Thursday, January 30, 2014

राष्ट्रपित्याचा व्यवसाय शेती

भारतातील विसंगतींनाही कधीकधी दाद द्यावीशी वाटते. ज्या देशात शेतकरी हर क्षणी नागवला आणि भरडला जात आहे, त्या देशाचा राष्ट्रपिता स्वतःला शेतकरी मानत असावा, आणि ज्या कृषीमंत्र्याच्या अमलात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यालाच ही बाब आढळावी, याला काय म्हणावे?

या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी वकीली शिकलेले होते आणि ते बॅरिस्टर होते, हे तर सर्वांनाच माहीत आहे, परंतु खुद्द बापू स्वतःला शेतकरी मानत होते. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत याचा पुरावा सांभाळून ठेवलेला आहे. त्यात खुद्द महात्मा गांधीची स्वाक्षरीही आहे.

97 वर्षे जुन्या भांडारकर संस्थेत भारत तसेच आशियाई देशांशी संबंधित अनेक प्राचीन हस्तलिखिते, पोथ्या आणि पुस्तके आहेत. परंतु या दस्तावेजांसोबतच आणखी एक महत्त्वपूर्ण दस्तावेज इथे आहे ते म्हणजे येथील व्हिजिटर्स बुक. सन् 1917 मध्ये स्थापनेनंतर अनेक नामवंतांनी या संस्थेला भेटी दिल्या आणि या व्हिजिटर्स बुकमध्ये आठवणी व टिपण्या मागे ठेवल्या.

याच भेटींमधील एक होती महात्मा गांधी, राजकुमारी अमृत कौर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची भेट. येथील दस्तावेजांनुसार 1 सप्टेंबर 1945 रोजी या तीन असामींनी या संस्थेला भेट दिली होती. त्यांच्या सोबत मणिलाल गांधी हेही होते.  या व्हिजिटर्स बुकमध्ये तीन रकाने होते - नाव, टिप्पणी आणि व्यवसाय.

पूर्ण संस्था पाहून झाल्यावर बापूंनी व्हिजिटर्स बुकमध्ये स्वाक्षरी केली. टिप्पणीच्या रकान्यात त्यांनी लिहिले, 'बहुत आनंद हुआ'. व्यवसायाच्या रकान्यात त्यांनी गुजरातीत लिहिले, 'खेडुत' अर्थात शेतकरी. त्यानंतर महात्मा गांधी येथे येऊन गेले होते, हे वारंवार सांगितले तरी त्यांच्या व्यवसायावर कोणीही लक्ष दिले नाही.

आता ही गोष्ट समोर कशी आली, तर ती आता कृषीमंत्री असलेल्या शरद पवार यांच्यामुळे. 2001 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आता केंद्रीय कृषीमंत्री असलेले शरद पवार हे या संस्थेच्या भेटीवर होते. (त्यानंतर 2004 साली भांडारकर संस्थेवर हल्ला झाला. यात काही संगती आहे का नाही, सांगता येत नाही)व्हिजिटर्स बुकमध्ये स्वाक्षरी करताना 'भांडारकर'चे तत्कालीन मानद सचिव मो. . धडफळे यांनी त्यांना सांगितले, की महात्मा गांधी हेही एके काळी येथे येऊन गेले होते. तेव्हा पवारांना उत्सुकता वाटली, की बापूंनी त्यांचा व्यवसाय काय लिहिला असावा.  तेव्हा जुने व्हिजिटर्स बुक मागवण्यात आले आणि तेव्हा ही बाब समोर आली.

याच पानांमध्ये असेही दिसते, की राजकुमारी अमृता कौर यांनी त्यांचा व्यवसाय 'देशसेविका' लिहिला होता तर सरदार पटेल यांनीही स्वतःला शेतकरीच म्हणवले होते. मणिलाल गांधी यांनी व्यवसाय लिहिला होता, 'संपादक, इंडियन ओपिनियन'.

काल राज्यसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी स्वतःकडे वाहन नसल्याचे जाहीर केले तेव्हा ही मीच दिलेली बातमी आठवली. आज योगायोगाने म. गांधीजींची पुण्यतिथी आहे. तेव्हा हीच बातमी मी अन्यत्र दिली.


म. गांधी देशाचे राष्ट्रपिता होते अथवा नाही, यावर वाटेल तेवढा वाद घाला. परंतु 'हा देश खेड्यांचा आहे आणि शेतकऱ्यांचा आहे' असे जेव्हा तो महात्मा सांगायचा, तेव्हा ते तोंडदेखले नव्हते, इतके नक्की!

