ‘शिवाजी’त तर त्याने काळा पैसा, हवाला, शिक्षण संस्थांमधील नफेखोरी अशा अनेक मुद्द्यांना हात घातला आहे.


दोन, शंकरच्या चित्रपटात कॉम्प्युटर ग्राफिक्सचा मोठा वापर केलेला असतो. ‘जंटलमन’मध्ये हा वापर केवळ ‘चिक बुक रयिले’ या गाण्यापुरता होता. त्यानंतर कादलन (हम से है मुकाबला) या चित्रपटात त्याने ग्राफिक्सचा सडाच टाकला. प्रभु देवाची नृत्ये, ए. आर. रहमानचे संगीत यांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेल्या या चित्रपटातील सात पैकी तीन गाण्यांमध्ये ग्राफिक्सचा वापर केला होता. त्यातील ‘मुक्काला मुकाबला’मध्ये तर थेट माईकेल जॅक्सनच्या ‘डेंजरस’ या गाण्याच्या धर्तीवर ग्राफिक्स वापरल्या होत्या.
त्यानंतरच्या ‘जीन्स’मध्ये त्याने ग्राफिक्सच्या सहायाने स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण करण्याची अफलातून शक्कल लढविली होती. ‘हिंदुस्तानी’त त्याने ग्राफिक्सच्या माध्यमातून कमल हासन याला सुभाषचंद्र बोस यांच्याशी हस्तांदोलन करताना दाखविला होता. ‘अन्नियन’मध्ये कम्प्युटर आणि वेबसाईट हा कथेचाच भाग दाखविल्याने त्यातही ग्राफिक्स होतेच. त्यात हाणामारीची दृश्ये ‘मॅट्रिक्स’च्या धर्तीवर दाखविली आहेत. ती प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय त्यातील गंमत कळणार नाही. ग्राफिक्स आणि कॉम्प्युटर हा ‘शिवाजी’तलाही एक महत्त्वाचा भाग आहेच.


तीन, चित्रपटांची व्यावसायिकता. मुख्यतः सामाजिक मुद्द्यांवर आधारलेले असले तरी शंकरच्या चित्रपटात प्रचारकीपणा अजिबात नसतो. किंबहुना त्याचा चित्रपट पाहताना अमुक मुद्दा यात ठळक आहे, हे अर्धा-अधिक चित्रपट पाहिल्याशिवाय कळत नाही. आपल्याला सवय असलेल्या व्यावसायिक चित्रपटांच्या मार्गानेच त्याचा चित्रपट धावत असतो. अचानक एखादे वळण येते आणि मग आपल्याला जाणवते, की अमुक बाब शंकरला जाणवून द्यायची आहे. ‘जंटलमन’ पाहताना ही एका चोराची प्रेमकथा असल्याचे वाटत राहते. ‘हिंदुस्तानी’ ही चंद्रू आणि त्याच्या दोन मैत्रिणींची कथा असल्याचा आधी समज होतो, तर ‘अन्नियन’मध्ये अंबी आणि रेमोच्याच द्वंद्वात प्रेक्षक पडलेला असतो. त्यामुळे शंकरचा चित्रपट मनोरंजनाच्या आघाडीवर कधीही फसत नाही. सादरीकरणावर एवढी हुकुमत असणारा दुसरा दिग्दर्शक सध्याच्या घडीला तरी दुर्मिळ आहे. चार, संगीत. शंकरच्या चित्रपटातील संगीताने रसिकांना मोहिनी घातली नाही, असं क्वचितच झालंय. ‘रोजा’द्वारे संगीत क्षेत्रात उपस्थिती नोंदविली असली तरी ए. आर. रहमानला खरी ऒळख शंकरच्या चित्रपटांनीच दिली (विशेषतः उत्तर भारतात). ‘जंटलमन’ प्रदर्शित झाला तेव्हा ‘एमटीव्ही’ भारतात नुकताच आला होता. त्याद्वारे हे गाणे हिंदी भाषक राज्यांतही हिट झाले. ‘राजा बाबू’ या चित्रपटात या गाण्याची नक्क्ल करण्यात आली. मात्र त्यात गंमत नव्हती. ‘जंटलमन’च्या रिमेकमध्येही हे गाणे वापरण्यात आले. मात्र त्यातही चिरंजीवीचे नृत्यही फिकेच पडले. मूळ चित्रपटात प्रभु देवाचे नृत्य हे चित्रपटाइतकेच प्रेक्षकांच्या आकर्षणाचा भाग होते. (चित्रपटाच्या पडद्यावरील प्रभु देवाचे हे पदार्पण.) याच चित्रपटातील ‘वट्ट वट्ट पुचक्कु’ (रूप सुहाना लगता है) आणि ‘उसलमपट्टी पेणकुट्टी’ (आशिकी में ह्द से) याही गाण्यांच्या हिंदी आवृत्तींनी मोठी लोकप्रियता मिळविली. बाकीची तीन गाणी तमिळमध्येही आजही हिट आहेत. त्यानंतरच्या ‘हम से है मुकाबला,’ ‘जीन्स,’ ‘हिंदुस्तानी,’ ‘नायक’ या हिंदी प्रेक्षकांना ऒळखीच्या
चित्रपटांतील संगीतानेही त्यांचा काळ गाजविला आहे. ‘बॉयज’ची गाणी तमिळ आणि तेलुगुत अत्यंत लोकप्रिय झाली. ‘अन्नियन’चे संगीत हरिश जयराजचे होते. तरीही त्यावर शंकरची छाप होतीच. ‘शिवाजी’ला पुन्हा रहमानचे संगीत आहे. त्यात त्याची पूर्वीची जादू आहेच.


