Friday, November 2, 2007

रजनीरसिकाचा रसास्वाद

जनीकांत का नया ऐक्शन धमाका...पोस्टरवरील हे वाक्य वाचले आणि पावले आपोआप त्या दिशेने वळली. तमिळ सुपरस्टार रजनीकांतचा पुण्यातील एकमेव फॅन म्हणून बहुतेक परिचितांनी नियुक्ती केली असल्याने त्याशिवाय पर्यायही नव्हता. शेवटी किती दिवस रजनीचे तमिळ चित्रपटच पाहणार? रजनीकांतच्या डब चित्रपटांची एक स्वतंत्र मजा असते, हे मुथ्थु महाराजा आणि तत्सम चित्रपट पाहून अगदी तोंडपाठच झालेले. म्हणजे बघा, की डब चित्रपटांमध्ये अगदी कपाळावर आडवे गंध लावलेल्या, इरकली साड्या नेसलेल्या बायका 'दैया रे दैया' असा 'ठेठ' उत्तर भारतीय उदगार काढताना पाहिल्यावर मनोरंजन होत नाही, असं म्हणायची कोणाची बिशाद आहे?

त्यामुळेच शंकरदादा या अतीव आकर्षक आणि चित्तथरारक नावाने आलेल्या चित्रपटाची वारी करणे क्रमप्राप्तच होते. त्यात पुण्यनगरीचे भूषण ठरलेल्या रतन या चित्रपटगृहात हा सिनेमा आल्यामुळे तर मंगळवारच्या सुट्टीचे नियोजन करायला काहीच अडचण नव्हती. आता ज्यांना रतनची ख्याती माहित नाही, त्यांच्यासाठी सांगायचे तर या चित्रपटगृहात प्रेक्षकांसाठी कोणताही सामाजिक थर नसून, तिकिट काढणाऱया प्रत्येक व्यक्तीला एकाच पातळीवर आणण्याची किमया साध्य करण्यात आली आहे. चित्रपटगृहाची क्षमता सुमारे शंभर ते दीडशे जणांची असली, तरी एकसमयावच्छेदे करून एवढा जमाव तिथे जमल्याला फार काळ लोटला आहे. त्यामुळे चित्रपट चालू असतानाही अँगल आवडला नसल्यास उठून दुसऱया सीटवर बसण्याचेसुद्धा अन्यत्र दुर्मिळ असलेले स्वातंत्र्य इथे लाभू शकते.

चित्रपटाच्या पोस्टरवर पडैयप्पातील एक दृश्य, चंद्रमुखीतील दोन दृश्ये व मुथ्थुमधील गाण्याची एक झलक, असा सारा जामानिमा बघितल्यानंतर तर एका तिकिटात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पाहायला मिळणार, याची खूणगाठ बांधली. कधी एकदा थिएटरला जाऊन चित्रपट पाहतो असे झाले होते. शेवटीचा तो दिवस आला. सुट्टीचा मुहूर्त साधून स्वारी पोचली थिएटरवर. तिथे अपेक्षेप्रमाणे चार चुकार चेहऱयांव्यतिरिक्त कोणीही नव्हते.

तिकिट काढून आत पोचलो आणि बऱयापैकी, चालू असलेल्या एका पंख्याखालची जागा पटकावली. टॉकिजमधील पंख्याखाली रजनीकांतचा पंखा (फॅन) असा एक पीजेही (मनातल्या मनात) मारून घेतला. आपल्यासारखेच चुकले फकीर पाहून मात्र मन खट्टू झाले. अरे, कुठं रजनीकांतच्या चित्रपटाची रिळे उशिरा पोचल्याने मलेशियाच्या एका थिएटरमध्ये झालेली तोड़फोड आणि कुठं ही रिकामी टॉकिज! 'रजनीकांतच्या चित्रपटाला प्रेक्षक जमण्याची गरज'...एक हेडिंगही डोक्यात तरळून गेलं. मात्र स्वतःलाच आवरलं...अरे बाबा, तू ऑफिसला आलेला नाहीस...पिक्चर पाहायला आलायस...मग मात्र सगळं शरीर, मन आणि डोकं आवरून धरलं...