Saturday, January 25, 2014

भ्रष्टाचार आणि 'आप'वर राष्ट्रपतींची टिप्पणी - एक नवा पायंडा

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणातून भ्रष्टाचाराच्या विरोधात केवळ स्पष्टोक्तीच केली असे नव्हे, तर त्यातून सरकारे कोसळतील, असा इशाराही दिला आहे. राष्ट्रपतींच्या बोजड भाषणांच्या परंपरेत हा एक वेगळा पायंडा आहे आणि त्याचे स्वागतच करावे लागेल.
भ्रष्टाचार हा असा कर्करोग आहे जो लोकशाहीला कमकुवत बनवतो तसेच आपल्याक राज्यांची पाळेमुळे पोकळ बनवतो. भारताचे नागरिक, क्रोधित आहेत तर त्यायचे कारण भ्रष्टाचार तसेच राष्ट्रीय साधनांचे नुकसान त्यांना दिसत आहे. जर सरकारांनी या त्रुटींचे निराकरण केले नाही तर मतदार सरकारांना खाली खेचतील,
असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. देशातील सत्ताधारी यातून बोध घेतील, अशी शक्यता कमी असली, तरी देशाचा सर्वोच्च अधिकारी हे वक्तव्य करतो आणि तेही प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवसाच्या पूर्वसंध्येला, ही खचितच महत्त्वाची बाब आहे. राष्ट्रपतींनी ‘आप’च्या नावाने निघालेल्या टोळीलाही जाता जाता टपली मारली, हे खूप बरे केले. ते म्हणाले, 
काही निराशावाद्यांनी लोकशाहीप्रती आपल्‍या कटिबध्‍दतेची खिल्‍ली उडवली असेल, मात्र जनतेने कधीही आपल्‍या लोकशाहीचा विश्‍वासघात केला नाही, जर कुठे काही त्रुटी असतील, तर त्‍या ज्‍यांनी इच्‍छा पूर्ण करण्‍याचा मार्ग म्‍हणून सत्‍तेचा मार्ग स्विकारला आहे त्‍यांच्‍यामुळे आहेत...याचप्रमाणे सार्वजनिक जीवनात वाढलेला पाखंडीपणाही धोकादायक आहे. निवडणूका कोणत्‍याही व्‍यक्‍तीला आभासाशी खेळण्‍याची परवानगी देत नाहीत. ज्‍या लोकांना मतदारांचा विश्‍वास हवा आहे, त्‍यांनी केवळ अशीच आश्‍वासने दिली पाहिजेत, जी पूर्ण होऊ शकतील. सरकार ही धर्मादाय संस्‍था नाही. लोकवादी अनागोंदी शासनाचा पर्याय असू शकत नाही. खोटया वचनांचा परिणाम अपेक्षाभंगात होतो, ज्‍यामुळे राग उफाळून येतो आणि स्‍वाभाविकपणे या रागाचे लक्ष्‍य असतेः सत्‍ताधारी पक्ष.

राष्ट्रपतींचे उरलेले भाषण नेहमीच्या चाकोरीतील होते, त्यात छोट्या राज्यांपासून दहशतवादासारखे अनेक विषय होते. वाचता येते आणि दूरचित्रवाणीवर दिसू लागले तेव्हापासूनच्या प्रत्येक राष्ट्रपतींना याच विषयावर वार्षिक प्रवचन देताना वाचले वा ऐकले आहे. त्यात काही नाविन्य नाही. ताज्या घडामोडींची बऱ्यापैकी दखल घेणारे हे भाषण म्हणून त्याची एवढीच दखल घेतलेली पुरे!