केवळ संगीत आणि गाणीच नव्हे तर त्यांचे चित्रीकरण हीही शंकरच्या चित्रपटांची खासियत आहे. भव्य, देखणी आणि काहीतरी वेगळ्या कल्पना असलेली गाणी पहावीत तर ती शंकरच्याच चित्रपटात. मग ती जगातील सात आश्चर्यांच्या पार्श्वभूमीवर चित्रीत केलेले ‘पूवुक्कुळ अतिशयम’ (जीन्स) असो, की तंजावरच्या प्रसिद्ध बाहुल्यांचे रूप दिलेल्या व्यक्तींसह चित्रीत केलेले ‘अऴगान राक्षसीये,’ असो! ‘अन्नियन’मध्ये ‘अंडक्काका कोंडक्कारी’ हे गाणे आहे. या गाण्यात केवळ दोन ते तीन मिनिटांच्या एका तुकड्यासाठी
तेनकासी या गावातील ५०० घरांना वेगवेगळ्या रंगांनी रंगविले होते. ‘हिंदुस्तानी’त त्याने ऑस्ट्रेलिया, तर ‘शिवाजी’त स्पेनमध्ये गाण्यांचे चित्रीकरण केले. ‘नायक’मधील ‘सैया पडू पय्या,’ हे गाणे आठवते. त्यात त्याने कॉम्प्युटर ग्राफिक्सचा हातचे काही राखून न ठेवता उपयोग केला आहे. ‘कादलन’मधील ‘उर्वशी उर्वशी’साठी त्याने एक खास बस तयार केली होती.


शंकरच्या चित्रपटातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ठळक न जाणवणारी मात्र अगदी अविभाज्य असलेली भारतीय पुराण-इतिहासांची उपस्थिती. दक्षिण भारतातील सर्वच दिग्दर्शकांप्रमाणे शंकरच्या चित्रपटांतही भारतीय संस्कृतीला अनुसरूनच कथा असतात. ‘कादलन’मध्ये भरतनाट्यम आणि अन्य नृत्यकलांचे दर्शन आहे, तर ‘हिंदुस्तानी’त केरळम्धील ....या कलेची माहिती येते. तेही अगदी कथेच्या ऒघात! ‘अन्नियन’मध्ये तर तमिळनाडुतील अय्यर आणि अय्यंगार ब्राम्हण, त्यांचे ज्ञानाराधन आदींची माहिती अगदी सांगोपांग येते. याच चित्रपटात ‘गरुड पुराणा’चा अगदी खुबीने केलेला उपयोग प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळायचा नाही. ‘शिवाजी’त ‘शिवाजीशी लग्न केल्यास त्याचा मृत्यु होईल, हे भविष्य बदलणे शक्य नाही,’ असं नायिकेला ज्योतिषाने सांगणे आणि अगदी वेगळ्या प्रकारे शिवाजीची मृत्यू होणे, ही कथेतली गंमत त्याशिवाय कळायची नाही. एकामागोमाग आठ हिट चित्रपट देणाऱ्या शंकरने स्वतःची एक शैली विकसित केली आहे. त्याच्या जंटलमन वगळता अन्य कृती (बॉयज) सुदैवाने हिंदीत डब झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याला यश मिळाले आहे. ‘अन्नियन’ हा फ्रेंच भाषेत ड्ब झालेला आतापर्यंतचा एकमेव भारतीय चित्रपट आहे. शिवाजी एकीकडे विक्रमामागोमाग विक्रम करत असताना आता हिंदीतही येऊ घालत आहे. आता शंकर शाहरूख खान सोबत ‘रोबोट’ नावाचा चित्रपट काढणार आहे. असो. मात्र माझ्यासारख्याला त्याच्या तमिळ चित्रपटाचीच अधिक प्रतिक्षा असणार आहे.


Saturday, July 28, 2007

राष्ट्रपती माझ्यासाठी

सेतु हिमाचल पसरलेल्या या देशात दर पाच वर्षांनी येणारा हृदयंगम सोहळ्याचा योग यंदाही आला. देशाच्या राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जागी प्रतिभा पाटील निवडून आल्या आणि भारतात स्त्रीशक्तीची पहाट होत असल्याची सर्वांना जाणीव झाली. बाकी, एका ब्रह्मचाऱ्याने पाच वर्षे राष्ट्रप्रमुखपदी काढल्यानंतर त्याच पदावर एका महिलेची "नेमणूक' व्हावी, यालाच कदाचित "काव्यात्म न्याय' म्हणत असावेत. तिरुवळ्ळूवर यांनी याबाबत काही कविता केल्या आहेत का, याची माहिती घ्यावी म्हणतो. कलाम यांनाच त्याबाबत विचारावे लागेल.

कलाम यांनी जाताना आपल्या केवळ दोन सुटकेस नेल्या, अशी एक बातमी कुठंतरी वाचनात आली. देशाच्या राजकारण्यांपेक्षा ही कृती खूपच वेगळी असल्याचेही काही जणांचे म्हणणे आहे. मला हे मान्य नाही. या देशातले जवळजवळ सर्व राजकारणी सुटकेसच सोबत नेतात आणि घेऊन जातातही. फरक एवढाच आहे, की कलाम यांनी त्या सुटकेसमध्ये आपले जीवनावश्‍यक सामानच नेले. अन्य राजकारणी मात्र सुटकेसमध्ये काय काय नेतील, हे त्यांना स्वतःला सांगता येणार नाही. निरनिराळ्या न्यायालयांमध्ये चालू असलेल्या "केस'मध्ये या नेत्यांनी दिलेल्या साक्षींवरूनच वरील विधान केले आहे, हे सूज्ञांस सांगायला नको. (पण इतरांना सांगावे लागते, म्हणून लिहिले.)