शंकरदादा हे चित्रपटाचे नाव असले तरी चित्रपटाशी त्या नावाचा नाममात्र संबंध आहे, हे समजायला साधारण दोन तास लागणार होते. पिक्चर डब करणाऱयांना कदाचित ते महत्त्वाचं वाटलं नसावं...खरं तर आपल्याकडची सिनेमावाली मंडळी बिनकथेचेही चित्रपट काढतात... मग केवळ नावापुरते काढायला काय हरकत आहे. असो. आता दोन तासांच्या हाणामारीची दृश्ये पाहिल्यानंतर चित्रपटाच्या कथेचा निघालेला निष्कर्ष एवढाच, की रजनीकांत (वीरा) कुठल्यातरी गावात राहत असतो. तो कशासाठी तरी शहरात येतो. एका गायन स्पर्धेत गाणं म्हणतो. (अर्धंच!) कॅसेट कंपनीच्या मालकाच्या मुलीशी त्याचं लग्न होतं. मात्र त्याची आधीची एक बायको असते. ती येते. मध्ये एक दोन प्रसंग घडतात आणि चित्रपट संपतो. वीरा या चित्रपटाची ही हिंदी आवृ्ती आहे, हे आधीच माहित होतं म्हणून बरं.

तिकिटाची संपूर्ण रक्कम मारामारीची दृश्ये पाहण्यासाठी खर्च करण्याचाच प्रेक्षकांनी चंग बांधला आहे, अशी समजूत करून केलेला हा खटाटोप. त्यामुळे हा चित्रपट मुख्यत्वे विनोदी म्हणून मानला जात असला तरी विनोदी दृश्ये शोधण्यातच टाईमपास झाला. नाही म्हणायला गंभीर प्रसंगातील 'क्यों रे, यहां पर ही तेरे कॅरियर (!) आरंभ हुआ था, यहां पे ही मै उसे खतम करूंगा' किंवा 'जब तर तुम मुझ से सामाजिक रूप से विवाह नहीं कर लेते' अशा वाक्यांनी काय जी विनोदनिर्मिती केली असेल तेवढीच.

शंकरदादा चित्रपटात अभिनेता रजनीकांत असला तरी प्रमुख भूमिका साऊंड इफेक्टचीच आहे. पार्श्वसंगीत खरोखरच चित्रपटाला आवश्यक आहे का, याची चर्चा करणाऱया मंडळींनी एकदा हा चित्रपट पाहावा. रजनीकांत पाऊल टाकतो...ठीश्श ठीश्श ठीश्श...तो मान वर करतो...ठीश्श ठीश्श ठीश्श...हात हलविला...ठीश्श ठीश्श ठीश्श...गुंडाला चोपले...ठीश्श ठीश्श ठीश्श. आता प्रत्येकच चित्रपटागृहात डॉल्बी सिस्टिम असली तर चित्रपटाची मजा ती काय? चित्रपट हे बुद्धीला चालना देणारे असावेत, असं मालकांनी कुठंतरी वाचलं असावं. त्यामुळे त्यांनी संवाद समजून घेण्याची जबाबदारी प्रेक्षकांवर टाकली. घ्या बुद्धीला आणि मेंदूला चालना...त्यामुळे अर्धा चित्रपट असाच संवादातल्या रिकाम्या जागा भराचा खेळ खेळत काढावा लागला. असे आणखी चार चित्रपट पाहिले तर आपणही एखाद्या चित्रपटाचे संवाद लिहू शकू बाप. अशा या आवाजाच्या आंधळी कोशिंबीरीत (का बहिरी कोशिंबिरीत!) केवळ ठीश्श ठीश्श ठीश्श...चा आधार फार मोठा वाटू लागला. विशेष म्हणजे थिएटरची शोभा वाढवायला आलेली मंडळीही त्याचा आस्वाद घेत होती, असं दिसलं.

एकूणात हा दोन तासांचा बहारदार कार्यक्रम संपला आणि खूपच ओकेबोके वाटू लागले. पण एका तिकिटात किती मनोरंजन करून घ्यायचं? आपण चित्रपट का पाहतो...तर ममोरंजनासाठी. मग एवढं मनोरंजन करणारा चित्रपट संपल्यावर वाईट तर वाटणारच. असो. मात्र प्रत्येक डब चित्रपट पाहायचा असा निश्चय केलेला मी आता वाट पाहत आहे पुढच्या डब चित्रपटाची. तोही रजनीकांतचा!

No comments:

Post a Comment