Monday, January 13, 2014

'आप'लीच प्रतिमा होते...2

‘आप’ला दिल्लीत मिळालेल्या विजयाचे फार मोठे कारण म्हणजे तेथील सरकारी नोकरदार लोकांची असलेली संख्या. दिल्लीतील अनधिकृत वसाहतींना अधिकृत करण्याचे ‘आप’चे आश्वासन हे याच वर्गासाठी दिलेले होते. यात सामान्य लोकांचा कुठे संबंध आला? वीज व पाणी फुकटात (किंवा कमी भावात) देण्याने लोकांचे भले कसे काय होते? ती वचने पूर्ण करूनही त्यातील कठोर अटींमुळे केवळ 20 व 30 टक्के लोकांनाच त्याचा फायदा होतो, अशी सध्याची बातमी आहे. दिल्लीची समस्या पाणी किंवा वीज नाही, कारण देशाची राजधानी म्हणून आधीच त्या शहर/राज्याचे कोडकौतुक होते. तेथील समस्या ही कायदा व सुव्यवस्थेची आहे. याबाबतीत दिल्लीचे राज्य सरकार काही करू शकत नाही कारण तो विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो.
‘आप’च्या विरोधात जाणारे तीन मुख्य मुद्दे म्हणजे एक तर या पक्षाला विचारसरणी नाही. केवळ दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या विरोधात असलेल्या जनभावनेवर तो स्वार झालेला आहे. 1977 सालच्या जनता पक्षासारखे ते एक कडबोळे आहे आणि कुठल्याही क्षणी त्याचा स्फोट होऊ शकतो. 'आप' हा पक्ष समाजवादी विचारसरणीचा असल्याचे त्यांचे चाणक्य योगेंद्र यादव म्हणतात, मात्र फोर्ड फाऊंडेशन आणि डच दूतावासाकडून मिळालेला निधी मात्र केजरीवाल यांना चालतो. काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची इच्छा त्यांचे नेते प्रशांत भूषण म्हणतात तर गांधी घराणे व मोदींना डिवचण्याचा एकमेव कार्यक्रम कुमार विश्वास राबवतात. मग भूषण यांचे मत त्यांचे वैयक्तिक असून पक्षाचे ते मत नाही, असा खुलासा मुख्यमंत्री केजरीवाल करतात. त्यावेळी राजकारणात पुनःप्रत्ययाचा आनंद किंवा दुःख काय असते, याचा अनुभव मिळतो. सामान्य माणसासाठी सत्ता राबवण्याचे ‘आप’चे लोक बोलत असले तरी म्हणजे काय याबद्दल संभ्रमाची स्थिती आहे. महाराष्ट्रात अंजली दमानिया यांच्यासारखे संधी न मिळाल्यामुळे सज्जन असलेले लोक हे या पक्षाचे आधारस्तंभ आहेत. अन्य राज्यांत थोड्या बहुत फरकाने हीच स्थिती आहे आणि आता नव्याने शिरकाव करणाऱ्यांमुळे तर जेथे नव्हती, तेथेही अशी स्थिती होईल.
‘आप’मध्ये वाढणारी गर्दी हा आपच्या विरोधात जाणारा आणखी एक मुद्दा आहे. या पक्षात सामील होणारे लोक हाही आता कौतुकाचा भाग झाला आहे. आज हे आणि उद्या ते ‘आप’मध्ये गेले, अशा बातम्यांचे भर हिवाळ्यात पीक आले आहे. वास्तविक उगवत्या सूर्याला नमस्कार हा काही आजचा प्रकार नाही. 1988-89 मध्ये विश्वनाथ प्रताप सिंग यांनी राजीव गांधींच्या विरोधात भ्रष्टाचाराच्याच मुद्द्यावरून बंड पुकारले तेव्हा अशीच अनेक व्यावसायिक मंडळी त्यांच्यासोबत सामील झाली. त्यानंतर 1991 मध्ये भाजप जोरात असताना तेव्हाही माजी सनदी अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांची भाजपमध्ये रीघ लागली होती. परंतु म्हणून काही या पक्षांचे चारित्र्य बदलले नाही. दोन्ही पक्षांमधून एका मागोमाग पात्रे नंतर कशी पुढे आली, हे साऱ्या जगाने पाहिले आहे. फार कशाला, राम विलास पासवान, शरद यादव, लालू प्रसाद यादव व मुलायम सिंग यादव अशी वस्ताद मंडळी साक्षात् जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून पुढे आलेली. परंतु त्यांचेही गंगेचे पाणी गंगेलाच मिळाले. त्यामुळे आज केजरीवाल यांच्या सोबत ग्रामस्वच्छतेच्या बाता करणारे लोक उद्या घाण करणारच नाहीत, याची खात्री काय? कालपर्यंत काँग्रेसच्या महाराज्ञी व युवराजांचे गुणगान करणाऱ्या अलका लांबा आणि समाजवादी पक्षात जमेल तशी सत्तेची ऊब मिळविणारे कमाल फारूखी यांच्यासारखे लोक आताच ‘आप’कडे वळत आहेत. आता पक्षाची सदस्यसंख्या वाढविण्याचे मनसुबे आहेत. तेव्हा सदस्यांच्या चारित्र्याची गाळणी लावणार का आणि ती प्रभावी ठरणार का, हा खरा प्रश्न आहे.
तिसरा महत्त्वाचा मुद्दा पक्षाचा कार्यक्रम आहे. गोरगरिब जनतेला आकर्षित करतील अशा मोफत वायद्यांचा सुकाळ हा काही पक्षाचा कार्यक्रम होऊ शकत नाही. 'आप'च्या यशाने आणि त्याच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील वल्गनांनी भारावलेल्या अनेकांना आज या पक्षाच्या विरोधात बोलणारी व्यक्ती भ्रष्ट लोकांचे समर्थन करणारीच वाटते. दरिद्री नारायणाच्या कल्याणासाठी राबणाऱ्यांच्या विरोधात उठलेला भांडवलशाहीचा हस्तक वाटतो. वस्तुस्थिती तशी नाही. गोरगरिबांच्या नावाने सुरू होणाऱ्या बहुतांश योजना अंती नवकोट नारायणांचेच कल्याण करणारा ठरतो किंवा राज्य व्यवस्थेला बडुविणारा ठरतो, हा इतिहास आहे.
1995 साली महाराष्ट्रात शिवसेनेने एक रुपयात झुणका भाकर योजनेचे आश्वासन दिले आणि तिच्या अंमलबजावणीचा देखावाही उभा केली. मात्र त्या योजनेने कोणाचे पोट भरले, हे साऱ्या जगाने पाहिले. त्याच वर्षी आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव यांनी 2 रुपये किलो दराने तांदूळ पुरविण्याचे आश्वासन देऊन प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकली. त्यांनी आपले आश्वासन पाळलेही. मात्र दोन वर्षांतच त्याचा राज्यावर एवढा बोजा आला, की त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी दीड वर्षांनी बंड करून सत्ता काबीज केल्यानंतर ही योजना गुंडाळली. काही वर्षांनी आंध्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येची एक लाटच उसळली. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये प्रकाशसिंग बादल यांनी 2000च्या आगेमागे शेतकऱ्यांसाठी मोफत विजेची योजना जाहीर करून सत्ता मिळविली. मात्र त्याचा परिणाम असा झाला, की विजेसाठी पैसे देण्याची चिंता नसल्यामुळे शेतकऱ्यांनी वारेमाप मोटारी चालवून पाण्याचा उपसा केला व आज पंजाबमध्ये भूजलाची स्थिती सर्वात चिंतादायक आहे. इंदिरा गांधींनी सुरू केलेली संजय गांधी निराधार योजना असो, सोनिया गांधी मिरवत असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजना असो अथवा शरद पवार वर्ष दोन वर्षाला शेतकऱ्यांच्या नावाने जाहीर करत असलेली मदत असो, त्यांचा खरा फायदा धेंडांनाच होतो, ही वस्तुस्थिती आहे. दिल्लीत 'आप'ने अठरा हजार अनधिकृत घरे (वस्त्या) अधिकृत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचे सर्व लाभार्थी खरोखर केवळ नाडलेले-पिचलेले लोक आहेत का?
हे सर्व लिहिण्याचा उद्देश देशात भ्रष्टाचार चालू राहावा आणि प्रामाणिक लोकांनी येऊ नये, असा नाही. मात्र प्रामाणिकपणा ही काही मोजक्या लोकांची मक्तेदारी नाही आणि गोरगरिबांच्या नावाने कोणी खोटी आश्वासने व स्वप्ने दाखवून लोकांची दिशाभूल करत असेल, तर ते गैर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हीच तेवढे स्वच्छ आणि बाकी सर्व तुच्छ, हा आविर्भावही चुकीचा आहे. इतर सर्व पक्षांप्रमाणे याही पक्षालाही वेळ द्यावा, कार्यक्रम व विचारसरणीच्या आधारावर टिकून राहून त्याने कारभार केला तरच त्याचे स्वागत करावे. अन्यथा लोकांची स्थिती पुन्हा हुरळली मेंढी तेच रान अशी होईल. ते होऊ नये, इतकाच हेतू. यासाठी या पक्षाला किमान एका वर्षाचा वेळ द्यायला हवा. त्यानंतरच हा पक्ष खरोखर आपला आहे अथवा नाही, हे सांगता येईल. (संपूर्ण)

Sunday, January 5, 2014

‘आप’लीच प्रतिमा होते...