बाकी कलाम यांना राष्ट्रपती भवनातून एकही वस्तू सोबत न्यावी वाटली नाही, यामागे त्यांच्या मोहत्यागा एवढेच धैर्यही मानलेच पाहिजे. अन्‌ माझं म्हणणं असं, की असं धैर्य आणि निरीच्छपणा अविवाहित राहिल्याशिवाय येणे शक्‍य नाही. कल्पना करा, अन्नामलाई विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तास घेतल्यानंतर कलाम मास्तर घरी आले आहेत. ते पाय धुवून चहा घेतात एवढ्यात मिसेस कलाम त्यांच्याजवळ येऊन म्हणतात, ""काय तुम्ही, "रायसीना हिल्स'च्या प्रासादातून काहीच घेऊन नाही आलात. बुश भारतात आले होते तेव्हा त्यांनी किती भेटवस्तू आणल्या होत्या. त्या तुम्ही तिथेच ठेवल्या. दुसऱ्या नेत्यांना पहा, आपल्या तर आपल्या इतरांच्या भेटवस्तूही ते घरी घेऊन जातात. "डीआरडीओ'त असल्यापासून तुमचं नेहमी असंच. एक गोष्ट घ्याल तर कसम!'' वगैरे वगैरे. आता हे भाषण ऐकल्यानंतर माजी राष्ट्रपती काय अन्‌ नुसता पती काय, वैतागणार नाही? तो वस्तूच नेणारच! मात्र कलाम यांना हा त्रास नाही. त्यामुळेच ते केवळ दोन सुटकेस (आपल्याच सामानाच्या) घेऊन घरी जाते झाले.

पाच वर्षांपूर्वी जेवढे सामान घेऊन कलाम आले, तेवढेच सामान घेऊन ते घरी गेले असंही काही जणांनी सांगितलं. (वृत्तवाहिन्यांनी या घटनेचे ज्याप्रकारे कव्हरेज दिलं, त्यात कलाम पाच वर्षांपूर्वी केसांच्या किती बटा घेऊन आले आणि जाताना त्यांच्या डोक्‍यावर बटा होत्या, हे कोणीच कसं सांगितलं नाही या आश्‍चर्यातून मी अजूनही सावरलेलो नाही.) येताना त्यांनी आणलेलेच सामान तर परत नेलं नाही ना, हेही चेक करायला पाहिजे.

कलाम चाचांचं मला एक बरं आवडायचं. ते मुलांना मूलच रहा, असं म्हणत. त्यांना मुलं खूप आवडत आणि मला मूल व्हायला खूप आवडतं. मूल झालं की काय टेंशन नाही...नोकरीची चिंता नाही, नोकरी मिळाली की बॉसची हांजी हांजी नाही...सर्व सव्यापसव्य सांभाळून पगार वाढण्याचीही काळजी नाही...एरवी जाताना कलाम जे बोलले तेही आपल्याला आवडले. जनतेचा सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती जातानाही चांगली प्रतिमा मनात ठेवून गेला.

कलाम यांची प्रतिमा जेवढी उत्कट तेवढीच आता नव्या राष्ट्रपतींची प्रतिभाही "फोकस'चाच विषय ठरणार आहे. त्या महाराष्ट्राच्या आहेत म्हणून मला त्यांच्याबद्दल अगत्य आहे, अशातला भाग नाही. (मी स्वतः कितपत महाराष्ट्रीय आहे, अशी साधार शंका घेणारे कमी नाहीत.) त्यांच्याबद्दल अगत्य असण्याचे कारण वेगळेच आहे. शपथ घेतल्यानंतर त्यांनी जे पहिले भाषण केले, त्यात त्यांनी माझा उल्ल्लेख केल्याबद्दल मला अगदी भरून आलं.

तुम्हाला आढळलं की नाही माझं नाव? काय म्हणता, नाही आढळलं. अहो, असं काय करता...त्या काय म्हणाल्या सांगा बघू..."जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले...' आता सांगा राव, माझी ओळख पटण्यासाठी तुम्हाला आणखी कोणती खूण सांगू. कलाम भलेही लोकप्रिय राष्ट्रपती असतील, पण माझा जाहीर उल्ल्लेख करणाऱ्या प्रतिभाताई पाटील याच खऱ्या माझ्या राष्ट्रपती आहेत. माझ्यापेक्षा रंजलेला, गांजलेला माणूस या अलम्‌ भारतात आणखी कोण असेल...बाकी सर्व गोष्टी जाऊ द्या...हा ब्लॉग लिहिल्यावर तो वाचून कोणी कॉमेंटही टाकत नाही...

अशा या पामर माणसाला आपलं म्हणणारी व्यक्ती आता देशाच्या सर्वोच्च्चपदी गेली आहे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. प्रतिभाताईंनी तुकारामाचा अभंग म्हटला, हीही तर खरेच आनंदाची गोष्ट आहे. त्यांची माझ्याबद्दलची आपुलकी कायम राहावी, यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन. मी नेहमी रंजला-गांजला राहीन, कारण...तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे,
ठेविले अनंते तैसेचि रहावे
असू द्यावे चित्ती समाधान...

Saturday, July 21, 2007

मी एक "एसएमएस्शाह'

मी या जगात आलो तेव्हापासून हे जग सुधारण्याची मला तीव्र तळमळ होती. मात्र काय करणार, एक सामान्य माणूस म्हणून माझ्या हातात काही शस्त्र नव्हते. त्यामुळे "उद्धवा, अजब तुझे सरकार' असे गात (मनातल्या मनात) मला रहावे लागत असे. मात्र पाच वर्षांपूर्वी या भारतवर्षात वृत्तवाहिन्यांनी "संभवामि युगे युगे' करत अवतार घेतला आणि समस्त "विनाशायच दुष्कृतां' होऊ लागले. तरीही काहीतरी उणं असल्याची जाणीव मनाला बोचत होती. त्या विनाशाच्या कामात आपला खारीचा वाटा उचलण्याची संधी मला मिळत नव्हती. त्यामुळे रुखरुख लागून राहिली होती. मात्र दोन वर्षांपूर्वी देशात मोबाईल क्रांती होऊ लागली. या मोबाईल क्रांतीने स्वतःची पिल्ले खाण्याऐवजी वेगळ्या पिल्लांना जन्म दिला. त्यातून संवादाचे पूल उभारले जाऊ लागले. त्यातच आमच्या हाती एक अजब उपकरण आले, त्याचा उपयोग आम्ही कधी शस्त्र तर कधी साधन म्हणून करू लागलो. ते शस्त्र म्हणजे एसएमएस.
या साधनाने मी या जगात एवढी उलथापालथ केली आहे, जगाचा एवढा चेहरामोहरा बदलला आहे, की मला आता लोकांनी "एसएमएस्शाह' (शहेनशहाच्या धर्तीवर) म्हणायला हरकत नाही.या जगातील विषमता, अज्ञान, अन्याय वगैरे निरनिराळे दुर्गुण पाहून पूर्वी मला चीड यायची. आता मात्र मी मोबाईलच्या काही कळा दाबून जगाची ही अवकळा बदलू शकतो. मी एक एसएमएस करायचा अवकाश, या जगात जे काही उदात्त, मंगल वगैरे व्हायचे असेल ते घडू शकते. देशाच्या राष्ट्रपतीपदी प्रतिभाताई पाटील याच निवडून याव्यात, असे मत मी तीन वाहिन्यांना एसएमएसद्वारे पाठविले होते. आज बघा, त्या निवडून आल्या आहेत. तेही प्रचंड मतांनी. मी एकच एसएमएस केला असता तर त्या साध्या निवडून आल्या असत्या. भारतात अतिवृष्टीचे प्रमाण ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेल्या हवामानातील बदलांमुळेच वाढले आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कमी व्हायला पाहिजे, असे मत मी एका हिंदी वाहिनीवरील चर्चेच्या कार्यक्रमानंतर एसएमएसद्वारे नोंदविले होते. त्याचा परिणाम म्हणून तापमानवाढही कमी झाली आणि त्यामुळे अतिवृष्टीही कमी झाली. माझ्या एसएमएसमुळेच हा क्रांतीकारी परिणाम झाला.
एकदा आम्ही कुटुंबासह भाजी खरेदी करून घरी परतत होतो. त्या दिवशी भोपळा दोन रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे एकदम पाच किलो विकत घेतले होते. रस्त्यातच एका दुकानात अमेरिकी सैनिकांना इराकमधून परत बोलाविण्याबद्दल सिनेटमध्ये चाललेल्या चर्चेची बातमी दाखवत होते. लगेच घरी येताच आधी ती वाहिनी लावली. त्यानंतर केला एक एसएमएस...‘इराकमध्ये अमेरिकी साम्राज्यवादी धोरणांची हद्द झाली असून, अमेरिकी सैन्य परत आलेच पाहिजे.’ गंमत बघा, दुसऱ्याच दिवशी इराकमधील अमेरिकी सैनिकांसाठी निधी वाढविण्यास सिनेटने नकार दिला.
संपूर्ण जंबुद्वीपाच्या (भारताचे प्राचीन नाव हो. "इंडियन सबकॉन्टिनंट'ची एकात्मता दर्शविण्यासाठी हेच नाव पाहिजे) जनतेप्रमाणे क्रिकेट हा माझाही जन्मसिद्ध हक्क आहे. क्रिकेट हा खेळण्यासाठी नसून, आपली तज्ज्ञ मतं व्यक्त करण्यासाठी केलेली सोय आहे, यावरही माझी इतरांपेक्षा अंमळ जास्तच श्रद्धा आहे. त्यामुळे त्याच श्रद्धेचे प्रतिबिंब एसएमएसमधूनही पडायला नको? त्यामुळेच विविध वाहिन्यांवर क्रिकेटची कॉमेंटरी कमी पडेल एवढे एसएमएस मी केले. त्याचा परिणामही भारतीय संघाच्या कामगिरीवर पडलेला दिसला. संघाची तयारी कमी आहे, असा एसएमएस मी संघ वेस्ट इंडिजला जाण्यापूर्वीच केला होता. त्यानंतर विश्‍वचषक स्पर्धेत संघाची झालेली वाताहात सर्वांच्या समोर आहे. या पराभवातूनही संघ सावरेल, असा एसएमएस मी एका वाहिनीला केला होता. त्यानंतर भारतीय संघाने बांगलादेशमध्ये विजय मिळविला, दक्षिण आफ्रिकेतही चांगली कामगिरी केली.
एसएमएस बाबत मी एवढा तज्ज्ञ झाल्यामुळे माझा आत्मविश्‍वास चांगलाच वाढला आहे. मात्र त्याचा मला कधी कधी अवचित फटका बसतो. एक हिंदी वृत्तवाहिनी एका प्रेमप्रकरणाचा "आँखो देखा हाल' प्रसारीत करत होती. त्यावर प्रथेप्रमाणे प्रतिक्रियांचे एसएमएसही मागविले होते. मीही अशा बाबती मागे राहतो काय? मीही एसएमएस केला. "प्रेमप्रकरण ही काळाची गरज असून, प्रत्येकाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे,' अशा आशयाचा एसएमएस मी केला होता. कसा माहित नाही, तो एसएमएस जायच्या जागी न जाता वाट चुकला आणि वाहिनीऐवजी एका "वहिनी'च्या मोबाईलवर पोचला. त्यानंतर माझे हाल येथे सांगण्यासारखे नाहीत. मात्र जगाच्या सुधारणेचा वसा घेतलेला असल्याने आणि एसएमएस या माध्यमावर माझी नितांत श्रद्धा असल्याने अशा क्षुल्लक प्रकारांनी विचलीत होणाऱ्यांपैकी मी नाही.
या जगात सर्व तऱ्हेचे परिवर्तन मी एसएमएसच्या माध्यमातून करू शकेन, याचा मला विश्‍वास आहे. तुमच्या गल्लीतील रस्त्यावर खड्डा पडला आहे? राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास नकार दिला आहे? केंद्रातील मंत्रिमंडळातून एखाद्या मंत्र्याला काढावे, असे तुम्हाला वाटते? आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळावा, असे तुम्हाला वाटते? जगात सगळीकडे दहशतवाद आणि अशांतता पसरली असून, केवळ भारतीय संस्कृतीच ही परिस्थिती बदलू शकते, असे तुम्हाला वाटते?आधुनिक विज्ञानाचा अध्यात्माशी आणि शिक्षणाचा अज्ञानाशी मेळ घालायला हवा, असे तुम्हाला वाटते? ईश्‍वर हा एखादा करबुडवा सरकारी कर्मचारी असून, त्याला रिटायर करायला हवे, असे तुम्हाला वाटते? तुम्हाला काहीही वाटत नसलं तरी तुमचे नाव सगळीकडे पोचायला पाहिजे, असे तुम्हाला वाटते?
प्रश्‍न अनेक, उत्तर मात्र एक आणि एकच! एसएमएस!!!
सर्व समस्यांवर रामबाण उपाय. हे विश्‍व घडविणाऱ्या ब्रह्मदेवालाही एवढ्या घडामोडींवर मार्ग काढणारा आणि घडामोड करणारा एसएमएस घडविता आला नाही. आधुनिक विज्ञानाने हे साधन शोधून या जगात सर्व विषयांत तज्ज्ञ असलेल्यांची एक नवी जमात निर्माण केली आहे. त्याबद्दल विज्ञानाचे आभार आणि तुम्हाला काय वाटतं, एसएमएस हे खरंच क्रांतीकारी साधन आहे का. तुमची मतं जरूर एसएमएसने कळवा हं.