आणखी आठवडाभराने सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू झालेले असेल. मात्र उत्तरेतील आम आदमी पक्षाच्या विजयाचे उत्तर रामायण तोपर्यंत संपलेले असण्याची शक्यता नाही. नरेंद्र मोदी यांच्या झंझावातापुढे काँग्रेसची वाताहत होत असल्याचे चित्र अगदी गेल्या महिन्यापर्यंत रंगलेले असताना अचानक ‘आप’ नावाच्या घटकाने राजकीय वातावरण ढवळून काढले. या पक्षाने दिल्ली या म्हटलं तर देशाच्या, पण वास्तवात नोकरशहांच्या राजधानीत अर्ध्याला थोड्या कमी इतक्या जागा मिळविल्या. त्यामुळे मोदी नावाच्या अश्वमेधाच्या घोड्याला कसे रोखायचे, या चिंतेत पडलेल्या सर्व सेक्युलरांना आशेचा नवा किरण दिसू लागला आहे आणि बेडकीचा बैल करण्याचे उद्योग चालू झाले आहेत.
इतकी साधी माणसं झाली नाहीत अन् होणारही नाहीत, असे काहीसे चित्र ‘आप’च्या नेत्यांच्या बाबतीत चित्र जणू असे रंगविले जाते आहे. भारतात राजकारणी नावाची जमात तिच्या वाट्याला येणाऱ्या शिव्या-शाप आणि टिंगलीला पुरून उरेल एवढी वावदूक आहे. मात्र म्हणून सगळे राजकारणी गलिच्छतेचे पुतळे आहेत आणि त्यांच्यापासून मुक्ती देण्यासाठीच केवळ ‘आप’ नावाची सेना आली आहे, असा आविर्भाव तद्दन चुकीचा आहे. या वाक्यातील पहिला भाग एकवेळ खरा मानता येईल, परंतु दुसरा भाग बिल्कुल खरा आहे. हा आविर्भाव केवळ खोटा आहे म्हणून नाही, तर पिडलेल्या-नाडलेल्या कोट्यवधी लोकांची त्यामुळे फसवणूक होते म्हणूनही तो वाईट आहे. म्हणूनच अट्टल राजकारण्यांप्रमाणे लोकांची दिशाभूल करण्यात ‘आप’ची मंडळीही काही कमी नाहीत.
सुमारे अडीच वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी दिल्लीत जे आंदोलन केले, त्यावेळपासून या फसवणुकीला सुरूवात होते. अण्णा हजारे यांच्या तेव्हाच्या काही सभा-पत्रकार परिषदांना मी उपस्थित होतो. त्याबद्दल मी लिहिलेही आहे. [(ही खदखद कुठवर वांझोटी राहणार) (दादागिरी चालते, भाईगिरी चालते मग अण्णागिरी का नाही?)] मात्र त्यांचा चेहरा वापरून व त्यांच्या प्रामाणिक पण भाबड्या तळमळीचा वापर करून कोणीतरी सूत्रे हालवत असल्याचेही जाणवत होते. चार वर्षांपूर्वी कोणालाही माहीत नसलेला अरविंद केजरीवाल नावाचा माणूस या आंदोलनाने पुढे आला. त्यापूर्वी त्यांना मेगॅसेसे पुरस्कार मिळाला होता, मात्र त्यांचे नाव मोजक्या लोकांपर्यंतच पोचले होते. सामान्य माणसापर्यंत तो चेहरा पोचला अण्णांच्या आंदोलनामुळे. मात्र नंतर काँग्रेस व भाजपच्या प्रस्थापित राजकारण्यांनी राजकारणात येण्याचे आव्हानात्मक आवाहन केल्यानंतर मात्र केजरीवालांनी पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानली. त्यांनी अण्णांना टांग मारून ‘आप’ल्या पक्षाला जन्म दिला.
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या एक आठवडा आधी मी बातमीसाठी (मैं अब दिल्ली नहीं जाऊँगाः अन्ना हज़ारे)अण्णांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी दिल्लीची अनेक मंडळी अण्णांच्या संस्थेत तळ देऊन बसली होती. केजरीवालना तुम्ही पाठिंबा द्या, असा त्या लोकांनी धोशा लावला होता. त्यातील एकाने तर अण्णांच्याच पद्धतीने त्यांच्या संस्थेत उपोषण सुरू केले आणि तो उपोषणाचा चौथा दिवस असल्याचाही फलक लावला. पारनेर पोलिसांनी त्याला तिथून हलवला. या लोकांची जातकुळी काय आहे, हे पुरेसे कळून चुकलेल्या अण्णांनी तेव्हा पूर्ण मौन बाळगणे पसंत केले. राळेगण सिद्धीत त्यांच्या उपोषणाच्या वेळेस केजरीवाल यांच्याबाबत प्रश्न विचारल्यावर अण्णांनी तटकन् संवाद संपविणे बरेच काही सांगून गेले. (मात्र आता परत त्यांच्या कोलांटउड्या चालू झाल्या आहेत, त्याबद्दल नंतर कधीतरी).
सत्ता हाती आल्यानंतर गेल्या आठ दिवसांत तर असा माहोल उभा केला आहे, की जणू काही कलियुगातील समस्त हरिश्चंद्र एकत्र आलेले आहेत आणि दुष्ट विश्वामित्रांची आता खैर नाही. अर्धखुळेपणाच्या सीमेवर उभ्या असलेल्या माध्यमांनाही हे मृगजळ खरेच पाणी आहे, असे वाटू लागले. त्यातील काहींनी 'मिष्ठान्नमितरेजनाम्' या न्यायाने वाहत्या गंगेत हात धुणे चालू ठेवले आहे. वास्तविक अगदी साध्या माणसासारखे, परंतु व्यापक जनतेच्या हितासाठी उत्तम प्रशासन राबविणारे किमान तीन मुख्यमंत्री या देशाला माहीत आहेत व तिघांपैकी कोणावरही आतापर्यंत डाग नाहीत. ते तीन मुख्यमंत्री म्हणजे पाँडिचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी (आधी काँग्रेस व आता ऑल इंडिया एनआर काँग्रेस), त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार (साम्यवादी पक्ष) व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (भाजप). मात्र त्यांच्यापैकी कोणीही स्वतःचा बडेजाव मिरविला नाही. यातील पाँडिचेरीला राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून भारत सरकारने गौरविले तर त्रिपुरात सरकार यांनी लोकांनी तीन-चारदा सतत निवडून दिले आहे.
माध्यमांनीच मोठे केलेल्या केजरीवाल आणि पार्टीने मात्र साधेपणाचेच देव्हारे माजवायला सुरूवात केली. त्यात कुमार विश्वाससारख्या तोंड वाजविणाऱ्या माणसांनी तर वात आणला. रा. ग. गडकऱ्यांनी जे कवींचे वर्णन केलेले आहे, त्यात थोडा बदल करून नेत्यांचे वर्णन असे करता येईल, की खरा नेता जमिनीवर असतो आणि खोट्या नेत्याला स्वर्ग दोन बोटे उरलेला असतो.
(क्रमशः)