Friday, July 20, 2007

विक्रमादित्य "शिवाजी द बॉस' हिंदीत बोलणार!

मिळ चित्रपट असूनही माध्यमांनी निर्माण केलेली उत्सुकता आणि रजनीकांतची लोकप्रियता, यामुळे "शिवाजी द बॉस'ची सर्वत्र घोडदौड चालू आहे. उत्तर भारत आणि परदेशांत उत्पन्नाचे विक्रम करणारा "शिवाजी द बॉस' आता हिंदीत येणार आहे. हा चित्रपट "डब' करण्याचा निर्णय "एव्हीएम प्रॉडक्‍शन्स' या निर्मिती संस्थेने घेतला आहे. चित्रपटाचा संगीतकार ए. आर. रहमान आणि दिग्दर्शक एस. शंकर परदेशातून आल्यानंतर कंपनीने त्यांच्या संमतीने याबाबतची घोषणा केली आहे.
"शिवाजी द बॉस' गेल्या 15 जूनला प्रदर्शित झाला. त्यानंतर उत्तर भारतातून या चित्रपटाने आतापर्यंत दीड कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. उत्तर भारतात या चित्रपटाच्या तीसहून अधिक "प्रिंट'चे अद्याप खेळ चालू आहेत. त्यामुळे दक्षिण भारत वगळता देशाच्या अन्य भागांतही अधिकाधिक व्यवसाय मिळविता यावा, यासाठी हा चित्रपट हिंदी भाषेत "डब' करण्यात येणार आहे. मुंबईतही या चित्रपटाने सतत "हाऊसफुल शो' करून तमिळ चित्रपटांच्या बाबतीत नवा विक्रम केला आहे.
हिंदीत "डब' केल्यानंतर "शिवाजी'च्या 120 प्रिंट काढण्यात येणार असून, तमिळ चित्रपटांच्या बाबतीतील तोही एक विक्रम ठरणार आहे. कोणत्याही "डब' चित्रपटाच्या आतापर्यंत एवढ्या प्रती काढण्यात आल्या नव्हत्या."शिवाजी द बॉस'चा दिग्दर्शक शंकर असून, त्याचे आठपैकी सात चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरले आहेत. त्यातील अनेक चित्रपट हिंदीत "रिमेक' अथवा "डब' करण्यात आले आणि या हिंदी आवृत्त्यांनीही भरपूर यश मिळविले. "जंटलमन' (रिमेकचा दिग्दर्शक महेश भट्ट), "हम से है मुकाबला' (मूळ तमिळ कादलन), "नायक' (मूळ तमिळ मुदलवन), "हिंदुस्थानी' (इंदियन), "जीन्स' व गेल्या वर्षीचा "अपरिचित' (मूळ तमिळ अन्नियन) हे त्यातील काही चित्रपट. त्यामुळे "शिवाजी'च्या हिंदी आवृत्तीलाही मोठे यश मिळेल, अशी खात्री वितरकांना आहे. "शिवाजी' प्रदर्शित झाल्यापासून उत्तर भारतातून वितरकांनी जास्तीत जास्त प्रिंट पाठविण्याचा आग्रह केल्यामुळेही हा निर्णय घेण्यात आल्याचे "एव्हीएम'कडून सांगण्यात आले आहे.
या चित्रपटाचे परदेशातील वितरण हक्क असणाऱ्या "अय्यंगारन इंटरनॅशनल'ने चिनी आणि जपानी भाषेतही हा चित्रपट डब करून प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांनी कितीही नावे ठेवली, तरी रजनीकांतच्या "शिवाजी'ने भारतीय प्रादेशिक चित्रपटांनी जागतिक पातळीवर नेऊन ठेवले आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाच्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंद होत आहे. आतापर्यंतच्या त्याच्या विक्रमांची ही जंत्रीच पहाः-
n दुबईत "शिवाजी'ने नुकतेच 30 दिवस पूर्ण केले. दुबईत आतापर्यंत केवळ "टायटॅनिक' आणि "चंद्रमुखी' (तोही रजनीकांतचाच) याच चित्रपटांनी तीस दिवस पूर्ण केले.
n "शिवाजी' चित्रपटाचे परदेशातील वितरणाचे हक्क 25 लाख डॉलर्सला विकले होते. आता चार आठवड्यानंतर या चित्रपटाने परदेशात 400 टक्के नफा कमावला आहे.
n मलेशियात या चित्रपटाने 80 लाख मलेशियन रिंगिटची कमाई करून तिकीट खिडकीवरील उत्पन्नाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
n "लॉस एंजेल्स टाईम्स'ने "शिवाजी'च्या यशाची दखल घेऊन "बॉलिवूड ही चित्रपटाबद्दल विशेष लेख प्रकाशित केला. त्यात प्रादेशिक चित्रपटांबद्दल कौतुकाचे लेखन आहे.

Wednesday, July 18, 2007

रेडियोचे दिवस

मागील काळाच्या आठवणींचा कड काढत "गेले ते दिन गेले...' असे रडगाणे गाण्यासाठी हा ब्लॉग नाही. मात्र गेला आठवडाभर गावी काय गेलो (मु. पो. नांदेड, मराठवाडा), भारनियमानाच्या कृपेने सात दिवस आपला जुना जाणता, बापुडा रेडियो हा सोबती पुन्हा गवसला. याच सोबत्याच्या सहवासात अगदी जगावेगळे आनंदाचे क्षण काही एक काळ व्यतित केले. त्यामुळे त्या दिवसांबद्दल भावनांचे कृत्रिम लाऊडस्पिकर न लावताही, एक कृतज्ञता म्हणून या विषयावर लिहावेसे वाटले. रेडियो हा तसा माझ्या बालपणीच अस्तंगत होत चाललेले माध्यम होते. त्याची ओढ लागण्याची काही कारण नव्हते. तेरा-चौदा वर्षांपूर्वी तर एफएम वाहिन्या नसल्यामुळे तर तेही आकर्षण नव्हते. त्याचवेळेस शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यलयात जाण्यास सज्ज झालो होतो. त्यावेळी जमाना होता कॅसेटस्‌चा. गुलशन कुमार यांची टी-सीरीज, तोरानी बंधुंची टीप्स आणि जैन बंधूंची व्हीनस या कंपन्या फॉर्मात होत्या. या कंपन्या नव्या नव्या चित्रपटांचे हक्क तर घेत होत्याच, त्या स्वतःही चित्रपट आणि खासगी अल्बम काढत होत्या. त्या नव्या गाण्यांचा "ट्रॅक' ठेवणे ही जिकीरीचीच बाब होती. (नव्या चित्रपटाच्या आकर्षणाच्या नावाखाली दिवस रात्र तेच ते गाणे आणि दृश्‍यांचे दळण घालणाऱ्या वाहिन्या अजून भारतीय अवकाशात यायच्या होत्या.) या गाण्यांची माहिती घेण्यासाठी आधार होता त्यावेळी विविध भारतीवर सकाळी लागणाऱ्या "चित्रलोक' कार्यक्रमाचा. यातूनच रेडियोशी पहिला संबंध आला. अगदी लहानपणी कधीतरी "बिनाका गीतमाला' ऐकली होती. त्या आठवणी होत्याच. त्यामुळे सर्वात आधी रेडियो सिलोन (आता ते श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) झाले होते. त्यावर सकाळी गाणे ऐकणे सुरू झाले. हळूहळू आमची "वेव्हलेंग्थ' जुळली आणि या संबंधांचे रुपांतर हलकेच नात्यात झाले.सीमा ओलांडलेल्या लहरीत्यानंतर "शॉर्ट वेव्ह'च्या सर्व थांब्यांवर विविध भारती आणि आकाशवाणीच्या शोधात रेडियोचा काटा फिरवू लागलो. अचानक '92च्या एका पावसाळी रात्री रेडियोचा काटा एका स्टेशनवर थांबला. अत्यंत स्वच्छ स्वरांमध्ये हिंदीतून चालू असलेल्या त्या मुलाखतीने त्याच स्टेशनवर काही काळ थांबण्यास प्रवृत्त केले. सुमारे दहा मिनिटांच्या कार्यक्रमानंतर उद्‌घोषिकेने सांगितले, "यह रेडियो जापान है,' अन्‌ मी जागीच उडालो. म्हणजे...हे कार्यक्रम जपानचे आहेत? अजून बुचकळ्यातून बाहेर पडलोही नव्हतो, अन्‌ तितक्‍यात त्याच जागी जपानी भाषा शिकविणारा कार्यक्रम सुरू झाला. जपानी, अन्‌ त्या अर्थाने कोणत्याही परदेशी भाषेशी ही पहिली ओळख! त्या स्टेशनची जागा नीट पाहून घेतली आणि दररोज "रेडियो जापान'च्या हिंदी कार्यक्रमांच्या वाऱ्या सुरू झाल्या. त्यातूनच विविध परदेशी रेडियो संस्थांच्या कार्यक्रमांची ओळख होऊ लागली. जपानपाठोपाठ जर्मनी (डॉइटशे वेले-इंग्रजीहिंदी), बीबीसी (इंग्रजी आणि हिंदी), वॉईस ऑफ अमेरिका (इंग्रजीहिंदी), रेडियो फ्रान्स इंटरनॅशनल, रेडियो ऑस्ट्रेलिया, रेडियो नेदरलॅंडस्‌, रेडियो ऑस्ट्रिया इंटरनॅशनल, रेडियो चायना इंटरनॅशनल ( इंग्रजीहिंदी) अशा एकाहून एक देशांच्या केंद्रांचे कार्यक्रम ऐकण्यात येऊ लागले.