Wednesday, September 25, 2013

राहुल गांधी रोजगार हमी योजना - दिवसभराची

   येणार येणार असा मोठा गाजावाजा झाला होता. त्यानुसार युवराज आले, त्यांनी पाहिले व हात हातविला, आणि आले त्यापेक्षा त्वरेने निघून गेले...या एका वाक्यात त्यांच्या पुण्याच्या दौऱ्याची हकीगत खरे तर लिहिण्यासारखी आहे. परंतु त्यासाठी जो जामानिमा उभा केला गेला आणि माध्यमांना ताटकळत ठेवण्यात आले, त्यातून 'नववधू प्रिया मी बावरते'चा युवराजांचा हट्ट अजूनही गेल्या नसल्याचे स्पष्ट झाले.

सकाळी दहाच्या सुमारास काँग्रेस पक्षातर्फे बालेवाडीतील क्रीडा संकुलात जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे गेल्यानंतर कळाले, की येथे येऊन काहीच काम करायचे नाही. वाहिन्यांची मंडळी आधीपासूनच ठाण मांडून बसली होती, तर वृत्तपत्रांचे प्रतिनिधी याला विचार, त्याला विचार, असे करून 'काहीतरी' मिळविण्याचा प्रयत्न करत होते. दात कोरून पोट भरण्याचा प्रकार चालू होता.

त्यानंतर एकामागोमाग काँग्रेसजन राहुल गांधी कसे ताजेतवाने वाटत आहेत, यावेळी कसे छान बोलले, त्यांची धोरणे स्पष्ट वाटली, असे थर्ड पार्टी वर्णन करू लागले. मात्र ते आमच्याशी बोलतील का, असे विचारले, की काढता पाय घेऊ लागले. एका क्षणी कार्यकर्त्यांसाठी केलेल्या भोजनाच्या व्यवस्थेत वाटा मिळाला आणि पोटभर जेवून आम्ही तिथेच लोळू लागलो. दोन तास व्हायला आले, तरी आपण येथे कशासाठी आलो, याचे प्रयोजनच कळेना. साडेतीन वाजता ते केवळ संपादकांशी बोलणार असल्याचे कळाले.

तितक्यात पुण्याचे उपमहापौर संजय गायकवाड आले आणि त्यांनी सुरेश कलमाडी यांना पक्षात परत घेण्यासाठी राहुलना निवेदन दिल्याचे सांगितले. त्यामुळे माना टाकलेल्या कलमबहाद्दरांमध्ये जान आली. (प्रत्यक्ष वार्तांकनात अद्यापही नोंदी हातानेच घेतल्या जात असल्याने, टॅब्लेट किंवा तत्सम साधनांचा वापर होत नसल्याने वार्ताहर कलमबहाद्दरच राहिले आहेत.) लहान मुलाला वाळूच्या ढिगात छोटा शंख सापडावा आणि त्याला त्याचेच अप्रूप वाटावे, असे ते दृश्य होते. त्यासाठी चोहोबाजूंनी माहितीची खोदाई चालू होती, पण आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?

त्यानंतर दोन तास सर्व श्रमिक बौद्धिक कामगारांनी एकमेकांशी गप्पा मारत, आलेल्या मंत्री, पदाधिकारी आणि अन्य लोकांवर टीका-टिपण्या करत घालविला. कोणाशी बोलायला गेले, तर पंजाछाप टाकसाळीतील चलनी वाक्येच कानी पडत होती. मारुतीची बेंबी गार असल्याचे सगळेच सांगत होते, मारुती आणि त्याची बेंबी दिसायची मारामार होती.