हा छंद जीवाला लावी पिसे
माझ्या अवतीभवती वावरणाऱ्या लोकांना रेडियो हा फक्त गाण्यांसाठी ऐकायचा असतो, हे माहित होते. मात्र गाण्यांसाठी रेडियोकडे वळलेला मी, या केंद्रांच्या कार्यक्रमांतच जास्त वेळ घालवू लागलो. या कार्यक्रमांत काय असायचे? तर बातम्या, त्या त्या देशाच्या धोरणांची माहिती, काही सांस्कृतिक कार्यक्रम, गाणे, त्या त्या देशांतील भाषा शिकविणारे कार्यक्रम (जर्मन, फ्रेंच, जपानी वगैरे) आणि श्रोत्यांचा पत्रव्यवहार...त्यांपैकी शेवटच्या भागाववर माझे जास्त लक्ष होते. साधारण सहा महिने अशा रितीने विविध लोकांचा पत्रव्यवहार ऐकल्यानंतर आपणही पत्र पाठवावे, असे वाटू लागले. मात्र त्यासाठी लागणाऱ्या "एअर-मेल'चा खर्च कोण करणार? अन्‌ करायचा ठरविला तरी एवढ्या केंद्रांशी किती पत्रे लिहावी लागणार, हा प्रश्‍न होताच. त्यावर एक पर्याय याच केंद्रांनी दिला होता. तो कामी आला. सर्व परदेशी केंद्रांना पाठविलेली पत्रे पंधरा पैशांच्या (त्यावेळी) पोस्ट कार्डावर दिल्लीतील दूतावासाला पाठविण्याची सोय होती. तिथून ती त्या केंद्राकडे पोटत असत. मग काय, एका शुभदिनी उचलली पेन, लावली कार्डाला आणि दिली दिल्लीला जपानी दूतावासाकडे पाठवून. त्यानंतर दोन महिने उलटल्यानंतरही काही उत्तर आले नाही म्हणून पत्र पाठविलेला दिवस शुभ होता का नाही, याबद्दलच शंका वाटू लागली. एके दिवशी कॉलेजमधून घरी आलो, तेव्हा एक मध्यम आकाराचा पिवळा लिफाफा माझी वाट पाहत असलेला दिसला. त्यावरील शिक्काच सांगत होता तो जपानहून आला आहे म्हणून. त्यातील कार्यक्रमांचे वेळापत्रक, माहितीपत्रक इ. इ. बघितल्यानंतर पत्र लिहिलेला दिवस शुभच असल्याची खात्री पटली. याच पाकिटात केंद्राच्या प्रसारणाबाबत एक फॉर्म होता (रिसेप्शन रिपोर्ट). तो भरून पाठविला आणि आणखी दोन महिन्यांनी आणखी एक पाकिट होते. त्यात एक सुंदर कार्ड होते. फॉर्मही होता. मीही फॉर्मात होतो. त्यानंतर जपानच्या केंद्रांसोबतच मी अन्यही केंद्रांना पत्रे पाठविली. सगळीकडून काही ना काही येतच होतं. ही "विदग्ध शारदा' ठेवायला घरात जागा पडू लागली. आलेली कॅलेंडर्स वर्षभरातच कालबाह्य होऊ लागली. त्यांच्यावरची चित्रे अप्रतिम असल्याने ती फेकून देण्याचाही प्रश्‍न नव्हता. बरं, याचसोबत सर्व केंद्रांवरील भाषा शिकण्याच्या कार्यक्रमांच्याही छापील प्रती (अर्थात मागणीवरूनच) येऊ लागल्या. त्याचसोबत न मागितलेल्या प्रतीही येऊ लागल्या. त्यामुळे हिंदीतून जर्मन शिकतानाच जर्मनमधून बंगाली शिकण्याचीही प्रेमळ कसरत करता येऊ लागली.मात्र त्याचवेळीस डॉयशे वेलेच्या एका कार्यक्रमात स्वतःचे नाव ऐकल्यानंतर अचानक झालेला आनंद, रेडियो चीनच्या उद्‌घोषकांचे जोरदार अनुनासिक हिंदी व गमतीशीर तमिळ...या मजेशीर आठवणी अन्य कुठे मिळाल्या असत्या.

एक भीती...फुकटची

रेडियोवरून जे पुकटात मिळेल ते मागवत रहायचं, ही माझी सहजवृत्ती झाली होती. कोणतातरी अज्ञात हात आपल्याला फुकट काही देतोय ही भावना सुखद होतीच. मात्र त्या अज्ञात हाताने एकदा चांगलाच हात दाखवला. "वॉईस ऑफ रशिया'च्या केंद्रावरून जपानमधील "ओम शिनरीक्‍यो' या पंथाचा एक कार्यक्रम सकाळी दहा ते साडे दहा चालत असे. मी तो ऐकत असे. त्यांचे साहित्य मागविण्यासाठी तेही पत्ता देत असत. मला कार्यक्रमाशी काही देणे घेणे नसे. मात्र कशाला फुकट सोडायचे, म्हणून पाठविले त्यांना एक पत्र. काही दिवसांनी आले त्यांचे उत्तर. पंथाचे प्रमुख .....यांच्या छायाचित्रासह त्यांचे तत्वज्ञान सांगणाऱ्या पत्रकांचे एक पाकिट. मी ते पाहिले आणि ठेवून दिले. काही दिवसांनी जपानमध्ये भूमिगत रेल्वेच्या मार्गात विषारी वायू सोडून माणसांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात चौदा जणांचा प्रयत्न केला. या घटनेच्या चौकशीत आपले वरील "ओम शिनरीक्‍यो' साहेबच प्रमुख आरोपी निघाले. त्यांची धरपकड करण्यात आली. त्यांच्या पंथाच्या अनुयायांचीही चौकशी करण्यात येऊ लागली. त्यामुळे इकडे भारतात मी मात्र घाबरलो. सुदैवाने चौकशीचे लोण इथपर्यंत आले नाही. त्यानंतर मात्र मी सरकारी केंद्रांवरच भिस्त ठेवण्याचा निर्णय मी घेतला.


आली लहर केला लहर

रेडियोच्या लहरींनी हा नाद लावला आणि त्याची परिणती अर्थातच अभ्यासावरही झाली. पण त्यामुळे डगमगून जाण्याचं ते वय नव्हतं. इंटरनेट अद्याप आलं नव्हतं आणि दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांचा सुळसुळाट होण्याला नुकतीच सुरवात होऊ लागली होती. त्यामुळे माझ्या वेडाला स्पर्धा किंवा आव्हान असे नव्हतेच. रात्री जागण्याची सवय तेव्हाही होतीच. त्यातून रात्री बेरात्री रेडियोवर कळणारे, न कळणारे असे कोणतेही कार्यक्रम किंवा गाणे ऐकण्यास काही प्रतिबंध नव्हताच. एकदा रात्री दोन वाजता मी रेडियोवर अरबी गाणे ऐकत होतो. (गाण्यांचा अर्थ काय, शब्द काय असे क्षुद्र प्रश्‍न मी कधी पडू दिले नाहीत.) शेजारच्या इमारतीतील काही लोक त्यावेळी कुठल्याशा गावाहून आले होते. घरापुढे आल्यानंतर माझ्या खोलीतून आलेल्या गाण्यांचे स्वर ऐकून त्यांचे घामाघूम झालेले चेहरे हा माझ्या चिरंतन आठवणींचा ठेवा आहे. (ज्यांनी कधी अरबी गाणे ऐकले नाहीत, त्यांना त्यातील चित्तथरारक लज्जत कळणार नाही.) रेडियोने मला खूप दिले. सुमारे नऊपैकी किमान चार भाषा तरी मी रेडियोमुळेच शिकलो. केवळ फ्रेंच वगळता. ती भाषा शिकण्याचे श्रेय इंटरनेट या नव्या मित्राला. रेडियोने मला जसे दिले, तसे मीही रेडियोला बरेच काही दिले. (घरात पडलेले किमान पाच निष्प्राण संच याची साक्ष देतील.) परदेशी रेडियोच्या सोबतीमुळे सामान्य ज्ञान जसे वाढले, तसेच संवादाचा आत्मविश्‍वासही वाढला. पुढे इंटरनेट आले आणि माझ्या या परदेशाच्या कौतुकाचा सोहळा संपुष्टात आला. आता इंटरनेटवर ऑडियो ऑन डिमांडचीही सोय आहे. मात्र त्यात अनिश्‍चिततेतून उद्‌भवणारा आनंद नाही. त्यामुळे "शॉर्ट वेव्ह'च्या माझ्या आठवणी नेहमीच "लॉंग लॉंग' राहतील.