तितक्यात काही वेळाने मुख्य रस्त्यावर काहीतरी गडबड झाली आणि पांढऱ्या जीपचे थवे कोणत्यातरी दिशेने निघाले. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली. काही वेळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या कोंदणात युवराज साक्षात जमिनीवरून पायी चालताना दिसले. ''वा, काय पर्सनलिटी आहे, किती गोरा आहे, काय दिसतो आहे,'' असे भिन्नलिंगी आवाजातील वाक्ये मागून कानी पडत होते आणि समोर 'खारूताई खारूताई तोंड दाखव'ची आठवण करून देत युवराजांची स्वारी दिसेनाशी झाली. 'वेटिंग फॉर गोदो'चा खेळ परत सुरू झाला.

तितक्यात काही कर्तव्यनिष्ठ पोलिसांना आपण कामावर असल्याचा त्याचवेळेस साक्षात्कार झाला. त्यांनी पत्रकारांनाच हाकलण्यास सुरूवात केली. एकाने 'आम्हाला करा अटक आणि टाका आत,' असे खास उत्तर दिल्यानंतर 'मी माझ्या वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत आहे,' असे तितकेच खास पोलिसी उत्तर आले. मग तिथून जाणाऱ्या हुसेन दलवाईंना बोलावून ही तक्रार त्यांच्या कानी घालण्यात आली. तद्दन राजकारण्याच्या खुबीने गोड शब्दांत जबाबदारी झटकून तीही स्वारी निघून गेली.

त्यानंतर उल्हास पवार यांच्या आगमनानंतर उल्लास पसरला. त्यांची रसवंती पाझरू लागली आणि मारुतीच्या गार बेंबीचा पुनःप्रत्यय सुरू झाला. तेच जंगी इरादे, त्याच कठोर कानउघाडण्या आणि तीच चिरपरिचित वाक्ये.

थोड्याच वेळात परत युवराजांची स्वारी आली आणि यावेळेस उलट्या दिशेने गेली. कोपऱ्यापर्यंत आल्यावर माध्यमीयांनाच जनता समजून ते कडे तोडून आले आणि माध्यमीयांचे कॅमेरे आणि कार्यकर्त्यांच्या सोनसाखळ्यांनी भरलेली मनगटे, यांचा असा काही कल्लोळ झाला, की झटक्यात आपली मान काढून घेऊन त्यांनी वेगाने पुढचा मार्ग पत्करला. एव्हाना संपादकांशी बोलून झाल्यावर ते माध्यमांतील 'आम आदमी' म्हणजे बातमीदारांना भेटतील, असे संदेश पसरविण्यात आले होते. त्यामुळे थांबणे भाग होते.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ थांबण्यास माध्यमीयांना सांगण्यात आले होते. त्यानुसार अर्धा किलोमीटरचा फेरा घालून सगळी वरात तिथे पोचली आणि कॅमेरे, बूम आणि लेखणीचे रुखवत सजवले गेले. सुमारे अर्धा तास झाला, तरी युवराज आले नाहीत म्हणल्यावर ते परस्पर गेले की काय, अशी असुरी शंका निर्माण झाली. एक दोघांनी त्याची वाच्यताही केली. परंतु ठिय्या कायम होता.

जवळपास तासाभराने जीपचा तोच ओळखीचा ताफा येऊ लागला. आता गाड्या थांबतील, म्हणून सर्वांच्या नजरा व माना रस्त्याकडे वळल्या. परंतु हाय रे दैवा, युवराज त्यांच्या अधीर जनतेला त्यांच्या गाडीच्या खिडकीतूनच पाहत आणि हात हलवत गेले. ते हात हलवत गेले आणि हे हात चोळत बसले. मात्र हात हलवताना त्यांची ती गालावरची मोहक खळी विलसत होती, त्यामुळे ते खोटे हसत नसतील, असे समाधान करून घेणे भाग होते.

तात्पर्यः ग्रामीण भागात रोजगार हमी पुरवणाऱ्या काँग्रेसच्या युवराजांनी बुधवार, 25 सप्टेंबर 2013 रोजी पुण्यातील माध्यमीयांना एक दिवस कामाला लावले.

Tuesday, September 10, 2013

शरद पवारांचा बावीस वर्षांनी रहस्यभेद

Sharad Pawar on Vilasrao Deshmukhशरद पवारांनी 1986-87 साली काँग्रेस प्रवेशानंतर पुढल्याच वर्षी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पटकावली. त्यानंतर 1991 साली काँग्रेसमधील स्वतःला निष्ठावान म्हणविणाऱ्या एका गटाने त्यांच्या खुर्चीला सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला. जानेवारी 1991 मधील त्या प्रसिद्ध बंडात विलासराव देशमुख आघाडीवर असतानाही पवारांनी त्यांच्याविरूद्ध काहीही कारवाई का केली नाही, याचा रहस्यभेद स्वतः पवारांनी आज केला. कदाचित पहिल्यांदाच.
गेल्या 23 वर्षांत प्रथमच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी यावर काही भाष्य केले. विलासराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आठवणी व श्रद्धांजलीच्या एका पुस्तकाचे प्रकाशन आज पवारांच्या हस्ते झाले. देशमुखांनी स्वतः काही केले नाही, त्यांचे कर्तेकरविते दिल्लीत होते, असे पवार यांनी सांगितले.
पवारांविरूद्धच्या बंडात देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि रामराव आदिक हे त्रिकूट होते. आदिक व देशमुख मंत्री तर सुशीलकुमार शिंदे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष होते. हे बंड फसल्यानंतर आदिक नंतरच्या वर्षांत विजनवासात गेले तर शिंदेंना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले आणि नंतर 12 वर्षे त्यांच्याकडे कोणतेच पद नव्हते. त्या तुलनेत विलासरावांची कारकीर्द सुरळीत चालली. (नाही म्हणायला 1995 साली लातूर मतदारसंघात त्यांना स्वीकारावा लागलेला पराभव, हा अपवाद. तो घडवून कोणी आणला, हे सगळ्यांना माहीत आहे.)

Pawar lashes out at Maha CM over delay in clearing files

सुमारे एक आठवडा चाललेल्या त्या प्रकरणात, अनेक आघाड्यांवर अपयश आल्याबद्दल आणि कॉंग्रेस पक्षावरील निष्ठा संशयास्पद असल्यामुळे पवारांच्या राजीनाम्याची देशमुख आणि इतरांनी उघडपणे मागणी केली होती.
"राजीव गांधींनी मला नवी दिल्लीला बोलावले आणि विचारले, ' महाराष्ट्रात नेमके काय चालले आहे? ' मी त्यांना उलट विचारले, 'हे तुम्ही मला विचारताय? ' नंतर त्यांनी मला सांगितले, की त्यांनी या नेत्यांना झाड फक्त जरा हलविण्यास सांगितले होते, उपटून टाकायला नाही. नंतर राजीव गांधींनी मला विचारले, "देशमुखविरुद्ध काय कारवाई करणार?" मी सांगितले, "काहीही नाही, कारण देशमुखांनी मनाने काही केले नाही. त्यांना दुसरेच लोक चालवत होते, " ते म्हणाले.
"त्यांनंतर या सगळ्यांमध्ये कोणी येऊन माझ्याकडे राजीनामा देऊ केला असेल, तर ते देशमुख होते. 'माझ्याकडून एक मंत्री मंत्रिमंडळाच्या संकेतांचा भंग झाला आहे. म्हणून नैतिकदृष्ट्या मी मंत्री असणे योग्य नाही,' असे ते म्हणले परंतु, त्यात त्यांचा दोष नव्हता, याची मला खात्री होती आणि तसे मी त्यांना सांगितले. म्हणून मी त्यांना मंत्रिपदी कायम ठेवले आणि त्यांनी उत्कृष्ट काम केले," अशी आठवण पवारांनी सांगितली.
मुख्यमंत्र्यांवर निशाणा
विलासरावांच्या त्वरित निर्णय घेण्याचा उल्लेख करून पवारांनी नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनाही चिमटे घेतले. "फाईलमधला फापटपसारा वाचत बसण्याची गरज नसते. त्यातले मुद्द्याचे काय आहे, हे समजणे हे चांगल्या प्रशासकाचे चिन्ह आहे. आणि आज फाईलवर सही करा म्हटलं, की लोकांचे हात कापतात. फाईलवर सही करताना त्यांना जसा काही तात्पुरता लकवा होतो, " ते म्हणाले.
एकुणात बऱ्याच दिवसांनी पवारांचे म्हटले तर राजकारणावर, म्हटले तर राजकारणाच्या बाहेरचे हे भाषण होते.

Friday, August 23, 2013

कळपावेगळा विवेकवादी

पाच वर्षांपूर्वी 'टाईम्स'मध्ये नुकताच लागलो होतो, त्यावेळी पहिल्यांदा मला नरेंद्र दाभोलकर यांच्या एका कार्यक्रमाला जाण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी मी अनिच्छेनेच गेलो होतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल मला थोडीफार माहिती होतीच त्यात डॉ. दाभोलकर 'साधना'चे संपादक असल्याचे आणि ते नियतकालिक समाजवाद्यांचे मुखपत्र असल्याचेही मला माहीत होते. समाजवाद्यांबद्दल एकूणच मनात अढी असल्यामुळे अंनिसशी माझ्यासारख्या सश्रद्ध माणसाचे कसे काय जमणार, हा प्रश्न होता. तो कार्यक्रम होता शैक्षणिक अभ्यासक्रमात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याच्या हक्कांची सनद प्रसिद्ध करण्याचा किंवा त्याप्रकारचा कसला तरी. डॉ. रावसाहेब कसबे हे त्या कार्यक्रमात होते, हे आठवते. तो कार्यक्रम सुरू झाला आणि सर्वात आधी मला कशाने आकर्षित केले असेल तर ते म्हणजे डॉ. दाभोलकरांची भाषा. काहीशा अनुनासिक अशा उच्चारांमध्ये बोलायला लागले, की त्यात एक नाद असायचा आणि तो नाद कानात साठवून ठेवण्याजोगा असायचा.

त्यानंतर प्रसंगोपात डॉ. दाभोलकरांशी बोलण्याचा अनेकदा प्रसंग आला आणि जाणवली ती त्यांच्यातली प्रामाणिकता. समाजवादी कंपूत वावरूनही त्यातील दांभिकतेचा स्पर्शही डॉ. दाभोलकरांना झालेला नव्हता, हे जाणवू लागले. मंचावर त्या नादमय शब्दांमध्ये ते बोलायचे, तोच ओघ अनौपचारिक संवादातही असायचा. त्यात कधीही कटुता किंवा नैराश्य आल्याचे एवढ्यांदा त्यांच्याशी बोलल्यानंतरही जाणवले नाही. बोलताना रामदास आणि तुकाराम यांसारख्या संतांची वचने किंवा स्वा. सावरकरांची विधाने वापरून आपण कळपावेगळा असल्याची जाणीव ते करून देत. मात्र त्यात कोणताही प्रयत्न किंवा अभिनिवेश नसे. कितीही आडवे किंवा अडचणीचे प्रश्न विचारले, तरी त्यांचा तोल ढळाल्याचे कधी पाहण्यात आले नाही. खासगी बोलायचे असेल तर इतरांच्या नावाने सरळ शिवीगाळ करणारे समाजवादी सोंगं पाहिलेल्या माझ्यासारख्याला याचे कौतुक न वाटले तर नवल. एखाद्या वेळी फोन केला तर पलीकडून ते म्हणत, "आता कार्यक्रमात आहे, दहा मिनिटांनी करा," आणि खरोखरच थोड्या वेळाने फोन केला तर उचलत आणि बोलतही.

डॉ. श्रीराम लागू आणि डॉ. दाभोलकरांचा एक संवादात्मक कार्यक्रम होत असे. त्यात दोघेही ईश्वर, धर्म आणि श्रद्धा व अंधश्रद्धाविषयक मांडणी करत असत. डॉ. लागूंची ईश्वराला रिटायर करण्याची भूमिका सर्वश्रुत होती. मात्र डॉ. दाभोलकर ईश्वराला पूर्णपणे न नाकारता, त्याच्या नावाने अकर्मण्यतेचा अंगिकार करण्याच्या विरोधात भूमिका मांडत असत. "संकटकाळी किंवा कृतज्ञता म्हणून एखाद्याला ईश्वराला शरण जावे वाटत असेल, तर त्याला आमची ना नाही," ही त्यांची भूमिका स्वीकारार्ह आणि सुखावह होती. मात्र म्हणून त्यांच्या सर्व भूमिका पटण्यासारख्या होत्या, असेही नाही. तरीही डॉ. दाभोलकरांबद्दल आदर वाटायचे कारण म्हणजे, हा माणूस सच्चा असल्याची जाणीव होती. सामाजिक चळवळींमधील आक्रस्ताळेपणा आणि एकांगीपणा यांपासून कोसो दूर असलेली ही व्यक्ती होती.
एरवी डॉ. दाभोलकर आयुष्यभर भोंदूगिरीच्या विरोधात लढले तरी त्यांच्याच समाजवादी गोतावळ्यात अनेकांनी स्वतःचे मठ काढून भोंदूगिरी सुरू केली. त्यातील काही तसबिरींशी बोलतो, बैलांशी बोलतो म्हणून वैचारिक छा-छूगिरी करतात आणि ते लोकांना दाखविण्यात काहींना 'वेगळे'ही वाटत नाही. मात्र डॉ. दाभोलकरांनी कटाक्षाने अशा बाबींपासून स्वतःला वेगळे ठेवले. 'साधना'चे संपादक म्हणूनही त्या नियतकालिकाला जनमानसात व्यापक स्थान देण्यात त्यांना चांगलेच यश आले. इतकेच नव्हे, तर एस. एम. जोशी हॉलसारखे सभागृह करून व्यवहार आणि तत्त्वांची त्यांनी सुरेख सांगड घातली होती.

अशा या माणसाला कोणी मारले, हा खरा प्रश्न आहे. याच्या दोनच शक्यता आहेत. एक तर सनातन सारख्या संस्थेतील कोणी माथेफिरू किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खेळी. राजू परूळेकरांसारख्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच शरसंधान केले आहेगेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे महाराष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात मुस्लिम युवक कसे निर्दोष असतात आणि हिंदूही कसे दहशतवादी असू शकतात, याचे गळाभरून वर्णन केले होते. आता डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा पहिला संशय हिंदू संघटनांवरच आला आहे. नव्हे, काही माजी साथींनी तर ट्विटरवरून त्यांना दोषी ठरवून समाजवादी संसारही मांडला आहे.

डॉ. दाभोलकरांना सनातन सारख्या संस्थेने मारले असेल, तर आस्तिक म्हणवून घेण्याची त्यांची लायकी नाही. आस्तिक किंवा नास्तिक कोणाही माणसाला मनुष्याला मारण्याची परवानगीच नाही. कारण आस्तिकाच्या दृष्टीने ईश्वर जगाचा शास्ता असल्यामुळे कोणत्याही मनुष्याच्या जन्म-मरणाचा फैसला हा त्यानेच करायचा असते. नास्तिकाच्या दृष्टीने ईश्वर वगैरे काही नसल्यामुळे या जगात जबाबदारीने वागण्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असल्याने त्यालाही असे जघन्य कृत्य करता येत नाही. त्यामुळे कोणत्याही दृष्टीने ही हत्या अत्यंत निषेधार्ह आहे.

अंधश्रद्धा विरोधी कायदा हा केवळ एक भाग झाला. डॉ. दाभोलकरांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक चांगल्या मोहिमा राबविल्या होत्या. गणेश मूर्त्यांचे हौदात विसर्जन करणे, दिवाळीच्या फटाक्यांवर खर्च करण्याऐवजी ती रक्कम सामाजिक कार्यासाठी देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे व राज्यातील सर्पमित्रांना एकत्र करून सापाच्या विषासाठी सहकारी संस्था काढणे, अशा अनेक योजना ते राबवत. मात्र त्यापेक्षाही आंतरजातीय विवाहासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. एक परिषद पुण्यातही आयोजित केली होती. जात पंचायतीची प्रकरणे पुढे यायला लागण्याच्या एक वर्ष आधी हे उपक्रम चालू केले होते. आता त्यांचे भवितव्य अंधातरीच असेल, असे सध्यातरी वाटत आहे.

या प्रकरणाचा तपास लागेल आणि दोषींवर कारवाई होईल, याबाबत मला फारशी आशा नाही. वास्तविक सध्याची एकूण परिस्थिती पाहता, मला कुठल्याच गोष्टीबद्दल कसलीही आशा नाही